Sunday, 29 June 2014

पवार झाले ‘मेटे’करी

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

28-June-2014 : 11:55:00
  
जी गोष्ट जगजाहीर आहे ती वारंवार सांगण्यात अर्थ नसतो. तसे केल्याने ती आदरणीय न राहता पांचट आणि हास्यास्पद होते. शरद पवार हे संत नाहीत आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही संतांची टोळी (मांदियाळी नव्हे) नाही किंवा महाराष्ट्रात मराठय़ांना दिलेले आरक्षण विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी दिले आहे, हेही त्याचमुळे त्यांनी सांगण्याचे कारण नाही. त्या संघवाल्यांचे पहा, आपण ढोंगी आहोत असे ते बिचारे कधी सांगतात काय? कारण आपले तसे असणे सार्‍यांना ठाऊक आहे आणि ज्यांना ते अजून कळले नाही त्यांनाही ते हळूहळू कळणारच आहे, हे समजण्याएवढे ते गंभीर आणि शहाणे आहेत. शरद पवारांचे तसे नाही. १९६0 च्या दशकापासून म्हणजे गेली पंचावन्न वर्षे ते महाराष्ट्राच्या (व अधूनमधून देशाच्या) राजकारणात राहिले आहेत आणि मराठी माणसांना त्यांचे अजूनही शिल्लक असलेले उतावळेपण नको तेवढे समजले आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दाचाच नव्हे तर हालचालीचाही अर्थ त्यांच्या ध्यानात येणारा आहे. विनायक मेट्यांनी जेव्हा मराठा आरक्षणाची आरोळी ठोकली, तेव्हाही तो आवाज कोणाचा आहे हे सार्‍यांना कळून चुकले होते. तरीही ‘सोयरिकीला जाताना शहाण्णव कुळांची थोरवी सांगायची आणि आरक्षण मागताना मागासलेपण पुढे करायचे यात विसंगती आहे’ हे तेव्हाचे त्यांचे मेट्यांवर केलेल्या टीकेचे बोल लोकांनी ऐकून घेतले होते. मात्र, ते ऐकतानाही मेटे आणि पवार एक आहेत आणि त्यांची तोंडे वेगळी असली तरी वाणी एक आहे हे त्यांना समजलेच होते. पुढे पवारांनी मेट्यांना आमदारकीचा मुकुट (त्यांच्या अनुयायांनी एका संपादकाच्या घरावर हल्ला चढविल्यानंतर आनंदाने) दिला, तेव्हाही लोकांना त्यांचा समज खरा असल्याची खात्री पटलीच होती. जे मेट्यांनी तेव्हा मागितले ते पवारांनी आता त्यांना दिले आहे व ते देताना शहाण्णव कुळी मराठय़ांना मागासवर्गीयांच्या रांगेत आणून बसविण्याचे राजकारणही केले आहे. आता मेट्यांनी युतीचा नाद सोडायला आणि पुन्हा पवारांच्या आश्रयाला यायला हरकत नाही. पण मेटेही चलाख आहेत. उद्या युतीचेच राज्य महाराष्ट्रात आले तर त्यात ते कदाचित मंत्री होतील आणि पवारांकडे येऊन साधे आमदार राहण्यापेक्षा तिकडे राहून मंत्री होणे त्यांनाही हिताचे वाटेल. मात्र, ते युतीत असले काय आणि आघाडीत, रामदास आठवल्यांसारखेच, ते पवारांचे आहेत आणि तसेच राहणारही आहेत. पवारांच्या मनातला मराठावाद कधी मावळलाच नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसी राजकारणात त्यांनी केलेली वजाबाकी ज्यांना नीट तपासता येते त्यांना त्यांच्या या मराठा भक्तीचीही चांगली कल्पना येऊ शकेल. मुसलमान काँग्रेससोबत नव्हते आणि दलितांचे वर्ग आंबेडकरी निष्ठेमुळे त्या पक्षापासून दूर होते, मग राहिलेले वर्ग कोणते? पवारांनी प्रथम ब्राह्मणांना दूर केले (आता तर त्यांचे अनुयायी ब्राह्मणांचे पुस्तकातील नामोल्लेख आणि पुतळेही काढण्याच्या मागे लागले आहेत) मग ओबीसींना दूर केले. मग उरले ते मराठे, कुणबी आणि तत्सम इतर त्यांच्याजवळचे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेव्हा ती चक्क मराठय़ांची रिपब्लिकन पार्टी होती. तिला काँग्रेसहून अधिक जागा कधी मिळाल्या नाहीत आणि मूळच्या काँग्रेसमध्येही मराठय़ांचे प्राबल्य आहेच. मग पवारच मेट्यांचे अनुयायी झाले आणि परवापर्यंतचा मराठा आरक्षणाला असलेला त्यांचा तोंडी विरोध मावळला. पण एकदम विरोधी रिंगणात उडी घ्यायची तर तिलाही एक धारिष्ट्य लागते. म्हणून मग पवारांची आताची रस्त्यावरची भाषा, ‘आम्ही म्हणजे कोणी संत नाहीत’  ही.. पवारसाहेब, तुम्ही संत नाहीत, संत कधी नव्हताही आणि यापुढेही तुम्हाला संत होता येणार नाही हे सारे जाणतात. तुम्हाला राजकीय संतांच्या मालिकेतही कोणी घेणार नाही. एक गोष्ट मात्र खरी, तुम्ही चांगले राजकारणी आहात आणि चांगले राजकारणी असण्यासाठी जे काही बरेवाईट सोडावे लागते ते सारे सोडण्याची तुमची तयारी आहे. कुणा जाणकाराचे म्हणणे असे की ज्वारीच्या शेतातून फिरतानाही अंगाला पांढरे लागू न देण्याचे कसब पवारसाहेबांमध्ये आहे. ते खरेच आहे. गेली ५0 वर्षे तुम्ही महाराष्ट्र, त्याला कळूही न देता आपल्या मुठीत ठेवला. सगळ्या वजाबाक्या मनापासून केल्या आणि तरीही त्यात जे गळले त्यांनी तुमच्या आरत्या गाण्याचे काम कधी थांबविले नाही. राजकारणी माणसांना प्रत्येकाचीच किंमत (मूल्य नव्हे) ठाऊक असते असे म्हणतात. ती मोजली की तो खूष राहतो आणि खिशातही राहतो.. तर काय, पवारसाहेब, तुमचे अभिनंदन!

No comments:

Post a Comment