Showing posts with label महर्षि विठ्ठल रामजी शिंदे. Show all posts
Showing posts with label महर्षि विठ्ठल रामजी शिंदे. Show all posts

Monday, 19 August 2013

धोंडो केशव कर्वे यांचा जातीय अहंगंड

कर्वे यांच्या आश्रमात होत्या फक्त ब्राह्मण मुली

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

महाराष्ट्रातील स्त्रिशिक्षणाची मूहुर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली. फुल्यांचे हे कार्य धोंडो केशव कर्वे यांनी पुढे नेले. १९५८ साली धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. असे असले तरी महात्मा फुले आणि कर्वे यांच्या कामात मूलभूत फरक होता. फुल्यांचे कार्य जातीनिरपेक्ष होते, तर कर्वे यांचे कार्य जातीधिष्ठित होते. कर्वे हे जातीने ब्राह्मण होते. त्यांनी आपल्या आश्रमात केवळ ब्राह्मणांच्या विधवा आणि परित्यक्ता मुलींना शिक्षण दिले. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे  यांना धोंडो केशव कर्वे यांच्या ब्राह्मणी  जातीयवादाचा कडू अनुभव आला होता. आपल्या आत्मचरित्रात महर्षि शिंदे यांनी या कडू आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

सासर तुटलेली आपली बहीण जनाक्का हिला शिक्षण मिळावे यासाठी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना त्या काळी प्रचंड यातायात करावी लागली. पंडिता रमाबाई यांनी जनाक्काला आपल्या शारदा सदनात प्रवेश नाकारल्यानंतर महर्षि शिंदे यांनी अन्यत्र कोठे व्यवस्था होऊ शकते का, याचा तपास सुरू केला. १८९५ साली महर्षि शिंदे पुण्यात आले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी १८९६ साली धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या गावात बालिका आश्रम स्थापन केला होता. विधवा आणि परित्यक्ता मुलींना आश्रय आणि शिक्षण देणे, असा कर्वे यांच्या बालिका आश्रमाचा उद्देश होता. कर्वे यांना पुण्यातच आश्रम सुरू करावयाचा होता. तथापि, पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्या कार्यात खोडे घातले. स्त्रियांना शिक्षण देणे हे मनुस्मृतींच्या विरोधात असल्याचे सांगून ब्राह्मण कर्वे यांच्या कार्याला विरोध करीत होते.

ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही!
कर्वे यांच्या  आश्रमाची माहिती महर्षि शिंदे यांना कळाली. महर्षि शिंदे हे सुधारकी बाण्याचे होते. कर्वे यांच्या कामाबाबत महर्षि शिंदे यांना आस्था वाटली. जनाक्काला कर्वे यांच्या आश्रमात टाकावे आणि झालेच तर आश्रमासाठी काही कामही करावे, असा दुहेरी हेतू मनात ठेवून महर्षि शिंदे हिंगण्याला गेले. कर्वे यांचा आश्रम नुकताच कुठे सुरू झालेला होता. कर्वे यांना आण्णासाहेब म्हटले जाई. त्यांच्या भेटीचा वृत्तांत महर्षि शिंदे यांनी तपशिलाने लिहिला आहे. महर्षि शिंदे लिहितात :
‘‘...शेणामातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या एका खोपटात प्रो. आण्णासाहेब जमिनीवर बसले होते. त्यांच्या आश्रमात ब्राह्मण जातीच्या १०-१५ विधवा मुली होत्या. माझ्या बहिणीस आपल्या आश्रमात घेता का, ह्या माझ्या प्रश्नाला ‘ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही' असे प्रो. आण्णासाहेबांनी सांगितले व माझ्या बहिणीस आश्रमात घेण्याचे साफ नाकारले. त्यामुळे माझी फारच निराशा झाली. तत्कालिन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचे हे उदाहरणच आहे...''

धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात ज्या काही १०-१५ मुली होत्या त्या सर्व ब्राह्मणांच्याच होत्या. इतर जातीतील मुलींना कर्वे आपल्या आश्रमात प्रवेश देत नसत, हे कडू वास्तव महर्षि शिंदे यांना अनुभवायला आले. सुधारकांनाही जातीची बंधने तोडणे योग्य वाटत नव्हते. हा सारा प्रकार पाहून महर्षि शिंदे कमालीचे व्यथित झाले.

ख्रिस्ती शाळेने दिला जनाक्काला प्रवेश
आधी पंडिता रमाबाई आणि नंतर धोंडो केशव कर्वे यांनी जनाक्काला आपल्या आश्रमात ठेवून घेण्यास नकार दिला. पण महर्षि शिंदे  हरणा-यांपैकी नव्हते. जनाक्काला शिकवायचेच, असा निश्चय त्यांनी केला होता. पुढे त्यांनी जनाक्काला पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागेतील मुलींच्या हायस्कुलात घातले. ही शाळा ख्रिस्ती होती. मिस हरफर्ड नावाची एक युरोपियन बाई शाळेची हेडामास्तरीण होती. ख्रिस्ती शाळांत कोणताही जातीभेद पाळला जात नसे. येथे जनाक्काला सहजपणे प्रवेश मिळाला. जनाक्काची शाळा सुरू झाली, पण फीसचा प्रश्न निर्माण झाला. या शाळेत मिस मेरी भोर नावाची एक हुशार ख्रिस्ती बाई शिक्षकीण होती. त्यांनी हेडमास्तरीण बार्इंना सांगून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केले. जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांकडून दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली.

आणि अशा प्रकारे जनाक्काच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

संदर्भ :
माझ्या आठवणी व अनुभव
लेखक : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे
प्रकरण : इंटरमिजिएटचे वर्ष







Sunday, 18 August 2013

जनाक्काच्या शिक्षणासाठी महर्षि शिंदे यांची धडपड

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

गोष्ट आहे १८९५-९६च्या आसपासची. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुण्यात सदाशिव पेठेत राहत होते. नागनाथाच्या पाराजवळ एका जुन्या वाड्यात त्यांच्या कुटुंबाचे बि-हाड होते. मातोश्री, बहीण जनाक्का आणि स्वत: महर्षि असे तिघांचे हे कुटुंब. सासरच्या जाचामुळे जनाक्का कायमची माहेरी आली होती. त्या काळी अल्पवयात लग्ने होत. जनाक्काचे वय शिकण्याचे होते. महर्षि शिंदे यांनी जनाक्काला शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. सदाशिव पेठेत चिमण्या गणपतीजवळ एका ख्रिस्ती मिशन-यांच्या शाळेत त्यांनी तिला पहिल्यांदा घातले. सांगले नावाच्या हेडमास्तरीण बाई होत्या. त्यांनी शिंदे यांना सहकार्य केले.

राजवट इंग्रजांची होती. फुकट शिक्षण मिळत नसे. फीस भरणे परवडणारे नव्हते. महर्षि शिंदे यांनी कुठे सोय होते का याचा शोध चालविला. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेचे नाव त्यांच्या समोर आल्या. पंडिता रमाबाई या मूळच्या चित्पावन ब्राह्मण होत्या. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून धर्मप्रसाराचे काम पुण्यात नेटाने सुरू केले होते. धर्मप्रसाराला समाज सेवेचा बुरखा पांघरलेला होता, इतकेच. महर्षि शिंदे पंडिता रमाबाई यांना भेटायला गेले. महर्षि शिंदे खेड्यातून आलेले. त्यांचा बावळा वेष पाहून बाईंनी अटींचा पाश आवळला. मुलीला आश्रमात ठेवते पण पाच वर्षे तुम्हाला तिला भेटता येणार नाही, अशी एक कडक अट त्यात होती. तुम्ही तिच्या शिक्षणात अडथळा आणाल म्हणून ही अट असल्याचे बाई म्हणाल्या. महर्षि शिंदे वस्ताद होते. ते म्हणाले, अहो बाई, मीच तिला शिक्षणासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. तिच्या शिक्षणात अडथळे आणायचे असते, तर तिला तुमच्याकडे घेऊन आलोच असतो कशाला? तिचे धर्मांतर करण्यात माझा अडथळा नको, म्हणून तुम्ही ही अट घातली हे उघड आहे.

बावळ्या दिसणा-या २०-२२ वर्षांच्या तरुणाच्या तोंडून अशी हुशारीची वाक्ये ऐकून बाई चमकल्या. त्यांनी अधिक चौकशी केली. हा मुलगा फर्ग्युसन कॉलेजात शिकलेला आहे, हे ऐकल्यानंतर बाई बदलल्या. फर्ग्युसन कॉलेजातील  प्रोफेसर मंडळी नास्तिक आहेत, असा शेरा मारून बार्इंनी जनाक्काला शारदा सदनमध्ये प्रवेश नाकारला.


संबधित लेख :
आगरकर यांचा मराठा द्वेष
महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा



Sunday, 4 August 2013

आगरकर यांचा मराठा द्वेष

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.   

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात त्या काळातील पुण्याचे आणि पुण्यातील माणसांचे त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह वर्णन आले आहे. पुण्याचा सामाजिक इतिहासच हे आत्मचरित्र सांगते. इतिहासांच्या पानावर मोठी असलेली अनेक माणसे प्रत्यक्षात कशी जातीय डबक्यातली बेडकं होती, हे महर्षि शिंदे यांच्या आत्मचरित्रातील निर्मळ वर्णनातून कळते. यापैकीच एक पात्र आहे गोपाळ गणेश आगरकर. महान समाजसुधारक म्हणून आगरकरांचे त्यांच्या हयातीतच नाव झाले होते. पण प्रत्यक्षात जीवनात ते कट्टर चित्पावन ब्राह्मण होते. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनात द्वेष ठासून भरलेला होता. 

महर्षि शिंदे हे १८९३ ते १९९८ या ६ वर्षांच्या काळात पुण्यात फग्र्युसन कॉलेजात शिकायला होते. फर्ग्युसन कॉलेजची महिन्याची फीस १० रुपये होती. एका वेळी ३ महिन्यांची फी भरावी लागे. त्याकाळी पुण्यात डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाची एक संस्था होती. ही संस्था मराठा समाज आणि इतर बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत करीत असे. गंगाराम भाऊ म्हस्के आणि राजन्ना लिंगो यांनी मिळून ही संस्था काढली होती. श्री. म्हस्के साहेब संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी होते. महर्षि शिंदे यांनी पुण्यात आल्या आल्या म्हस्के साहेबांची भेट घेतली. म्हस्के साहेबांनी त्यांना दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यानंतर राहण्या-खाण्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. गरीब मुलांना नादारी देऊन फी माफ करण्याची योजना तेव्हा फर्ग्युसन कॉलेजात होती. नादारी देण्याचे अधिकार कॉलेजच्या प्राचार्यांना होते. फर्ग्युसनचे प्राचार्य वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) निवृत्त झाले होते. गोपाळ गणेश आगरकर हे नवे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. महर्षि शिंदे यांनी नादारीचा अर्ज घेऊन आगरकरांची भेट घेतली. "मला मराठा एज्युकेशन असोसिएशनची १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.", असे महर्षि यांनी आगरकरांना प्रामाणिकपणे सांगून टाकले. झाले. ‘मराठा असोशिएशन'चे नाव ऐकताच आगरकरांच्या भुवया ताठ झाल्या. इतर एकही शब्द न ऐकता आगरकरांनी नादारी मिळणार नाही, असे सांगून टाकले. 

हा सगळा किस्सा महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात आला आहे. महर्षि यांनी भेट घेतली तेव्हा आगरकर हे पुण्यात राहत नसत. पुण्याबाहेर एका विस्तीर्ण जागेवर झोपडी बांधून ते राहत. याच झोपडीच्या जागेवर नंतर फर्ग्युसन कॉलेजच्या इमारती बांधण्यात आल्या. महर्षि हे १८९२ साली जमखंडी येथे काही काळ शिक्षक होते. तेथे आगरकरांची कथित कीर्ति महर्षि यांच्या कानावर गेली होती. महर्षि लिहितात : "इ.स. १८९२ साली मी जमखंडी शाळेत शिक्षक असताना त्यांचे सुधारक पत्रातले लेख माझ्या वाचण्यात येऊन माझी मते झपाट्याने सुधारणेच्या बाजूची बनत चालली होती. पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा ह्या कल्पनेशी नीट मेळ जमेना." 

शिंदे-आगरकर भेट
महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे यांनी लिहिले : "माझ्या भेटीची वेळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराची होती. दिवस हिवाळ्याचे होते. आगरकर कायमचेच देमकरी होते. ते झोपडीच्या बाहेर अंगणात उभे होते. लोकरीचा जवळ जवळ फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचे नेसलेले धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस. पायात आगरकरी सुधारणेचा जोडा- म्हणजे ब्राह्मणी जोडाच; पण त्याचे टाचेवरचे कातडे टाचेच्या मागे वर उभे केलेले. मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयांचे केस दाट व डोळे qकचित खोल व भेदक असे हे दर्शन घडले. माझा अर्ज पाहून मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशीप मिळत आहे हे ऐकल्याबरोबर स्वारीने मला फी माफ व्हायची नाही हे निर्भिडपणे सांगितले. आधीच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तिमुळे मी जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती आणि त्यावर हा नकाराचा बॉम्ब मजवर आदळल्यामुळे आगरकरांविषयी माझा ग्रह अनुकूल झाला नाही. हा गृह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशी माझा पुढे जो अत्यल्प पत्यक्ष संबंध आला त्यामुळे म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाही.…. "

कॉलेजात असतानाही पक्षपातीपणाचा अनुभव महर्षि शिन्दे यांना वरचेवर येत गेला. पुढील वर्णनात शिन्दे यांनी लिहिले की : "… विशेष पेच हा की, त्या आगरकर महाशयांनी मला नादारी दिली नाही, त्यांच्या सुधारकातील लेख वाचून माझी त्या हरीवरील श्रद्धा बरीच कमी होत आली होती." 

हे सारे लिहित असताना महर्षि शिन्दे यांनी पिढीजात घरंदाजपणा आणि मनाचा मोठेपणा सोडला नाही. आगरकर आणि कॉलेज बद्दल ते अपशब्द वापरीत नाहीत. उलट आपल्याला आपल्या मनात जो काही कटु विचार आला त्याला आपला अजाणपणा कारणीभूत होता, असे म्हणून ते सारा दोष स्वत:कडेच घेतात. महर्षि लिहितात : "..खरोखर पाहता ह्याच आगरकरांचा इतर प्रोफेसरांचा qकवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा काहीच दोष नव्हता. केवळ ह्या निराशेला माझा अजाणपणा व अननुभवीपणा कारण होय." महर्षि शिन्दे यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही संतवृत्ती खरोखरच अद्भूत होय. कुठे चित्पावनी ब्राह्मणवाद जोपासणारे आगरकर आणि कुठे या जातीयवादाला माफ करून दोष स्वत:च्या माथी घेणारे महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे. 

महर्षि यांच्या मोठेपणास त्रिवार मानाचा मुजरा. 



महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.   

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका नेहमीच नि:पक्षपातीपणाची राहिली आहे. आपल्या लेखनात कोणताही जातीय अभिनिवेश त्यांनी ठेवला नाही. आगरकरांचा चित्पावनी अवतारातील जातीयवाद त्यांनी ज्या प्रमाणे मांडला, त्याच प्रमाणे त्याकाळी मराठा समाजातील शिक्षितांचा आडमुठ्ठेपणाही मांडला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असतानाच परीक्षेची फी भरण्याची वेळ आली तेव्हाचा महर्षि शिन्दे यांनी सांगितलेला एक किस्सा त्यांच्या नि:पक्षपातीपणाची साक्ष देतो. 

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या प्रीव्हिएस परीक्षेला बसायचे तेव्हा पुन्हा पैशांची अडचण निर्माण झाली. परीक्षेची फी २० रुपये होती. म्हस्के साहेबांकडे पुन्हा पैसे मागण्यासाठी जाणे शिंदे यांना प्रशस्त वाटेना कारण त्यांनी आधीच दरमहा १० रुपयांची व्यवस्था करून दिलेली होती. शिंदे जेथे राहत त्या तापडपत्रीकरांच्या वाड्यात नरहरपंत नावाचा एक गरीब ब्राह्मण भटकीसाठी येत असे. नरहरपंताला शिंदे यांचे विशेष कौतुक वाटे. मराठा असूनही हा मुलगा इतके शिकला ही धारणा या कौतुकामागे होती. नरहरपंताने महर्षि शिंदे यांना पुण्यातील अनेक मान्यवरांचे पत्ते मिळवून दिले. या भटकंतीतून महर्षि शिंदे यांच्याकडे १४ रुपये जमले. आणखी ६ रुपयांची गरज होती. शुक्रवार पेठेत म्युनिसिपालिटीचा दवाखाना होता. तेथे डॉ. शेळके नावाचे एक डॉक्टर होते. त्यांचा पत्ता नरहरपंताने महर्षि शिन्दे यांना दिला. महर्षि शिन्दे हे डॉ. शेळके यांना भेटायला गेले. डॉ. शेळके यांनी पैसे तर दिले नाहीच. उलट जिव्हारी लागेल, असा उपदेश मात्र केला. डॉ. शेळके म्हणाले, "मराठ्यांच्या कुळात जन्मून असे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखवीत. कशास शिकावे?"


संबधित लेख :

आगरकर यांचा मराठा द्वेष
महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा