Friday 16 September 2011

परशुरामाची भाकडकथा भाग - ५


तुझ्या पोटी महाभयंकर पूत्र जन्मेल


भावांनो आणि बहिणींनो,
मी परशुरामावर लिहिलेल्या लेखांमुळे सनातनी ब्राह्मण खवळले आहेत. तुम्ही खोटे लिहिता, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. अलिकडे ब्राह्मण सत्यनारायाणापलिकडे कोणताही ग्रंथ वाचित नाहीत, त्यातून असे आरोप होतात. त्यामुळे आज मी ब्राह्मणी धर्मग्रंथांतील पुराव्यांसह तुमच्यासमोर येत आहे.
......................................................

परशुराम हा कसा अर्धा क्षत्रिय आहे, हे मी या पूर्वीच्या एका लेखात लिहिले होते. त्याविषयी थोडीसी अधिक आपण घेऊ या. परशुरामाच्या वंशाचा क्षत्रियांच्या चंद्रवंशाशी संबंध आहे. त्याची कहाणी श्रीमद्भागवतात आली आहे. भागवताच्या नवव्या स्कंदात चंद्रवंशाची आणि परशुरामाची कथा येते. मी येथे भागवताची परमहंस संहिता पुराव्यासाठी घेतली आहे. ब्राह्मणी ग्रंथांचे या देशातील सर्वांत मोठे प्रकाशक 'गीता प्रेस गोरखपूर'नेही हीच संहिता वापरली आहे. यावरून तिच्या खरेपणाबद्दल ब्राह्मणांनी शंका घेऊ नये.
बृहस्पतीची बायको पळविली जाते तेव्हा
बृहस्पती हा ब्राह्मण पुराणांत अतिशय प्रसिद्ध आहे. तो देवांचा गुरू समजला जातो. त्याची पत्नी तारा. ती अत्यंत रूपवान होती. या तारेला एकदा चंद्राने पळवून नेले. इतकेच नव्हे, तर तिला गर्भवतीही केले. यावरून देवदानवांत युद्ध झाले. पण चंद्राकडून तारा परत मिळविणे कोणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे बृहस्पती ब्रह्मदेवाकडे रडत गेला. ब्रह्मदेवाने मांडवळी करून चंद्राचे मन वळवले. शेवटी चंद्राने तारा परत केली. तारेला घरी आणल्यानंतर बृहस्पतीला कळले की, तिच्या पोटात चंद्राचा गर्भ आहे. त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. मात्र, तारेने स्पष्ट नकार दिला. बिचारा बृहस्पती चरफडत राहिला. तारेला मुलगा झाला. त्याचे नाव बुध. बुधाचा विवाह इलेशी झाला. इलेला बुधापासून मुलगा झाला. त्याचे नाव पुरूरवा. इंद्राच्या दरबारातील अप्सरा उर्वशी पुरूरवाच्या प्रेमात पडली. ही आपल्याकडील पहिली प्रेमकथा समजली जाते.
परशुरामाची आजी आणि आई दोघी क्षत्रियच
पुरुरवा-उर्वशीपासून पृथ्वीवरील चंद्रवंशी क्षत्रियांच्या वंशाची खरया अर्थाने सुरूवात झाली. त्यांच्याच वंशात पुढे महापराक्रमी राजा गाधीचा जन्म झाला. गाधीची एक कन्या सत्यवती. सत्यवतीचा विवाह ऋचिक नावाच्या ब्राह्मणाशी झाला. ऋचिकाचा पूत्र जमदग्नी. जमदग्नीची बायको रेणुका हीसुद्धा क्षत्रियाची कन्या होती. रेणुकेची कथा याच ब्लॉगवर आधी दिलेली आहे. जमदग्नी आणि रेणुकेचा सर्वांत धाकला मुलगा म्हणजे परशुराम. अशा प्रकारे परशुराम हा मिश्रवंशीय होता. ब्राह्मण महासंघ आणि इतर ब्राह्मण संघटना त्याला पूर्ण ब्राह्मण म्हणून प्रोजेक्ट करतात, ते अशा प्रकारे खोटे आहे.
घोरो दण्डधर: पुत्रो
परशुरामाच्या जन्माची कथा मोठीच चमत्कारिक आहे. ऋचिक ऋषिने पत्नी सत्यवती आणि तिच्या आईसाठी दोन चरू शिजविले. हे चरू दोघींना दिले. मात्र या दोघींनी चरूंची अदलाबदल केली. हे जेव्हा ऋचिकाला कळले. त्याने पत्नी सत्यवतीला शाप दिला. त्यासंबंधीचा परमहंस संहितेतील मूळ संस्कृत श्लोक असा :
तद विज्ञाय मुनि: प्राह पत्नीं कष्टमयकारषी: ।
घोरो दण्डधर: पुत्रो भ्राता ते ब्रह्मवेत्तम: ।।१६।।
श्रीमद्भागवत. स्कंध : ९.  अध्याय : १५.
‘घोरो दण्डधर: पुत्रोङ्क याचा अर्थ- ‘तुला घोर म्हणजेच महाभयंकर आणि लोकांना दंड देणारा म्हणजेच त्रास देणारा पूत्र होईल.'  भ्राता ते ब्रह्मवेत्तम: याचा अर्थ - तुझा भाऊ मात्र ब्रह्मज्ञानी होईल.
ऋचिकाची शापवाणी ऐकून सत्यवती घाबरली. तिने क्षमायाचना केली. त्यावर ऋचिकाने उ:शाप दिला की, तुझ्या मुलाऐवजी नातू ‘घोर दण्डधर'  निपजेल. सत्यवतीला जमदग्नी झाला. व जमदग्नीला परशुराम. ऋचिकाच्या शापानुसार तो खरोखर घोर म्हणजेच महाभयंकर व लोकांना त्रास देणारा निघाला.



      - अनिता पाटील, औरंगाबाद.


No comments:

Post a Comment