Sunday, 11 August 2013

संजय सोनवणीच का निवडून यायला हवेत?

८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी सोनवणी यांना 'अपाविमं'चा पाठींबा


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्लॉगर श्री. संजय सोनवणी यांनी सासवड येथे भरणा-या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिता पाटील विचार मंचच्या वतीने आम्ही त्यांना पाठींबा देत आहोत. श्री. सोनवणी यांच्याशी ‘अपाविमं'चे अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक मुद्यांवर सहमतीही ओह. सहमतीच्या याच मुद्यांच्या आधारे आम्ही त्यांना जाहीर पाठींबा देत आहोत. नुसताच पाठींबा देत नसून, संजय सोनवणी हेच या निवडणुकीत विजयी व्हायला हवेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. अपाविमंच्या हजारो वाचकांच्या वतीने संजय सोनवणी यांना विजयी होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा.

ही निवडणूक श्री. सोनवणी यांनीच का जिंकायला हवी, याची काही ठोस कारणे आहेत. अशी एकूण १० कारणे आम्हाला दिसतात. अपाविमंच्या वाचकांसाठी ती खाली देत आहोत.

१. श्री. सोनवणी हे ‘बहुजन' हा विचार घेऊन लिहिणारे आणि लढणारे असे एकमेव साहित्यिक आहेत.

२. वैयक्ति स्वार्थासाठी बहुजन हा विचार त्यांनी कधी लपविला नाही. हा विचार त्यांनी ठोस भूमिका घेऊन जाहीरपणे मांडला. अशी भूमिका घेणारे ते एकमेव साहित्यिक आहेत.

३. श्री. सोनवणी यांनी बहुजन विचार सोडून ब्राह्मणवादाला पुरक भूमिका घेतली असती, तर आज मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वांत थोर साहित्यिक म्हणून ब्राह्मणी मीडियाने त्यांचा उदोउदो केला असता. त्यांना मखरातच बसविले असते. पण असल्या कोत्या स्वार्थासाठी त्यांनी आपली मूळ भूमिका सोडली नाही. भूमिकांच्या बाबतीतला हा ठामपणा आजच्या स्वार्थलोलूप जगात लाख मोलाचा आहे, असे अपाविमंला वाटते.

४. श्री. संजय सोनवणी बहुजनवादी आहेत, म्हणून त्यांना या निवडणुकीत विजय मिळाला पाहिजे, असे नव्हे. असे कोणी म्हणत असेल, तर त्याला श्री. सोनवणी यांच्या विषयी कोणतीही माहिती नाही, असे आम्ही मानू. बहुजनवादी असण्याच्या आधी सोनवणी हे थोर लेखक आणि संशोधक आहेत.  त्यांनी ललित साहित्याचे कथा, कविता, कादंबरी असे सर्व प्रकार हातळले आहेत. त्यांच्या अनेक कादंब-यांनी खपाचे विक्रम केले आहेत. थोर-थोर म्हटल्या जाणा-या बहुतांश लेखकांच्या पुस्तकांना कुत्रे विचारत नसताना सोनवणी यांची पुस्तके आवृत्त्यांमागून आवृत्या काढीत आहेत.

५. श्री. संजय सोनवणी यांनी इतिहासाच्या क्षेत्रात अत्यंत मूलगामी लिखाण केले आहे. प्रत्येक ऐतिहासिक महापुरूषाच्या पाठीशी ब्राह्मण गुरूचे झेंगट लावून देणा-या बोगस इतिहास लेखकांचा त्यांनी पर्दाफाश केला. आपला हा विचार त्यांनी निर्भयपणे मांडला.

६. भाषाशास्त्राच्या क्षेत्रातही श्री. सोनवणी यांचे काम अद्वितीय आहे. मराठी आणि संस्कृत या दोन स्वतंत्र भाषा आहेत, हा विचार श्री. सोनवणी यांनी पहिल्यांदा दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जी प्रक्रिया सध्या सुरू आहे, तिच्या मुळाशी हाच विचार आहे. यावरू श्री. सोनवणी यांच्या विचाराचे मोल लक्षात यावे.

७. श्री. संजय सोनवणी यांचा तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी तत्त्वचिंतनपर विपूल लेखन केले आहे.


८. आजपर्यंत ८६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यातील अगदी मोजके अपवाद वगळता सर्व संमेलनांचे अध्यक्ष हे या ना त्या कारणाने ब्राह्मणवादाला पूरक भूमिका घेऊन लेखन करत होते. ब्राह्मणवाद पूर्णत: नाकारण्याचे धाडस कोणीही केलेले नव्हते. श्री. सोनवणी निवडून आल्यास ब्राह्मणवादाला संपूर्ण नकार देणारा पहिलाच संमेलनाध्यक्ष मराठीला मिळेल.


९. श्री. सोनवणी हे सर्वार्थाने २१ व्या शतकातील लेखक आहेत. ऑनलाईन मराठी लेखनातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचा ब्लॉग विशेष वाचकप्रिय आहे. श्री. सोनवणी विजयी झाल्यास पूर्ण वेळ ब्लॉगर असलेला पहिला संमेलनाध्यक्ष मराठीला मिळेल.

१०. महाराष्ट्राच्या सर्व विभागातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील साहित्य परिषदा ताब्यात ठेवणा-या लोकांशी श्री. सोनवणी यांचे कोणतेही लागेबांधे नाहीत. त्यामुळेच सोनवणी यांचा विजय पहिला नि:पक्ष विजय ठरेल.

श्री. संजय सोनवणी यांना निवडणुकीसाठी पुन:श्च शुभेच्छा.

1 comment:

  1. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी सोनवणी यांना पाठींबा. श्री. संजय सोनवणी यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete