Tuesday, 20 November 2012

ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप नव्हे!

जमदग्नी ब्राह्मण म्हणतो : लाखांचा पोशिंदा 
असलेल्या राजाला मारणे हेच सर्वांत मोठे पाप!!
ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप कसे ठरले आणि कोणी ठरविले?  ब्राह्मणाला ठार मारणे हे सर्वांत मोठे पाप आहे हे कोणत्या ग्रंथात लिहिले आहे? मी अनेक धर्मग्रंथ धुंडाळले मात्र मला तरी असा कोणताही उल्लेख कोणत्याही मान्यता प्राप्त ग्रंथात आढळून येत नाही. उलट राजाला ठार मारणे, हे सर्वांत मोठे पाप आहे, असे उल्लेख अनेक ग्रंथात आढळून येतात. ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, हा प्रचार खोटा आहे. 

या संदर्भाने भागवत पुराणात काय उल्लेख आहेत, याची चर्चा मी येथे करणार आहे. भागवत पुराणाची निवड दोन कारणांसाठी केली आहे. एक म्हणजे, आज हिंदू म्हणविला जाणार धर्म भागवत पुराणातील संकल्पनांवर आधारित आहे. अवतार कल्पना भागवत पुराणानेच आणली असून, ती हिंदू म्हणविल्या जाणाऱ्या  धर्माचा मुख्य आधार ठरली आहे. दुसरे कारण असे की, ज्या परशुरामाला आजचे ब्राह्मण आपला आदर्श ठरवित आहेत, त्याच्याच कथेत ब्राह्मण हत्या हे सर्वांत मोठे पाप नसल्याचा उल्लेख आलेला आहे. 

जमदग्नी ब्राह्मणाने काय म्हटले?
क्षत्रियांच्या हैहय कुळातील राजा सहस्त्रार्जुन आणि परशुराम यांचे भयंकर शत्रुत्व होते. एक दिवस परशुराम सहस्त्रार्जुनाला ठार मारतो. ही गोष्ट जेव्हा परशुरामाचा पिता जमदग्नी याला कळते, तेव्हा तो दु:खी होतो. तो परशुरामाचा धिक्कार करतो. 'भवान् पापमकारषीत्' म्हणजेच तू सर्वांत मोठे पाप केले आहे, असे जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. इतकेच नव्हे तर, 'राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु:' म्हणजेच ‘राजाची हत्या करणे हे ब्राह्मणाची हत्या करण्यापेक्षाही मोठे पाप आहे', असे शास्त्रवचन जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. 

जमदग्नी ब्राह्मणाने परशुरामाला उद्देशून केलेला हा उपदेश भागवत पुराणाच्या ९ व्या स्कंधातील १५ अध्यायात जमदग्नी ब्राह्मणाचा हा उपदेश आलेला आहे. जमदग्नीच्या तोंडचे मूळ श्लोक असे :

राम राम महाबाहो भवान् पापमकारषीत्
अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं वृथा ।।३८।।
अर्थ : हाय हाय परशुरामा! तू घोर पाप केले आहे. राम राम! तू मोठा वीर आहेस; पण ज्याला सर्वदेवमय आणि नरदेव असे म्हटले जाते, त्या राजाचा तू व्यर्थ वध केला आहे. 

वयं हि ब्राह्मणास्ताम क्षमयार्हणतां गता ।
यया लोकगुरुर्देव: पारमेष्ठ्यमंगात् पदम ।।३९।।
अर्थ : बेटा, आपण ब्राह्मण आहोत. आपण क्षमा धारण केली आहे, म्हणून आपण या लोकी गुरू या पदाला पात्र झालो आहोत. आपले परम पिता ब्रह्मदेव हे केवळ क्षमा धारण केल्यामुळेच ब्रह्मपदाला पोहोचले आहेत. 

राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु: ।
तीर्थसंसेवया चांहो जद्यङ्गच्युतचेतन: ।।४।।
अर्थ : बेटा, सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे.  तुझ्या हातून असे सर्वांत मोठे पाप घडले आहे. आता भगवंताचे स्मरण करीत करीत तीर्थयात्रा कर आणि केलेले पाप धुवून काढ.

सारांश, ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप आहे, असा जो प्रचार कित्येक शतके केला जात होता, तो खोटा आहे. धर्मग्रंथांनी ब्राह्मण हत्येपेक्षा राजहत्या हे सर्वांत मोठे पाप ठरविले आहे. मधल्या कालखंडात ब्राह्मणांशिवाय इतर कोणी धर्मग्रंथ वाचितच नव्हते. त्यामुळे ब्राह्मण काहीही खोट्या गोष्टी प्रसृत करीत असत. ब्राह्मण हत्येविषयीच्या कल्पना अशाच प्रसृत केल्या गेल्या. ग्रंथांतील सत्य बाहेर येऊ नये, म्हणून ब्राह्मणांनी इतरांना ग्रंथ वाचनाचा अधिकारच नाकारला. 

-अनिता पाटील

No comments:

Post a Comment