Friday 1 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१

तुकोबांनी ब्राह्मणांचा धर्मावरील विशेषाधिकारच नाकारला

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

महाराष्ट्रातील त्या काळातील ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? तुकोबांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? या प्रश्नांची उत्तरे तुकोबांच्या गाथ्यातच सापडतात. भारतात खोलवर रुजलला ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या पायावर उभा आहे. ब्राह्मण ही जात यात मोठी लाभधारक आहे. या ब्राह्मण धर्माच्या पायावरच तुकोबांनी घाव घातला. परंपरेने ब्राह्मणांना जातीनिष्ठ श्रेष्ठत्व दिले होते. ते तुकोबांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही, अशी घोषणा तुकोबांनी केली. इतकेच नव्हे, तर ब्राह्मण होण्याचा अधिकार कोणालाही आहे, अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. तुकोबा म्हणतात की, एखादा मनुष्य अंत्यजाच्या कुळात (सर्वांत हीन जातीत) जन्मला असेल, मात्र तो निस्सीम विठ्ठल भक्त असेल, तर त्याला ब्राह्मणच समजायला हवे. तुकोबांचा या संबंधीचा अभंग असा -
ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।। रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।। 
याच्या विरुद्ध बाजूने विचार मांडताना तुकोबा म्हणतात की, भक्तीहीन असलेल्या ब्राह्मणास अंत्यज मानावे. हा विचार अंत्यंत क्रांतीकारक आहे. ही क्रांती घडविण्यासाठी तुकोबांची वाणी विजेसारखी कडाडते. तुकोबा लिहितात -
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।। 
त्याही पुढे जाऊन तुकोबा म्हणतात की, अशा भक्तीहीन ब्राह्मणाला जन्म देणारी स्त्री नक्कीच व्याभिचारी असली पाहिजे. 
हा हल्ला इतका घणाघाती आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांना ती पचणे कठीण झाले असणार. 
धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार
ब्राह्मणी परंपरेने धार्मिक न्याय-निवाडा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना दिला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे आणि ब्राह्मणत्व कोणाला नाकारायचे याचे अधिकार ब्राह्मणांच्या धर्मसभेला होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण्याचा हक्क पैठणच्या पंडितांनी नाकारला होता. धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना पतितसावित्रिक ठरवून मौंजीचा अधिकार नाकारला होता. धर्मपंडितांचा हा अधिकार जन्माधिष्ठित जातीवर आधारित आहे. ब्राह्मणाखेरीज इतर कोणत्याही जातीतील व्यक्तीला हा अधिकार नाही. मात्र कुणव्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामांनी ब्राह्मण जातीचा हा विशेषाधिकार धुडकावून लावला. इतकेच नव्हे, तर तो स्वत:च्या हाती घेऊन ब्राह्मण कोण याचा निवाडा करणारे अभंग रचले. ते अभंग महाराष्ट्रभर लोकप्रियही झाले. त्यामुळे ब्राह्मण चवताळून उठले. तुकोबांच्या हत्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. 

तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथ्यातील अनुक्रमांक दिला आहे. 

ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
(अभंग क्रमांक : १२३०)
अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे. 

अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
(अभंग क्रमांक : १३४४) 
अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये. 

ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
(अभंग क्रमांक : १२२९) 
अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.




3 comments:

  1. विज्ञानवादी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन कि त्यांचा धुळवडीच्या दिवशी खून???......
    फाल्गुन व.द्वितिया! म्हणजेच तुकाराम बीज.च्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता. पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय. तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते , त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला. समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.)अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते.

    ReplyDelete
  2. तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले.हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे."पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून,आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता,हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे"(८८३)याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
    संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
    आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते.त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही,म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय.असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ?
    वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात,"ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला,त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय,ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो,त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."

    ReplyDelete
  3. संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते, रडणारे नव्हते.

    असाध्य ते साध्य |
    करिता सायास ||
    कारण अभ्यास |
    तुका म्हणे ||

    प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !!
    तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्ष करू इच्छिणारे तुकोबाराय वैकुंठाचा विचार कसा करतील ???
    तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--

    "सांडूनी सुखाचा वाटा |
    मुक्ती मागे तो करंटा ||
    का रे न घ्यावा जन्म |
    काय वैकुंठी जाऊन ||
    येथे मिळतो दहीभात |
    वैकुंठी ते नाही मिळत ||
    तुका म्हणे न लागे मुक्ती |
    राहीन संगे संताचिया ||"
    --संत तुकोबाराय.

    पण तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
    बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...

    प्रसिद्ध कवी सुर्यकांतजी डोळसे म्हणतात की-
    आता पाप पाप म्हणून
    कुणी उर बडवू शकत नाहीत.
    कुणाच्याही गाथा,
    पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त

    सदेह वैकुंठाचा अर्थ
    हळूहळू का होईना कळतो आहे.
    तरीही एखादा मंबाजी,
    जमेल तसा छळतो आहे.

    खोटा इतिहास पुन्हा
    कुणी लिहू शकत नाही.
    आणायचे म्हटले तरी
    ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.

    रंगपंचमी / धूळवळीच्या दिवसी मंबाभटाने तुकोबारायांचा खून केला आणि तो खुनाचा सत्य बाजू पुढे आली तर सामान्य लोक फोडून फेकतील म्हणून सदेह वैकुंठाची थाप मारली...तुकोबारायांची हत्त्या झाली म्हणून त्यांचे मोठेपण कमी होत नाही...सत्य स्वीकारा...आणि ठरवा की तुकोबारायांचा आणि त्यांचा खून करणाऱ्यांचा धर्म कसा काय एक असू शकतो...मी स्वत:ला वारकरी धर्मीय समजतो.. वाचकांनी यावर गांभीर्याने विचार करावा आणि ठरवावे की जो तुमच्या आमच्यासाठी काळा दिवस ठरला त्या दिवसी तुकोबारायांची गाथा वाचून त्यांना अभिवादन करायचं का प्रस्थापितांच्या रंगात रंग उधळून गुलामीत धुंध व्हायच !

    जय नामदेवराया !! जय तुकोबाराया !!

    -सुनील चौधरी, जळगाव.

    ReplyDelete