Wednesday, 6 March 2013

पंचांगवाल्या दात्यांना पावसानेच पाडले दातावर!

सोलापुरी पंचांगात भविष्याची बोगसगिरी !!

राजा मइंद

सोलापूरचे दाते कुटुंब पंचांगाच्या नावाखाली सुमारे १०० वर्षांपासून महाराष्ट्राला बनवित आले आहे. या पंचांगकर त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. खेड्यांमध्ये गाय हरवली तरी, लोक पंचागवाल्या बामनाकडे जाऊन विचारतात. शुभ-अशुभाच्या असंख्य भाकड गोष्टी पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत रुजविण्याचे पाप दात्यांनी केले आहे. दात्यांच्या शुभ-अशुभाच्या कल्पित कथांना तूर्तास आम्ही बाजूला ठेवीत आहोत. त्यावर पुढच्या लेखात केव्हा तरी लिहू. आजच्या लेखाचा विषय दात्यांच्या पंचांगातील वर्षफल हा आहे. दात्यांचे २०१२-१३ या वर्षाचे पंचांग आम्ही त्यासाठी वाचकांसमोर ठेवीत आहोत. दात्यांच्या पंचांगाचे वर्ष आता संपत आले आहे. वर्षाच्या आरंभी दात्यांनी जी काही भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली का, हे तपासून पाहण्याचा हा योग्य काळ आहे.

यंदा महाराष्ट्रात ‘न भुतो न भविष्यती' असा भयंकर दुष्काळ पडला आहे. रानच्या पाखराला चोच भिजवायलाही पाणी नाही. या महाभयंकर दुष्काळाचा अंदाज सोलापुरी दात्यांच्या पंचांगातील ग्रहतारयांना आलेला नव्हता. उलट यंदा महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडून धनधान्याची आबादाणी राहील, जनावरे आनंदी राहतील, असे अजब भविष्य दात्यांनी या वर्षाच्या सुरूवातीला आपल्या पंचांगात लिहून ठेवले होते.

पावसासंबंधी दात्यांनी काय काय म्हणून ठेवले होते ते आता दात्यांच्या शब्दांतच पाहू या :

  • राजा शुक्र असल्याने पाणी मुबलक मिळेल.
  • मंत्री शुक्र असल्याने जनावरे भरपूर दूध देतील.. पाऊस चांगला पडून धनधान्य वृद्धी होईल.
  • खरीपाचा स्वामी चंद्र असल्याने पर्जन्यमान चांगले राहील. दूध दुभते व धान्य मुबलक मिळेल.
  • आद्रा नक्षत्राचे फळ : पिके चांगली येऊन धान्य व कापड पुष्कळ मिळेल.
  • या वर्षी आवर्त नावाचा मेघ असल्यामुळे वादळासह पाऊस होईल.
  • पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धन धान्य दुभते वाढेल.
  • मेघ निवास कुंभाराचे घरी असून रोहिणी नक्षत्र पर्वतावर पडले आहे. त्यामुळे खंडीत वृष्टी होईल.
  • या वर्षी चार आढक म्हणजे पर्जन्यमान उत्तम राहील.
  • हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील.


दाते पंचांगात सुरूवातीला छापण्यात आलेल्या वर्षफलात वरील ओळी आल्या आहेत. (पंचांगातील या पानाची फोटो कॉपी लेखाच्या शेवटी दिली आहे. वाचकांनी ती अवश्य पाहावी.) पाणी मुबलक मिळेल, वादळासह पाऊस येईल, पर्जन्यमान चांगले राहील, अशी भाकिते दात्यांनी त्यात मांडली आहेत. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडेल, असे एकही वाक्य दात्यांच्या या भाकितात नाही. अनंत दाते, वीणा दाते, विनय दाते, प्रिया दाते, ओंकार दाते, मुग्धा दाते अशा एकूण ६ दात्यांनी हे वर्षफल लिहिले आहे. असे खोटे भविष्य तुम्ही कसे काय वर्तविले, असा जाब दात्यांना महाराष्ट्र विचारीत आहे. त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

खोटे भविष्य वाचा आणि वर्षभर सुखी राहा!
पाऊस काही दात्यांना विचारून पडण्याचा निर्णय घेत नाही. दात्यांनी पंचांगात लिहिले आहे, म्हणून धो धो कोसळणे आपले कर्तव्य आहे, असे पावसाला वाटत नाही. पण दात्यांना तसे वाटत असावे. आपण पंचांगात लिहिले आहे, तर पाऊस पडेलच, अशी अंधश्रद्धा ही मंडळी त्यामुळेच बाळगून आहेत. पर्जन्यराजाने ती दूर केली. दात्यांना पावसाने दातावर पाडले! यातली गंमत अशी की, + हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील.+ असे मखलाशी करणारे एक वाक्य शेवटी दात्यांनी या भाकिताला जोडले आहे. खोटी भविष्ये वाचून माणूस वर्षभर सुखी कसा राहू शकतो, हे दातेच जाणोत. पंचांग वाचणारे लोक सुखी राहो न राहो, पंचांगाच्या विक्रीतून लक्षावधी रुपये कमावून सोलापुरी दाते मात्र सुखी आहेत.

हात वर करायला जागा!
अनंत दाते, वीणा दाते, विनय दाते, प्रिया दाते, ओंकार दाते, मुग्धा दाते या मंडळींनी वर्षफल लिहिताना काही पळवाटा त्यात ठेवल्या आहेत. वर दिलेल्या ८ वाक्यांत दात्यांनी उत्तम पाऊस पडेल, असे म्हटले आहे. त्याच्या जोडीला दोन वाक्ये मात्र पाऊस पडणार नाही, असे सांगणारी दोन वाक्ये न विसरता लिहिलेली आहेत. ही दोन वाक्ये अशी :

  • रब्बीचा स्वामी शनि असल्याने पाऊस कमी पडेल आणि धनधान्य कमी प्रमाणात मिळेल.
  • या वर्षी पृथुश्रवण नावाचा नाग आहे म्हणून पाऊस कमी पडेल.

दोन्ही हातांनी ढोलकी वाजविण्याचा दात्यांचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. त्यातून दात्यांची जबाबदारी अजिबात संपत नाही. पावसासंबंधीची एकूण १० वाक्ये दात्यांच्या वर्षफलात आहेत. त्यातली ८ वाक्ये म्हणतात पाऊस चांगला पडेल, तर दोन वाक्ये म्हणतात पाऊस पडणार नाही. येथे सरासरी काढली तर दात्यांच्या पंचांगातील ८० टक्के अंदाज मुबलक पावसाच्या बाजून आहे. २० टक्के अंदाज 'कमी पावसा'च्या बाजूने आहे. म्हणजेच दाते खोटे पडले आहेत.

९८ व्या वर्षी तरी बदला!
ल. गो. दाते यांनी दाते पंचांगांची स्थापना केली. २०१२-१३ चे पंचांग दात्यांचे ९७ वे पंचांग होते. या ९७ वर्षांत सर्व काही बदलून गेले आहे. दाते मात्र तसेच आहेत. ते बदलायला तयार नाहीत. २०१३-१४ या वर्षाचे पंचांग दाते मंडळी तयार करीत असतील. त्यांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे की, येणारया पंचांगात तरी अशी खोटी-नाटी भाकिते देऊन दिशाभूल करू नका. ९८ व्या वर्षी का असेना, पण स्वत:त काळानुरूप थोडा बदल करून घ्या.


सोलापुरी दात्यांच्या पंचांगातील
पावसाविषयीचे भाकित असलेले पान 

No comments:

Post a Comment