Saturday 5 November 2011

वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?

प्रस्तावना

अतिप्राचीन काळापासून भारत देशात दोन धार्मिक परंपरा आहेत.
१. युरोप आणि आशिया यांच्या सीमावर्ती भागातून आलेल्या आर्यांची ब्राह्मणी परंपरा
२. भारतातील मूलनिवासी लोकांची मूळ भारतीय परंपरा.
या पैकी ब्राह्मणी परंपरा ही आदिमानवाच्या अवस्थेतील हिंसाचाराधिष्ठित धारा असून मूळ भारतीय परंपरा ही मानवाने आदिम अवस्था पार केल्यानंतरची दयाधर्मावर आधारित श्रेष्ठ परंपरा आहे. वैदिक धर्म, सनातन धर्म या धर्मपरंपरा ही ब्राह्मणी धर्माचे अपत्य असून, बौद्ध, जैन, आणि अलिकडील वैष्णव, शैवादी भक्ति सांप्रदाय या एतद्देशीय धार्मिक विचारांतून निर्माण झालेल्या धर्मपरंपरा होत. मूळ भारतीय परंपरांना ढोबळमानाने दयाधर्म असे म्हणता येते.  महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनीही मूळ धार्मिक परंपरेला दयाधर्म असेच म्हटले आहे१.  वैदिक धर्मीय स्वत:स आर्य म्हणवतात. संपूर्ण वैदिक धर्माची बांधणी यज्ञादी कर्माभोवती करण्यात आली आहे. यावरून वैदिक आर्य लोक हे अग्निपूजक होते. ते पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यांचे मुख्य अन्न मांस हेच होते. त्यांच्यात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. एका अर्थाने वैदिक धर्म हा रानटी लोकांचा अर्थात आदिमानवाचा धर्म  होता, हे वैदिक वाङ्मयातील पुराव्यांवरूनच म्हणता येते. या उलट मूळ भारतीय परंपरेत मानवतेला आणि दयाधर्माला अत्यंत महत्त्व आहे.  धार्मिक कारणांसाठी पशुहिंसा  वर्ज्य  मानण्यात येते. प्राणी हक्कांसाठी अलिकडे पेटासारख्या संस्था काम करतात. हे काम मूळ दयाधर्माधिष्ठित मूळ भारतीय धर्मांनी प्राचीन काळीच सुरू केले होते. बौद्ध, जैन, भक्तिसांप्रदाय, शैव या मूळ भारतीय धर्मांत ते दिसून येते. भक्ती सांप्रदाय आणि शैवांना आज हिंदू मानले जाते. परंतु ते चूक आहे. हे मूळचे स्वतंत्र धर्म होते. श्रीकृष्ण आणि महादेव अर्थात शंकर या देवताच वेदांत नाहीत. उत्तर काळात वैदिक ब्राह्मणांनी या मूळ धर्मांत शिरकाव करून हे धर्मच हायजॅक केले. विष्णू या  नव्या देवतेला जन्म देऊन हे धर्म त्यात सामावून घेतले. इतकेच काय बौद्धालाही विष्णूचा अवतार दाखविले गेले. हे वैदिकांचे बहुजनांविरोधातील कपटकारस्थान आहे.
उपयुक्तता हाच वैदिक धर्माचा पाया
युरोपात लंगडा घोडा सांभाळला जात नाही. त्याला गोळी मारून ठार केले जाते. कारण त्याचा मालकाला काहीही उपयोग नसतो. आजकालच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उपयुक्ततेचा हाच निकष आज लावला जातो. +हायर अँड फायर+ हे उपयुक्ततेचे तंत्र त्यातून विकसित झाले. उपयुक्ततेचे हे तत्त्व अमानूष आणि अत्यंत क्रूर आहे. तथापि, वैदिक धर्माचा  पायाच उपुयक्ततेच्या या तत्त्वावर घालण्यात आला आहे. वैदिक धर्मातील कर्मकांडे, नीतिनियम आणि समाजव्यवस्थापन असे सर्व काही उपयुक्ततेच्या याच तत्त्वावर बेतले आहे. उपयुक्त नसलेल्या कोणत्याही गोष्टीला वैदिक धर्मात स्थान नाही. लंगडा घोडा सांभाळायला ही संस्कृती तयार नाही. त्याच्या नशीबी या संस्कृतीने मृत्यूच लिहिला आहे. म्हणूनच वैदिकांच्या दृष्टीने गाय हा पिण्यास दूध आणि खाण्यास मांस देणारा उपयुक्त पशू ठरतो. अलिकडील काळात ब्राह्मणवादाचे फेरबीजारोपण करणारे विनायक दामोदर सावरकर हे गायीला उपयुक्त पशूपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत. सावरकर असे का लिहितात याचे उत्तर वैदिक धर्मपरंपरेत सापडते. सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. ते असे का वागले याचे इंगितही इथेच सापडते.
म्हातारया आई-वडिलांच्या नशीबी वनवास
उपयुक्ततेचा हा मुद्दा वैदिक सभ्येतत (सभ्यता म्हणजे समाजव्यवस्था. इंग्रजीतील सिव्हिलायझेशन या शब्दासाठी हा शब्द वापरला जातो.) अत्यंत क्रूर पद्धतीने आमलात आणते. त्यात दयामाया काहीही नाही. माणसांचे महत्त्वसुद्धा याच तत्त्वानुसार ठरते. येथे माणुसकीला शून्य किंमत आहे. याच उपयुक्ततेतून चार वर्ण आणि चार आश्रम तयार झाले. उपयुक्ततेनुसार माणसांची किंमत ठरविली गेली. हलकी कामे करणारया शूद्रांना हीन लेखण्यात येते ते त्यामुळेच. जन्म देणारया आईवडिलांनाही वैदिक धर्म याच उपयुक्ततेच्या तराजूत मोजतो. आयुष्याच्या चौथ्या टप्प्यात आलेल्या वृद्धांना वैदिक समाजात कोणतेही स्थान राहत नाही. त्यांच्यासाठी वानप्रस्थाश्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज भारतात वृद्धाश्रम उभे राहत आहेत. त्याकडे आपण आधुनिक चंगळवादाचे क्रूर अपत्य म्हणून पाहतो. परंतु महानतेचा डांगोरा पिटणारया वैदिक सभ्यतेने यापेक्षाही क्रूर व्यवस्था म्हातारया माणसांसाठी निर्माण केली होती.  या व्यवस्थेनुसार, जराजर्जर झालेल्या माता-पित्यांना मरण्यासाठी वनात सोडले जाई. महाभारतातील विदूर, धृतराष्ट्र, गांधारी आदींचा मृत्यू जंगलात कसा झाला याची वर्णने जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचावीत.
ब्राह्मण हे लाभाचे पद
उपयुक्ततेच्या क्रूर पायावर वैदिक सभ्यता उभी असली, तरी तत्कालिन समाजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे उपुयक्त नसलेल्या ब्राह्मणांसाठी उपयुक्ततेचा हा नियम लावला जात नाही. यात आश्चर्यकारक असे मात्र काहीही नाही. ब्राह्मणांना उपयुक्ततेचा निकष लावला जात नाही, कारण या व्यवस्थेचे निर्माते स्वत: ब्राह्मणच होते. स्वत:ला समाजाच्या सर्वोच्च स्थानी स्थापून काहीही काम न करता खाता येईल, अशी व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्यासाठी निर्माण करून घेतली. या व्यवस्थेत क्षत्रिय सर्व समाज आणि राज्याचे प्राणांची बाजी लावून संरक्षण करतात. वैश्य व्यापार-उदिम वाढवून संपत्ती निर्माण करतात. शूद्र सेवा देतात. ब्राह्मण काय करतात? या तिन्ही वर्णांकडून स्वत:ची सेवा करून घेतात! +ब्राह्मणो अदंडणीय:+ असे म्हणत ब्राह्मण अदंडणीय आहेत म्हणजेच त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही, अशी घोषणा वेदांनी केली. चातुर्वर्ण्य  व्यवस्थेचा हाच खरा अर्थ आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारमधील लाभाच्या पदांवरून (लाभाच्या पदाला इंग्रजीत +ऑफीस ऑफ प्रॉफिट+ म्हणतात.) वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक जणांना आर्थिक लाभ देणारया पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ब्राह्मण हे वैदिक सभ्यतेतील असेच लाभाचे पद आहे. ब्राह्मणांना लाभाच्या पदावरून घालवणारे कोणतेही न्यायालय अजून या देशात निर्माण होऊ शकले नाही.
वैदिक धर्माची चिकित्सा 
होऊ नये याची धर्मातच तरतूद 
आपल्याकडे वैदिक धर्माची योग्य चिकित्सा आजपर्यंत झालेलीच नाही. वैदिक धर्माची चिकित्सा होऊ  नये, अशी व्यवस्था या धर्मातच करून ठेवण्यात आली आहे. वैदिक धर्माची बांधणी किती काळजीपूर्वक करण्यात आली, हे यावरून लक्षात येते. चिकित्सेसाठी विद्वत्तेची शिक्षणाची गरज असते. शिकणे आणि शिकविण्याची व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्या हाती ठेवली होती. वैदिक सभ्यतेच्या प्रारंभ काळात क्षत्रिय व वैश्यांना शिक्षणाचा हक्क होता, असा युक्तिवाद केला जातो. परंतु तो अत्यंत फसवा आहे. या दोन वर्णांना त्यांच्या व्यवसायांना उपयुक्त असेच शिक्षण दिले जात असे. रामायण-महाभारतकाळ हा वैदिक सभ्यतेचा परमोच्च काळ होय. त्याकाळातली दोन उदाहरणे पाहू या. कौरव आणि पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होत. द्रोणाचार्यांनी त्यांना वेद शिकविले का? अजिबात  नाही. त्यांना सैनिकी शिक्षण द्रोणाचार्यांनी दिले. श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरू विश्वामित्र. त्यांनीही राम-लक्ष्मणास सैनिकी शिक्षणच दिले. क्षत्रिय आणि वैश्यांनी वेदशास्त्रात पारंगत होण्याची गरज मानली जात नव्हती. वेदशास्त्रात पारंगत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य मानले जाई. वैदिकाभिमानी आजही हेच मानतात. शूद्रांना तर वेदांचा अधिकारच नव्हता. शूद्राच्या कानावर चुकून जरी वेदांची वाक्ये पडली, तरी त्याच्या कानात शिशाचा गरम रस ओतावा, अशा अमानवी, क्रूर आणि संतापजनक तरतुदी मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आहेत. अशा प्रकारे वैदिक धर्माची चिकित्साच होऊ नये, अशी व्यवस्था या सभ्यतेच्या एकूण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सारया विवेचनाचा एका वाक्यातील अर्थ असा : ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान सुरक्षित राहावे यासाठी केलेले हे कारस्थान आहे!  
वेदोत्तर काळात तरी का झाली नाही चिकित्सा?
मी वर जी व्यवस्था सांगितली, ती वैदिक कालखंडातली आहे. वैदिक धर्माचा अंत झाल्यानंतरच्या काळात तसेच अलिकडील म्हणजेच आधुनिक काळात तरी वैदिक सभ्यतेची चिकित्सा का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तरासाठीही आपणास पुन्हा याच व्यवस्थेकडे जावे लागेल. वैदिक धर्म नष्ट झाला. वैष्णव, शैवादि नवे धर्म अस्तित्वात आले, तरी समाज व्यवस्थेची मूळ चौकट तीच राहिली.  कारण ग्रंथरचनेचे पेटंट अजूनही ब्राह्मणांकडेच होते. त्यामुळे उत्तर कालीन १८ पुराणे, सूत्रे शास्त्रे वगैरे सर्व ग्रंथात ब्राह्मण हेच समाजव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी कायम होते. उलट या काळात ब्राह्मणांचे स्थान अधिक बळकट झालेले दिसते. स्मृती ग्रंथांची रचना याच काळात झाली.  ज्यांना आज आपण बहुजन समाज म्हणतो. त्या जातींवर अधिकाधिक बंधने लादली गेली. परवापर्यंत म्हणजेच पेशवाईपर्यंत ही दाबादाबी सुरू होती. दलितांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधण्यापर्यंत नीच पातळी पेशवाईत या सभ्यतेने गाठली. या संपूर्ण काळात बहुजन समाज अशिक्षिततेच्या गर्तेत होता. तो वेदवाङ्मयाची खरी चिकित्सा करण्यास असमर्थ होता. वेद आणि वेदांना प्रामाण्य मानणारया धर्मातील तरतुदी बहुजन समाजाच्या विरोधात होत्या. या समाजाकडून वेदवाङ्मयाची चिकित्सा होण्याचा सर्वाधिक धोका होता. म्हणून बहुजनांना वेदाधिकारच नाकारण्यात आला. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी, ही आजची म्हण येथे चपखलपणे लागू होते. बहुजन समाजाला वैदिक वाङ्मयापासून दूर ठेवण्याच्या तरतुदी वैदिक वाङ्मयात करून ठेवण्यात आल्या त्यामागे असे व्यापक षडयंत्र आहे. वेदिक सभ्यतेची आणि वाङ्मयाची चिकित्सा करण्याची क्षमता या संपूर्ण कालावधीत केवळ ब्राह्मणांतच होती. तथापि, ब्राह्मणांनी वैदिक धर्माची खरी चिकित्सा केली नाही. या धर्मात ब्राह्मणांसाठी +लाभाचे पद+ होते. वेदांची खरी चिकित्सा करून ब्राह्मण स्वत:ला नुकसानीत कशाला टाकतील?
बौद्ध काळात ब्राह्मण वाङ्मय भूमिगत
वैदिक काळ आणि पुराण काळ यांच्या मध्ये बौद्ध आणि जैन काळ भारतात येऊन गेला. बौद्ध-जैन काळानंतर पुन्हा ब्राह्मणी चौकट जशीच्या तशी लागू झाली. यावरून ब्राह्मणवादी पंडित दिशाभूल करणारा युक्तिवाद करतात की, बौद्ध धर्म या देशाचा धर्म कधीच होऊ शकला नाही. हा युक्तिवाद करणारया या विद्वानांना लावण्यासाठी पाखंडी, ढोंगी, कारस्थानी या प्रकारातील सर्व उपमा आणि अलंकार थिटे पडतील. बौद्ध काळात वैदिकांची पूर्ण वाताहत झाली होती. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले धर्मग्रंथ भूमिगत केले. वेदार्थ गुप्त केला२. अनेक ब्राह्मणी ग्रंथ तर हजारो वर्षे भूमिगत होते. दयानंद सरस्वती यांना वेदांच्या शुद्ध संहिता युरोपातून मॅक्समूल्लरसारख्या पंडिताकडून आणाव्या लागल्या त्या याचमुळे. बौद्ध काळात वेदविद्या गुप्त होती, असा उल्लेख गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी  यांनीही केला आहे. लोकहितवादी म्हणतात : वेदविद्या गुप्त ठेवण्याची रीति, म्हणजे ज्या काळी बौद्ध मार्गातील व इतर साधू हे धडधडीत वेदांतील प्रतिपादनाची निंदा  करू लागले व तेणेकरून वेदांविषयी सर्वत्र असन्मान उत्पन्न होऊ लागला. तेव्हा वेदार्थ न जाणता केवळ तो पाठ करून कायम ठेवण्याविषयीची रीति, वैदिकधर्मानुयायींनी ठरविली असावी३.
वैदिकांनी बौद्ध आणि जैन धर्माचा एवढा धसका घेतला होता की, बौद्ध आणि जैन मंदिरात जाऊ नये असे शास्त्रादेश ब्राह्मणी ग्रंथांत लिहिण्यात आले. त्यापैकी एक शास्त्रादेश असा :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम ।।
या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत४. लोकहितवादींच्या या म्हणण्यात खूप तथ्य आहे. बौद्ध धर्म भारतभूमीतून नामशेष झाल्यानंतर भारतातील बहुतेक बौद्ध आणि जैन लेण्या, चैत्य विहार ओस पडले. सांचीचा स्तूप तर मातीने झाकूनच टाकण्यात आला होता. इंग्रज आल्यानंतर या वास्तूंना प्रकाशात आणले गेले. अजिंठ्याची बौद्ध लेणी रॉबर्ट नावाच्या इंग्रज अधिकारयाने जगासमोर आणली. ती स्थानिक लोकांना माहीत होती. परंतु तिच्यात जाणे लोक पाप समजत.
बहुजनांवर इंग्रजांचे उपकार
ब्राह्मणांनी गुप्त केलेले, कटकारस्थानांनी भरलेले वेदवाङ्मय इंग्रजी राजवटीत जगासमोर आले. या दृष्टीने पाहता इंग्रजी राजवट ही या देशातील बहुजनांसाठी उपकारकच ठरली.  इंग्रज अधिकारयांनी सर्व प्रकारच्या भारतीय वाङ्मयाचा धांडोळा घेतला. ब्राह्मणांना खास तैनात करून अर्थ नीट लावून घेतले. तेव्हा त्यातील रानटी तरतुदी समोर आल्या. तसेच ब्राह्मणांच्या धूर्तपणाचा, कारस्थानांचा आणि कपटांचाही पर्दाफाश झाला. तरीही ब्राह्मणी कपट-कारस्थाने बहुजन समाज समजून घेऊ शकला नाही. कारण बहुजन समाज अजूनही अशिक्षितच होता. स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज शिकून बराचसा जाणता झाला आहे. ब्राह्मणी संस्कृत ग्रंथ तसेच इंग्रजांनी केलेली या ग्रंथांची समीक्षाही तो आता वाचू, समजू लागला आहे. आता ब्राह्मणी धर्माचे पितळ उघडे पडत आहे. तथापि, ब्राह्मणी कारस्थाने अजूनही पूर्णपणे जगासमोर येऊ शकलेली नाहीत. याचे कारण आहे मीडिया. भारतातील मीडिया अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाखाली असल्यामुळे ब्राह्मणी वाङ्मयाची समीक्षेला प्रसिद्धी दिली जात नाही. असो मीडियाचा विषय आपण केव्हा तरी हाताळू.
वेदांकडे चला नको, वेदांपासून दूर व्हा!
इंग्रजांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घाबरलेल्या काही ब्राह्मणांनी वैदिक धर्म परंपरा कशी श्रेष्ठ तसेच वेदांकडे परत जाण्यात समाजाचे कसे भले आहे, असे सांगून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दयानंद सरस्वती, विवेकानंद हे लोक असा भ्रम पसरविण्यात आघाडीवर होते. दयानंद सरस्वतींनी आर्यसमाजाची स्थापना केली, तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन केला. +वेदांकडे चला+ अशी हाक दयानंदांनी दिली होती. या उपद्व्यापातून फार काही साध्य झाले नाही. आर्यसमाजाचे महत्त्व प्रेमविवाह लावून देण्यापुरते राहिले. गेल्याच महिन्यात खुद्द न्यायालयानेच आर्यसमाजाच्या या विकृत चाळ्यांना चाप लावला आहे. रामकृष्ण मठ वैदिक पुस्तकांचे दुकान होऊन बसला आहे. त्यापलीकडे हा मठ कोणतेही विधायक कार्य करू शकला नाही. आपल्या पंथाला हिंदू धर्मात गृहीत धरले जाऊ नये, यासाठी रामकृष्ण मठाने काही वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावरून वेदाभिमान्यांची निराशा लक्षात येते. वेदांकडे चला ही हाक बंद करून आता वेदांपासून दूर चला अशी नवी हाक देण्याची वेळ आली आहे.
आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजांचे पाप
इंग्रजांनी कायदे करून सतीची चाल बंद करण्यासारख्या काही सुधारणा केल्या. त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माला राजकीय पाठबळ मिळाले. बहुजन समाज ख्रिस्ती होण्याचा धोका या काळात होता. ब्राह्मणी धर्म व्यवस्थापकांनी हे बरोबर हेरले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज असे अनेकविध समाज स्थापन करून बहुजनांना वैदिक व्यवस्थेतच गुरफटून ठेवण्याचे नवे कारस्थान खेळले गेले. इंग्रजांना राज्य आणि व्यापारातून पैसे कमावण्यात जास्त रस होता. तो मिळवून देण्यासाठी स्थानिक हस्तक म्हणून ब्राह्मणांची त्यांना मदत झाली. न्या. महादेवशास्त्री रानडे, राजा राममाहन रॉय वगैरेंसारखे या समाजांचे प्रमुख इंग्रजांच्या प्रशासकीय व्यवस्थेचे भाग होते. त्यामुळे इंग्रजांनी अशा कथित सुधारक समाजांना काही प्रमाणात प्रतिष्ठा मिळू दिली. या काळात जे काही बहुजन शिकून विद्वान झाले. ते वैदिक चौकटीची समीक्षा करण्याऐवजी या बोगस समाजांच्या नादी लागले. बहुजन समाजातील मोठे समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. अशा प्रकारे इंग्रजी राजवटीत वैदिक सभ्यतेची बहुजनांकडून चिकित्सा होण्याची निर्माण झालेली शक्यता धुळीस मिळाली. बहुजनांचा उद्धार होण्याचा दरवाजा किलकिला होत असताना तो अशा प्रकारे पुन्हा घट्ट बंद झाला. ब्राह्मणांनी त्या काळी निर्माण केलेल्या विविध समाजांचे हे पाप आहे. इंग्रज गेल्यानंतर हे कथित समाज रहस्यमयरित्या गायब झाले. त्यांचे अस्तित्व कायमचे संपले. कारण त्यांचा कार्यभाग साधला गेला होता.
समीक्षेच हा छोटा प्रयत्न  
असो. कथित श्रेष्ठ आणि महान वैदिक धर्माची न झालेली चिकित्सा करण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे. तो किती यशस्वी होतो, हे वाचकांनीच ठरवायचे आहे. माझा शब्द अंतिम आहे, असा माझा दावा नाही. याच्या विरुद्ध मत कोणाला मांडायचे असल्यास जरूर मांडावे. मी त्याचे स्वागतच करीन. एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. एका अर्थान हाच लोकशाहीचा खरा दागिना आहे. फक्त असे करताना खोट्या पुराव्यांचा आधार घेतला जाऊ नये, एवढी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करून ही लांबलेली प्रस्तावना संपविते.

या लेख मालेतील इतर लेख पुढील लिंक वर वाचा 




अनिता पाटील, औरंगाबाद. 

...................................................................................................................
संदर्भ :
१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.
३. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५५.
४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५०.  
...................................................................................................................

4 comments: