Sunday 18 August 2013

जनाक्काच्या शिक्षणासाठी महर्षि शिंदे यांची धडपड

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

गोष्ट आहे १८९५-९६च्या आसपासची. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुण्यात सदाशिव पेठेत राहत होते. नागनाथाच्या पाराजवळ एका जुन्या वाड्यात त्यांच्या कुटुंबाचे बि-हाड होते. मातोश्री, बहीण जनाक्का आणि स्वत: महर्षि असे तिघांचे हे कुटुंब. सासरच्या जाचामुळे जनाक्का कायमची माहेरी आली होती. त्या काळी अल्पवयात लग्ने होत. जनाक्काचे वय शिकण्याचे होते. महर्षि शिंदे यांनी जनाक्काला शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. सदाशिव पेठेत चिमण्या गणपतीजवळ एका ख्रिस्ती मिशन-यांच्या शाळेत त्यांनी तिला पहिल्यांदा घातले. सांगले नावाच्या हेडमास्तरीण बाई होत्या. त्यांनी शिंदे यांना सहकार्य केले.

राजवट इंग्रजांची होती. फुकट शिक्षण मिळत नसे. फीस भरणे परवडणारे नव्हते. महर्षि शिंदे यांनी कुठे सोय होते का याचा शोध चालविला. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेचे नाव त्यांच्या समोर आल्या. पंडिता रमाबाई या मूळच्या चित्पावन ब्राह्मण होत्या. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून धर्मप्रसाराचे काम पुण्यात नेटाने सुरू केले होते. धर्मप्रसाराला समाज सेवेचा बुरखा पांघरलेला होता, इतकेच. महर्षि शिंदे पंडिता रमाबाई यांना भेटायला गेले. महर्षि शिंदे खेड्यातून आलेले. त्यांचा बावळा वेष पाहून बाईंनी अटींचा पाश आवळला. मुलीला आश्रमात ठेवते पण पाच वर्षे तुम्हाला तिला भेटता येणार नाही, अशी एक कडक अट त्यात होती. तुम्ही तिच्या शिक्षणात अडथळा आणाल म्हणून ही अट असल्याचे बाई म्हणाल्या. महर्षि शिंदे वस्ताद होते. ते म्हणाले, अहो बाई, मीच तिला शिक्षणासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. तिच्या शिक्षणात अडथळे आणायचे असते, तर तिला तुमच्याकडे घेऊन आलोच असतो कशाला? तिचे धर्मांतर करण्यात माझा अडथळा नको, म्हणून तुम्ही ही अट घातली हे उघड आहे.

बावळ्या दिसणा-या २०-२२ वर्षांच्या तरुणाच्या तोंडून अशी हुशारीची वाक्ये ऐकून बाई चमकल्या. त्यांनी अधिक चौकशी केली. हा मुलगा फर्ग्युसन कॉलेजात शिकलेला आहे, हे ऐकल्यानंतर बाई बदलल्या. फर्ग्युसन कॉलेजातील  प्रोफेसर मंडळी नास्तिक आहेत, असा शेरा मारून बार्इंनी जनाक्काला शारदा सदनमध्ये प्रवेश नाकारला.


संबधित लेख :
आगरकर यांचा मराठा द्वेष
महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा



No comments:

Post a Comment