Showing posts with label वेदांची चिकित्सा. Show all posts
Showing posts with label वेदांची चिकित्सा. Show all posts

Tuesday, 8 November 2011

अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !


प्रकरण -४   


वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार लिहिले आहेत. यांतील बहुतेक संस्कारांचे वेळी गाय किंवा  बैल मारण्याची प्रथा वैदिक धर्मात होती. आर्यलोकांना शेतीचे विशेष ज्ञान नव्हते. ते पशुपालक होते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. जे माणसाचे मुख्य अन्न असते, तेच त्याच्या धार्मिक विधित महत्त्वाचा भाग ठरते. हे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात अंत्यसंस्काराचे वेळी गाय मारण्याची प्रथा दिसून येते. सोळावा म्हणजेच शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय. यात गाय मारून ती प्रेतासोबत जाळली जात असे. प्रेतासोबत जाळल्या जाणारया गायीला वेदसाहित्यात अनुस्तरणी असे म्हणतात. व गाय मारून जाळण्याच्या विधिस अनुस्तरणीकर्म म्हणतात.  प्रेतासोबत गाय कापण्यामागे मोठी अंधश्रद्धा दिसून येते. अग्निमध्ये जे हवन केले जाते, ते आपल्या पितरांना मिळते, अशी वैदिकांची मान्यता होती. मृत्यू पावलेल्या माणसाला स्वर्गाच्या प्रवासात खायला मिळावे म्हणून गाय मारून आणि जाळून त्याच्यासोबत दिली जात असे. 
अनुस्तरणीकर्माचा विधि ऋग्वेदात, शुक्लयजुर्वेदाच्या ३५ व्या अध्यायात, तैत्तिरीय आरण्यकात असेच इतर अनेक सूत्र ग्रंथांत आहे१. गाय मारून तिच्या मांसाचा पिंड देण्यात यावा. मारलेल्या गायीची वपा म्हणजेच चरबी काढून तिने प्रेताच्या मुखास तसेच सर्व शरीरास आच्छादून टाकावे नंतर प्रेतास अग्नि द्यावा, असे या ग्रंथांतील उल्लेख सांगतात. गाय उपलब्ध होणे शक्य नसेल तर बकरीचा कल्प खुद्द ऋगवेवादातच सांगितला आहे२. कल्प म्हणजे पर्याय. ऋगवेदातील या ऋचेचा आद्य (आद्य म्हणजे सुरुवात.) असा  : 
अग्नेर्वर्भ परि गोभिव्र्ययस्व० - ऋगवेद. ७.६.२१.
ऋगवेदातील हाच मंत्र तैत्तिरीयारण्यकात (६ प्रपाठक, १ ला अनुवाक) प्रतिपादिला आहे. याशिवाय कलिवर्जप्रकरणसंबंधात +अग्निहोत्रं गवालंभम्+ असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. +गवालंभम+ या शब्दाची फोड गव म्हणजेच गाय आणि आलंभम् म्हणजेच आलंभन अर्थात गाय मारून उपयोगात आणणे अशी आहे. याचाच अर्थ वैदिक धर्माच्या अगदी प्रारंभकाळापासून अनुस्तरणीकर्म प्रचलित होते. 
गाय स्मशानात नेण्याची पद्धती 
प्रेत स्मशानात नेतानाच अनुस्तरणी गाय नेली जावी. अनुस्तरणी गायीच्या गळ्यात किंवा पायात एक दोरी अडकवून ती प्रेताच्या दंडास बांधावी व ती अशा प्रकारे प्रेतासोबत न्यावी. स्मशानात ती कापावी. तिची चरबी काढून प्रेताच्या चेहèयासह सर्वांगावर पोतारावी. गायीचे अवयव मृतदेहाच्या अवयांवर जसे० पायावर पाय हृदयावर हृदय इ. ठेवावे. नंतर प्रेतास अग्नी द्यावा, असा सर्व प्रमुख ब्राह्मणी ग्रंथांचा आदेश आहे.  
मी येथे ऋग्वेद,  तैत्तिरीयारण्यक किंवा  इतर ब्राह्मणी ग्रंथांतील तरतुदींपेक्षा आश्वलायनाचार्यांनी लिहिलेल्या गृह्यसूत्रातील तरतुदींचेच विवेचन करणार आहे. ऋगवेदातील तरतुदी या तत्कालीन सर्व वर्णांसाठी होत्या. किमान त्रैवर्णिकांसाठी तर होत्याच होत्या. परंतु आश्वलायनाचार्याच्या गृह्यसूत्रातील तरतुदी या केवळ आणि केवळ ऋगवेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून गोहत्याबंदीसाठी थयथयाट चालविला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म तसेच आदिवासी जमाती यांना टार्गेट करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांचा हा खटाटोप चालू आहे. हे उपदव्याप कसे निरर्थक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे पूर्वजच गायी कापून खात होते, इतकेच नव्हे तर त्यांचे अंत्यसंस्कारांसारखे विधिही गायीच्या मांसाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आश्वलायन गृह्यसूत्राचा आधार पुढील विवेचनासाठी मी घेतला आहे.
या पहा ग्रंथांतील अघोरी  तरतुदी 
आश्वलायनाचार्याने आपल्या गृह्यसूत्रात गाय मारण्याचा आणि जाळण्याचा विधि फार विस्ताराने लिहिला आहे. चौथ्या अध्यायात खंड १, २ आणि ३ मध्ये अनुस्तरणीकर्मविधि आला आहे.  आश्वलायनाने म्हटले आहे. यासंबंधीची सूत्रे आणि त्यांचा अर्थ पुढे देत आहे.
खंड २
सूत्र : अनुस्तरणीम् ।।४।।
अर्थ : ज्या मादी पशूने प्रेताचे आच्छादन करितात ती अनुस्तरणी करावी. (अनुस्तरणी करावी म्हणजे प्रेताबरोबर मारून जाळावी)
सूत्र : गाम् ।।५।। अजां वैकवर्णार्मं ।।६।।
अर्थ : गाय किंवा एक रंगी शेळी अनुस्तरणी करावी.
सूत्र : कृष्णामेके ।।७।।
अर्थ : काळी शेळीही अनुस्तरणी करता येऊ शकेल, असे काही ऋषींचे म्हणणे आहे.
सूत्र : सव्ये बाहौ बद्ध्वाऽनुसंकालयन्ति ।।८।।
अर्थ : पशुचा पुढला डावा पाय बांधून त्यास प्रेताचे मागे न्यावे.
सूत्र : अन्वंचोऽमात्या अघोनिवीता: प्रवृत्तशिखा ज्येष्ठप्रथमा: कनिष्ठजघन्या: ।।९।।
अर्थ : आणि त्या पशूचे मागून प्रेताच्या बांधवादिकांनी माळेसारखे जानवे करून व शेंड्या मोकळ्या सोडून ज्येष्ठ पुढे व धाकटे मागे या क्रमाने चालावे.
खंड ३
गाय मारल्यानंतर चे विधि पुढील प्रमाणे : 
सूत्र : अनुस्तरण्या वपामुत्खिद्य शिरो मुखं प्रच्छादयेदग्नेर्वर्म परि गोभिव्र्ययस्वेति ।।१९।।
अर्थ : अनुस्तरणीची म्हणजेच मारलेल्या गायीची वपा म्हणजे चरबी काढून त्या चरबीने प्रेताचे शिर मुखसुद्धा झाकावे. हे कर्म करताना +अग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ).
सूत्र : वृक्का ऊद्धृत्य पाण्योरादध्यादति द्रव सारमेयौ श्वानाविती दक्षिणे दक्षिणं सव्ये सव्यम् ।।२०।।
अर्थ : वृक्क म्हणजे गायीच्या कुशीतील मांसाचे गोळे काढावे. प्रेताच्या उजव्या हातावर उजवा वृक्क व डाव्या हातावर डावा वृक्क ठेवावा. हा विधि करीत असताना +अति द्रव०+ (ऋ. ७।६।१५) ही ऋचा म्हणावी. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
सूत्र : हृदये हृदयम ।।२१।।
अर्थ : प्रेताच्या हृदयावर कापलेल्या गायीचे हृदय ठेवावे.
सूत्र : सर्वां यथांग विनिक्षिप्य चर्मणा प्रच्छाद्येममग्ने चमसं मा वि जिव्हर इति प्रणीताप्रणयनमनुमंत्रयते ।।२४।।
अर्थ : अनुस्तरणीचा म्हणजेच कापलेल्या गायीचा जो जो अवयव असेल तो तो प्रेताच्या त्या त्या अवयवावर ठेवावा. गायीचे कातडे प्रेतावर पांघरून प्रेत पूर्ण झाकून टाकावे. हा विधि करीत असताना +इममग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
या पूढील खंडांत प्रेतास अग्नी देण्याचे विधि, अस्थिंची विल्हेवाट व सुतकादि प्रथांचे पालन या विषयी लिहिण्यात आलेले आहेत. 
दयानंद सरस्वती यांच्या +वेदांकडे चला+ या हाकेचे पालन करावयाचे झाल्यास आपल्याला अंत्यसंस्कारांसाठी गायी कापाव्या लागतील. हे आजच्या ब्राह्मणवाद्यांना चालणार आहे का? दयानंद सरस्वती प्रणित आर्यसमाज वेदांतील अनुस्तरणीविधीचे पालन करून अंत्य संस्कारांत गाय कापतो का? या प्रश्नांची उत्तरे हिंदूत्चाचा बुरखा पांघरलेल्या ब्राह्मणवाद्यांनी द्यायला हवीत.

या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  


अनिता पाटील, औरंगाबाद. 

................................................................

संदर्भ :
 


१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 

या लेखात आलेले ऋगवेदातील मंत्र पुढील प्रमाणे आहेत :

१. अग्नेर्वर्म परि गोभिव्र्यस्व सं प्रोर्णुध्व पीवसा मेदसा च ।।
नेत्त्वा धृष्णुर्हरसा जर्हृषाणो दधृग्विधक्ष्यन्पर्यंखयाते ।। ७।६।२१

२. अति द्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौ शबलौ साधुना पथा ।।
अथा पितृन्त्सुविदत्राँ उपेहि यमेन ये सधमादं मदंति ।। ७।६।१५

३. इमामग्ने चमसं मा वि जिङ्घर: प्रियो देवानामुत सोम्यानाम् ।।
एष यश्चमसो देवपानस्तस्मिन्देवा अमृता मादयंते ।। ७।६।२१  
...............................................................

मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप!


प्रकरण -३

मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो. 
मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे. अश्वलायनाच्या गृह्यसूत्रात मधुपर्कावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. गृह्यसूत्राच्या पहिल्या अध्यात, २४ व्या खंडात हा सर्व भाग येतो. या खंडातले २, ३ आणि ४ क्रमांकाची सूत्रे सांगतात : 
सूत्र : स्नातकायोपस्थिताय ।।२।।
सूत्र : राज्ञेच ।।३।।
सूत्र : आचार्यश्वशुरपितृव्यमातुलानां च ।।४।।
अर्थ : घरी आलेला स्नातक म्हणजेच विद्याध्यन करणारा विद्यार्थी, राजा, आचार्य म्हणजेच गुरू, सासरा, चुलता qकवा मामा यांना मधुपर्क पूजा द्यावी.
गाय मारल्याशिवाय मधुपर्क पूर्ण होत नाही असा आदेश देणारी आश्वलायनाची ही पाहा काही सूत्रे :
सूत्र : आचांतोदकाय गां वेदयंते ।।२३।।
अर्थ : आचमन केलेल्याला गाय निवेदन करावी.
सूत्र : हतो मे पाप्मा पाप्मा मे इत इति जपित्वोमकुरूतेति कारयिष्यन् ।।२४।।
अर्थ : प्रतिग्रहकरत्याच्या मनात गाय मारण्याची इच्छा असेल तर +हतो मे पाप्मा पाप्मा मे हत: + हा मंत्र जपावा. +ओमकुरुत+ म्हणून गाय मारण्याची आज्ञा द्यावी.
सूत्र : नामांसो मधुपर्को भवति भवति ।।२६।।
अर्थ : मांसाखेरीज मधुपर्क होत नाही 
या सूत्रातील शेवटचे २६ क्रमांकाचे सूत्र अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे आहे. मांसाखेरीज मधुपर्क म्हणजेच पाहुणचार नाही, असा स्पष्ट शास्त्रादेश ब्राह्मणांसाठी देण्यात आला आहे. त्या आधीच्या २५ व्या सूत्रात गाय मारण्याची इच्छा नसल्यास उत्सर्ग करण्याची आज्ञा आहे. उत्सर्ग म्हणजे गाय महाजनांच्या खर्चाने चालणारया पांजरपोळात नेऊन सोडणे. एका अर्थाने तिला जीवदान देणे. २५ वे सूत्र म्हणते की, माता रुद्राणां दुहिता वसुनामिति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्त्रक्ष्यन् ।। याचा अर्थ असा की, गायीचा उत्सर्ग करण्याची इच्छा असल्यास +माता रुद्राणाम दुहिता+ या मंत्राचा जप करून ओमउत्सृजत असे म्हणून उत्सर्ग करण्यास सांगावे. २५ व्या सूत्रावरून आपला असा समज होतो की, गायीला सोडले म्हणजे वैदिक सभ्यतेत दयाधर्म यास स्थान आहे. पण तसे होत नाही. पुढचाच श्लोक सांगतो की, +नामांसो मधुपर्को भवति भवति+ या सूत्रावरील भाष्यकार सांगतात की, गाय पांजरपोळात सोडल्यानंतर दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा. 
वैदिक धर्मात दयेला कोणताही थारा नाही. आज हिंदू म्हणवल्या जाणारया धर्मात जी काही भूतदया आहे, ती बौद्ध व जैनांच्या रेट्यामुळे आली आहे. शास्त्राच्या दृष्टीने सर्वाधिक मान्यताप्राप्त असलेल्या याज्ञवल्क्याच्या१  व्यहाराध्यायात पुढील श्लोक आहे :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
