Monday 22 July 2013

कोणी कोणाचा गुरू नाही; कोणी कोणाचा शिष्य नाही..!

तुकोबांना शेवटचे गुरू मानून गुरूपदाचे स्तोम थांबवा

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

गुरू पौर्णिमा विशेष

गुरू या शब्दाएवढा बोगस आणि ढोंगी शब्द दुसरा कोणताही नाही. गुरू ही संकल्पनाच बोगस आहे. भारतातील जातीय विषमता पोसणारी ब्राह्मणी व्यवस्था गुरू या दोन अक्षरांवर टिकून आहे. ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करून समतेचे राज्य आणायचे असेल, तर प्रथम गुरू हा शब्द गाडून टाकला पाहिजे. गुरू या शब्दाने जेवढी घाण येथे करून ठेवली आहे, तेवढी घाण कोणीही केलेली नाही. गुरू या शब्दाने भारतातील महापुरूषांना अवमानित आणि अपमानित करण्याचे महापाप केले आहे. त्यामागे सुनियोजित षडयंत्र प्राचीन काळापासून येथे राबत आहे.

चंद्रगुप्त ते शिवाजी
महापुरूष जन्माला आला की, त्याच्या मागे खोट्या गुरूचे लचांड लावून देण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्था करते. हा गुरू हमखास ब्राह्मण जातीतला असतो. पुराणातील गोष्टी मी येथे उगाळणार नाही. फक्त इतिहासाचाच विचार येथे देत आहे. इतिहासात जाता येईल तितके मागे जाऊन बोगस गुरू चिकटविण्याचे काम ब्राह्मणवाद्यांनी ेकेले आहे. याची सुरूवात थेट चंद्रगुप्त मौर्यापासून होते. चंद्रगुप्ताच्या नावामागे चाणक्य नावाचा एक बोगस ब्राह्मण गुरू म्हणून चिकटविण्यात आला. प्रत्येक यशस्वी राजाच्या नावा मागे असे कोणते तरी ब्राह्मणी नाव चिकटावून दिले गेले. छत्रपती शिवरायांचे उदाहरण हे या मालिकेतील सर्वांत अलिकडचे उदाहरण आहे. दादोजी कोंडदेव आणि रामदास असे दोन-दोन बोगस गुरू ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या नावामागे चिकटवून टाकले. हे बनावट गुरू काढून टाकण्यासाठी महाराष्ट्राला अनेक वर्षे लढा द्यावा लागला. 

महापुरूष घडविता येत नसतो
महापुरूष जन्माला यावा लागत असतो. घडविला जात नसतो. अनुबोध करून महापुरूष घडविता आले असते, तर एकेका गुरूने शेकडो महापुरूष निर्माण केले असते.  एक शिवाजी महाराष्ट्रात, एक उत्तर भारतात, एक दक्षिण भारतात असे अनेक शिवाजी निर्माण करून मोगलांचा सहज नि:पात करता आला असता. पण वास्तवात असे होत नसते. शिवाजी एकच असतो आणि तो जिजाऊंच्या पोटीच जन्माला यावा लागत असतो. 

बुद्धांनी सर्वप्रथम नाकारला गुरू
ब्राह्मणी व्यवस्था गुरूपदाच्या बोगसगिरीवर उभी आहे, हे सर्वांत आधी भगवान गौतम बुद्धांनी ओळखले. बुद्धांनी कोणताही गुरू केला नाही. स्वत:चा मार्ग स्वत: शोधला. आपल्या अनुयायांनी गुरूपणाच्या बोगसगिरीत अडकू नये म्हणून बुद्धांनी ‘अत्त दीप भव'  म्हणजेच स्वत:चा दीप स्वत:च हो, अशी शिकवण त्यांना दिली. बुद्धानंतर लौकिक अर्थाने गुरू न करणारे दुसरे महापुरूष म्हणजे संत तुकाराम महाराज होत. तुकोबांनी स्वत: कोणताही गुरू केला नाही. संत नामदेवांचा स्वप्नादेश मानून तुकोबांनी अभंग रचना सुरू केली. तसेच बाबाजी चैतन्यांचा स्वप्नबोध मानून अध्यात्मिक उन्नती साधली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तुकोबांनी कोणालाही गुरूबोध दिला नाही. संत बहिणाबाई आणि संत निळोबा यांनी तुकोबांना गुरू मानले. पण तुकोबांनी त्यांना लौकिकार्थाने अनुबोध दिलेला नव्हता. दोघांनीही तुकोबांचा स्वप्नबोध मानून तुकोबांना गुरूस्थानी मानले. 

शिखांचा आदर्श घ्या
शीख धर्म हा गुरूपंरपरेवर आधारित असला तरी, शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी  यांनी ही गुरूपरंपरा खंडीत केली. यापुढे आपला कोणीही नवा गुरू होणार नाही, ग्रंथसाहिब हाच आपला आता गुरू, असा आदेश गोविंदसिंगजी  यांनी आपल्या अनुयायांनी दिला. म्हणूनच शिखांच्या पवित्र ग्रंथास गुरूग्रंथसाहिब असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गुरूंच्या नावाने जी ढोंगबाजी चालते, ती शीख धर्मात दिसून येत नाही. गोविंदसिंगजी  यांनी केलेल्या योजनेचे हे फळ आहे. 

तुकोबा हेच आपले शेवटचे गुरू
महाराष्ट्रात तुकोबांना शेवटचे गुरू मानून गुरूपरंपरा खंडीत करता येऊ शकते. या पुढे आपला कोणताही गुरू नाही. तुकोबांचा गाथा हाच आपला गुरू, असे मान्य केल्यास गुरूच्या नावाने सुरू असलेली बोगसगिरी थांबविता येईल.


No comments:

Post a Comment