Wednesday 28 September 2022

मी नास्तिक का आहे?

सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरपणामुळे नाकारतो आहे का, या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण काही मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की, माझा जो काही थोडासा सहवास त्यांना मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की, माझा देवावरचा अविश्वास हा जरा अतिरेकीपणाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दिखावेगिरी एवढीच कारणे आहेत. पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्‍यांत मी ‘एकाधिकारशहा‘ म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बटुकेश्वर दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर ‘अहंकार‘ हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे. या प्रश्नाची मी इथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहंमन्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
या माझ्या सर्व मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या अवाजावी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे का ते आपण पाहू या. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण जेव्हा मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरीही मी कधी अभ्यासू किंवा चमकणरा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात, अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्यक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता अशा शामळू व बुजर्‍या वृत्तीचा मी मुलगा होतो आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो, पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत गेलो आणि एक वर्ष मी तेथल्या वसतिगृहात राहिलो. तेथे सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेव्यतिरिक्त मी तासन्‌ तास गायत्री मंत्र पठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्फूर्ती मला त्यांच्या शिकवणीतूनच मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो.

१९२७ च्या मेमध्ये मला लाहोर येथे अटक झाली. दुसर्‍या दिवशी मला रेल्वे पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारांती मी निर्णय घेतला की, देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही, नाही ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते. किंबहुना या गोष्टी सुखावहसुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असेलच तर, पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही. आणि जर त्याने असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढायला पाहिजे की, त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. मी माझ्या ध्येयासाठी माझ्या प्राणांचा त्याग करत आहे, याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?

बालीश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार. जर देव अस्तित्वात नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली ? याला माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे आहे. जसा ते भूतपिशाच्चांवर विश्वास ठेवायला लागले तसेच हेसुद्धा झाले. फरक इतकाच की ईश्वरावरची श्रद्धा ही सर्वसामान्य पातळीवरची असते आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञानही चांगले प्रगत आहे. लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी पिळणूक करणारे धूर्त लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य व मान्यता प्राप्त करून घेतात आणि यातच धर्माचा उगम आहे असे काही जहालमतवाद्यांचे मत आहे. पण ते मला मान्य नाही; जरी सर्व श्रद्धा, धर्म, पंथ आणि इतर अशा संस्था यापुढे जुलमी व पिळणूक करणार्‍या संस्था, व्यक्ती व वर्ग यांना पाठिंबा देणार्‍या बनल्या आहेत या जहालांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. राजाविरुद्ध बंड करणे हे प्रत्येक धर्माचे पापच मानले आहे.

देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःची अशी कल्पना आहे की, माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. स्वतःचे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची कल्पना जास्त तपशीलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा या हेतूने दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाची दयाळू व वात्सल्यवृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी पडू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा सर्व आप्तस्वकीयांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा आप्त अजूनही आहे आणि तो विधाता आहे, सर्वशक्तिमान आहे या कल्पनेमध्ये त्याला आधार मिळतो. आणि आदिमानवाच्या काळात ही गोष्ट खरोखरच उपयोगी होती. नैराश्यामध्ये ईश्वराच्या संकल्पनेचे फार साहाय्य होते.

माणूस कितीही संकटात सापडला तरी त्या सर्वांचा समर्थपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे. मित्रांनो, हा माझा पोकळ दिमाख नव्हे. नास्तिक बनवणार्‍या या माझ्या विचारपद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिले तर दैनंदिन पूजा व ईश्वरावरची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काळिमा फासणार्‍या गोष्टी आहेत असे मी मानतो. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून ठाम उभे राहणार्‍या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

मी हे दिव्य कसे काय पार पडतो ते पाहू या. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितलं. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील.‘‘ मी म्हणालो, ‘‘नाही. महाशय, असे कधीच होणार नाही. असे करणे म्हणजे तोंडाला काळिमा फासणारे आणि मनोधैर्य खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही.‘‘ वाचक आणि मित्र हो, याला तुम्ही पोकळ ऐट म्हणाल काय ? अर्थात ती आहे असे जरी म्हणालात, तर मला अभिमानच आहे.

--- वीर भगत सिंह
जन्म: सप्टेंबर २८ १९०७
विलय: मार्च २३ १९३१

(Rahul Bansode कृत अनुवाद)

No comments:

Post a Comment