Monday 9 July 2012

गीतेतला वेदविरोध

वंशशुद्धीची कल्पना नाकारली
  
सध्या ज्याला हिंदू धर्म म्हणून संबोधले जाते त्या धर्मात श्रीकृष्णाने भर रणांगणावर अर्जुनाला सांगितलेल्या गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज अस्तित्वात असलेला भारतीय धर्माचा ढाचा भक्ती सांप्रदायाच्या पायावर उभा आहे आणि भक्ती सांप्रदाय गीतेच्या पायावर उभा आहे. गुजरातपासून बंगाल-आसामपर्यंत आणि महाराष्ट्रापासून नेपाळपर्यंत भक्ती संप्रदायाचा प्रभाव आहे. हा सांप्रदाय भारतीय धर्माच्या ब्राह्मणी शाखेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या तत्त्वाला अनुसरतो; तर भक्ती सांप्रदाय समानतेच्या तत्त्वाला अनुसरतो. देशातील सर्वच भागांतील भक्तिपंथियांना ब्राह्मणी छळाला तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. भक्ती सांप्रदायाने ब्राह्मणी धर्माला सुरूंग लावला. भक्ती सांप्रदायाचे मूळ नाथपंथात आहे. ही परंपरा आदिनाथापासून सुरू होते. या परंपरेतील पहिला महापुरुष मच्छिंद्र होय. ही परंपरा मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी-निवृत्ती आणि ज्ञानेश्वर अशी महाराष्ट्रात आली. बंगालात चैतन्य सांप्रदायाच्या रूपाने ती अस्तित्वात आहे. याच परंपरेतील बाबाजी चैतन्य यांना जगद्गुरू संत तुकारामांनी आपले गुरू मानले. अशा प्रकारे वारकरी परंपरा ही नाथपंथात मिसळून गेलेली आहे. या परंपरेने ब्राह्मणी भेदभावाला विरोध करून सर्व जातींना समान तत्त्वावर धार्मिक अधिकार दिले. या समानतेचे मूळ गीतेत सापडते. वेदांना धक्का दिल्याशिवाय समानतेचे तत्त्व अस्तित्वात येऊ शकत नाही. याची कल्पना श्रीकृष्णाला होती. त्यामुळे त्याने गीतेत वेदांतील तत्त्वज्ञानालाच नव्हे, तर खुद्द वेदांनाच बाजूला उचलून फेकले. हा विचार कोणालाही धाडसी वाटेल, पण तोच सत्य आहे. याचे पुरावे इतरत्र नव्हे, तर खुद्द गीतेतच सापडतात. तथापि, ब्राह्मणी हितसंबंध जपण्यासाठी आजपर्यंत गीतेतील हे क्रांतीकारी विचार हेतूत: दाबून टाकण्यात आले. वैदिक विचारांचे सार असलेले मुद्दे काढायचे ठरल्यास पुढील प्रमाणे निघतील :  
१. वंशशुद्धी.
२. ठराविक जातींना विशेषाधिकार. 
३. विशिष्ट जातींना धर्माधिकार देण्यास नकार. 
४. वेद सर्वश्रेष्ठ. वेदांचा शब्द अंतिम.
हे सारमयी मुद्दे श्रीकृष्णाने गीतेत कसे निकाली काढले ते आता आपण टप्प्याने पाहू. पहिले तीन मुद्दे वेगवेगळे दिसत असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. किंबहुना एकच मुद्दा वेगवेगळ्या रूपात समोर येताना दिसतो.
तो म्हणजे वंशशुद्धी.

