Thursday, 1 December 2011




सर्व वाचक भावा बहिणींच्या चरणी विनम्र लोटांगण

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,बहुजन समाजाच्या प्रबोधनाचा वसा घेतल्यानंतर मी ब्लॉग सुरू केला. सप्टेंबर २०११ च्या पहिल्या तारखेला मी माझी पहिली पोस्ट ब्लॉगवर टाकली. आज डिसेंबरची १ तारीख आहे. बरोबर तीन महिने झाले. आज सकाळी माझ्या ब्लॉगने वाचकांचा २० हजारांचा आकडा पार केला. याचा अर्थ माझ्या ब्लॉगवरील लेख २० हजार वेळा पाहिले/वाचले गेले. या ३ महिन्यांच्या काळात माझ्या लेखांना बहुजन समाजातील तरुण वर्गाने सर्वाधिक पसंती दिली. ही माझी सर्वांत महत्त्वाची बाब समजते. तरुण वर्गात आता जागृती आली आहे. ब्राह्मणी धर्मातील भेदभावाबाबत जाणीव निर्माण होत आहे. मी आपणा सर्वांची ऋणी आहे. माझ्या ब्लॉगला एवढा उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपणा सर्व भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे. मी आपल्या चरणी लोटांगण घेऊन आपले ऋण व्यक्त करते. 


मी कोणी फार मोठी नव्हे. सर्वसामान्य स्त्रियांसारखीच एक स्त्री आहे. फक्त वाचनाची थोडीफार आवड होती. काही ब्राह्मणी ग्रंथ वाचण्यात आले आणि मी चकीत झाले. बहुजनांना दाबण्यासाठीच आपले धर्मग्रंथ रचले गेले आहेत, हे ढळढळीतपणे दिसून आले. हे कोणाला सांगावे? फेसबुकची सेवा त्यासाठी मदतीला आली. आधी फेसबुकवर लिहू लागले. भावा-बहिणींनी सल्ला दिला की, तुम्ही ब्लॉग काढा. मग ब्लॉग काढला. तुमच्याच प्रेरणेने हे सगळे घडले.


या तीन महिन्यांच्या काळात माझ्यावर अनवस्था प्रसंगही ओढवले. फेसबुकवर असताना मी माझा पत्ता, मोबाईल नंबर वगैरे टाकला होता. पण माझ्या लेखामुळे दुखावलेले ब्राह्मणी भुते मला त्रास देऊ लागली. रात्री बेरात्री फोन येऊ लागले. धमक्या येऊ लागल्या. माझ्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली. त्यामुळे शेवटी मी माझा फोटो, पत्ता काढून टाकला. फोन नंबर बदलून घेतला. मला विनाकारण तमाशा करायचा नव्हता. बहुजन समाजात जागृती करणे हे माझे ध्ये होते. अज्ञातवासात राहूनही ते करता येते. म्हणून मी अज्ञातवासात गेले. पांडवांप्रमाणे मी अज्ञातवासाची शिक्षा भोगत आहे. सत्य जगासमोर यावे यासाठी. 


मी अज्ञातवासात गेल्यानंतरही ब्राह्मणी भुते गप्प झाली नाहीत, त्यांच्या कारवाया अजूनही सुरूच आहेत. ते माझ्या पोस्टवर घाणेरड्या भाषेत कॉमेंट्स टाकत असतात. काही ब्राह्मण बहुजनांची नावे धारण करून खोटी खाती तयार करतात. या खोट्या नावाने शिविगाळ करणा-या कॉमेंट्स टाकतात. बहुजन समाज अनिता पाटील यांच्या विरोधात आहे, असा आभास निर्माण करण्यासाठी त्यांचे हे चाळे सुरू आहेत. त्यांच्या या कारवायांना फसण्याएवढा बहुजन समाज आता भोळा राहिलेला नाही, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.


माझे सर्वांना एवढेच सांगणे आहे की, मी कोण आहे, याकडे बघू नका. मला प्रसिद्धी नको आहे. पैसा नको आहे. उलट स्वत:चे पैसे खर्च करून मी हे उद्योग करीत आहे. मला फक्त बहुजन समाजात जागृती निर्माण करायची आहे. ती मी करीतच राहीन. कोणी कितीही विरोध केला, तरी माझे काम थांबणार नाही. मी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण आता स्वीकारले आहे. कोणी कितीही टीका केली, तरी त्यावर प्रतिक्रिया मी देत नाही. माझे स्वीकृत कार्य करीत राहते. पुढेही करीत राहीन. मला सपोर्ट करणा-या सर्व भावांना आणि बहिणींना पुनश्च एकदा विनम्रपणे साष्टांग दंडवत.


तुमची बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment