Monday 5 December 2011

कनिष्ठ जातींना हीन मानणा-या जातीयवाद्यांना काय उत्तरे देणार?


भावांनो आणि बहिणींनो,

मी हा ब्लॉग लोकांशी भांडण्यासाठी काढलेला नाही. बहुजन समाजाच्या जनजागृतीसाठी काढला आहे. त्यामुळे लोकांनी कितीही टीका केली, तरी मी माझे काम सुरूच ठेवणार आहे.  माझे काही भाऊ आणि बहिणी मला विचारतात की, एवढी टीका होत असताना तुम्ही गप्प का राहता? बरेचदा ही टीका खोटेपणावर आधारित असते. किमान हे खोटे संदर्भ खोडून काढण्यासाठी तरी आपण उत्तरे द्यायला हवीत, असा आग्रह हे भाऊ आणि बहिणी धरीत असतात. 
माझे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान
वरील प्रमाणे आग्रह धरणारया माझ्या भावा-बहिणींच्या भूमिकेबद्दल पूर्ण आदर आहे. तथापि, माझे असे मत आहे की, माझे लक्ष विचलीत होऊन टीकेला उत्तर देण्यातच माझा वेळ जावा, अशी काही लोकांची व्यूहरचना आहे. त्यामुळे त्यांना उत्तरे देण्यात वेळ घालविण्याऐवजी आपल्या मूळ लिखाणात वेळ घालविणे आवश्यक आहे, असे मला वाटते. म्हणून मी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. माझ्या ब्लॉगवर येणारे लोक माझे विचार वाचायला येतात. माझी टीकाकारांसोबतची भांडणे वाचायला नव्हेत. मग आपण व्यर्थ वेळ कशाला वाया घालावा? असे मला वाटते. ब्राह्मण संत तुलसीदास याने चांडाल, शुद्र, पशु और नारी । ये तो सब ताडण के अधिकारी ।।, असे रामचरित मानसात लिहून ठेवले आहे. या विचारांचे वाहक असलेल्या लोकांकडून पाठिंब्याची अपेक्षा करता येणार नाही. हे लोक टीका करणारच. 
त्यांना विषय समजूनच घ्यायचा नाही
काही लोक स्वत:चे नाव चर्चेत राहावे, यासाठीही टीका करीत असतात. काही लोक अर्धवट माहितीवर बोलत असतात. काहींना मुस्लिम आणि दलितांबद्दल पूर्वग्रह असतात. दलित-मुस्लिमांची न्याय्य बाजूही त्यांना खपत नाही. अशा लोकांना उत्तरे देणे अनर्थकारकच आहे. ज्यांना विषय समजून घ्यायचा नाहीए. त्यांना समजावत बसणे, म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे नव्हे काय?
ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी 
व्यवस्था नष्ट होईपर्यंत लढा सुरूच राहील
कनिष्ठ जातींना हिणकस ठरवून केवळ ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारया या व्यवस्थेविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील. ही व्यवस्था पूर्णत: नष्ट झाली पाहिजे, असे माझे मत आहे. ज्यांनी ज्यांनी ही व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या महापुरुषांचा त्यांच्या कार्यासह परिचय करून देण्यासाठी मी सध्या लेखन करीत आहे. हे लेखन पूर्ण झाल्यानंतर नवी समाजव्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकेल, याबाबत मी लिहीन. मी कोणी फार मोठी नाही. ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी ही व्यवस्था मी पूर्णत: नष्ट करू शकेन, असा भ्रमही माझ्या डोक्यात नाही. तरीही मी माझे प्रयत्न सुरू ठेवीन. यशापयशाची परवा मी करीत नाही. पुढच्या किंवा  त्याच्या पुढच्या पिढीत ही व्यवस्था नष्ट होईलच, अशी माझी ठाम निष्ठा आहे.

अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment