Friday 27 September 2019

दिल्लीत महिलांची बस गायब; पण फक्त पवारांनी प्रतिसाद दिला


लोकसत्ता ऑनलाइन वरून साभार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सबंधित घटना 1995-96च्या सुमारासची आहे. त्यावेळी महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चा नेला होता. साधारणपणे देशभरातले लोक दिल्लीत कुठल्याही कामासाठी आले की दिल्ली दर्शन केल्याशिवाय परतत नाहीत. त्याला अनुसरून मोर्चा पार पडल्यानंतर या महिलांनी चार बस भाड्यानं केल्या आणि दिल्ली दर्शनाला निघाल्या. रात्रीच्या सुमारास बसेस मुक्कामी परत आल्या तेव्हा लक्षात आलं की तीनच बस आल्यात नी 52 महिला असलेली एक बस आलेलीच नाही.

बराचवेळ वाट बघून राष्ट्रवादी पक्षाची कार्यकर्ती असलेल्या एका महिलेनं सुचवलं की दिल्लीत महाराष्ट्रातले पत्रकार आहेत नितीन वैद्य नावाचे, त्यांच्याशी संपर्क साधुया. या महिलांनी वैद्य यांच्याशी रात्री साडेदहा अकराच्या सुमारास संपर्क साधला आणि समस्या सांगितली. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना नितीन वैद्य यांनीही आठवणीला उजाळा दिला आणि घडलेली हकीकत सांगितली. “रात्री अकराच्या सुमारास जेव्हा फोन आला की महाराष्ट्रातल्या 52 महिला असलेली बस गायब आहे. ही मोठी आपत्ती असल्यामुळे काही तरी केलं पाहिजे असं मला वाटलं. या महिला पोलिसांकडे गेल्या होत्या. तिथून मला सारखा फोन करून काही पत्ता लागत नाहीये असं सांगत होत्या. रात्रभर महिलांचा पत्ता लागल्याची चांगली बातमी येईल म्हणून मी जागाच होतो पण तसं काही झालं नाही,” वैदय यांनी सांगितलं.

अखेर मध्यरात्रही उलटून गेल्यावर मी महाराष्ट्रातल्या दिल्लीत असलेल्या चार नेत्यांना फोन करायचं ठरवलं, वैद्य म्हणाले. “पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मी चौघांना फोन केला, ज्यातले एक शरद पवार होते जे काही कामासाठी दिल्लीत आले होते. इतर तीन नेत्यांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, परंतु पवारांनी स्वत:च माझा फोन घेतला आणि म्हणाले बघतो काय करता येईल ते. साडे सातच्या सुमारास पवारांचाच मला फोन आला की बससह महिलांचा पत्ता लागलाय म्हणून. ते स्वत: पोलिस ठाण्यातूनच बोलत होते,” वैद्य यांनी सांगितलं.

झालेलं असं या बसमधल्या महिलांनी ड्रायव्हरला राजी केलं आणि दिल्ली दर्शन झाल्यावर बस परस्पर हरिद्वारला नेली देवदर्शनासाठी. इकडे सगळे काळजी करत होते आणि या महिला दिल्लीपासून सुमारे 250 किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वारला पोचल्या होत्या. शरद पवारांनी दखल घेत पोलिस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर व घटनेचं गांभीर्य सांगितल्यानंतर पोलिसांनी सगळ्या दिशांना शोध घेण्याचे संदेश पाठवले. अखेर सदर बस हरिद्वारला असल्याचे तिथल्या पोलिसांनी दिल्लील पोलिसांना कळवलं. त्यावेळी शरद पवार स्वत: पोलिस ठाण्यात होते. त्यांनी लगेच वैद्यंना फोन केला.

पवारांचा फोन आल्यानंतर नितीन वैद्यही पोलिस ठाण्यात पोचले. पवारांनी हरिद्वारच्या पोलिसांना बसमधल्या महिला 52च आहेत ना, ज्या शोधतोय त्या सगळ्या आहेत ना याची खात्री करायला लावली. ती झाल्यावर ते निघाले पुढच्या कामाला. यावेळी एक विशेष प्रसंग घडला ते म्हणजे पवारांनी वैद्यना सांगितलं की याची बातमी करू नका. वैद्य सांगतात, “मी पवारांना विचारलं याची बातमी का नको करू?. तर पवार म्हणाले तुमची बातमी होईल, परंतु या महिलांचे पती पुढे आयुष्यात त्यांना कुठल्याही सार्वजनिक कामासाठी जाऊ देणार नाहीत. या महिलांच्या उर्वरीत आयुष्याचा विचार केला तर त्याची बातमी न झालेलीच चांगली.”

वैद्य यांनीही त्यांचं म्हणणं मानलं आणि बातमी केली नाही. परंतु, पवारांच्या वाढदिवसानिमित्त काही वर्षांपूर्वी एक विशेषांक काढण्यात आला होता. त्या घटनेलाही बराच काळ लोटला होता त्यामुळे या अंकात वैद्य यांनी ही घटना लिहिली होती.

सध्या शरद पवारांवर शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला आहे, आणि पवार पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलचा हा किस्साही चांगलाच व्हायरल होतो आहे.

1 comment:

  1. लताबाई, मोदी, शरद पवार आणि विलासराव...

    हा सगळा विषय मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित आहे. जेव्हा लताबाईंना हे जाणवले की आपल्या पिताश्रींना अखेरच्या दिवसात योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यात एक चांगले रुग्णालय बांधावे. दिदींना लोकांनीच अनंत हस्ते आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्यक्रमाला भरूभरून प्रतिसाद दिला. आणि मोठी रक्कम उभी राहिली. दिदींना आर्थिक तोशिश न लागता रुग्णालय उभे राहिले. पण ही जागा मिळवण्याकरिता त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिदींसाठी खूप खटाटोप केला. शहर नागरी कमाल मर्यादेमध्ये (लॅण्ड सिलिंग) ही जमीन होती. ती मोकळी करून एका खासगी ट्रस्टसाठी मंगेशकर कुटंबियांना द्यायची होती. श्री.शरद पवारांनी उलट-पलट करून 48 तासात ती जागा लताबाईंच्या ताब्यात दिली. शरद पवारांच्या कामाचा झपाटा ज्यांना माहिती आहे, त्यांना याची कल्पना येऊ शकेल. पवारसाहेबांनी जागा दिली तो काळ होता 1993 चा. केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेलेले श्री. शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत आले होते. आणि त्यांनी ही जमीन दिली.

    रुग्णालयाचे काम सुरू झाले पण तोपर्यंत राज्यात सत्तान्तर होऊन शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले होते आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांच्याकडे आले. रुग्णालयाचा पाया घातला गेला. कॉलम उभे राहायला सुरूवात झाली. आणि मग शासकीय अधिकार्यांच्या लक्षात आले की, सरकारने जागा दिली असली तरी महसूल खात्याशी जे लीज-डीड कायदेशीररित्या करावे लागते ते केलेलेच नाही. आणि त्यापूर्वी बांधकाम सुरू झाले. मग हृदयनाथ मंगेशकर यांची धावपळ झाली. त्यांनी मनोहर जोशींना भेटून कल्पना दिली. पण ते काम काही मार्गी लागले नाही. पुढे युतीचे सरकार गेले. आणि 1999 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तिथपर्यंत अधिकार्यांनी या बांधकामावर हरकत घेतली होती. आणि छोटा दिसणारा विषय अडचणीचा होऊ लागला होता. रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाच्या श्रीमती वेलणकर आणि डॉ. धनंजय केळकर त्यावेळचे आमदार उल्हास पवार यांना वारंवार भेटले आणि विलासरावांच्या मार्फत त्यांनी हा विषय मार्गी लावायची त्यांनी विनंती केली. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. केळकर यांना घेऊन उल्हास पवार यांनी वर्षा बंगला गाठला. विलासरावांना सगळा विषय समजावून सांगितला. विलासरावांनी संबंधित खात्याचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जॉनी जोसेफ यांना बोलावून घेतले आणि त्यांना एका वाक्यात सांगितले. ‘दिदींचे काम आहे; मार्गी लावून द्या. अडचण करू नका...’ हळूवार पणे विलासराव कामे करीत होते. आणि ती अडचण लगेच दूर झाली.

    नंतर शानदार रुग्णालय उभे राहिले. त्या रुग्णालयाचे उद्घाटन करायला त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिदींनी आणले. वाजपेयी यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख कार्यक्रमाला होतेच. नामफलकावरचा पडदा दूर झाला. अटलबिहारींनी पाहिलं, त्याच्यावर लिहिले होते की, "देश के प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयींजींके करकमलोद्वारा..." वगैरे; पण त्या फलकावर राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नावच नव्हते! त्याची चर्चा झाली. तेव्हा हृदयनाथ उल्हास पवारांना म्हणाले की, "आम्हाला असे सांगण्यात आले की प्रोटोकॉलमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव टाकणे बसत नाही." विलासराव म्हणाले, "काही हरकत नाही. तुमचे काम झाले याचा आनंद आहे."

    याच रुग्णालयाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन लताबाईंनी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले. याला काय म्हणावे. हा कृतघ्नपणा नाही का? नाही म्हणालयला पवारांनी जागा दिली म्हणून रुग्णालयाचे भूमीपूजन लतालताबाईंनी पवारांच्या हस्ते केले होते.

    या रुग्णालयात पुणे आणि आसपासच्या परिसरातील गरीब रुग्णाला सवलतीच्या दराने उपचार होतील अशी लोकांची अपेक्षा होती. पण, तसे काही घडले नाही आणि आता हे रुग्णालय पुण्यातल्या रुबीच्या तोडीचे महागडे रुग्णालय ठरले आहे. अशी भिती वाटते की काही वर्षानंतर मंगेशकर रुग्णालयाच्या रस्त्याने जाणार्या गाड्यांना टोल द्यावा लागतो की काय! शासनाच्या मदतीने मिळालेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या दीनानाथजींच्या स्मारकरुपाने उपचार करणार्या या रुग्णालयाचा आज गरीब रुग्णांना फायदा किती हा वेगळा प्रश्न आहे.

    ReplyDelete