अर्जुन का घाबरला? 
अर्जुन रणांगणात येतो. समोर आपले नातेवाईक पाहून हतधैर्य होतो. माझ्याच नातेवाईकांना कसे मारू, असा प्रश्न त्याला पडतो. आणि तो रथातून खाली उतरतो. त्याच्या हातील गांडीव धनुष्य गळून पडते. +न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानिच्+ असे म्हणून अर्जून युद्ध करण्याचे नाकारतो. त्यावर श्रीकृष्ण त्याला गीता सांगतो. हा गीतेचा कारणभाव आजपर्यंत आपल्याला सांगितला जातो. यात काही चूकही नाही. पण हे पूर्ण सत्य नाही. ब्राह्मणवादी आपल्याला अर्धेच सत्य सांगत आहेत. किंबहुना अर्जुनाने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. काय आहे हा मुख्य मुद्या? हा मुख्य मुद्दा आहे, वंशशुद्धीचा! अर्जुनाच्या तोंडचे गीतेच्या पहिल्या अध्यायातील पुढील श्लोक पहा :

कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन् ।।३८।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।३९।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वारष्णेय जायते वर्णसंकर: ।।४०।।
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्त पिण्डोदकक्रिया: ।।४१।।
दोषैरेतै: कुलघ्नां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।४२।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रूम ।।४३।।

हे पहिल्या अध्यायातील अंतिम टप्प्यातील श्लोक आहेत. यानंतर उपसंहाराचे तीन श्लोक येऊन पहिला अध्याय संपतो. यावरून या श्लोकांचे महत्त्व लक्षात येते. हे श्लोक अर्जुनाच्या मनातील सर्वांत मोठे प्रश्न आहेत. पण या प्रश्नांची चर्चाच आपल्याकडे कधी होत नाही. कारण त्यांची उत्तरे अत्यंत धक्कादायक आणि आपल्या मूळ धार्मिक धारणांना धक्का देणारी आहेत. 
हे सर्व समजून घेण्यासाठी आपण प्रथम या श्लोकांचा अर्थ समजून घेऊ या :

युद्ध केल्याने कुलक्षय म्हणजेच कुलांचा नाश होणार आहे. तसेच कुलक्षय करणे हे पाप आहे, हे माहीत असूनही आपण हे पाप का करावे ।।३८।।
कुलांचा नाश झाल्याने कुलांच्या सनातन परंपरा नष्ट होतात. धर्म नष्ट होऊन अधर्माचा पगडा बसतो ।।३९।।
अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुलातील स्त्रिया प्रदुषित होतात. कुलस्त्रिया प्रदुषित झाल्याने वर्णसंकर होतो ।।४०।।
वर्णसंकरामुळे नरकमय स्थिती प्राप्त होते. पिंडदानादि क्रिया नष्ट होतात. अंतत: पितरे पतन पावतात ।।४१।।
कुलपरंपरांचा अशा प्रकारे नाश केल्यामुळे सर्व प्रकारच्या जातीव्यवस्था नष्ट होतात. जातिधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतो ।।४२।।
हे रक्षणकत्र्या श्रीकृष्णा मी असे ऐकले आहे की, अशा प्रकारे कुलधर्म नष्ट करणारे लोक नेहमी नरकात राहतात ।।४३।।

या सहा श्लोकांतून असे दिसते की, अर्जुनाला युद्धाची पर्वा नाही. त्याची भीती वेगळीच आहे. त्याला वाटते की, +युद्ध केल्यानंतर वीर पुरूष मारले जातील. त्यांच्या बायका विधवा होतील. विधवा बायका प्रदुषित होतील. त्यातून वर्णसंकर होईल. जातीव्यवस्था नष्ट होईल.+ ही भीती त्याला वाटते कारण, असे केल्याने आपण नरकात जाऊ असे त्याला वैदिक परंपरेने शिकविले आहे.

