Sunday, 4 December 2011

श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष




वैदिक इंद्राची फटफजिती 
भारतातील पहिलचा वेदविरोधक महापुरूष कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नि:संशयपणे श्रीकृष्ण असे द्यावे लागेल. काळा श्रीकृष्ण गोऱ्या  वैदिक ब्राह्मणांचा देव झाला, यातच सर्वकाही आले. 
महाभारत आणि श्रीमद्भागवातील आणखी काही उदाहरणे देऊन मी हा मुद्दा स्पष्ट करते. वैदिकांचा मुख्य देव इंद्र आणि ब्रह्म आहेत. तर मुख्य ग्रंथ ऋग्वेद आहे. यजुर्वेद अथर्ववेद सामवेद बरेच नंतरचे आहेत, याबाबत आता विद्वानांत एकमत झालेले आहे. वेदांत ३३ प्रकारचे देव आहेत. (३३ कोटी या शब्दप्रयोगातील कोटी या शब्दाने संख्या दर्शविली जात नाही. कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार.) ऋगवेदाचा नायक इंद्र आहे. तर खलनायक वृत्रासूर आहे. इंद्राने आपल्या वज्र नावाच्या शस्त्राने वृत्रासुराला ठार मारले. याचे वर्णन ऋगवेदात येते. इंद्राने वृत्रासुराची पुरे म्हणजेच तटबंदीयुक्त नगरे उद्ध्वस्त केली. म्हणून त्याला वेदांनी पुरंदर म्हटले आहे. वैदिक यज्ञाची मुख्य देवताही इंद्रच आहे. वेदांत इंद्राच्याच प्रार्थनांना मुख्यस्थान आहे. त्यातीलच ही एक प्रार्थना पाहा :
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
अर्थ - ज्याची कीर्ती आम्ही वृद्ध लोकांकडून ऐकत आलो आहोत, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वसंपन्न असा जो पूषा म्हणजेच सूर्य आमचे कल्याण करो. ज्याती गती अकुंठित आहे असा जो ताक्ष्र्ये तो आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत  करो.
या प्रार्थनेत पहिले नाव इंद्राचे येते. इंद्राच्या अशा असंख्य प्रार्थनांनी वेदवाङ्मय भरून राहिले आहे. त्या सर्वांत पडण्याची गरज नाही. महाभारत काळाच्या पूर्वसंध्येपर्यंत इंद्राचे महत्त्व टिकून राहिले दिसून येते. महाभारत काळात मात्र नव्या धर्ममताने इंद्र आणि इतर वैदिक देवतांचा पराभव केला.
इंद्र यज्ञावर बंदी
महाभारतकाळात श्रीकृष्णाने वैदिक परंपरेला पहिला दणका दिला. इंद्राला पर्जन्याची देवता मानले जाई. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी गोकुळात इंद्रयाग करण्याची प्रथा होती. ती श्रीकृष्णाने बंद केली. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. नंदराजाने इंद्रयज्ञाची संपूर्ण तयारी केली होती. ऐनवेळी श्रीकृष्णाने हस्तक्षेप करून ही सामग्री गोवर्धन पर्वताच्या यागासाठी वापरण्याचे आदेश दिले. श्रीकृष्ण भागवतात म्हणतो :
य इंद्रयाग संभारास्तैरयं साध्यतां मख:
(श्रीमद्भागवत. स्कंध : १० अध्याय : २४ श्लोक : २५)
अर्थ : इंद्र-याग (याग म्हणजे यज्ञ) करण्यासाठी जी सामग्री तयार करण्यात आली आहे, ती आता हा (गोवर्धन पर्वताचा) यज्ञ करण्यासाठी वापरा.
गोवर्धन पूजेची परंपरा आजही उत्तर भारतात सुरू आहे. विशेष म्हणजे क्षत्रिय राजपुतांत गोवर्धन पूजेला अत्यंतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील परदेशी राजपूत या जमातीतही गोवर्धन पूजा केली जाते. अशा एका पूजेला मी स्वत: उपस्थित राहिले आहे. आपली पूजा बंद झाल्यामुळे इंद्र कसा चिडला त्याने पर्जन्याची अमाप वृष्टी कशी केली आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकूळवासियांचे संरक्षण कसे केले, याची रसाळ वर्णने कालांतराने पुराणिकांनी करून ठेवली. इंद्राने श्रीकृष्णावर हल्ला केला, पण त्यात त्याची फटफजिती झाली आणि त्याला श्रीकृष्णासमोर शरण यावे लागले, अशीही वर्णने पुराणांत आढळतात. 
इंद्र सैरावैरा पाळतो 
वेदांतील नायक असलेला इंद्र अशा प्रकारे महाभारतात पराभूत झाला. पुढे श्रीमद्भागवत आणि इतर १८ पुराणांत तर इंद्राची अवस्था फारच हीन दीन अवस्था झाली. दानवांचे संकट आले की वेदांतील महापराक्रमी इंद्र सैरावैरा पळत सुटतो. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर तो श्रीविष्णूला शरण जातो. या काळात इंद्र मागे पडून विष्णू ही मुख्य देवता म्हणून उदयास आली होती.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

1 comment:

  1. कोण इंद्र..???

    कोण कृष्ण..???

    ह्या गोष्टींचा आता काही उपयोग आहे का..??

    बहुजन मुलाना आपले नेते काय देतायत

    मोफत शिक्षण ..??
    मोफत कंप्यूटर शिक्षण..???
    मोफत एडमिशन..??

    आमच्या जीवा वर नेते झाले पैसे कमवले
    कॉलेज काढले
    शाळा काढल्या
    पण तिथे आमच्या मुलाना एडमिशन फुकट देतात का..??

    तुमचा कृष्ण येतो का आमच्या मदतीला
    का इंद्र येतो आमच्या मुलांच्या मदतीला

    आम्हाला नका सांगू बहुजन आणि मराठा
    काय करतात आमचे नेते आम्ही रोज पहातो आहे

    ReplyDelete