Wednesday, 19 October 2011

स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन

स्वाध्याय परीवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. हा दिवस त्यांचे अनुयायी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. यासंबंधी तसेच एकूणच परीवाराच्या विचारधारेसंबंधी मला काही प्रश्न पडले आहेत. आज निमित्त आहे म्हणून मी ते येथे मांडते.  

१. स्वाध्यायी लोक धर्मप्रचारार्थ बाहेर पडतात, कोणाच्या घरचे अन्न घेत नाहीत. इतकेच काय पाणीसुद्धा स्वत:चे स्वत:सोबत घेऊन येतात. माझ्या घरी त्यांचे एक पथक आले होते, तेव्हा मी स्वत:च हा अनुभव घेतला.
माझा प्रश्न :  पूर्वी ब्राह्मण समाज इतर समाजाच्या हातचे काहीही खातपीत नव्हता. इतर जातींच्या हातचे काही खाल्ले-पिल्ले तर आपल्याला बाट लागेल, अशी ब्राह्मणांची तेव्हा समजूत होती. हा भेदाभेद आज संपत आला आहे. फार थोड्या प्रमाणात तो सुरू आहे.  बाटाची ही विचारधारा स्वाध्याय परीवार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहे का? परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

२. पांडुरंगशास्त्र्यांच्या हयातीत स्वाध्याय परीवाराचे दैवत होते योगश्वर रूपातील श्रीकृष्ण आणि मुख्य ग्रंथ होता गीता. त्यामुळे हिंदू म्हणविणाèया सर्व लोकांना पांडुरंगशास्त्री हे काही वेगळे सांगत नसून आपलीच मूळ परंपरा पुढे नेत आहेत, असे वाटले. त्यांना मोठा अनुयायीवर्ग मिळाला.
माझा प्रश्न :  स्वाध्याय परीवाराने आता अमृतालय नावाने आपली स्वतंत्र प्रार्थनागृहे म्हणजेच मंदिरे बांधणे सुरू केले आहे. अमृतालयात योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीच्या बरोबरीने पांडुरंगशास्त्र्यांची प्रतिमा ठेवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ शास्त्रीबुवांना परीवाराने देवाचे स्वरूप देऊन कृष्णाच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. शास्त्रीबुवांची कृष्णाच्या बरोबरीने प्रतिष्ठापना करणे योग्य आहे का? 
३. शास्त्रीबुवांच्या हयातीत स्वाध्याय परीवार स्वत:ला हिंदूच म्हणवून घेत असे. गीता हा मूळ ग्रंथ म्हणून त्यांनी त्यासाठीच स्वीकारला होता.
माझा प्रश्न :  आता स्वाध्याय परीवाराने अमृतालय नावाने स्वत:चे स्वतंत्र मंदिर निर्माण केल्यामुळे परीवाराला आता  हिंदू म्हणावे का? स्वत: परीवाराची याबाबत काय भूमिका आहे. परीवार स्वत:ला अजूनही हिंदूच म्हणवतो का? 
४. स्वाध्याय परीवाराने अजून तरी अधिकृतरित्या हिंदू धर्मापासून फारकत घेतलेली नाही. याचा अर्थ सर्व जनता स्वाध्याय परीवाराला अजूनही हिंदूच समजते.
माझा प्रश्न : यातून दोन प्रश्न निर्माण होतात.   प्रश्न १- हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. शास्त्रीबुवांना योगेश्वर कृष्णाच्या बरोबरीने मंदिरात स्थान मिळाले याचाच अर्थ त्यांना देवत्व प्राप्त झाले. मग आता  हिंदू धर्माने ३३ कोटी १ इतके देव मानायचे का? प्रश्न २-  स्वाध्याय परिवाराने  हिंदू धर्मात राहून शास्त्रीबुवांच्या रूपाने आपला सवता  देव निर्माण करणे योग्य आहे का? 
५. शास्त्रीबुवांनी स्वाध्याय परीवारासाठी निवडलेल्या योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीचे कॉपीराईट घेतले आहे. १९८५ साली त्यांनी मूर्तीचे कॉपीराईट घेतल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती कोणालाही बसविता येत नाही. २००७ साली जळगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात योगेश्वर कृष्णाची मूर्ती बसविण्यात आली होती. स्वाध्याप परीवाराच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर ही मूर्ती तेव्हाच्या जळगाव पोलीस अधीक्षकांनी जप्त केली होती.
माझा प्रश्न : मूर्तीचे कॉपी राईट घेण्याचा शास्त्रीबुवांचा उद्देश काय? आपले वेगळेपण ठेवण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे, असे दिसून येते. स्वतंत्र धर्मस्थापनेची ही पूर्वतयारी होती का?

६. स्वाध्याय परीवाराच्या सर्व दैनंदिन प्रार्थना संस्कृतात आहेत. खेड्यापाड्यातील अज्ञानी लोकांच्या त्या गळी उतरविण्यात येत आहेत.
माझा प्रश्न : यातूनही दोन प्रश्न निर्माण होतात. प्रश्न १- संस्कृत मंत्रांचे अत्यंत चुकीचे उच्चार खेड्यातील लोक करतात. त्यातून अर्थाचे अनर्थ होतात. अर्थ समजत नसल्यामुळे हे त्या गोरगरीब लोकांच्या लक्षात येत नाही, एवढेच. मराठी संतांनी संस्कृताला दूर सारून लोकभाषा मराठीत ग्रंथ रचना केली. स्वाध्याय परीवार उलटी गंगा वाहवून लोकांना पुन्हा संस्कृताकडे नेऊ पाहत आहे. परीवाराला लोकभाषेचा एवढा तिटकारा का? प्रश्न १- चुकीचा मंत्र म्हटल्यास अयोग्य फळ मिळते, असे वेदांत म्हटले आहे. वृत्रासुराच्या आईला इंद्राला मारणारा मुलगा हवा होता. ब्रह्मदेवाकडे वर मागताना तिने विसर्ग चुकीच्या ठिकाणी वापरला. त्यामुळे तिला इंद्राकडून मारला जाणारा वर मिळाला. या संबंधीचा -यजमानम् हिनस्ती- हा संस्कृत श्लोक फार प्रसिद्ध आहे. अशा फलप्राप्तीला जबाबदार कोण?  
सारांश : वरील सर्व चर्चेचा सारांश काढताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. स्वाध्याय परीवाराने स्वतंत्र धर्म निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालविला आहे. त्यात काही चूक आहे, असे नाही. या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच आपले स्वतंत्र धर्ममत प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. स्वाध्याय परीवाराला स्वतंत्र धर्मस्थापना करायवयाची असल्यास कोणाचीच हरकत नाही. फक्त त्यांनी त्यातील छुपेपणाचा त्याग करावा. उघडपणे आपले मत प्रतिपादन करावे. हिंदू धर्माच्या अडून त्यांनी हे उद्योग करू नये. छुपेपणा ही संघाची कार्य पद्धती आहे. त्याच मार्गाने स्वाध्याय परिवार चालला आहे.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

8 comments:

  1. आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर ती पटणार आहेत का?
    उत्तरे मिळाल्यावर आपण त्यावर ही एखादा लेख टाकणार का?

    ReplyDelete
    Replies
    1. संजोगजी आपल्या मताशी मी १००% सहमत आहे.

      Delete
    2. अभ्यास न करता केवळ कांहीं तरी बकवास करायला लागते काय ?

      Delete
    3. द्या की उत्तरे. पटणे न पटण्याला का घाबरताय

      Delete
  2. एकूणच बोगस असतात सगळेच अध्यात्म वाले


    ReplyDelete
  3. आपण किती दिवस स्वाध्याय केला आहे, आपण स्वाध्यायाचे कोणते प्रयोग पाहिले आहेत.

    ReplyDelete