Wednesday 11 July 2012

कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे

बरे झाले देवा कुणबी केलो

मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पुरावे पाहणार आहोत. संत तुकाराम हे जन्मजात महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणा-या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. तुकाराम म्हणतात,  काय काय करितो या मना । परी ते नाईके नारायणा ।। 


संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अ‍ॅलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानाने तुकारामांना ''भारताचे राष्ट्रीय कवी'' अशी उपाधी दिली होती. (ग्रँट यांच्या विषयीच्या माहितीसाठी तळटीप पहा. )  या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी कुणबी या जातीबद्दल मागे ठेवलेल्या पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

संत तुकारामांचा उल्लेख करताना विविध प्रकारच्या जातीवाचक उपाध्या लावला जातात. परंतु त्या सर्व त्यांच्या व्यवसायानुसार लावल्या गेल्या. त्यांना वाणी म्हणत. तुका झाला वाणी । चुकवुनी चौरयांशीच्या खाणी ।। अशा अभंग पंक्तीमुळे त्यांना वाणी म्हटले गेले. तुकारामांकडे मोठा व्यापार-उदिम होता. त्यामुळे त्यांनी हा उल्लेख प्रतिकात्मकरित्या केला आहे. तुकारामांनी सर्व संसाराचा त्याग केला होता;  म्हणून त्यांना गोसावी  म्हटले गेले. त्यांच्या घराण्यात महाजनकी होती;  म्हणून त्यांना महाजन म्हणण्याचीही प्रथा होती. परंतु या सर्व उपाध्या होत. त्याचा तुकारामांच्या जातीशी काहीही संबंध नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
तुकारामांचे मुळचे घराणे क्षत्रियांचे होते. परंतु कालौघात ब्राह्मणांनी स्वत: वगळता इतर सर्व वर्णांना  वेदाधिकार नाकारला. त्यामुळे क्षत्रिय जातीही शुद्र गणल्या गेल्या. त्यामुळे तुकाराम स्वत:चा उल्लेख शुद्र असा करतात. असा उल्लेख करताना त्यांच्या मनातला नम्र भावही प्रकट होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ या आपल्या उक्तीशी प्रमाणिक राहून तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. संत तुकारामांच्या गाथ्यात असे असंख्य अभंग आपणास दिसून येतात. मात्र या सारयांत न पडता एकच उदाहरण देते. ‘‘आपणांस वैराग्य कसें प्राप्त झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशीं व देवाशीं संभाषण''  या शीर्षकाखाली काही अभंग तुकाराम गाथ्यात आहेत. त्यातील पहिल्याच अभंगातील काही पंक्ती अशा -
याती शुद्र वैश्य केला वेवसाव ।
आधी तो हा देव कुळपूज्य ।।१।।
नये बोलो परि पाळिले वचन ।
केलिया प्रश्न तुम्ही संती ।।२।।
दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान ।
स्त्री एकी अन्न करिता मेली ।।४।।
लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे ।
वेवसाव देखे तुटी येता ।।५।।
या अभंगात तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणतात. वैश्य (व्यापार) व्यवसाय केल्याचे नमूद करतात. मी वैश्य आहे असे म्हणत नाहीत. याचाच अर्थ तुकाराम हे वैश्य नव्हते. मग ते कोण होते? त्यासाठी खालील अभंग पाहा -
बरे झाले देवा कुणबी केलों ।
नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।।
भले केले देवराया ।
नाचे तुका लागे पाया ।।२।।
तुका म्हणे थोरपणे ।
नरक होती अभिमाने ।।६।।
या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी केले. उच्च जातीत जन्माला घातले असतेस तर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.''   आपण कुणबी असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचत देवाच्या पायी लागतात. हे दुसरया कडव्यावरून स्पष्ट होते.

या पुराव्यांवरून एक गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्पष्ट आहे कि, तुकाराम  हे कुणबी जातीत जन्माला आले होते. वारकरी संतांनी आपल्या जाती कधी लपविल्या नाहीत. या उलट संतांनी आपल्या जाती मिरविल्या. कारण कोणतीही जात श्रेष्ठ नाही, तसेच कोणतीही जात कनिष्ठही  नाही, अशी त्यांची निस्सीम श्रद्धा होती. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ'  हाच वारकरी पंथाचा आत्मा होता.

कुणबी-मराठा पर्यायवाचक यातीनामे

असो. या वरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होते की, तुकाराम कुणबी होते. पण खरा प्रश्न असा आहे की, यावरून कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे सिद्ध होते का? याचे उत्तर आहे - होय, कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे यावरून सिद्ध होते. तुकारामा नंतरच्या त्यांच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवित आहेत. तुकारामांचा मूळचा वंश शिवकालीन मोरे घराण्यातील आहे. त्यांचे वंशज आजही मोरे हेच आडनाव वापरतात. जावळीचे मोरे इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते स्वत:ला पूर्वापार मराठा याच नावाने संबोधतात. याचाच अर्थ कुणबी आणि मराठा ही दोन्ही यातीनामे एकमेकांना पर्यायवाचक ठरतात.

- अनिता पाटील.

तळटीप  : तुकारामांना राष्ट्रकवी ही उपाधी देणारे सर अलेक्झांडर ग्रँट (१८२६-१८८४) हे ब्रिटिश विद्वान होते. इंग्रजी राजवटीत १८६० साली ते मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजात प्रोफेसर म्हणून रूजू झाले. १८६२ साली ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १८६३ साली ते तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले. १८६८ पर्यंत ते कुलगुरूपदावर कायम होते. १८६८ साली ते तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (विधान परीषद) सदस्य म्हणून नियुक्त झाले.

1 comment:

  1. नमस्कार, सध्या कुणबी समाज व साहित्य ह्या विषयीच अभ्यास करत होतो, कुणबी समाजातील साहित्यकारांची नावे व त्यांनी निर्माण केलेले साहित्य, साहित्य प्रकार इत्यादींची माहिती मिळेल काय?

    ReplyDelete