Tuesday 16 July 2013

तुकोबांच्या गाथ्यातील बोगस अभंगांची कथा

रामदासाच्या गुरुपदामागील कारस्थान

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

इतिहासाची मोडतोड करणे, खोटा इतिहास लिहिणे आणि त्यासाठी खोटे दस्तावेज तयार करणे, हे पाप महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे नित्यनेमाने सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी हे पाप करणारे ब्राह्मणच असतात. ब्राह्मण जातीचा आणि ब्राह्मण जातीत जन्मलेल्या महापुरुषांचा महिमा वाढविणे हा एकमेव उद्देश या पापामागे आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथाही या महापाप्यांनी सोडला नाही. तुकोबांच्या हयातीत ब्राह्मणांनी त्यांना अनन्वयित छळले. पण तुकोबांच्या वैकुंठगमनानंतरही ब्राह्मण स्वस्थ बसले नव्हते. तुकोबांच्या गाथ्यात बोगस अभंग घुसवून त्यांनी रामदासाचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला. हे कसे घडले याचा हा थोडक्यात आढावा. 

तुकोबांचे वास्तव्य देहूस होते. तसेच लोहगावी त्यांची किर्तने होत. या दोन्ही ठिकाणांहून पुणे हाकेच्या अंतरावर आहे. शिवराय १० ते १२ वर्षांचे असतील तेव्हाच तुकोबांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरलेली होती. औरंगाबादजवळील शिऊर येथील बहिणाबाई तुकोबांना गुरू करून घेण्यासाठी देहूला आल्या होत्या. यावरून तुकोबांच्या कीर्तीची कल्पना यावी. पुण्यात राहणा-या शिवरायांच्या कानी तुकोबांची किर्ती जाणे हे स्वाभाविकच होते. समाज जागृतीचे काम करणा-या तुकोबांचा योग्य सन्मान व्हायला हवा, असे मनात आणून शिवरायांनी मानाची वस्त्रे आणि अबदागि-या देहूला पाठविल्या. सोबत जडजवाहीरही पाठविले. तुकोबा ऐहिक मान सन्मानांच्या पलिकडे गेलेले महान संत होते. त्यांनी हा सर्व सरंजाम विनम्रपणे नाकारला. सोने आणि माती, राजा आणि रंक यांची किंमत आमच्या दृष्टीने सारखीच आहे. असे तुकोबांनी शिवरायांच्या दूतांना सांगितले. राजाने पाठविलेला सरंजाम नाकारणे साधी गोष्ट नव्हे. तुकोबांच्या या निष्पृह, निर्भय आणि निर्मोही वृत्तीने शिवराय प्रभावित झाले. या महापुरूषाचे आशीर्वाद आपण घेतलेच पाहिजेत, असा निश्चय करून महाराज स्वत: देहूला आले. असा हा थोडक्यात इतिहास. हा इतिहास विकृत करण्याचे काम चाफळच्या रामदासी मठाने नंतर केले. 

तुकोबांच्या अभंगांना जोडले ५ बोगस अभंगांचे शेपूट
तुकोबांनी आपल्या आयुष्यातील सर्व घडामोडी अभंगरूपाने मांडल्या आहेत. या प्रसंगावरही त्यांनी अभंग लिहिले. हे एकूण ९ अभंग आहेत. तुकोबांच्या मूळ अभंगांना आणखी ५ अभंगांचे शेपूट चाफळच्या रामदासी चेल्यांनी जोडले. कटकारस्थाने करून हे अभंग हस्तलिखित गाथ्यात व्यवस्थित घुसडविण्यात आले. तुकोबा शिवरायांना रामदासांकडे पाठवित आहेत, असे या बोगस अभंगात दाखविण्यात आले आहे. पुण्यातल्या इंदुप्रकाश छापखान्याने तुकोबांच्या अभंगांचा पहिला छापील गाथा प्रसिद्ध केला, त्यात हे अभंग अनायासे आले. पुढे महाराष्ट्र सरकारने गाथा प्रसिद्ध केला, त्यातही हे अभंग आले. रामदास हे शिवरायांचे गुरू होते, हा समज या ५ बोगस अभंगांनी दृढ करण्याचे काम केले. खुद्द तुकाराम महाराजांनीच शिवरायांना रामदासाकडे पाठविले होते, हे दाखविणारा कागदोपत्री पुरावा या कारस्थानाने पुरविला होता.

पापाला वाचा फुटली
पण प्रत्येक कागद खरेच बोलतो, असे गृहित धरता येत नाही. खोटेपणा कितीही बेमालूमपणे केला तरी काही गोष्टी अनवधानाने मागे राहून जातातच. रामदास्यांचेही तेच झाले. तुकोबांच्या तोंडी रामदास्यांनी अशा काही गोष्टी घातल्या की, ज्या तुकोबांच्या काळात अस्तित्वातच नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० सालचा आहे. तुकोबांचे वैकुंठगमन हे १६४९ सालचे आहे. म्हणजेच तुकोबा गेले तेव्हा शिवरायांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. शिवरायांचे स्वराज्य अजून आकाराला आले नव्हते. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ अजून स्थापन व्हायचे होते. १६७४ साली शिवरायांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर त्यांचे अष्टप्रधान मंडळ स्थापन झाले. खोटेपणा करणा-या रामदास्यांना याची माहिती कोठून असणार? त्यांनी तुकोबांच्या तोंडी शिवरायांची स्तुती घातली. त्यात अष्टप्रधानांचा उल्लेख करून टाकला. तुकोबांच्या हयातीत शिवरायांकडे प्रधानकीचे काम पाहणा-यास डबीर असे म्हणत. नंतर महाराजांनी या पदाचे नाव बदलून सुमंत असे केले. पण तुकोबांच्या तोंडी घातलेल्या खोट्या अभंगात ही दोन पदे वेगवेगळी असल्याचे दिसून येते! 

मल्हार रामराव चिटणीसाचे पाप 
हे अभंग रचण्याचे पाप मल्हार रामराव चिटणीसाचे आहे. चिटणिसाच्या बखरीत शिवराय आणि तुकोबांच्या भेटीचा प्रसंग दाखविला आहे. या भेटी प्रसंगी तुकोबा शिवरायांना उपदेश करताना दाखविले आहे. तुकोबांच्या उपदेशात हे बोगस अभंग येतात. 

तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी संशोधन करून रामदासी चेल्यांचा हा बनाव उघडकीस आणला. देहू संस्थानने गाथा छापला तेव्हा हे प्रक्षिप्त अभंग गाथ्यातून गाळण्यात आले. येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, महाराष्ट्रात वारकरी संस्थांनी छापलेल्या एकाही गाथ्यात हे प्रक्षिप्त अभंग नाहीत. चाफळच्या रामदासी चेल्यांनी केलेल्या या कारस्थानाचा पर्दाफाश करताना सदानंद मोरे यांनी केलेले गाथ्याच्या प्रस्तावनेत विवेचन असे : 

"… ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा सद्भावनेने (good faith) हे अभंग रचले, तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी, राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, १६५० पर्यंत ज्याला शिवरायाचे नावही माहीत असणे सुतराम् शक्य नव्हते, तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे आणि सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील दोन नावे असली; तरी ती दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहेत. त्यातही मौज अशी, की शिवराज्यभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर या फारशी भाषेतील शब्दाला सुमंत हा पर्याय राज्यव्यवहारकोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदासभक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही १६५० पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्याचा चमत्कार केला आहे."

मोरे पुढे लिहितात : "… मुळात रामदासी संप्रदायातच या अभंगांची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा करणेही फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा रामदासांच्या संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. हनुमंतस्वामीच्या रामदासांच्या बखरीची वाढीव दुसरी आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयार केली. … चिटणीस, हनुमंतस्वामी व कदाचित मेढे यांनी भेटीचे वर्णन करताना बहुधा हे अभंग रचले असावेत. अर्थात त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यांना वाटायचे काही कारण नव्हते. त्यांनी केले, ते प्रामाणिकपणे व रामदासांचा महिमा वाढविण्यासाठी. ही घटना खरोखर घडली व तुकोबांनी शिवरायांना रामदासांकडे जायला सांगितले, ही त्यांची प्रामाणिक समजूत होती. तिच्या पोटी त्यांनी हे केले. तुकोबांनी शिवरायांना गद्यात उपदेश करण्याऐवजी अभंगांत करणे अधिक सयुक्तिक वाटल्याने त्यांची गद्याऐवजी पद्य अभंग करून ते मूळ अभंगांची ओळ विस्कळीत करून त्यांच्यांत मध्येच घुसडले. पण त्यामुळे वृत्तविसंगती निर्माण होते, ओघ बिघडतो, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु साताऱ्याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांची अडाणीपणे अभंगांत आणली. अर्थात त्यांच्या अडाणी प्रामाणिकपणामुळेच प्रस्तुत प्रक्षेप ओळखणे शक्य झाले."


अपराध अक्षम्यच
चाफळच्या मठाचे कारस्थान उघड करताना डॉ. सदानंद मोरे यांनी तुकोबांच्या वंशजाला साजेसा संयम ठेवला आहे. पण रामदासी चेले आणि त्यानंतर ब्राह्मण इतिहासकारांनी रामदासाला शिवरायांचा गुरू ठरविण्यासाठी केलेली कारस्थाने क्षमा करण्याजोगी निश्चितच नाहीत.


[[Google Search : tukaram, sant tukaram, jagadguru, dehu, gatha, ramdas, malhar ramrao chitnis, lohgao, pune, chatrapati shivji maharaj, brahman]]




1 comment:

  1. तुम्ही बोलताय ते जर खर असेल तर

    सदानंद मोरे पहा किती वस्तुस्थितिला धरून सगळ्या घटने कड़े पहातायत आणि तुम्ही पहा कोणत्या नजरेने ह्या गोष्टी कड़े पाहता आहात
    चाणक्या पासून ते रामदास स्वामी पर्यंत कोणाला माहीत होत की 2013 साली कोणी तरी पुरावे माघनार आहे म्हणून ते तैयार करुण ठेवले पाहिजेत
    तुम्ही एका जाती च्या द्वेषा मूळ केलेले आरोप हास्यास्पद वाटतायत

    ReplyDelete