Wednesday, 27 June 2012

वाल्मिकीचा झाला वाल्या कोळी!


महावीर सांगलीकरांची शोकांतिका

महावीर सांगलीकर
...............................
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामायण लिहिले. ही कथा सर्वांना माहीत आहे. वाल्या-वाल्मिकीची ही गोष्ट वाईटातून चांगल्याकडे प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून प्रतिक रूपात भारतभर वापली जाते. त्यातूनच वाल्याचा वाल्मिकी होणे, हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. ‘वाल्मिकीचा वाल्या कोळी होणे' अशी उलटी उदाहरणेही समाजात दिसत असतात. तथापि, ती अजून प्रतिक रूपात रूढ होऊ शकलेली नाही. महाविचार या नावाने ब्लॉग लेखन करणारे महावीर सांगलीकर यांनी ‘वाल्मिकीचा वाल्या' असे उलटे प्रतिक बनण्याचा चंग बांधला असावा. ‘बहुजनवाद : शिक्षणबंदीचे सत्यशोधन' या मथळ्याचा त्यांचा एक लेख आज ‘महाविचार'वर प्रकटला. सांगलीकर वाल्मिकीचे वाल्या बनले आहेत, याचे प्रत्यंतर हा लेख वाचल्यानंतर येते. बहुजनांना शिक्षणबंदी केलेलीच नव्हती. बहुजन समाज शिक्षणात मागे आहे, त्याला स्वत: बहुजनच जबाबदार आहेत, अशी अविचारी विधाने सांगलीकरांनी या लेखात केली आहेत. या लेखातील प्रत्येक वाक्य खोटे आहे. सांगलीकरांना माझा सल्ला आहे की, त्यांनी महात्मा फुल्यांच्या लेखनातील कोणतेही एक पान काढू वाचावे. आपण हा लेख लिहून किती बेजबाबदारपणा केला आहे, याची प्रचिती त्यांना हे पान देईल. 

सांगलीकर यांच्या पुरोगामी लेखांची चाहती असे बिरूद मी गेले वर्षभर मिरवत आहे. आजचा लेख वाचल्यानंतर मला त्याबद्दल खरोखरच पश्चात्ताप होत आहे. ज्यांना विचारवंत, अभ्यासक अशी बिरुदावली आपण लावत होतो, त्यांनी अचानक असा कुविचार करावा, हे बघूनच मला धक्का बसला आहे.

महावीर सांगलीकर हे उत्तम वाचक आहेत. त्यांचे वाचन आणि अभ्यास चांगला आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे ते अज्ञानातून असे काही लिहितील असे मला वाटत नाही. हेतूत: केलेला हा कुविचार आहे, हे उघडच दिसते. काही तात्कालिक लाभ या कुविचारामागे असणार नाही, अशी मी आशा करते. असो. सांगलीकरांनी प्रा.हरी नरके आणि संजय सोनवणी यांची वाट धरली आहे. आपल्या वाटेवर त्यांनी सुखाने प्रवास करावा. आम्ही महात्मा फुले यांच्या वाटेने चालत राहू. आमची काहीही तक्रार नाही. ही मंडळी उद्या विश्व  हिन्दू परिषदेच्या व्यासपीठावर दिसली, तरी आम्ही काहीही म्हणणार नाही. शेवटी, कोठे जायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. 

अनिता पाटील

No comments:

Post a Comment