Showing posts with label महात्मा फुले यांचे अखंड भाग-१. Show all posts
Showing posts with label महात्मा फुले यांचे अखंड भाग-१. Show all posts

Thursday, 22 August 2013

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती


महात्मा फुले यांचे अखंड

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती । दुजा का करिसी । मुलांसाठी ।।१।।
भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ । अनुष्ठानी बीज । नाही का रे ।।२।।
अनुष्ठानावीण विध्वा मुले देती । मारूनी टाकिती सांदी कोनी ।।३।।
ज्याची जशी कर्मे तशी फळा येती । शिक्षा ती भोगिती । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
जप आणि अनुष्ठान केल्याने मुले होतात, असा प्रचार ब्राह्मण करतात. जपानुष्ठाने मुले झाली असती, तर मग मुले होण्यासाठी इतर कोणताही उद्योग करण्याची गरजच राहिली नसती. मुले होण्यासाठी भट-ब्राह्मण बहुजन समाजाला जपानुष्ठाने करायला सांगतात, मात्र खुद्द ब्राह्मणांच्याच अनेक स्त्रिया वांझ आहेत. ब्राह्मण स्त्रियांना अनुष्ठानातून बीज का नाही मिळत. कोणत्याही प्रकारची अनुष्ठाने न करता ब्राह्मणांच्या विधवा स्त्रियांना मुले होतात. मग त्या स्त्रिया अशा मुलांना गुपचूप मारून टाकतात. ज्याची जशी कर्मे आहेत, तशी फळे त्याला मिळतात. वाईट कामांची शिक्षा भोगावी लागते, असे जोती म्हणतात.

कठीण शब्दांचे अर्थ :
बहु : फार
बीज : बी, वीर्य
विध्वा : विधवा.
सांदी : घरातील अंधारी जागा.
कोनी : कोनाड्यात.

भट करिताती द्रव्य लूट

महात्मा फुले यांचे अखंड

प्राणीमात्रा सोई सुख करण्यास । निर्मी पर्जन्यास । नद्यांसह ।।१।।
त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती । आर्ये कुरापती । तीर्थे केली ।।२।।
दाढी डोई वेण्या मुढ भादरिती । भट करिताती । द्रव्य लूट ।।३।।
आर्यांनी कल्पिली थोतांडे ही सारी । दगे सर्वोपरी । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
सर्व प्राणिमात्रांस सुखी करण्याच्या उद्देशाने इश्वराने पाऊस आणि नद्यांची निर्मिती केली आहे. नद्यांचे पाणी वेगाने वाहत असते. त्यात आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी कुरापती काढून (नदीकाठांवर) तीर्थे निर्माण केली. या तीर्थांवर मुर्ख लोक दाढ्या, डोकी, वेण्या भादरतात आणि त्याच्या माध्यमातून भट ब्राह्मण पैशांनी लुबाडणूक करतात. आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी ही सर्व थोतांडे निर्माण केली आहेत. ही सर्व धोकेबाजी आहे, से जोती म्हणतात.

कठीण शब्दांचे अर्थ :
पर्जन्य : पाऊस.
डोई : डोके
मुढ : मुर्ख
भारदरणे : केस कापणे
दगे : दगा या शब्दाचे अनेक वचन. दगा म्हणजे धोका.

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी


महात्मा फुले यांचे अखंड

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी । त्यांचे भय मनी । धरा सर्व ।।१।।
न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा । आंनद करावा । भांडू नये ।।२।।
धर्मराज्य भेद मानवा नसावे । सत्याने वर्तावे । इशासाठी ।।३।।
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो । आर्यांस सांगतो । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
सर्वांचा निर्माण करता मालक एकच आहे. त्याचे भय सर्वांनी मनात धरावे. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा. आनंदाने राहावे. भांडण करू नये. धर्माच्या नावाखाली माणसांत भेदभाव नसावा. इश्वरासाठी सत्याने वर्तन करावे. सर्वांनी सुखी व्हावे यासाठी मी भिक्षा मागतो. हा सर्व उपदेश आर्यांसाठी म्हणजेच ब्राह्मणांसाठी आहे, असे जोती म्हणतात. 

कठीण शब्दांचे अर्थ :
धनी : मालक
इश : इश्वर
आर्य : ब्राह्मण

Tuesday, 30 July 2013

श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती...!

वारकरी संतांनी लोकजागृतीसाठी अभंगांची रचना केली. याच धर्तीवर महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड रचले आहेत. फुले यांच्या अखंडांत ब्राह्मणी धर्मावर जबरदस्त प्रहार करण्यात आले आहेत. फुले यांचे काही निवडक अखंड येथे देत आहोत.

अखंड क्रमांक : २५
श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती । मौजा मारिताती । मृतानावे ।।१।।
पडझड गाया दीन मांग खाती । ब्राह्मण निंदिती । त्याला सर्व ।।२।।
अहिंसक जती पाणी काढविती । किड्या मोक्ष देती । तृष्णेसाठी ।।३।।
आर्यासह जत्या नाही सत्य त्या । जाती सर्व वाया । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
आर्य ब्राह्मण श्राद्धामध्ये गायी (गोमांस) खातात. मृतांच्या नावे मौजा मारतात.
मातंग समाजातील दीन दलित लोक मेलेल्या गायी (गोमांस) खातात, त्याला मात्र हेच ब्राह्मण नावे ठेवितात.
(विहिरींना पाणी लागावे यासाठी बळी देण्याच्या प्रथेचा उल्लेख करताना महात्मा फुले म्हणतात की,) आपली तहान भागावी यासाठी अहिंसक जती (संन्यासी) बळी देतात. वर बळी दिल्या जाणा-या प्राण्याला मोक्ष मिळाला, अशा भाकडकथा पसरवितात.
जोतिबा म्हणतात की, आर्य ब्राह्मण आणि जती यांच्या वागण्यात सत्य अजिबात नाही. हे लोक धर्माच्या नावाखाली जे जे काही करतात ते सर्व वायाच जाते.

अखंड क्रमांक : २९
कल्पनेचे देव करिले उदंड । रचिले पाखांड । हितासाठी ।।१।।
किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले । अज्ञ फसविले । कृत्रिमाने ।।२।।
निर्लज्ज सोवळे त्याचे अधिष्ठान । भोंदिती निदान । शुद्रादिक ।।३।।
ब्राह्मणांनी नित्य होऊनी निसंग । शुद्र केले नंग । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
(ब्राह्मणांनी) खूप खोटे देव निर्माण केले आहेत. आपल्या हितासाठी (पोट भरण्यासाठी) त्यांनी हे सारे पाखांड रचले आहे.
(ब्राह्मणांनी) ग्रंथांमध्ये किन्नर आणि गंधर्वांना नाचवून अज्ञ जणांना फसविले. गंधर्व किन्नरांच्या सा-या कथा कृत्रिम म्हणजेच खोट्या आहेत.
निर्लज्ज सोवळे हे ब्राह्मणांचे अधिष्ठाण आहे. त्याचा वापर करून ते शुद्रांना भोंदून खात असतात.
जोतिबा म्हणतात की, ब्राह्मणांनी नेहमीच नि:संग होऊन म्हणजेच लाज-लज्जा सोडून शुद्रांना नागविले आहे.



संदर्भ :
महात्मा फुले सम्रग्र वाङ्मय (पान क्रमांक : ५४२)
संपादक : य. दि. फडके
सुधारित पाचवी आवृत्ती, २८ नोव्हे. १९९१
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ.

अनुक्रमिका येथे पाहा