जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपका
- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.
महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का? सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती.
१. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली.
२. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले.
महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत.
गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे.
बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले.
या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले.
जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."
रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."
यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती.
कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.
How Savarkar escaped the gallows
How Savarkar escaped the gallows