Wednesday, 13 June 2012

सामनाची मळमळ


शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनामधून प्रसिद्ध झालेला हाच तो अग्रलेख. या अग्रलेखात वारकरी धर्म आणि qदडी सोहळ्याचा घोर अवमान करण्यात आला आहे.

पुण्यातील ‘कलमाडी’ दिंडी!


सुरेश कलमाडी यांच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाचे धोरण नक्की काय आहे, याचा खुलासा राज्यातील कॉंग्रेस पुढार्‍यांनी करणे गरजेचे आहे. कॉमनवेल्थ खेळांच्या घोटाळा प्रकरणात कलमाडी यांना सीबीआयने अटक केली. सहा-सात महिन्यांच्या तुरुंगवासानंतर कलमाडी बाहेर आले. या काळात कॉंग्रेस पक्षातून त्यांना निलंबित केले, पण पुण्यनगरीच्या या खासदाराने परवा पुणे महानगरपालिकेच्या खास दारातून आत प्रवेश केला तेव्हा मोठाच राडा झालेला लोकांनी पाहिला. कलमाडी पुण्याचे खासदार आहेत व त्यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर तेथील लोकांनी निवडून दिले, पण ‘घोटाळा’ प्रकरणात पक्षाने त्यांचे ओझे दूर केले असतानाही परवा पुणे महानगरपालिकेत कलमाडींना कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची कवचकुंडले प्राप्त झाली होती. कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी छातीचा कोट करून कलमाडी यांचे परवा रक्षण केले व वाजतगाजत मिरवणुकीने पुणे महानगरपालिकेत त्यांना घेऊन आले. कलमाडी झिंदाबाद व कलमाडी मुर्दाबादच्या घोषणांनी व रेटारेटीने महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला. हा सर्व तमाशा पुण्यातील जनतेने ‘याची देही याची डोळा’ पाहिला. एका बाजूला टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत माऊली नामाच्या जयघोषात ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू होते. ‘माझे जिवाची आवडी पंढरपुरा नेईल गुढी’ अशी अवस्था लाखो वारकर्‍यांची झाली होती. त्याचवेळी पुण्यातील समस्त कॉंग्रेसजन कलमाडींची गुढी, पालखी पुणे महानगरपालिकेत रेटून नेताना दिसत होते.  पुण्यनगरीत कलमाडी म्हणजेच कॉंग्रेस हे चित्र काही वर्षांपासून नक्कीच आहे. पंढरपुरात जसे बडवे आहेत तसेच बडवे पुण्यातील कॉंग्रेसमध्ये आहेत व ते सर्व लोक कलमाडींना ‘माऊली’ मानतात. माऊलींचे पुण्यात आगमन झाल्यापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. याच काळात राष्ट्रवादीचा जोर वाढला. पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाली. यावर माऊली कलमाडी म्हणतात, ‘मी पुण्यात असतो तर असे घडले नसते.’ माऊली कलमाडी पुण्यात असते तर काय घडले असते याचा अनुभव पुणेकर जनता गेल्या काही वर्षांपासून घेत आहे, पण आता ‘माऊली’चे पुण्यात आगमन झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य प्राप्त झाले आहे. माऊली म्हणजे चैतन्याचा झराच. त्यामुळे त्यांनी सांगितले, ‘‘पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेतले जाईल की नाही यावर बोलणार नाही. मात्र लोकसभा निवडणूक लढविणार आहे. माझे दिल्लीतील कॉंगे्रस नेत्यांशी चांगले संबंध आहेत.’’ कलमाडी चुकीचे काय बोलले? सत्य तेच बोलले. कलमाडी यांनी सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरांचे घाव आपल्या छातीवर झेलले आहेत. कॉमनवेल्थ घोटाळ्यात रॉबर्ट वढेरांचे नाव होतेच. अनेक संशयास्पद फायलींवर तेव्हा प्रधानमंत्री कार्यालयात असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचे सही-शिक्के होते, पण शीला दीक्षित, जयपाल रेड्डीही तेवढेच गुंतले होते, मात्र सर्वांच्या वतीने तुरुंगात गेले ते पुण्याचे कॉंग्रेससम्राट कलमाडी. त्यामुळेच दिल्लीत त्यांचे उत्तम संबंध आहेत. कलमाडींचे असेच संबंध राहू द्या. कलमाडींची दिंडी, पताका कॉंग्रेसवाले पुढे नेत आहेत. त्यांचा जयघोष घुमू द्या. अनंत गाडगीळांसारखे कॉंग्रेसवाले म्हणतात पुण्यातील कलमाडीप्रताप पाहून त्यांचा श्‍वास घुसमटला आहे. गाडगीळ श्‍वास मोकळा करा. तुमची पालखी उचलायला चार प्रामाणिक कार्यकर्ते पुण्यात उरले आहेत काय हे उल्हासदादा पवारांना विचारा. पाहा काही जमतंय का?


No comments:

Post a Comment