Showing posts with label स्वाध्याय परिवाराचे सत्य स्वरूप. Show all posts
Showing posts with label स्वाध्याय परिवाराचे सत्य स्वरूप. Show all posts

Wednesday, 17 April 2013

पांडुरंग आठवले यांनी चोर-लुटारू कोणाला म्हटले?

म्हणे, एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही!

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

समताधिष्ठित वारकरी सांप्रदायाला संपवून ब्राह्मण वर्चस्ववादी धर्माची स्थापना करण्यासाठी स्वाध्याय परिवाराचा जन्म झाला आहे, याचे सुतोवाच आम्ही मागच्या लेखात केले होते. त्याबाबत आज जरा विस्ताराने पाहू या.  पांडुरंग बुवा आठवले यांच्या प्रवचनांतील उतारेच्या उतारे वैष्णवधर्मीय वारक-यांच्या श्रद्धांची टिंगल-टवाळी करतात. वारक-यांवर थेट हल्ला करण्याचे मात्र आठवले टाळतात. थेट हल्ला केल्याने वारक-यांकडून आक्रमक प्रतिहल्ला होईल, हे न ओळखण्याएवढे आठवले अडाणी नव्हते. त्यामुळे वारक-यांविरुद्ध छुपी विष पेरणी करण्याचे तंत्र आठवल्यांनी वापरले. वारक-यांचा उल्लेख टाळून त्यांच्या श्रद्धांना ते टार्गेट करतात. 

१५ दिवसांनी येणा-या एकादशीला दिवसभर उपवास करणे आणि रात्री संतांच्या भजनाचा जागर करणे, हा वारकरी धर्म आणि अन्य वैष्णव पंथीयांच्या धर्मश्रद्धेचा पाया आहे. पायावर घाव घातला की इमारत आपोआप कोसळेल, असा अंदाज बांधून पांडुरंग बुवा आठवले यांनी एकादशीच्या उपवासाला आणि संतांच्या भजनाला थोतांड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकादशीच्या दिवशी सर्वांनी मिळून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही' असे आठवले म्हणतात. येथे वारकरी हा शब्द वापरण्याचे आठवले टाळतात. हे कपटनाट्य आहे. याला नथीतून तीर मारणे म्हणतात. पण आठवले यांच्या विवेचनात एकादशी आणि भजनाचा (ज्याला आठवले आक्रोश म्हणतात) उल्लेख असल्यामुळे हा हल्ला वैष्णव आणि वारक-यांवरच आहे, हे स्पष्टच आहे. या पुढे जाऊन आठवलेबुवा एकादशीला संतांची भजने म्हणणा-यांना (म्हणजेच वारक-यांना) आळशी, निष्क्रिय अशी विशेषणे लावतात. इतकेच नव्हे तर या भोळ्या भक्तांची चोर-लुटारू अशी संभावना करण्याचा नतद्रष्टपणाही करतात. वारक-यांची अशी  अवहेलना आठवले अनेक ठिकाणी करतात. 

'दशावतार' या पुस्तकातील पान क्र. ११ वरील हा उतारा पाहा : 

‘...दर एकादशीच्या दिवशी आळशी आणि निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात : ‘प्रभो! ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक.' पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही, हा शास्त्रीय सिद्धांत आहे.... गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधूनाम' असेल, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी भगवान येतो. चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही...'१

वारक-यांची अशी मानहाणी करण्यासाठी पांडुरंगबुवा आठवले वेदांची साक्ष काढतात. ‘दशावतार' या पुस्तकात पान क्र. १४ वर आठवले काय म्हणतात ते पाहा : 

‘...कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...'२

एकादशीचा नेम करणा-या वैष्णवांचे संतभजन पांडुरंगबुवांच्या दृष्टीने आक्रोश असून वैष्णवांचा देव दगड आहे. या बडबडीला आठवले वैदिक सिद्धांत म्हणतात. बहुजन समाजाची थट्टा करणारे हे विवेचन वैदिक सिद्धांत असूच शकत नाही. हा असुरी सिद्धांत आहे. मानवतेची हेटाळणी करणा-या पांडुरंगबुवांच्या या सिद्धांताला ‘दादासुराचा सिद्धांत' म्हणणेच अधिक योग्य ठरेल.

संदर्भ 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ११ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.

२. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. १४ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.


या विषयावरील इतर लेख

म्हणे, ब्राह्मणांसाठीच ईश्वर अवतार घेतो

पांडुरंगबुवा आठवले यांचा आणखी एक बोगस सिद्धांत

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगबुवा आठवले हे आपल्या नावापुढे शास्त्री ही पदवी लावतात. शास्त्र शिकवतो तो शास्त्री! पांडुरंगबुवा आठवले कोणते शास्त्र शिकवितात? पांडुरंगबुवा हे ब्राह्मणी वर्चस्वाचे शास्त्र शिकवितात. पण,  जातीभेद करणे हे शास्त्र कसे काय असू शकते? पांडुरंगबुवांची शिकवण हे शास्त्र नसून बहुजन समाजाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी वापरले गेलेले शस्त्र आहे.

एकादशीला उपवास करून संतांची भजने म्हणणा-या वारकरी व अन्य वैष्णवांसाठी ईश्वर अवतार घेत नाही, असा दावा पांडुरंग बुवा आठवले यांनी केल्यानंतर लोकांच्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की, मग ईश्वर पृथ्वीवर अवतार कोणासाठी घेतो. यावर आठवलेबुवा अत्यंत खुबी उत्तर देतात : ईश्वर हा केवळ ब्राह्मणांसाठीच अवतार घेतो!

'दशावतार' या पुस्तकात आलेले या विषयावरील विवेचन भयंकर विषारी आहे. भारतीय समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले पाहिजे. इतर सर्व जातींनी ब्राह्मणांच्या आज्ञेत राहिले पाहिजे अशाच आशयाची शिकवण पांडुरंगबुवांनी या विवेचनात दिली आहे. या पुस्तकात छापलेले परशुरामाच्या अवतारावरील पांडुरंगबुवांचे प्रवचन इतके जातीयवादी आहे की, त्याची तुलना कोणाशीच करता येऊ शकत नाही. या प्रवचनात ‘विदुषक ब्राह्मण' या विषयी काही विवेचन आले आहे. ते पाहिले की याची प्रचीती येते.

आठवले म्हणतात : ‘..तुम्ही जुनी नाटके वाचा. त्यात एक ब्राह्मण असतो. त्याला विदुषक म्हणून दाखविले जाते. आजही अधिकांश ब्राह्मण विदुषकाप्रमाणेच बनत चालले आहेत. कित्येक वेळा ब्राह्मणांची अशी अवस्था झाली आहे. आणि वारंवार भगवंताला अवतार घ्यावा लागला आहे...ज्यांच्यावर वैदिक संस्कृती, भारतीय गौरव, भारतीय सभ्यता व मानव सभ्यता ह्यांची फार मोठी जबाबदारी आहे अशा ब्राह्मणांना ज्यावेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते. त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही...'१

आठवलेबुवांचे प्रवचन खरे मानले तर ज्या काळी वर उल्लेखिलेली नाटके आली, तेव्हाच देवाने अवतार घ्यायला हवा होता. पण अजून तरी तो अवतरलेला नाही. ब्राह्मणांना विदुषक बनवूनही देव आलेला नाही, याचाच अर्थ आठवल्यांचा कथित वैदिक सिद्धांत खोटा ठरला आहे. 

बहुजन समाजाचा विदुषक झाल्यावर देव काय करतो?
भारतीय समाज-संस्कृतीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवी सभ्यतेची जबाबदारी केवळ आणि केवळ ब्राह्मणांवर आहे, असा भ्रम येथे आठवलेबुवा निर्माण करतात. पण, संस्कृतीचा हा मक्ता ब्राह्मणांना कोणी दिला? ब्राह्मणांचा विदुषक झाल्यावर देव अवतार घेत असेल तर बहुजन समाजाची अवस्था विदुषकासारखी झाल्यावर देव काय करतो. सर्कशीतील विदुषकाची लोक जशी गंमत पाहतात, तशी देव बहुजनांची गंमत पाहतो का? बहुजन समाज देवाच्या पोटाखाली आलेला आहे, असे आठवल्यांना वाटत होते की काय कोण जाणे? ब्राह्मणांना देवाने निर्माण केले आणि बहुजनांना  सैतानाने निर्माण केले, असे काही आहे का? 

आठवलेबुवांच्या या विवेचनात एक मोठी मेख आहे. ‘ब्राह्मणांना ज्या वेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते', असे जेव्हा आठवलेबुवा म्हणता, तेव्हा त्यांना बहुजनांना धाक घालायचा असतो. खबरदार, ब्राह्मणांच्या विरोधात काही बोलाल तर देव तुमचा बंदोबस्त करील, अशी ताकीद आठवले देऊ इच्छितात. धर्माची भीती घालून ब्राह्मणांनी हजारो वर्षे पोटे भरली. तोच उद्योग येथे आठवलेही करून जातात.

ब्राह्मणांना देवाने जन्मत:च जानवे घालून का पाठवले नाही?
आम्ही सांगतो, ब्राह्मणांचीच काय कोणाचीच अवस्था विदुषकासारखी होता कामा नये. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. तरच हा समाज टिकेल. ब्राह्मण हे देवाचे आवडते आहेत आणि बहुजन नावडते आहेत, असे जर आठवले आणि त्यांच्या स्वाध्याय परिवाराला वाटत असेल, ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत असे म्हणावे लागते. फक्त ब्राह्मणच देवाचे लाडके असते, तर देवाने ब्राह्मणांना मातेच्या पोटात असतानाच जानवे घातले असते आणि ब्राह्मणाचे मूल हे जानवे गुंडाळूनच जन्माला आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. बहुजनांची मुले जशी नाळ गुंडाळून जन्माला येतात तशीच ब्राह्मणांची मुलेही नाळ गुंडाळूनच जन्माला येतात. हाच खरा सिद्धांत आहे. या सिद्धांताला तुम्ही वैदिक म्हणा नाही तर अवैदिक, पण तोच सत्य आहे.

संदर्भ
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ८४,८५ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई. 


वरील विवेचनाचा पुरावा म्हणून पांडुरंग आठवले यांच्या दशावतार या पुस्तकातील एका पानाची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासू वाचकांनी ती अवश्य पाहावी. 


Tuesday, 2 April 2013

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला

राजा मइंद


पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान जातीय ब्राह्मणवादी विचारांनी भरलेले आहे. या पुस्तकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची कुत्सित शब्दांत हेटाळणी करण्यात आली आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.  तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.

पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : 

...ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१

किती ही थापेबाजी? तुकोबांना इश्वराचे दर्शनच झाले नाही, असे विवेचन करून आठवले तुकोबांचा घोर अपमानच करतात. तुकोबांना इश्वराचा साक्षात्कार झाला होता. त्या विषयीचे शेकडो अभंग त्यांच्या गाथ्यात आहेत. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा' अशी तुकोबांची अवस्था झाली होती. पण, त्याकडे आठवलेबुवा सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 

वारकरी धर्माविरोधात ‘स्वाध्याया'चे कारस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी, असा अवमानकारक अपप्रचार करून पांडुरंगबुवांना आठवल्यांना काय साध्य करायचे होते? वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात वैदिक धर्मातील विषमते विरुद्ध बंड पुकारले. धार्मिक क्षेत्रात समतेचा झेंडा रोवला. आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे. वारकरी धर्माचा थेट फटका ब्राह्मणांना बसला. धर्मक्षेत्रातील ब्राह्मणांच्या एकाधिकारच वारकरी संतांनी प्रहार केले. त्यामुळे विषमतावादी ब्राह्मणी विचारांचा पुरस्कार करणा-यांचा वारकरी सांप्रदायावर विशेष राग आहे. वारकरी धर्मातील प्रत्येक संताला ब्राह्मणांनी छळले. ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंत सर्वच संतांना ब्राह्मणांच्या या छळाला तोंड द्यावे लागले. वारकरी संत मात्र ब्राह्मणांपुढे झुकले नाही. वारक-यांचा समतेचा विचार मारला जाऊ शकला नाही. त्यामुळेच वारकरी धर्म हा महाराष्ट्राचा मुख्य धर्म बनू शकला. 

थेट विरोध करून वारक-यांचा विचार संपविला जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर विषमतावादी ब्राह्मणी विचारांच्या पुरस्कत्र्यांनी आता छुप्या पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परीवार याच मार्गाने चालला आहे. महाराष्ट्रातील समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या पुस्तकातील उतारे पाहिले की, स्वाध्याय परिवाराचा छुपा अजेंडा लक्षात येतो. 


संदर्भ : 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ६ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.




Wednesday, 19 October 2011

स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन

स्वाध्याय परीवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. हा दिवस त्यांचे अनुयायी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. यासंबंधी तसेच एकूणच परीवाराच्या विचारधारेसंबंधी मला काही प्रश्न पडले आहेत. आज निमित्त आहे म्हणून मी ते येथे मांडते.  

१. स्वाध्यायी लोक धर्मप्रचारार्थ बाहेर पडतात, कोणाच्या घरचे अन्न घेत नाहीत. इतकेच काय पाणीसुद्धा स्वत:चे स्वत:सोबत घेऊन येतात. माझ्या घरी त्यांचे एक पथक आले होते, तेव्हा मी स्वत:च हा अनुभव घेतला.
माझा प्रश्न :  पूर्वी ब्राह्मण समाज इतर समाजाच्या हातचे काहीही खातपीत नव्हता. इतर जातींच्या हातचे काही खाल्ले-पिल्ले तर आपल्याला बाट लागेल, अशी ब्राह्मणांची तेव्हा समजूत होती. हा भेदाभेद आज संपत आला आहे. फार थोड्या प्रमाणात तो सुरू आहे.  बाटाची ही विचारधारा स्वाध्याय परीवार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहे का? परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

२. पांडुरंगशास्त्र्यांच्या हयातीत स्वाध्याय परीवाराचे दैवत होते योगश्वर रूपातील श्रीकृष्ण आणि मुख्य ग्रंथ होता गीता. त्यामुळे हिंदू म्हणविणाèया सर्व लोकांना पांडुरंगशास्त्री हे काही वेगळे सांगत नसून आपलीच मूळ परंपरा पुढे नेत आहेत, असे वाटले. त्यांना मोठा अनुयायीवर्ग मिळाला.
माझा प्रश्न :  स्वाध्याय परीवाराने आता अमृतालय नावाने आपली स्वतंत्र प्रार्थनागृहे म्हणजेच मंदिरे बांधणे सुरू केले आहे. अमृतालयात योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीच्या बरोबरीने पांडुरंगशास्त्र्यांची प्रतिमा ठेवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ शास्त्रीबुवांना परीवाराने देवाचे स्वरूप देऊन कृष्णाच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. शास्त्रीबुवांची कृष्णाच्या बरोबरीने प्रतिष्ठापना करणे योग्य आहे का? 
३. शास्त्रीबुवांच्या हयातीत स्वाध्याय परीवार स्वत:ला हिंदूच म्हणवून घेत असे. गीता हा मूळ ग्रंथ म्हणून त्यांनी त्यासाठीच स्वीकारला होता.
माझा प्रश्न :  आता स्वाध्याय परीवाराने अमृतालय नावाने स्वत:चे स्वतंत्र मंदिर निर्माण केल्यामुळे परीवाराला आता  हिंदू म्हणावे का? स्वत: परीवाराची याबाबत काय भूमिका आहे. परीवार स्वत:ला अजूनही हिंदूच म्हणवतो का? 
४. स्वाध्याय परीवाराने अजून तरी अधिकृतरित्या हिंदू धर्मापासून फारकत घेतलेली नाही. याचा अर्थ सर्व जनता स्वाध्याय परीवाराला अजूनही हिंदूच समजते.
माझा प्रश्न : यातून दोन प्रश्न निर्माण होतात.   प्रश्न १- हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. शास्त्रीबुवांना योगेश्वर कृष्णाच्या बरोबरीने मंदिरात स्थान मिळाले याचाच अर्थ त्यांना देवत्व प्राप्त झाले. मग आता  हिंदू धर्माने ३३ कोटी १ इतके देव मानायचे का? प्रश्न २-  स्वाध्याय परिवाराने  हिंदू धर्मात राहून शास्त्रीबुवांच्या रूपाने आपला सवता  देव निर्माण करणे योग्य आहे का? 
५. शास्त्रीबुवांनी स्वाध्याय परीवारासाठी निवडलेल्या योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीचे कॉपीराईट घेतले आहे. १९८५ साली त्यांनी मूर्तीचे कॉपीराईट घेतल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती कोणालाही बसविता येत नाही. २००७ साली जळगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात योगेश्वर कृष्णाची मूर्ती बसविण्यात आली होती. स्वाध्याप परीवाराच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर ही मूर्ती तेव्हाच्या जळगाव पोलीस अधीक्षकांनी जप्त केली होती.
माझा प्रश्न : मूर्तीचे कॉपी राईट घेण्याचा शास्त्रीबुवांचा उद्देश काय? आपले वेगळेपण ठेवण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे, असे दिसून येते. स्वतंत्र धर्मस्थापनेची ही पूर्वतयारी होती का?

६. स्वाध्याय परीवाराच्या सर्व दैनंदिन प्रार्थना संस्कृतात आहेत. खेड्यापाड्यातील अज्ञानी लोकांच्या त्या गळी उतरविण्यात येत आहेत.
माझा प्रश्न : यातूनही दोन प्रश्न निर्माण होतात. प्रश्न १- संस्कृत मंत्रांचे अत्यंत चुकीचे उच्चार खेड्यातील लोक करतात. त्यातून अर्थाचे अनर्थ होतात. अर्थ समजत नसल्यामुळे हे त्या गोरगरीब लोकांच्या लक्षात येत नाही, एवढेच. मराठी संतांनी संस्कृताला दूर सारून लोकभाषा मराठीत ग्रंथ रचना केली. स्वाध्याय परीवार उलटी गंगा वाहवून लोकांना पुन्हा संस्कृताकडे नेऊ पाहत आहे. परीवाराला लोकभाषेचा एवढा तिटकारा का? प्रश्न १- चुकीचा मंत्र म्हटल्यास अयोग्य फळ मिळते, असे वेदांत म्हटले आहे. वृत्रासुराच्या आईला इंद्राला मारणारा मुलगा हवा होता. ब्रह्मदेवाकडे वर मागताना तिने विसर्ग चुकीच्या ठिकाणी वापरला. त्यामुळे तिला इंद्राकडून मारला जाणारा वर मिळाला. या संबंधीचा -यजमानम् हिनस्ती- हा संस्कृत श्लोक फार प्रसिद्ध आहे. अशा फलप्राप्तीला जबाबदार कोण?  
सारांश : वरील सर्व चर्चेचा सारांश काढताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. स्वाध्याय परीवाराने स्वतंत्र धर्म निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालविला आहे. त्यात काही चूक आहे, असे नाही. या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच आपले स्वतंत्र धर्ममत प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. स्वाध्याय परीवाराला स्वतंत्र धर्मस्थापना करायवयाची असल्यास कोणाचीच हरकत नाही. फक्त त्यांनी त्यातील छुपेपणाचा त्याग करावा. उघडपणे आपले मत प्रतिपादन करावे. हिंदू धर्माच्या अडून त्यांनी हे उद्योग करू नये. छुपेपणा ही संघाची कार्य पद्धती आहे. त्याच मार्गाने स्वाध्याय परिवार चालला आहे.  

अनिता पाटील, औरंगाबाद.