Monday, 30 December 2013

व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज!

प्रसिद्ध पत्रकार मुजफ्फर हुसैन यांनी छत्रपती शिवरायांवर लिहिलेला हा लेख दै. पुण्यनगरीच्या १७ डिसेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. अपाविमंच्या वाचकांसाठी तो देत आहोत.
वाचकांना आठवत असेल की व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये सलग २0 वर्षे युद्ध सुरू होते. सुरुवातीला अमेरिकेला वाटले होते की या देशाला नष्ट करणे म्हणजे जेमतेम काही तासांचे काम! परंतु प्रत्यक्षात अमेरिकेला व्हिएतनामशी युद्ध करणे जडच गेले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण असे आहे की व्हिएतनामी जनतेच्या नायकपदी विराजमान होते प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज! व्हिएतनाममधून अमेरिका बाहेर पडली आणि व्हिएतनामचा विजय झाला. त्या वेळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी विचारले की, अमेरिकेसारख्या बलाढय़ शक्तीला नामोहरम करण्यात तुम्ही कसे सफल झालात? त्या वेळी राष्ट्रपतींनी म्हटले होते की, अमेरिकेला हरवणे हे नि:संशयपणे आमच्या कुवतीबाहेरचे होते; परंतु आम्ही हिंमत सोडली नाही. राष्ट्रपती सांगतात, 'त्याच वेळी भारतातील एका शूरवीर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यावरून प्रेरणा घेऊन मी आमची युद्धनीती आखली आणि ती कसोशीने अंमलात आणली. त्याचा सुपरिणाम काहीच दिवसांत आम्हाला दिसला.' पत्रकारांनी त्या राजाचे नाव विचारताच राष्ट्रपती सहजपणे पटकन बोलून गेले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. ते जर आमच्या भूमीवर जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते. काही काळानंतर व्हिएतनामचे राष्ट्रपती मरण पावले. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी लिहून ठेवले होते की, माझ्या समाधीवर एक वाक्य अवश्य लिहा - 'छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधिस्त झाला!' आजही त्यांच्या समाधीवर हे वाक्य वाचायला मिळते.

काही काळानंतर व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्री भारताच्या दौर्‍यावर आल्या. आपल्या राजकीय रिवाजानुसार त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधी समाधी दाखवण्यात आली. त्यावर त्यांनी विचारले की, शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? बरोबरचे भारत सरकारचे अधिकारी गप्पच झाले. आजपर्यंत असा प्रश्न त्यांना कोणी विचारला नव्हता. व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर जे त्यांचे इतर अधिकारी आलेले होते त्यांनीच सांगितले की, छत्रपतींची समाधी महाराष्ट्रात रायगड येथे आहे. व्हिएतनामी परराष्ट्रमंत्री महोदया इतकं ऐकून थांबल्या नाहीत. त्यांनी छत्रपतींच्या समाधीला वंदन करण्याची इच्छा व्यक्त केली. 'ज्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेसारख्या देशाला नमवले, त्यांना वंदन केल्याशिवाय मी स्वदेशी परत जाऊ शकत नाही!' असे म्हणून त्या रायगडला गेल्या. महाराजांच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घेतले. ओल्या डोळ्यांनी त्यांनी तिथली माती उचलली. आपल्या बॅगेमध्ये ठेवली आणि कपाळाला लावली. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आश्‍चर्यचकित झाले होते. शिवाजी महाराजांवरील त्यांची श्रद्धा पाहून त्यांना वाटले. एखादा भक्त जणू या मंदिरात आपल्या देवतेची पूजा करण्यासाठी खास आला आहे! पत्रकारांनी त्यांना याबद्दल छेडले असता, मंत्री महोदया म्हणाल्या की, 'ही माती शूरवीरांची माती आहे. या मातीत शिवाजीसारख्या महान चारित्र्यवान, शूर लढवय्याचा जन्म झाला. ही माती मी माझ्या देशात नेऊन तिथल्या मातीत मिसळेन. म्हणजे व्हिएतनामच्या भूमीवरही छत्रपतींसारखा राजा जन्माला येईल.' बर्‍याच काळानंतर 'सशक्त भारत' नावाच्या मासिकाने नोव्हेंबर २0१३च्या अंकात वरील घटना प्रसिद्ध केली. वाचून सगळेच आश्‍चर्यात पडले आणि छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडवला. या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानही वाटला.

भारत सरकार या अत्यंत गौरवशाली घटनेवर पोस्टाचे तिकीट प्रकाशित करू शकणार नाही का? महाराष्ट्रासह सर्व भारतातील शिवाजीभक्तांनी जर मागणी केली तर आपण निश्‍चितच आपले हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करू शकू. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांच्या समाधीचे आणि त्यावरील वाक्याचे तिकीट पोस्ट खात्यातर्फे प्रकाशित झाले तर नक्कीच आपल्या मातृभूमीची मान अभिमानाने उंचावेल.

व्हिएतनामसारख्या अगदी छोट्या-नगण्य देशाने अमेरिकेला धूळ चारावी, हा खरोखरच एक चमत्कारच आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हा लहानसा देश आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी वर्षानुवर्षे लढत राहिला. अमेरिका अण्वस्त्रधारी देश. अक्षरश: काही मिनिटांत व्हिएतनामला भस्मीभूत करणे अमेरिकेच्या डाव्या हातचा खेळ होता; परंतु असे घडले नाही. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातील विजयी देश व्हिएतनामसमोर टिकू शकला नाही. अमेरिकेच्या शक्तिसंपन्न राष्ट्रपतींना व्हिएतनामसमोर गुडघे टेकावे लागले. अमेरिकेने हल्ला करताच व्हिएतनामी गोरिल्ला सैनिक नक्की कुठे लपून बसतात हे शोधून काढणे अमेरिकेच्या सैन्याला जमले नाही. व्हिएलनामी गोरिल्लांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेजवळ अत्यंत प्रभावी यंत्रसामग्री होती; पण या अत्यंत संवेदनशील यंत्रांनाही व्हिएतनामी गोरिल्लांनी भीक घातली नाही. व्हिएतनाम युद्धावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातून मूठभर व्हिएतनामींनी बलाढय़ अमेरिकेच्या नाकात कसा दम आणला याच्या कथा वाचायला मिळतात. अखेर व्हिएतनामचे विभाजन करणे अमेरिकेला अशक्यच झाले. या छोट्याशा देशापुढे नमते घ्यावे लागले. व्हिएतनामींची स्वातंत्र्याची ऊर्मी अणुबॉम्बही नष्ट करू शकत नाही, हे अमेरिकेला कळून चुकले. यातील योगायोगाची गोष्ट अशी की, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना ज्या पद्धतीने सतत फसवत आले तेच धोरण व्हिएतनामी सैनिकांनी अवलंबले होते. त्याबद्दलची काही उदाहरणे तर अत्यंत रोमहर्षक आहेत. अमेरिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ही होती की, व्हिएतनामी गोरिल्ला जंगलात कुठे लपून बसले आहेत, हेच त्यांना समजत नसे. त्यांची यंत्रसामग्रीही उपयोगी ठरत नव्हती. अखेर अमेरिकेच्या सीआयएने आपल्या शास्त्रज्ञांना असे एखादे जबरदस्त यंत्र बनवण्याचे आवाहन केले ज्यामुळे व्हिएतनामी सैनिकांचा पत्ता लागेल. अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञांनी विचार करायला सुरुवात केली. त्यांच्या मनात विचार आला की, सैनिक भलेही कुठेही लपून बसू देत; परंतु मल-मूत्र उत्सर्जनाची भावना प्रत्येक माणसाला असतेच. म्हणून त्यांनी मूत्रामधील रासायनिक तत्त्वांवर आधारित असे सिग्नल तयार केले. ज्यामुळे मूत्रविसर्जनाची जागा सापडेल. त्या क्षेत्रात दिवे उजळल्याबरोबर अमेरिकन सैनिक तेथे पोहोचत आणि बॉम्ब टाकून हल्ला करत. अशा पद्धतीने अनेक गोरिल्लांना ठार करण्यात अमेरिकेला यश आले. काही काळातच गोरिल्लांना ही गोष्ट लक्षात आली. या प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिएतनामी सैनिकांनी नामी युक्ती शोधून काढली. साधीच पण प्रभावी. आता हे सैनिक एका मातीच्या मोठय़ा हंड्यात मूत्र विसर्जन करायला लागले आणि तो हंडा झाडावर टांगून ठेवू लागले. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन सैनिकांना अनेक ठिकाणांहून एकाच वेळी सततच सिग्नल यायला लागले. अमेरिका अक्षरश: भांबावून गेली आणि काही दिवसांतच ही कारवाई बंद पडली.

व्हिएतनामींना खेळवण्यासाठी अमेरिका सतत काही ना काही युक्त्या करत असे. वरील प्रकारानंतर अमेरिकेने गोरिल्लांना पकडण्यासाठी चक्क ढेकणांचा उपयोग केला. असे म्हणतात की भुकेला ढेकूण नेहमी माणसांच्या वासाच्या दिशेने जात असतो. व्हिएतनामी गोरिल्ला जिथे असावेत, असा अमेरिकेचा अंदाज होता तेथे त्यांनी भुकेलेले असे लाखो-करोडो ढेकूण सोडले; पण या ढेकणांची फौज बघताच व्हिएतनामी सैनिकांनी तत्काळ त्यांच्यावर विषारी वायू सोडून त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला. अखेर अमेरिकेला हार मानण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. शेपूट घालून अमेरिका व्हिएतनाममधून चालती झाली. अशाच प्रकारच्या अनेक रोमांचक कथा स्व. पत्रकार मिलिंद गाडगीळ यांनी आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. त्या काळात मिलिंद गाडगीळ व्हिएतनाम युद्धावर नियमितपणे लिहीत असत.

छत्रपती आपल्या शत्रूला चकवण्यात अत्यंत हुशार होते. त्यामुळे मोगलांचे त्यांच्यापुढे काही चालले नाही. छत्रपतींसारखेच धोरण व्हिएतनामींनीही अवलंबले. त्यांनी अमेरिकेसारख्या समृद्ध, सबळ देशाशी अशीच आंधळी कोशिंबीर खेळत, मोगलांप्रमाणेच अमेरिकेला उखडून फेकले. व्हिएतनामींची हुशारी, त्यांची छत्रपतींवरील भक्तीने प्रभावित होणार्‍या आपण भारतीयांनी भारताच्या या सुपुत्राला वंदन करूया!

-मुझफ्फर हुसेन 
(शब्दांकन : अवंती महाजन)

No comments:

Post a Comment