Monday, 19 August 2013

धोंडो केशव कर्वे यांचा जातीय अहंगंड

कर्वे यांच्या आश्रमात होत्या फक्त ब्राह्मण मुली

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

महाराष्ट्रातील स्त्रिशिक्षणाची मूहुर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली. फुल्यांचे हे कार्य धोंडो केशव कर्वे यांनी पुढे नेले. १९५८ साली धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. असे असले तरी महात्मा फुले आणि कर्वे यांच्या कामात मूलभूत फरक होता. फुल्यांचे कार्य जातीनिरपेक्ष होते, तर कर्वे यांचे कार्य जातीधिष्ठित होते. कर्वे हे जातीने ब्राह्मण होते. त्यांनी आपल्या आश्रमात केवळ ब्राह्मणांच्या विधवा आणि परित्यक्ता मुलींना शिक्षण दिले. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे  यांना धोंडो केशव कर्वे यांच्या ब्राह्मणी  जातीयवादाचा कडू अनुभव आला होता. आपल्या आत्मचरित्रात महर्षि शिंदे यांनी या कडू आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

सासर तुटलेली आपली बहीण जनाक्का हिला शिक्षण मिळावे यासाठी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना त्या काळी प्रचंड यातायात करावी लागली. पंडिता रमाबाई यांनी जनाक्काला आपल्या शारदा सदनात प्रवेश नाकारल्यानंतर महर्षि शिंदे यांनी अन्यत्र कोठे व्यवस्था होऊ शकते का, याचा तपास सुरू केला. १८९५ साली महर्षि शिंदे पुण्यात आले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी १८९६ साली धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या गावात बालिका आश्रम स्थापन केला होता. विधवा आणि परित्यक्ता मुलींना आश्रय आणि शिक्षण देणे, असा कर्वे यांच्या बालिका आश्रमाचा उद्देश होता. कर्वे यांना पुण्यातच आश्रम सुरू करावयाचा होता. तथापि, पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्या कार्यात खोडे घातले. स्त्रियांना शिक्षण देणे हे मनुस्मृतींच्या विरोधात असल्याचे सांगून ब्राह्मण कर्वे यांच्या कार्याला विरोध करीत होते.

ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही!
कर्वे यांच्या  आश्रमाची माहिती महर्षि शिंदे यांना कळाली. महर्षि शिंदे हे सुधारकी बाण्याचे होते. कर्वे यांच्या कामाबाबत महर्षि शिंदे यांना आस्था वाटली. जनाक्काला कर्वे यांच्या आश्रमात टाकावे आणि झालेच तर आश्रमासाठी काही कामही करावे, असा दुहेरी हेतू मनात ठेवून महर्षि शिंदे हिंगण्याला गेले. कर्वे यांचा आश्रम नुकताच कुठे सुरू झालेला होता. कर्वे यांना आण्णासाहेब म्हटले जाई. त्यांच्या भेटीचा वृत्तांत महर्षि शिंदे यांनी तपशिलाने लिहिला आहे. महर्षि शिंदे लिहितात :
‘‘...शेणामातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या एका खोपटात प्रो. आण्णासाहेब जमिनीवर बसले होते. त्यांच्या आश्रमात ब्राह्मण जातीच्या १०-१५ विधवा मुली होत्या. माझ्या बहिणीस आपल्या आश्रमात घेता का, ह्या माझ्या प्रश्नाला ‘ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही' असे प्रो. आण्णासाहेबांनी सांगितले व माझ्या बहिणीस आश्रमात घेण्याचे साफ नाकारले. त्यामुळे माझी फारच निराशा झाली. तत्कालिन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचे हे उदाहरणच आहे...''

धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात ज्या काही १०-१५ मुली होत्या त्या सर्व ब्राह्मणांच्याच होत्या. इतर जातीतील मुलींना कर्वे आपल्या आश्रमात प्रवेश देत नसत, हे कडू वास्तव महर्षि शिंदे यांना अनुभवायला आले. सुधारकांनाही जातीची बंधने तोडणे योग्य वाटत नव्हते. हा सारा प्रकार पाहून महर्षि शिंदे कमालीचे व्यथित झाले.

ख्रिस्ती शाळेने दिला जनाक्काला प्रवेश
आधी पंडिता रमाबाई आणि नंतर धोंडो केशव कर्वे यांनी जनाक्काला आपल्या आश्रमात ठेवून घेण्यास नकार दिला. पण महर्षि शिंदे  हरणा-यांपैकी नव्हते. जनाक्काला शिकवायचेच, असा निश्चय त्यांनी केला होता. पुढे त्यांनी जनाक्काला पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागेतील मुलींच्या हायस्कुलात घातले. ही शाळा ख्रिस्ती होती. मिस हरफर्ड नावाची एक युरोपियन बाई शाळेची हेडामास्तरीण होती. ख्रिस्ती शाळांत कोणताही जातीभेद पाळला जात नसे. येथे जनाक्काला सहजपणे प्रवेश मिळाला. जनाक्काची शाळा सुरू झाली, पण फीसचा प्रश्न निर्माण झाला. या शाळेत मिस मेरी भोर नावाची एक हुशार ख्रिस्ती बाई शिक्षकीण होती. त्यांनी हेडमास्तरीण बार्इंना सांगून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केले. जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांकडून दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली.

आणि अशा प्रकारे जनाक्काच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

संदर्भ :
माझ्या आठवणी व अनुभव
लेखक : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे
प्रकरण : इंटरमिजिएटचे वर्ष1 comment:

  1. निषेध!
    निषेध!
    निषेध!
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

    ReplyDelete