Friday 5 May 2023

रमेश पतंगेंना ब्राह्मणांच्या पंगतीला का बसू दिले नाही?

आपल्या पुस्तकाचे हस्तलिखित वाचणाऱ्या एका स्नेह्याशी झालेले रमेश पतंगे चे संभाषण स्वतः त्याने आपल्या या मनोगतात नोंदवले आहे. ते लिहितात, "हस्तलिखित वाचल्यानंतर माझ्या एका स्नेह्याने मला प्रश्न विचारला, की या पुस्तकात तू संपातील फक्त चांगलेच अनुभव मांडीत गेला आहेस. तुला जातीमुळे अपमानित होण्याचा प्रसंग कधी आलाच नाही का?" मी त्याला म्हटलं, "खरोखरच असा औषधाला एकही प्रसंग आलेला नाही. त्यमुळे त्याविषयी मी काहीच लिहिलेलं नाही." मी पुढे म्हणालो, "संघात असा प्रसंग नाही, पण सार्वजनिक आयुष्यात असा एकच प्रसंग आहे." त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो म्हणाला,

"कोणता प्रसंग मी (पतंगे) सांगू लागलो. "१९८९ साली हैद्राबादला मी रमेश देवळे यांच्या लग्नास गेलो होतो. तिथून पुढे श्रीशैलमला सपत्नीक गेलो. निघताना हैद्राबादेतील संघ प्रचारकाने मला एक चिठ्ठी दिली. शेषाद्री चारी यांच्या सांगण्यावरून ही चिठ्ठी त्यांनी दिली. श्रीशैलमला एक चांगली धर्मशाळा आहे. तिथेच मी रहावे असे त्यांनी सुचवले व धर्मशाळा व्यवस्थापकांना पत्र दिले. ते घेऊन मी धर्मशाळेत गेलो. त्यांनी मला एक खोली दिली. "
"ही धर्मशाळा ब्राह्मणांची होती. रात्री मी सगळ्यांच्या पंक्तीबरोबर जेवायला बसलो, पण नंतर मात्र मी कोण ? माझे गोत्र कोणते ? कोणत्या ब्राह्मण शाखेतील मी आहे याची चौकशी व्यवस्थापकांनी केली. मी ब्राह्मण नाही हे त्यांच्या लक्षात आलं."

"दुसऱ्या दिवशी दुपारच्या भोजनाच्या वेळी व्यवस्थापक मला म्हणाले, "तुला सर्वांच्या बरोबर बसता येणार नाही. सगळ्यांचं जेवण झालं की तुला वाढू." त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजला. आयुष्यात भयंकर अपमानित झाल्यासारख वाटलं. एक क्षणभर देखील या वास्तूत राहू नये असं वाटलं. शांतपणे मी माझं सामान बांधलं आणि धर्मशाळा सोडली. "

जातीमुळे कमी लेखल्याचा एवढा एकच प्रसंग चांगलाच स्मरणात राहिलेला आहे. संघातही कार्यक्रमाच्या वेळी स्वयंसेवकांच्या पंगती बसतात. अशा वेळी जागा अपुरी पडते. मग इतरांना सांगावं लागतं "या पंगतीत आता बसता येणार नाही." वाक्य तेच पण त्यामागची मनोभावना वेगळी असते. धर्मशाळेत जातिश्रेष्ठत्वाचा अहंभाव होता, तर येथे तो व्यवस्थेतील एक भाग असतो. "

त्या ब्राह्मणांनी धर्मपालन केले, मग चिडता कशाला ?
हैद्राबाद येथे पतंगे यांना आलेला हा अनुभव थोडा तपासून घेऊ या. त्यांना आलेला
हा अनुभव संघाबाहेरचा आहे आणि संघ यापेक्षा वेगळा असल्यामुळे संघात असा अनुभव येत नाही, असे ते सुचवतात. या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतात. धर्मशाळेतील अनुभवाने आयुष्यात भयंकर अपमानित झाल्यासारखे वाटले, एक क्षणभर देखील या वास्तूत राहू नये असे वाटले आणि शांतपणे सामान बांधून धर्मशाळा सोडली, असे ते सांगतात. माझे म्हणणे असे, की पतंगे यांचे धर्मशाळा सोडण्याचे कृत्य हे धार्मिक संकेताचा भंग करणारे आहे. किंबहुना ते धर्मद्रोहाचेच कृत्य आहे. त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटले, हेही त्यांच्या हातून पडलेले अधर्माचे कृत्यच होय. त्या धर्मशाळेतील ब्राह्मणांनी असे कोणते धर्मविरोधी कृत्य केले, की ज्यामुळे पतंगेंना आपला अपमान झाल्यासारखे वाटावे ?

त्यांनी तर आपल्या धर्माचे प्रामाणिकपणे पालन केले. ब्राह्मणांच्या पंगतीला ब्राह्मणेा बसू शकत नाही, हा मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांचा पवित्र नियम आहे. ज्यांचा या धर्मग्रंथांवर विश्वास आहे, ज्यांना या धर्मग्रंथांनी सांगितलेला धर्म पवित्र वाटतो, ते ब्राह्मण वेगळ्या पद्धतीने वागू लागले, तर त्यांना धर्मद्रोहाचे पाप लागेल आणि त्याबद्दल प्रायश्चित घेण्याचा प्रसंग त्यांच्यावर येईल. आता, स्वतः पतंगेही त्या धर्मावर प्राणपणाने प्रेम करणारे आहेत आणि तो धर्म सांगणाऱ्या धर्मग्रंथावर आघात कराल तर प्रत्याघात होणार, असा इशारा देत आहेत. मग ते विचारे ब्राह्मण आपल्या धर्मांचे पालन करीत असताना त्यांनी आपला अपमान केला, असे पतंगेंनी का बरे मानावे ?

खरे तर त्यांनी आपल्या धर्मांचे काटेकोर पालन केले, म्हणून पतंगेंचे मन अत्यंत प्रसन्न व आनंदी व्हायला हवे होते. धर्मशाळेतील जातिश्रेष्ठत्वाचा अहंभाव हा मनुस्मृतीसारख्या ग्रंथावर आधारलेला आहे आणि म्हणून आपला असा अपमान होऊ नये असे ज्याला वाटत असेल, त्याने धर्मग्रंथाची ती व्यवस्था मोडण्याची प्रतिज्ञा करायला हवी आणि ती व्यवस्था बळकट करणाऱ्या मनुस्मृतीसारख्या ग्रंथावर आघात करण्यासाठी स्वतःच सज्ज व्हायला हवे!

वाचायला पाहिजे असे पुस्तक
 

वादांची वादळे

-आ. ह. साळुंखे 
ऑगस्ट २०२० आवृत्तीप्रकाशक
राकेश आण्णासाहेब साळुंखे
'लोकायत', १३ यशवंतनगर, गेंडामाळ
सातारा ४१५००२.
दूरध्वनी: ०२१६२ २५०७२५
lokayatprakashan@yahoo.com www.lokayatprakashan.co.in

No comments:

Post a Comment