Tuesday 29 July 2014

अशी झाली तुकोबांची हत्या

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


"तुका सप्तशती" या ग्रंथालाच "वैकुंठ गाथा" असेही नाव आहे. या ग्रंथातच ते नमूद आहे.  ग्रंथाचा कर्ता आधूत कोळी नामक कवी आहे. आधूत हा तुकोबांवर घालण्यात आलेल्या मारेक-यांचा म्होरक्या होता. आधूत हा शब्द अवधूतचा अपभ्रंश असावा, असे दिसते. आधूतने आपली कहाणी या ग्रंथात थोडक्यात कथन केली आहे. मारेकरी तुकोबांना मारायला गेले खरे; पण समाधी अवस्थेत असलेल्या तुकोबांच्या चेह-यावरील तेज पाहून ते घाबरले. त्यांच्या हातातील तरवारी आणि पलिते गळून पडले. तुकोबांना मारण्याऐवजी त्यांना मनोभावे वंदन करून मारेकरी परतले. नंतर आधूतला तुकोबांचा अनुग्रह झाला. त्याला अचानक काव्यस्फुर्ती झाली. त्याचे फलित म्हणजे हा ग्रंथ होय. स्वत: मारेक-यांपैकीच एकाने हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे त्याचे ऐतिहासिक मोल प्रचंड मोठे आहे. "अपाविमं"चा संशोधक संघ त्यावर काम करीत आहे. हा ग्रंथ जेवढा उपलब्ध आहे, तेवढ्या स्वरूपात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

या ग्रंथाची भाषाही अद्वितीय आहे. यातील अनेक शब्द त्या काळातील बोलीभाषेतून उचलले आहेत, असे दिसते. त्यामुळे त्यांचा अर्थ लावणे हे जिकिरीचे काम आहे. मारेक-यांसाठी "वधियंते" असा शब्द त्यात वापरण्यात आला आहे. वधियंते हे अनेकवचनी रूप असून मूळ एकवचनी शब्द वधियंता असा आहे, असे दिसते. या ग्रंथात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीच्या दिवशीचा घटनाक्रम आठ ते दहा ओव्यांत आला आहे. हा घटनाक्रम असा : 

तुकोबांना ठार मारण्यासाठी पाच मारेक-यांना उक्ते देण्यात आले होते. आधूत कोळी हा या पाचांचा म्होरक्या होता. उक्ते देणारे लोक वधियंत्यांना म्हणजेच मारेक-यांना घेऊन तुकोबांचे वास्तव्य असलेल्या भंडारा डोंगरावर जातात. वधियंत्याच्या हातात पेटते पलिते आणि नंग्या तलवारी असतात. तुकोबांच्या जवळ आल्यानंतर वधियंत्यांचा म्होरक्या आधूत हा वधियंत्यांना इशारा करतो. वधियंते पुढे सरसावतात. पण, समाधी अवस्थेतील तुकोबांच्या चेह-यावरील प्रचंड तेज पाहून ते घाबरतात. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटतो. त्यांच्या हातातील पेलिते आणि तलवारी गळून पडतात. घाबरलेले वधियंते तुकोबांना विनम्रपणे वंदन करतात. तलवारी आणि पलिते तेथेच सोडून वधियंते निघून जातात. मारेकरी घालणारे टोळके मग पुढे होते. पलिते आणि तलवारी उचलून हे लोक तुकोबांवर वार करतात. तुकोबांना ठार मारून ते पळून जातात. या मारेक-यांना ग्रंथकत्र्याने वोखटे अशी उपाधी वापरली आहे. वोखटे म्हणजे ओंगळ, अमंगळ, वाईट. 

तुकोबांची हत्या झाल्यानंतरच्या क्षणाचे भयकारी चित्र ग्रंथकत्र्याने उभे केले आहे. आधूत लिहितो की, तुकोबांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण धरणी डळमळली, पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करणारा शेष नारायणही मनात भयकंपित झाला. आकाशात अग्निकल्लोळ होऊन अनेक तारे कोसळले. अवघ्या काही क्षणांत हा सर्व प्रकार घडून आला.  

वैकुंठ गाथा या ग्रंथातील तुकोबारायांच्या हत्येशी संबंधित मूळ ओव्या पाहा (वाचकांच्या सोयीसाठी ओव्यांना क्रमांक देण्यात आले आहेत.) : 

तव तो कोलियांचा धुरी । पांचाशी इशारा करी । 
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
पुढे जाले वधियंते । परी आंगा कांपाचे भरिते । 
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
स्वामी समाधीशी तपोनिधी । तेज पसरले चहुविधी । 
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
सावध बाघण आवटे । उचलिती तरवार दिवटे । 
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
डळमळिली धरणी । शेष भय कंपिला मनी । 
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।

ओव्यांतील कठीण शब्दांचे अर्थ : 

कोलियांचा - कोळ्यांचा.
धुरी - प्रमुख, म्होरक्या. 
पांचाशी - पाच जणांना.
तरवार - तलवार  
झडकरी - लवकर. 
वधियंते - मारेकरी. ठार मारण्यासाठी आलेले लोक.
आंगा - अंगाला. 
कांपाचे भरिते - थरकापाचे भरते
हातीयेचे - हातातील.
पलिते - दिवट्या, मशाली.
चहुविधी - चहुकडे 
दिवटे - पलिते. मशाली.
देखत खेवो - देखता क्षणी

ओव्यांचा क्रमश: अर्थ : 

तेव्हा तो कोळ्यांचा म्होरक्या पाचांना इशारा करतो. तलवारीने लवकर घाव घाला असे त्यांना सांगतो. ।।१।।
मारेकरी पुढे झाले, परंतु त्यांच्या अंगाला कापरे भरले. हातातील तलवारी आणि पलिते गळून पडले. ।।२।।
तपोनिधी असलेले स्वामी (तुकोबाराय) समाधीत होते. त्यांचे तेज चहुकडे पसरले होते. मारेक-यांनी आधी चरणांना वंदन केले आणि मग ते निघून गेले. ।।३।।
तेव्हा सावध असलेले बाघण आवटे तलवारी आणि दिवट्या उचलतात. हे अमंगळ लोक तुकोबांवर घाव घालतात. मग वेगवेगळे होऊन पळून जातात. ।।४।।
(त्यानंतर) धरणी डळमळित होते. शेष मनात भयकंपित होतो. आकाशात अग्निकल्लोळ होतो. (तारे कोसळतात.) ही सर्व चिन्हे पाहता पाहता घडून येतात. ।।५।। 

अर्थ न लागलेले शब्द
या ओव्यांतील बाघण आणि आवटे या दोन शब्दांचे अर्थ नीट लागत नाहीत. बाघण हा शब्द मूळचा ब्राह्मण असावा. ग्रंथाचे हस्तलिखित प्रत तयार करताना चुकून ह्मचा घ झाला असावा. qकवा हेतूत:ही असे केले गेले असावे. बाघण या शब्दाच्या अचूक अर्थ निदानासाठी आम्ही अनेक पर्याय तपासून पाहिले. हा शब्द बावन्न असावा, अशी एक शक्यता वाटते. ती गृहीत धरल्यास मारणारे लोक एकूण ५२ जण होते, असा अर्थ काढता येतो. तिसरी एक शक्यता अशी की, बाघण हाच मूळ शब्द असावा. ते मारेकèयांपैकी कोणाचे आडनाव असावे. आवटे या शब्दाचा काहीच उलगडा होत नाही. तुकोबांना मारणारे हे लोक आवटे आडनावाचे असावेत, अशी एक शक्यता असू शकते. पण त्याबाबत ठोस काहीच सांगता येत नाही.


संबंधित लेख

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २

Monday 28 July 2014

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!

अपाविमंच्या संशोधक संघाचे अद्भूत सत्यशोधन 

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा खून झाला की ते सदेह वैकुंठाला गेले, या बाबत अनेक तर्कवितर्क लढविले जातात. खून झाला असे म्हणणारे तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. तर सदेह वैकुंठ गमनाची कथा सत्य मानणारे खुनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. या वादात सत्य काही नीट हाती लागत नाही. पण थोडीशी बुद्धी लावून विचार केल्यास असे दिसून येते की, तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठाला गेले या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. 

तुकोबा हे जातीने कुणबी होते. स्वत: तुकोबांनीच हे लिहून ठेवले आहे. "बरे झाले देवा कुणबी केलो । नाही तरी दंभेची असतो मेलो ।।" असे तुकोबा एके ठिकाणी म्हणतात. दुस-या एका अभंगात ते म्हणतात, "तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । परी हा पंढरीनाथ विसंबेना ।।".  कुणबी ही जात ब्राह्मणांच्या दृष्टीने शुद्र होती. ब्राह्मणी पोथ्यांतील आदेशांनुसार शुद्रांना धर्मविचार सांगण्याचा, प्रवचन किर्तन करण्याचा तसेच गुरू होण्याचा अधिकार नाही. वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही शुद्रांना नाही, हे सर्वविदीत आहेच. तुकारामांनी ब्राह्मणी पोथ्यांतील या आज्ञांना पायदळी तुडवून "वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" अशी घोषणा केली. हजारो लोक त्यांचे अनुयायी झाले. तुकोबांनी धर्म भ्रष्ट केला, अशी आवई उठवून ब्राह्मणांनी तुकोबांविरोधात अनेक कारवाया केल्या. गावचा पाटील, धर्मशास्त्री आणि पुण्यातील निजामाचा प्रतिनिधी दादोजी कोंडदेव यांच्याकडे तुकोबांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. या सर्वच ठिकाणी तुकोबांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. ब्राह्मणी नीती-नियमांच्या त्यांनी चिंधड्या उडविल्या. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी शेवटचा उपाय म्हणून तुकोबांची हत्या करण्याचा कट रचला. इतकेच नव्हे, तर तो तडीस नेला. 

या काळापर्यंत तुकोबा साक्षात्कारी संताच्या पदाला पोहोचले होते. साक्षात विठ्ठलाच्या साक्षात्कारामुळे त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती. त्यांनी सदेह वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फाल्गुण वद्य द्वितीयेचा मुहूर्त त्यांनी काढला. आपल्या सर्व अनुयायांना त्याची माहिती दिली. या काळात तुकोबांचा बहुतांश काळ भंडारा डोंगरावरच जात होता. लोकांपासून दूर राहावे, यासाठी त्यांनी भंडारा डोंगराची निवड केली होती. नेमका याच काळात ब्राह्मणांनी डाव साधला. वैकुंठगमनाच्या दोन दिवस आधी फाल्गुण पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या रात्री ब्राह्मणांनी भंडारा डोंगरावर तुकोबांची हत्या केली. मृतदेह तिथल्याच गुहेत दडविला. गुहेचे दार प्रचंड मोठ्या शिळेने बंद करून टाकले. काम फत्ते झाले असे समजून ब्राह्मण निघून गेले. 

पौर्णिमा ते द्वितीया असे अडीच दिवस तुकोबा बेपत्ता होते. पण, साक्षात पांडुरंगच तुकोबांसोबत असल्यामुळे त्यांचे सदेह वैकुंठगमन रोखणे ब्राह्मणांच्या हाती नव्हतेच. फाल्गुण वद्य द्वितीयेला विठोबा आपली पत्नी रखुमाईला घेऊन भंडारा डोंगरावरील त्या गुहेत प्रकट झाले. विठोबाने हळुवार हाक मारली, "तुकोबा उठ." झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तुकोबा उठून बसले. गुहेच्या तोंडाची शिळा माती होऊन गळून पडली. दिवस उगवायच्या आत तुकोबा देहूत आले. त्यांचे हजारो अनुयायी तेथे वाटच पाहत होते. ठरलेल्या वेळी आणि इंद्रायणीच्या काठावरील ठरलेल्या स्थळी सर्व जण एकत्र गोळा झाले. साक्षात विठ्ठल विमान घेऊन आले. तुकोबांनी सर्वांचे क्षेमकुशल घेतले. आणि विमानात बसून ते वैकुंठाला निघुन गेले. 

"तुका सप्तशती" नावाच्या जुन्या ग्रंथात वरील कथा आली आहे. हा ग्रंथ पूणं रुपाने आता उपलब्ध नाही. त्याची काही प्रकरणेच उपलब्ध आहेत. हा ग्रंथ मोडीत आहे. याची एक अत्यंत दुर्मिळ प्रत अपाविमंच्या हाती लागली आहे. ब्राह्मणांनी अनेक कारस्थाने केली. त्यात हा ग्रंथ संपविण्याच्या कारस्थानाचाही समावेश आहे. तथापि, या धर्मभूमीचे भाग्य थोर म्हणून या ग्रंथाचा काही भाग का होईना या विध्वंसातून टिकून राहिला. हा ग्रंथ आम्ही लवकरच अपाविमंवर वाचकांसाठी जशाच्या तशा टाकणार आहोत.


संबंधित लेख

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या

Thursday 24 July 2014

प्लँचेट, दाभोलकर आणि सावरकर

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याच्या बातमीने सध्या महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली आहे. प्लँचेट हे पोलिसांसाठी काही नवे नाही. दहशतवादविरोधी पथकांनी अनेकवेळा प्लँचेट करून आरोपींचा अदमास घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्लँचेट खरे की खोटे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला म्हणून प्लँचेट थांबतील या भ्रमात कोणी राहू नये.

प्लँचेटसाठी भारतभर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्म्याला बोलावण्यास प्राधान्य दिले जाते. सावकर यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे तो लवकर येतो, तसेच प्रश्नांची उत्तरेही तो अचूक देतो, असे प्लँचेट करणारे लोक मानतात. खरेखोटे प्लँचेट करणारे आणि सावरकरच जाणोत. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी करण्यात आलेल्या प्लँचेटमधून पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी सावरकरांच्या आत्म्याला बोलावले असते, तर कदाचित खुनी सापडलेही असते, असेही तमाम प्लँचेटकर मानत आहेत.

असो. आदरणीय अनिता ताई यांनी प्लँचेट आणि सावरकर यांच्यावर लिहिलेला एक लेख अपाविमंवर आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. या लेखाची लिन्क खाली देत आहे. 

धनगरांच्या कुंडलीतला "ड"!

धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही आधीपासून धनगर समाजाच्या प्रवर्गाचा विषय दोन्ही काँग्रेसने अधांतरी लटकावून ठेवला आहे. केंद्र सरकारच्या यादीत धनगर ही जात अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र धनगरांना भटक्या जमाती या स्वतंत्र प्रवर्गात टाकले आहे. भारत सरकारचा कारभार इंग्रजीत चालतो. कोणताही जीआर इंग्रजीत निघतो. नंतर त्याचे भाषांतर हिंदी  आणि इतर भाषांत होते. भारतीय भाषांतील"र" हा वर्ण इंग्रजीत जाताना "ड" होते. धनगर या शब्दाचेही तसेच झाले. "र" चा "ड" होऊन धनगरच्या जागी धनगड आला. या "र" ने मोठा घोटाळा केला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या कुंडलाीत बसलेला हा ड समाजाला गेली कित्येक दशके छळत आहे. धनगड आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत, असे गृहीत धरून राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे हक्क नकारले. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर या मुद्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकारने यावर एक बैठकही घेतली. पण, मधुकर पिचड आणि वळवी यांसारख्या वजनदार नेत्यांनी हा निर्णय रोखला. आपल्या जातींच्या आरक्षणात त्यांना वाटेकरी नको आहेत.

धनगर-धनगड एकच! 
या विषयावर संजय सोनवणी हे गेली अनेक वर्षे लिहित आहेत. त्यांनी या विषयी खरोखरच सखोल अभ्यास केलेला आहे, असे त्यांच्या लिखाणावरून दिसून येते. एका लेखात सोनवणी यांनी या विषयाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की,
"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत "Oraon and Dhangad" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात "ओरान, धनगर" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही "धनगर/धनगड" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी "महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत" असे विधान केले होते.

आरक्षणाबाबत अपाविमंची भूमिका स्पष्ट आहे. हक्कदार जाती-जमातींना न्याय्य वाटा मिळायलाच हवा. धनगर समाज अनुसूचित जमातीत येत असेल, तर त्याला तो हक्क मिळायलाच हवा. कोणी मंत्री समाजाचा हक्क नाकारू शकत नाही.

Tuesday 22 July 2014

दोन बायकांचा दादला भारतरत्न!

संपत्तीच्या वादातून समोर आले भीमसेन जोशींच्या दोन बायकांचे रहस्य

-राजा मइंद, कार्यकारी संपादक अपाविमं.

भारतरत्न या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात आलेले शास्त्रीय गायक पं. भीमसेन जोशी यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीला मुले-बाळे झाल्यानंतर त्यांनी दुसरी बायको केली. दोघींनाही नांदवले. दोन बायकांचा दादला ही आपली ओळख जगासमोर येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी त्यांनी जीवंत असताना घेतली होती. एरवी सगळ्या जगाची धुणी धुणाèया मीडियाने ही बाब दाबूनच ठेवली होती. मात्र, भीमसेन जोशी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही सवतींच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला आणि त्यातून ही माहिती हळूच जगासमोर आली. दोन बायका अन् फजिती ऐका, ही म्हण भीमसेन जोशी यांच्या बाबती मृत्यूनंतर अशा पद्धतीने खरी झाली.

भीमसेन जोशी यांनी 1944 मध्ये सुनंदा कट्टी यांच्याशी लग्न केले. सुनंदा जोशी या भीमसेन जोशी यांच्या नातेवाईकांच्या कन्या होत्या. सुनंदाकडून जोशी यांना 4 मुले झाली. यात राघवेंद्र (67), ऊषा (66) सुमनगला (63) आणि आनंद (52) अशी त्यांची नावे आहेत. 1951 मध्ये जोशी यांचा वत्सला मधोळकर यांच्याशी विवाह झाला. वत्सला या भीमसेन जोशी यांच्या कन्नड नाटक 'भाग्यश्री'मध्ये त्यांची सहनायिका होत्या. वत्सला यांच्याकडून भीमसेन जोशी यांना तीन मुले झाली. जयंत (62, पेंटर), शुभदा (56, गायिका) आणि श्रीनिवास (47, आईआईटी-दिल्लीतून इंजिनीअर झाले, आणि सध्या गायक आहेत) अशी त्यांची नावे आहेत. भीमसेन जोशी यांनी आपल्या पहिली पत्नी सुनंदा यांना घटस्फोट दिला नव्हता. ते त्यांना आर्थिक मदत करत राहिले. सुनंदा पुण्याच्या सदाशीवपेठमध्ये वेगळे राहत होत्या.

भीमसेन यांची जवळपास 10 कोटींची संपत्ती आहे, ज्यामध्ये जवळपास 20 संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचा समावेश आहे. या संपत्तीचा हा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पंडीत भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांची 3 मुले यांनी मागील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. पुणे कोर्टाच्या निर्णयात पंडीत जोशी यांच्या पुण्यात असलेला बंगला 'कलाश्री' आणि इतर 2 फ्लॅटमध्ये या तिघांनाही कोण्या तिसर्‍या व्यक्तीला अधिकार देण्यास मनाई करण्यात आली होती.

पंडीत जोशी यांच्या पहिल्या पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय देण्यात आला. राघवेंद्र यांनी जानेवारी 2011 मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर 22 सप्टेंबर 2008 या तारखेला बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले होते.

जोशी यांनी दुसरे लग्न केले तेव्हा हिंदू लग्न कायदा 1956 अजून बनवण्यात आला नव्हता. तसेच जोशी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. याबदल्यात जोशी यांनी वत्सला आणि त्यांच्या मुलांना पुण्यातील बंगला, फ्लॅट आणि पुढील 50 वर्षांपर्यंत संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचे हक्क दिले होते. तर पहिली पत्नी सुनंदा आणि त्यांच्या चार मुलांच्या नावावर 20 लाख रुपयांची बँकेतील रक्कम केली होती. पंडीतजी आपल्या दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांच्या मुलांसोबत 'कलाश्री'मध्ये राहत होते. वत्सला स्वतःसुध्दा शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे निधन 2005 मध्ये झाले होते. त्यांच्या निधनानंतर जोशी यांनी आपला बंगला कलाश्रीचे मालकी हक्क मुलगी सुभदा आणि मुलगा जयंत याच्या पत्नीकडे सोपवले होते. त्याच बरोबर इतर दोन फ्लॅट आपला मुलगा श्रीनिवास आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केले होते.

अशी आहे भीमसेन जोशी यांची संपत्ती
मृत्यूपत्रानुसार, पं. भीमसेन जोशी यांची एकूण संपत्ती 10 कोटींच्या जवळपास आहे. ज्यामध्ये संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टी उत्पन्नाचाही समावेश आहे. जोशी यांच्या संपत्तीमध्ये 5 कोटी रुपयांचा बंगला आणि 4 फ्लॅटचा समावेश आहे.