Sunday, 27 May 2012

लोकमान्य नव्हे भटमान्य!बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य' ही पदवी कोणी दिली याला तसे महत्त्व नाही, कारण खरा मुद्दा असा आहे की, बाळ गंगाधर टिळक लोकमान्य या पदवीच्या कसोटीला उतरतात का? लोकमान्य नेता कोण, हे ठरविण्यासाठी साध्या ३ कसोट्या लावता येऊ शकतील.

१. सर्व जातींचे आणि धर्माचे लोक ज्याचे अनुयायी आहेत, असा नेता. 
२. लोकमान्य म्हणजे सर्व लोकांची मान्यता असलेला नेता.
३. सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांचा विचार करून आपला आचार ठरविणारा नेता. 

टिळकांचे अनुयायी कोण होते? 

‘मॅन नोन बाय द कंपनी ही कीपस्' अशी एक म्हण इंग्रजीत आहे. या म्हणीचा अर्थ असा की, माणूस हा त्याच्या आजूबाजूला कोण वावरते, यावरून ओळखला जातो. बाळ गंगाधर टिळक यांच्या आजूबाजूला कोण होते? टिळक नेते म्हणून वावरत असताना दुसèया फळीतील नेतेमंडळी कोण होती? ही पाहा त्यांची नावे : नरसिंह  चिंतामन केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, दाजीसाहेब खरे,  गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, बापूजी अणे. टिळकांच्या दुसऱ्या फळीतील ही सारी नेतेमंडळी ब्राह्मण होती. इतकेच नव्हे, तर यातील बहुतांश मंडळी ही टिळकांच्या चित्पावन या पोटजातीतील होती. भा. द. खेर  यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या ३०० पानांच्या पुस्तकात या लोकांव्यतिरिक्त एकही नाव येत नाही. यापैकी केळकर आणि खाडीलकर ही मंडळी टिळकांच्या दृष्टीने घरचीच होती. केळकर हे ‘मराठा' दैनिकाचे संपादक होते. तर खाडिलकर केसरीचे सहसंपादक होते. गंगाधर देशपांडे हे कर्नाटकातील होते. त्यांना कर्नाटक सिंह  अशी उपाधी लावली जात असे. दादासाहेब खापर्डे अमरावतीचे, डॉ. मुंजे नागपूरचे, तर बापूजी अणे यवतमाळचे होते. आळेकर हेही विदर्भातलेच होते.१

टिळकांना बहुजन समाजाची मान्यता होती का?

‘तेल्या तांबोळ्याचे पुढारी' असे संबोधन वापरून टिळकांना बहुजन समाजाचे मोठे पाठबळ होते, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य दिसत नाही. आपण चित्पावन ब्राह्मण आहोत, या वास्तवाची तसेच त्यातून आलेल्या मर्यादांची जाणीव खुद्द टिळकांनाही होती. हे त्यांच्या अनेक भाषणांवरून दिसून येते. टिळकांनी स्वदेशीचे आंदोलन पुकारले आणि प्रमुख शहरांत दौरे काढले. मुंबई दौरयावर असताना १५ डिसेंबर १९०७ रोजी चिंचपोकळी येथे मजुरांसमोर टिळकांचे भाषण झाले. त्यात टिळक म्हणाले, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. स्वदेशी हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ  माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही.''२

हे भाषण मजूरांसमोरचे आहे, म्हणून महत्वाचे आहे. टिळकांच्या आंदोलनाबाबत सर्वसामान्य समाजात ‘भटांचे ढोंग' अशी त्याकाळी भावना होती, हे खुद्द टिळकांच्या वक्तव्यातूनच दिसते. तरीही त्यांना ‘तेल्या तांबोळ्या'चे पुढारी ठरविण्याचा अट्टाहास केला जातो. 

टिळकांच्या राजकीय कारकीर्दीत स्वदेशी आंदोलन सर्वाधिक महत्वाचे होते. त्याचा लोकांवर किती परिणाम झाला, हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल. या आंदोलनाच्या देशव्यापी परिणामाचे फारसे पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात, ते दुर्दैवाने ब्राह्मण समाजाशीच संबंधित आहेत. भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या पुस्तकातील एक उल्लेख पाहा : फाळणी : १९०६ मध्ये टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशी आणि बहिष्कार या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी व्याख्यान दौरे केले. टिळकांची वर्षभर अविश्रांत परीश्रम घेतले. ‘परदेशी साखर खाणे पाप आहे असे टिळकांनी पटवून दिल्याने बहुसंख्य ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले. इतकेच नव्हे तर हे पापकर्म करण्यापासून इतरांना वाचविले.

टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतरांनी सोडले होते का? हा खरा प्रश्न आहे. तसे काही दिसून येत नाही.

टिळकांचे वैयक्तिक आचार-विचार

आता सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. बाळ गंगाधर टिळक यांचे वैयक्ति-आचार विचार लोकनेत्याला साजेशे होते का? या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने नकारार्थीच येते. २३ जुलै १९०८ रोजी रात्री १० वा. न्या. दावर यांनी टिळकांना ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. टिळकांची रवानी मंडालेला करण्यात आली. तुरुंगात ब्राह्मणेतरांनी बनविलेला स्वयंपाक खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत असावी, असे दिसते. आपण ब्राह्मण असल्यामुळे तुरुंगवासाच्या काळात आपल्याला ब्राह्मण आचारी मिळावा, अशी मागणी टिळकांनी इंग्रज सरकारकडे केली. ती सरकारने मान्य केली. पहिली काही वर्षे टिळकांना गुजरातेतील एक ब्राह्मण कैदी आचारी म्हणून देण्यात आला. त्याची शिक्षा संपल्यानंतर पुण्यातला व्ही. आर. कुलकर्णी नावाचा दुसरा ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून मिळाला. त्याची शिक्षा संपल्यानंतर उत्तर भारतातील एक ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून देण्यात आला. हे तिन्ही आचारी टिळकांसोबत त्यांच्याच कोठडीत राहत होते. 

ही माहिती ऐकिव नाही. स्वत: टिळकांनीच ती सांगितली आहे. मंडालेतील शिक्षा भोगून टिळक १६ जून १९१४ च्या मध्यरात्री पुण्यातील आपल्या घरी गायकवाडवाड्यात परतले. त्यानंतर लगेचच २३  जून १९१४ रोजी त्यांनी ‘केसरीङ्कला एक मुलाखत दिली. या मुलाखतीतील टिळकांनी पुढील माहिती दिली : 

...माझ्या करिता स्वयंपाक करण्यासाठी एका गुजराथी ब्राह्मण कैद्याची योजना केली होती.४

...माझ्याबरोबर गेलेल्या गुजराथी ब्राह्मण कैद्याची शिक्षेची मुदत संपल्यामुळे एक महिन्याने तो परत गेला आणि त्याच्या जागी येरवड्याच्या तुरुंगातून कुलकर्णी नावाचा ब्राह्मण कैदी आला. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु त्याला दोन वर्षांची माफी मिळाली व माझ्या सुटकेपूर्वी त्याची घरी रवानगी करण्यात आली. नंतर उत्तर हिंदुस्थानातून एक ब्राह्मण कैदी आला व माझ्या मुदतीत तो माझ्याजवळ राहिला.५ 

आपण उभयता ब्राह्मण आहोत!

बाळ गंगाधर टिळक यांचा आचारी व्ही. आर. कुलकर्णी याने मंडालेच्या तुरुंगातील काही आठवणीची टिपणे लिहिली आहेत. त्यात एके ठिकाणी कुलकर्णी म्हणतो : ‘एके दिवशी टिळक मला म्हणाले, येथे मला पुष्कळ वेळ मिळतो. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नसे. मी एक गोष्ट सांगतो. आपण उभयता ब्राह्मण आहोत. गायत्रीचा जप केल्यावाचून आणि सूर्याला अर्घ्य दिल्यावाचून आपण जेवता कामा नये. तेव्हापासून आम्ही हा नियम सतत पाळला.'६

अशा प्रकारे बाळ गंगाधर टिळक हे शेवटी ब्राह्मणच उरतात. लोकांच्या दृष्टीने तर ते ब्राह्मण होतेच. परंतु स्वत:लाही त्यांना आपले ब्राह्मण असणेच महत्त्वाचे वाटत असते. 

ब्रिटिशांना टिळकांबद्दल काय वाटत होते?

जाता जाता टिळकांबद्दलचे इंग्रजांचे काय मत होते, याकडेही एक नजर टाकूया. टिळकांनी आपल्या माथेफिरू अनुयायांच्या मदतीने काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात हाणामा-या घडवून आणल्या. या प्रकाराबाबत लंडन टाईम्सने पुढील टिप्पणी केली होती : ‘टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत. राजकीय तत्त्वज्ञान असे त्यांच्याजवळ मुळीच नाही. परंतु त्यांचे हेतू केवळ विध्वंसक स्वरूपाचे आहेत. जर काँग्रेसचा कब्जा आपणास मिळणार नसेल, तर ती मोडून टाकण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. आणि तात्पुर्ता का होईना त्यांचा तो हेतू तडीस गेला आहे.'७ 

लंडन टाईम्सला टिळकांचे ब्राह्मण असणे अधोरेखित करणे महत्त्वाचे वाटते. तसेच टिळकांकडे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही, हेही लंडन टाईम्स नमूद करतो.  परकीयांचे वृत्तपत्र म्हणून लंडन टाईम्सच्या या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्यात वस्तुस्थितीचे दर्शन घडते.

उपसंहार

वरील विवेचनातून पुढील ठोस सत्य हाती येते.

  •  टिळकांचे सर्व लेफ्टनंट ब्राह्मण विशेत: चित्पावन ब्राह्मण होते.
  • बाळ गंगाधर टिळक यांच्या आंदोलनाकडे बहुजन समाज ‘भटांचे ढोंग' म्हणून पाहत होता. स्वत: टिळकच हे नमूद करतात.
  • टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतर समाजावर त्याचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. 
  • तुरुंगात असतानाही बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण आचारी मिळावा म्हणून हट्ट धरतात. आणि तो पूर्णही करून घेतात. ब्राह्मणेतर समाजाच्या हातचे खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत होती. 
  • आपण उभयता ब्राह्मण आहोत आणि म्हणून आपण गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय जेऊ नये, असा उपदेश टिळक आपल्या आचा-याला करतात. आणि आमलात आणतात. 
  • टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत, असे विश्लेषण लंडन टाईम्स करतो. टिळक हे भारतातील सर्व समाजाचे नेते आहेत, असे लंडन टाईम्स म्हणत नाही. 


निष्कर्ष

केवळ ब्राह्मणांसाठीच आपली ध्येय धोरणे राबविणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वत: टिळकांनाही आपण ब्राह्मण आहोत, हेच अधिक महत्त्वाचे वाटते. अतएव, बाळ गंगाधर टिळक यांना ब्राह्मणमान्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. स्वत: टिळकांनाही तेच अपेक्षित होते. 

अनिता पाटील 

...............................................................................................................................
संदर्भ : 

१. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. 
या पुस्तकातील काही उल्लेख पुढील प्रमाणे :

अ) २० जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय लॉर्ड कर्झनने घोषित केला. त्याविरुद्ध टिळकांनी केसरीत लेखमाला लिहून रान माजविण्याचा प्रयत्न केला. बंगालची फाळणी रद्द करावी, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकावा आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची स्थापना करून स्वदेशी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी त्रिसूत्री टिळकांनी जाहीर केली. (पान ८५)
ब) टिळकांना एकेक समर्थ अनुयायी मिळत होते. ‘मराठा'चे संपादक तात्यासाहेब केळकर, ‘केसरी'चे सहसंपादक कृष्णाजीपंत प्रभाकर खाडिलकर, कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे, टिळकांचे परममित्र अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे, यवतमाळचे बापूजी अणे या अनुयायांनी आपल्या नेत्याचा संदेश देशाच्या कानाकोप-यांत पोहोचविला. (पान ८७)
क ) टिळकांनी परिस्थितीचा सांगोपांग विचार करून १९०७ सालचा आपला कार्यक्रम आखला. न. चि. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे आदि कार्यकर्ते टिळकांचा संदेश देशाच्या कानाकोपèयात पोहोचविण्यास सिद्ध होतेच. (पान १०४).

२.  भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ११६).
३. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ९९)
४. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १६९)
५. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७०)
६. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७४).
७. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.)

No comments:

Post a Comment