Sunday, 23 October 2011

भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !

आनंद आणि वेदना 

प्रिय विनायक  शिंदे,  
उत्तर भारतात स्वतंत्र राज्य स्थापन
करणारे महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा.

भाऊराया, ज्या शिंद्यांनी उत्तर भारतात स्वत:चे राज्य निर्माण केले, त्यांचे आडनाव तू लावतोस. प्रथमत: महादजी, दत्ताजी आदी सर्व महाप्रराक्रमी शिंद्यांना मानाचा मुजरा. शिंद्यांनी नवे राज्य घडविण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. तू मात्र ब्राह्मणवाद्यांची लढाई उसनी  लढण्यासाठी शक्तीपणाला लावत आहेस. शिंदे पानपतावर लढले तेव्हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खान गारदी होता, हे तुला माहिती असेलच. नसेल, तर तू थोडासा इतिहास वाचून घ्यावास हे बरे.
असो.  तुझा मेल वाचताना आनंद आणि वेदना अशा संमिश्र भावना होत्या. आनंद यासाठी की, तुझी तळमळ खरी होती. वेदना यासाठी की, ही तळमळ तू ज्या लोकांसाठी तू दाखवित आहेस, त्यांची कपटनीती ओळखण्यास तू असमर्थ ठरलास. तू इतकी पाने लिहिलीस त्यासाठी तुझे कौतुक केले पाहिजे. पण त्यातून फारच थोडा अर्थ हाती आला. मी ९६ कुळी मर्द मराठा आहे, असे तू वारंवार सांगत होतास. का? मी माझ्या संपूर्ण ब्लॉगवर माझी जात लिहिलेली नाही. मला ती सांगण्याची गरज वाटत नाही. मी विचार सांगते, जात नाही. तुला जात का सांगावीशी वाटली कोणास ठाऊक?  तू तुझ्या नावापुढे हिंदू गर्जना असे लिहिले आहे, हा काय प्रकार आहे? 
ग्वाल्हेर येथे जीवाजीराव शिंदे यांनी बांधलेला
मराठेशाहीचा जय विलास राजवाडा.
मी ब्राह्मणांविरुद्ध नव्हे, ढोंगाविरुद्ध आहे
मी ब्राह्मणांविरुद्ध लिहिते असा आरोप तू केलास. त्यात कोणतेही तथ्य नाही. मी ढोंगी, कारस्थानी, षडयंत्रकारी लोकांच्या विरुद्ध लिहिते. मी जे विषय निवडले, त्यात ब्राह्मणांचे ढोंग मला दिसून आले. मी त्याविरुद्ध लिहिले. उद्या मराठ्यांचे किंवा आणखी इतर कोणाचेही ढोंग दिसून आले, तर त्याविरुद्धही लिहीन.
हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही
हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही, हा माझा विचार आहे. आणि मी त्यावर ठाम आहे. आपल्या देशात एकसंध असा स्वदेशी धर्मच अस्तित्वात नाही. अस्तित्वात आहेत त्या जाती. तू स्वत:ला वारंवार ९६ कुळी मराठा म्हणवून घेतोस, यावरूनच हे सिद्ध होत नाही का? एखादा ब्राह्मण बाप आपली मुलगी तुला द्यायला तयार होईल का? किंवा तुम्ही ९६ कुळी मराठे  आपल्या मुली दलितांना द्यायला तयार व्हाल का? ज्या दिवशी असे घडेल, त्या दिवशी हिंदू नावाचा एकसंध धर्म अस्तित्वात आहे, असे मी समजेन.
शिवाजी महाराजांच्या सेनेतील मुसलमानांचे काय करायचे?
तू म्हणालास माझा मुसलमानांना विरोध आहे. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात असंख्य मुसलमान होते. आग्रा येथून महाराजांना सहीसलामत बाहेर काढणारा मदारी मेहतर मुसलमानच होता, हे तू विसरलास. विसरलास म्हणण्यापेक्षा जातीयवादी ब्राह्मणवाद्यांनी तुला विसरायला भाग पाडले. महाराजांच्या सेवेत असलेल्या या मुसलमानांचे काय करायचे?  महाराजांनी अनेक मशिदींनाही इनाम जमिनी दिल्या त्याचे काय करायचे? ब्राह्मणवादी अशा अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. शिवरायांच्या लष्करातील मुसलमान सरदारांची माहिती देणारे मूलनिवासीचे एक पेपर कटिंग मी माझ्या फेसबुक वॉलवर टाकलेले आहे. ते अवश्य पाहा.
मुसलमान अरबस्तानातून 
आलेले नाहीत
तू संभाजी राजांनी राजपुत सरदारांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला, म्हणून अजून एक गोष्ट तुझ्या लक्षात आणून देणे मला आवश्यक वाटते. शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते, तसेच औरंगजेबाच्या सैन्यात भारतीय होते. ज्यांना तुम्ही हिंदू म्हणता. औरंगजेबच नव्हे, तर बहुतांश मोगल सम्राटांच्या लढाया राजपुतांनी लढल्या. शिवरायांवर चालून आलेला मिर्झाराजा जयसिंग  राजपूतच होता. याच राजपुतांनी मोगलांना मुली दिल्या. या हिंदूंचे काय करायचे? आज भारतात जे मुसलमान आहेत, त्यापैकी सर्वांचे पूर्वज हे हिंदूच होते. ते काही अरबस्तानातून आलेले नाहीत. त्यांचा या भूमीवर तुमच्या एवढाच हक्क आहे. उच्चवर्णीयांच्या छळाला कंटाळून असंख्य दलित फार पूर्वीपासून धर्मांतरीत होत आले आहेत. त्यात मुस्लिम झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्या मुसलमानांचे काय करायचे? गुजरातमध्ये ब्राह्मणवाद्यांनी केले तसे सगळ्यांना मारून टाकायचे?

दोन्ही पोस्टर्स लावा
अफजल खान मारला गेल्यानंतर त्याचा
ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर शिवरायांच्या अंगावर चालून आला.
महाराजांनी त्याला समाजवले. तरीही फितूर कृष्णाजीने
तीन वार महाराजांवर केले. एक वार महाराजांच्या कपाळावर लागला.
शेवटी नाईलाजाने महाराजांनी कृष्णाजीला कट्यारीच्या
वाराने ठार केले. कृष्णाजीवर वार करताना महाराज.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी पोस्टर्स ब्राह्मणवादी लावतात. हे तू स्वत:च मान्य केले. अफजल खानासोबत कृष्णाजी भास्करचे मुंडके उडवितानाचे पोस्टर्स हे लोक का लावित नाहीत? पोस्टर्स लावायचीच आहेत, तर दोन्ही लावा. तू स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेत असशील तर तुझ्या घरासमोर ही दोन्ही पोस्टर्स तू लावून दाखव.
राज्य कायद्याचे आहे की ठाकरयांचे
औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा का करायचा याचे उत्तर कोणी देईल का? इंदूरहून आलेल्या उपरया ठाकरयांना औरंगाबादचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला? तुझे ब्राह्मणवादी ५ वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होते. केंद्रातही तेव्हा त्यांचीच सत्ता होती. तेव्हा शहराचे नाव रितसर बदलून का घेतले नाही. येथे राज्य कायद्याचे आहे की, ठाकरयांचे? तुम्ही ठाकरेवादी आहात, म्हणून सगळ्यांनी ठाकरेवादी बनून ते म्हणतील तसे वागले पाहिजे, ही हुकूमशाही कोण चालू देणार? कायद्यानुसार नाव बदला. आम्हीच काय सर्व जनता शहराला त्या नावाने हाक मारील. 
मी कोणत्याही संघटनेची नाही
तू मला स्वत:च्या अधिकारात संभाजी ब्रिगेडची सदस्य करून टाकले. बाबा रे मी कोणत्याही संस्थेची संघटनेची सदस्य नाही. मी स्वयंप्रज्ञ आहे. माझ्या ब्लॉगची चिरफाड करण्याची तयारी चालविली आहेस, त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. मला जशी माझी मते मांडण्याचा अधिकार आहे, तसाच तुझ्यासह इतर सर्वांनाच तो आहे. तुझ्या लेखांचे मी स्वागतच करीन. 
अपशब्द वापरले नाहीत, त्याबद्दल आभार
शेवटी एका गोष्टीबद्दल तुझे अभिनंदन आणि कौतुक करते. आभारही मानते.  कोणत्याही प्रकारचे अपशब्द न वापरता माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणारा तू पहिला ब्राह्मणवादी आहेस. आज पर्यंत   प्रत्येक ब्राह्मणवाद्यांने मला आई-बहिणींवरून शिव्याच दिल्या आहेत. लोकांना ब्राह्मणवाद्यांची  संस्कृती कळावी यासाठी माझ्या फेसबुक अकाऊंटवर मी या सर्व शिव्यायुक्त प्रतिक्रिया तशाच ठेवल्या आहेत.  ज्या ब्राह्मणवादाबद्दल तुला एवढा अभिमान वाटतो, त्यांचे खरे स्वरूप हे असे आहे. पूर्वीचे ब्राह्मण ओव्या लिहीत, आताचे शिव्या लिहितात.
असो. लिहिण्यासारखे खूप आहे. पण तू माझ्या लेखांची चिरफाड करणारच आहेस, तेव्हा आपला संवाद होईलच. त्यामुळे आत्ता फार लिहीत नाही.

ता. क. 
१. जाता जाता एक सूचना करू इच्छिते. तू संक्षिप्त लिहिण्याचा प्रयत्न कर. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘ब्रेव्हिटी इज साऊल ऑफ विट'  ब्रेव्हिटी म्हणजे थोडक्यात सांगणे आणि विट म्हणजे बुद्धिमत्ता, हे तर तुला माहिती असेलच. या म्हणीचा सोपा अर्थ असा : संक्षिप्तता हा विद्वत्तेचा बुद्धिमत्तेचा आत्मा आहे.

२. तू ब्राह्मणवाद्यांची बाजू घेऊ लढतो आहेस. तो तुझा निर्णय आहे, माझा त्याला कोणताही आक्षेप नाही. परंतु अशी लढाई लढणारयांना इंग्रजीत मर्सिनरी असे म्हणतात. मर्सिनरीचे सोप्या मराठीतील भाषांतर होते ''भाडोत्री सैनिक''.  हरी नरके, संजय सोनवणी, मधुकर रामटेके यांनी तुझ्या आधी हीच महनीय कामगिरी करून पाहिली आहे. ते ब्राह्मणांची लढाई स्वत:च्या अंगावर घेऊन प्राणपणाने लढत होते. त्यांचे ब्राह्मणांनी काय हाल केले, हे वाचायचे असेल, तर माझ्या याच ब्लॉगवरील खालील लेख वाच. तुझ्यासाठी त्याची खास लिंक  येथे देत आहे.

अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!
.........................................................................................................................
'हिंदू गर्जना'चे विनायक शिंदे यांनी मला पाठविलेले
चार भागातील पत्र खालील लिंकवर वाचा :

९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र
.........................................................................................................................


धन्यवाद. 
तुझीच बहीण

अनिता पाटील, औरंगाबाद.
............................................................................................ 

No comments:

Post a Comment