अर्जुनाला चिंता जातीव्यवस्था नष्ट होण्याची 
वेदांनी घालून दिलेला वर्णाश्रम धर्म हा जातीसंस्थेपेक्षा भिन्न आहे, असा युक्तिवाद ब्राह्मणवादी करतात. +युद्धाने जातीधर्म म्हणजे जातीव्यवस्था नष्ट होईल+ अशी भीती खुद्द अर्जुनानेच व्यक्त केली आहे. त्यामुळे जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था एकच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दुसरे कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही. जातीव्यवस्था नष्ट होणे म्हणजेच वेगवेगळ्या जातींतील पुरूष आणि स्त्रियांना एकत्र येण्याची परवानगी देणे होय. यालाच वर्णसंकर म्हणतात. वर्णसंकरातून नको असलेली मिश्र संतती निर्माण होईल, ही अर्जुनाची खरी भीती आहे. जातीव्यवस्था नष्ट होण्याच्या संभाव्य धोक्यामुळे अर्जुन एवढा घाबरला आहे की, तो कौरवांच्या हातून मरायलाही तयार होतो. तो म्हणतो :
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४५।।
अर्थ : धृष्टराष्ट्राच्या पुत्रांनी मला ठार मारले तरी ते (जातीव्यवस्था मोडण्याचे पाप करण्यापेक्षा) क्षेमतर म्हणजे अधिक चांगले आहे.
जाती व्यवस्था नष्ट होण्याचा धोका हीच अर्जुनाची मुख्य चिंता आहे. परंतु हा मुद्दा कोणीही अधोरेखित करीत नाही. कारण आपली परंपरा झापडबंद आहे. अर्जुनाच्या +आपल्याच बांधवांना कसे मारू?+ या प्रश्नाभोवतीच ही परंपरा फिरत राहिली आहे.

कृष्णाने अर्जुनाची चिंता दुर्लक्षिली! 
जातीव्यवस्था उच्चाटनाची भीती अर्जुनाच्य दृष्टीने मुख्य असली तरी श्रीकृष्णाने या मुद्याला अजिबात महत्त्व दिलेले नाही. भगवतगीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांत या प्रश्नाचे थेट उत्तरच श्रीकृष्णाने दिलेले नाही. वर्णसंकर होणार असेल, तर होऊ दे असेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सूचित केले, असा याचा अर्थ होतो. आज भारतात कोणताही मानववंश शुद्ध स्वरूपात अस्तित्वात नाही. भारत देश हा मिश्रवंशीयांचा आहे. एकाच बापाच्या पोटी जन्मलेल्या दोन भावांतील एक जण फॉरेनर वाटावा एवढा गोरा आणि घा-या डोळ्यांचा असतो, तर दुसरा काळाकुट्ट असतो. अगदी ऋग्वेदी ब्राह्मणांतही हीच स्थिती आहे. भारती युद्धाचेच हे परीणाम आहेत. ते स्वीकारून श्रीकृष्णाने अर्जुनाला +युद्धस्व भारत+ असे म्हणून युद्ध करण्याचा आदेश दिला. वंशशुद्धीच्या भेदभावकारक तत्त्वाला श्रीकृष्णाने तिलांजली दिली. 

श्रीकृष्णाने वर्ण संकराला अप्रत्यक्षरित्या पाठींबाच दिल्याचे यावरून दिसते.
अनिता पाटील

5 comments:

  1. लेख वाचला…परंतु आपण फक्त श्लोकात आलेल्या शब्दांची गफलत केलेली दिसते…केवळ एका श्लोकावरून मान्याजोग्या निष्कर्षाला आपल्याला पोहोचायचे असेल,तर मग काही बोलायलाच नको…महाभारताचे युद्ध निव्वळ सत्य-असत्य यांच्या दरम्यानचे युद्ध नसून त्यापलीकडे सुद्धा काही ज्ञान देते,हे मला सुद्धा मान्य आहे,परंतु निव्वळ मनाजोगा अर्थ काढून असे होणार नाही तर त्यासाठी त्याचा अभ्यास करून योग्य अर्थ काढून लोकांना सांगावा लागेल.जातीद्वेश त्यामागचे कारण नसावे.

    ReplyDelete
    Replies
    1. या लेखात जर शब्‍दांची गफलत असेल,तर खरा अर्थ आपण सांगावा. व आपण स्‍वत:चा परीचय सुध्‍दा देण्‍याचे का टाळले त्‍याचा खुलासा शक्‍य असल्‍यास करावा.

      Delete
  2. चातुर्वर्ण्यम् मया सुष्टम् असा एक श्लोक आहे गीतेत, वाचलाय का?

    ReplyDelete
  3. चातुर्वर्ण्यम् मया सुष्टम् असा श्लोक गीतेत आहे.परंतु पुढे गुणकर्म विभागाश म्हटलेले आहे. ब्राम्हण,क्षत्रीय,वैश्य,शूद्र हे जन्माने नव्हे तर कर्माने विभागले जातात.

    ReplyDelete