त्या काळी म्हातारी जनावरे सांभाळणे अवघड होते. त्यामुळे त्यांचा प्रोक्षणविधि करून या जनावरांची तीन प्रकारे विल्हेवाट लावावी असे हा श्लोक सांगतो. हे तीन प्रकार असे १) ही जनावरे अनुस्तरणी करिता म्हणजे माणसाच्या अंत्यविधीसाठी, अगर श्राद्धासाठी वापरावी २) राजगवी म्हणजेच राजाच्या हवाली करावी. ३) खाण्यासाठी ठार मारावी. खाण्यासाठी प्राणी मारल्यास दोष लागत नाही. मांस भक्षण मद्यपान आणि स्त्रीशी संभोग केल्याने दोष लागत नाही, असे मनुने सांगितल्याचे आपण +गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!+ या प्रकरणात पहिलेच आहे२. याशिवाय वेदाने सांगितलेल्या कर्मासाठी प्राणी मारल्यास त्याला हत्या समजू नये, असा शास्त्रादेश असल्याचेही आपण याच प्रकरणात पाहिले आहे३ .
बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेच्या रेट्यानंतर वैदिकांनी आपल्यात थोडेसे बदल करून हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हिंसा पूर्णपणे संपविली नाही. यासंबंधी मनुस्मृती म्हटले आहे की : 
मधुपर्के च यज्ञेच पितृदैवतकर्मणि ।
अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनु: 
अर्थ : मधुपर्क म्हणजे पाहुणचार, यज्ञ व श्राद्ध या विqधमध्येच पशु मारावेत. अन्यत्र ते मारू नयेत. 
याचाच अर्थ मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे सात्विक मिश्रण, असे जे सांगताना ब्राह्मण खोटे बोलत असतात. आश्वलायनाच्या गृह्यसूत्रातील हे सर्व नियम ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे ब्राह्मणांच्या लग्नसमारंभादि विधित पूर्वी गाय मारली जात होती, हे सिद्ध होते. गोमांसापासून बनविलेला मधुपर्काचा सोपा अर्थ म्हणजे गोमांसेचे सूप होय. हे ब्राह्मणांकडून श्रद्धापूर्वक प्राशन केले जात असे. मधुपर्काचे तीन भाग करून ते पिऊन घ्यावेत, असे आश्लायन सांगतो.
आश्लायनाचे यासंबंधीचे सूत्र असे :
विरोजो दोहोऽसीति प्रथमं प्राश्नीयात् । विराजो दोहमशीयेति द्वितीयम् । मयि दोह: पद्यायै विराज इति तृतियम् ।। खंड २४. सूत्र १६
अर्थ : +विराजो दोहोसि+ हा मंत्र म्हणून पहिला भाग प्यावा. +विराजो दोहमशीय+ हा मंत्र म्हणून दुसरा भाग प्यावा. +मयि दोह: पद्यायै विराज:+ हा मंत्र म्हणून मधुपर्काचा तिसरा भाग प्यावा. 
गायीच्या मांसापासून बनविलेले हे  सूप वैदिक ब्राह्मणांना अमृतासमान प्रिय होते. आश्वलायनाच्या पुढच्या सूत्रावरून हे स्पष्ट होते. 
अथाचमनीयेनान्वाचामति अमृताऽपिधानमसीति ।। खंड २४. सूत्र २०
अर्थ : नंतर +अमृततापिधानमसि+ हा मंत्र म्हणून शेवटचे आचमन करावे.
अहिंसावादी धर्माचा रेटा वाढल्यानंतर कालांतराने मधुपर्कामधून गाय बाद झाली. गायीच्या जागी बकरयाचा कल्प सांगितला गेला. म्हणजेच गायी ऐवजी बकरा कापून मधुपर्क गेला जाऊ लागला. संस्कारकौस्तुभ या ब्राह्मणी ग्रंथात +गोप्रतिनिधित्वेन छाग आलभ्यते+४  असे म्हटले आहे. याचाच अर्थ गायीचे प्रयोजन जाऊन बकरयाची योजना येथे केलेली दिसते. अहिंसावादाचा आणखी रेटा वाढल्यानंतर बकरा कापण्याची प्रथाही बंद झाली. आता ब्राह्मणांच्या लग्नात विहिणीस +भेट बकरा+ म्हणून एक रूपया दिला जातो. गायीचे प्रयोजन मात्र अजूनही प्रतिकात्मक स्वरूपात सुरूच आहे. विवाह प्रसंगी कणकेची गाय करून ती कापली जाते. 
या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मूळचा वैदिक धर्म हा गायीचे मांस खाणारया रानटी लोकांचा धर्म होता. बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेमुळे लोक या धर्मांकडे आकर्षित होऊ लागले तेव्हा वैदिकांनी आपल्या धर्मातील ही हिंसा बंद केली. म्हणजे मूळ वैदिक धर्म संपला स्वत:ला वैदिक म्हणवणारे वस्तुत: बौद्ध आणि जैन धर्माचेच पालन करीत असतात.  



या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  



अनिता पाटील, औरंगाबाद.
......................................................................

संदर्भ :

१. याज्ञवल्क्य  स्मृतीचे ३ भाग असून त्याचा एक भाग व्यवहाराध्याय या नावाने ओळखला जातो. 
2. न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)

3. या वेदविहिता हिंसा  न सा हिंसा प्रकीरति ता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला हिंसा  समजण्यात येऊ नये.

4. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 
....................................................................

Saturday, 5 November 2011

वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?

प्रस्तावना

अतिप्राचीन काळापासून भारत देशात दोन धार्मिक परंपरा आहेत.
१. युरोप आणि आशिया यांच्या सीमावर्ती भागातून आलेल्या आर्यांची ब्राह्मणी परंपरा
२. भारतातील मूलनिवासी लोकांची मूळ भारतीय परंपरा.
या पैकी ब्राह्मणी परंपरा ही आदिमानवाच्या अवस्थेतील हिंसाचाराधिष्ठित धारा असून मूळ भारतीय परंपरा ही मानवाने आदिम अवस्था पार केल्यानंतरची दयाधर्मावर आधारित श्रेष्ठ परंपरा आहे. वैदिक धर्म, सनातन धर्म या धर्मपरंपरा ही ब्राह्मणी धर्माचे अपत्य असून, बौद्ध, जैन, आणि अलिकडील वैष्णव, शैवादी भक्ति सांप्रदाय या एतद्देशीय धार्मिक विचारांतून निर्माण झालेल्या धर्मपरंपरा होत. मूळ भारतीय परंपरांना ढोबळमानाने दयाधर्म असे म्हणता येते.  महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनीही मूळ धार्मिक परंपरेला दयाधर्म असेच म्हटले आहे१.  वैदिक धर्मीय स्वत:स आर्य म्हणवतात. संपूर्ण वैदिक धर्माची बांधणी यज्ञादी कर्माभोवती करण्यात आली आहे. यावरून वैदिक आर्य लोक हे अग्निपूजक होते. ते पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यांचे मुख्य अन्न मांस हेच होते. त्यांच्यात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. एका अर्थाने वैदिक धर्म हा रानटी लोकांचा अर्थात आदिमानवाचा धर्म  होता, हे वैदिक वाङ्मयातील पुराव्यांवरूनच म्हणता येते. या उलट मूळ भारतीय परंपरेत मानवतेला आणि दयाधर्माला अत्यंत महत्त्व आहे.  धार्मिक कारणांसाठी पशुहिंसा  वर्ज्य  मानण्यात येते. प्राणी हक्कांसाठी अलिकडे पेटासारख्या संस्था काम करतात. हे काम मूळ दयाधर्माधिष्ठित मूळ भारतीय धर्मांनी प्राचीन काळीच सुरू केले होते. बौद्ध, जैन, भक्तिसांप्रदाय, शैव या मूळ भारतीय धर्मांत ते दिसून येते. भक्ती सांप्रदाय आणि शैवांना आज हिंदू मानले जाते. परंतु ते चूक आहे. हे मूळचे स्वतंत्र धर्म होते. श्रीकृष्ण आणि महादेव अर्थात शंकर या देवताच वेदांत नाहीत. उत्तर काळात वैदिक ब्राह्मणांनी या मूळ धर्मांत शिरकाव करून हे धर्मच हायजॅक केले. विष्णू या  नव्या देवतेला जन्म देऊन हे धर्म त्यात सामावून घेतले. इतकेच काय बौद्धालाही विष्णूचा अवतार दाखविले गेले. हे वैदिकांचे बहुजनांविरोधातील कपटकारस्थान आहे.
उपयुक्तता हाच वैदिक धर्माचा पाया
युरोपात लंगडा घोडा सांभाळला जात नाही. त्याला गोळी मारून ठार केले जाते. कारण त्याचा मालकाला काहीही उपयोग नसतो. आजकालच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उपयुक्ततेचा हाच निकष आज लावला जातो. +हायर अँड फायर+ हे उपयुक्ततेचे तंत्र त्यातून विकसित झाले. उपयुक्ततेचे हे तत्त्व अमानूष आणि अत्यंत क्रूर आहे. तथापि, वैदिक धर्माचा  पायाच उपुयक्ततेच्या या तत्त्वावर घालण्यात आला आहे. वैदिक धर्मातील कर्मकांडे, नीतिनियम आणि समाजव्यवस्थापन असे सर्व काही उपयुक्ततेच्या याच तत्त्वावर बेतले आहे. उपयुक्त नसलेल्या कोणत्याही गोष्टीला वैदिक धर्मात स्थान नाही. लंगडा घोडा सांभाळायला ही संस्कृती तयार नाही. त्याच्या नशीबी या संस्कृतीने मृत्यूच लिहिला आहे. म्हणूनच वैदिकांच्या दृष्टीने गाय हा पिण्यास दूध आणि खाण्यास मांस देणारा उपयुक्त पशू ठरतो. अलिकडील काळात ब्राह्मणवादाचे फेरबीजारोपण करणारे विनायक दामोदर सावरकर हे गायीला उपयुक्त पशूपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत. सावरकर असे का लिहितात याचे उत्तर वैदिक धर्मपरंपरेत सापडते. सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. ते असे का वागले याचे इंगितही इथेच सापडते.
म्हातारया आई-वडिलांच्या नशीबी वनवास
उपयुक्ततेचा हा मुद्दा वैदिक सभ्येतत (सभ्यता म्हणजे समाजव्यवस्था. इंग्रजीतील सिव्हिलायझेशन या शब्दासाठी हा शब्द वापरला जातो.) अत्यंत क्रूर पद्धतीने आमलात आणते. त्यात दयामाया काहीही नाही. माणसांचे महत्त्वसुद्धा याच तत्त्वानुसार ठरते. येथे माणुसकीला शून्य किंमत आहे. याच उपयुक्ततेतून चार वर्ण आणि चार आश्रम तयार झाले. उपयुक्ततेनुसार माणसांची किंमत ठरविली गेली. हलकी कामे करणारया शूद्रांना हीन लेखण्यात येते ते त्यामुळेच. जन्म देणारया आईवडिलांनाही वैदिक धर्म याच उपयुक्ततेच्या तराजूत मोजतो. आयुष्याच्या चौथ्या टप्प्यात आलेल्या वृद्धांना वैदिक समाजात कोणतेही स्थान राहत नाही. त्यांच्यासाठी वानप्रस्थाश्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज भारतात वृद्धाश्रम उभे राहत आहेत. त्याकडे आपण आधुनिक चंगळवादाचे क्रूर अपत्य म्हणून पाहतो. परंतु महानतेचा डांगोरा पिटणारया वैदिक सभ्यतेने यापेक्षाही क्रूर व्यवस्था म्हातारया माणसांसाठी निर्माण केली होती.  या व्यवस्थेनुसार, जराजर्जर झालेल्या माता-पित्यांना मरण्यासाठी वनात सोडले जाई. महाभारतातील विदूर, धृतराष्ट्र, गांधारी आदींचा मृत्यू जंगलात कसा झाला याची वर्णने जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचावीत.
ब्राह्मण हे लाभाचे पद
उपयुक्ततेच्या क्रूर पायावर वैदिक सभ्यता उभी असली, तरी तत्कालिन समाजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे उपुयक्त नसलेल्या ब्राह्मणांसाठी उपयुक्ततेचा हा नियम लावला जात नाही. यात आश्चर्यकारक असे मात्र काहीही नाही. ब्राह्मणांना उपयुक्ततेचा निकष लावला जात नाही, कारण या व्यवस्थेचे निर्माते स्वत: ब्राह्मणच होते. स्वत:ला समाजाच्या सर्वोच्च स्थानी स्थापून काहीही काम न करता खाता येईल, अशी व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्यासाठी निर्माण करून घेतली. या व्यवस्थेत क्षत्रिय सर्व समाज आणि राज्याचे प्राणांची बाजी लावून संरक्षण करतात. वैश्य व्यापार-उदिम वाढवून संपत्ती निर्माण करतात. शूद्र सेवा देतात. ब्राह्मण काय करतात? या तिन्ही वर्णांकडून स्वत:ची सेवा करून घेतात! +ब्राह्मणो अदंडणीय:+ असे म्हणत ब्राह्मण अदंडणीय आहेत म्हणजेच त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही, अशी घोषणा वेदांनी केली. चातुर्वर्ण्य  व्यवस्थेचा हाच खरा अर्थ आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारमधील लाभाच्या पदांवरून (लाभाच्या पदाला इंग्रजीत +ऑफीस ऑफ प्रॉफिट+ म्हणतात.) वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक जणांना आर्थिक लाभ देणारया पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ब्राह्मण हे वैदिक सभ्यतेतील असेच लाभाचे पद आहे. ब्राह्मणांना लाभाच्या पदावरून घालवणारे कोणतेही न्यायालय अजून या देशात निर्माण होऊ शकले नाही.
वैदिक धर्माची चिकित्सा 
होऊ नये याची धर्मातच तरतूद 
आपल्याकडे वैदिक धर्माची योग्य चिकित्सा आजपर्यंत झालेलीच नाही. वैदिक धर्माची चिकित्सा होऊ  नये, अशी व्यवस्था या धर्मातच करून ठेवण्यात आली आहे. वैदिक धर्माची बांधणी किती काळजीपूर्वक करण्यात आली, हे यावरून लक्षात येते. चिकित्सेसाठी विद्वत्तेची शिक्षणाची गरज असते. शिकणे आणि शिकविण्याची व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्या हाती ठेवली होती. वैदिक सभ्यतेच्या प्रारंभ काळात क्षत्रिय व वैश्यांना शिक्षणाचा हक्क होता, असा युक्तिवाद केला जातो. परंतु तो अत्यंत फसवा आहे. या दोन वर्णांना त्यांच्या व्यवसायांना उपयुक्त असेच शिक्षण दिले जात असे. रामायण-महाभारतकाळ हा वैदिक सभ्यतेचा परमोच्च काळ होय. त्याकाळातली दोन उदाहरणे पाहू या. कौरव आणि पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होत. द्रोणाचार्यांनी त्यांना वेद शिकविले का? अजिबात  नाही. त्यांना सैनिकी शिक्षण द्रोणाचार्यांनी दिले. श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरू विश्वामित्र. त्यांनीही राम-लक्ष्मणास सैनिकी शिक्षणच दिले. क्षत्रिय आणि वैश्यांनी वेदशास्त्रात पारंगत होण्याची गरज मानली जात नव्हती. वेदशास्त्रात पारंगत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य मानले जाई. वैदिकाभिमानी आजही हेच मानतात. शूद्रांना तर वेदांचा अधिकारच नव्हता. शूद्राच्या कानावर चुकून जरी वेदांची वाक्ये पडली, तरी त्याच्या कानात शिशाचा गरम रस ओतावा, अशा अमानवी, क्रूर आणि संतापजनक तरतुदी मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आहेत. अशा प्रकारे वैदिक धर्माची चिकित्साच होऊ नये, अशी व्यवस्था या सभ्यतेच्या एकूण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सारया विवेचनाचा एका वाक्यातील अर्थ असा : ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान सुरक्षित राहावे यासाठी केलेले हे कारस्थान आहे!  
वेदोत्तर काळात तरी का झाली नाही चिकित्सा?
मी वर जी व्यवस्था सांगितली, ती वैदिक कालखंडातली आहे. वैदिक धर्माचा अंत झाल्यानंतरच्या काळात तसेच अलिकडील म्हणजेच आधुनिक काळात तरी वैदिक सभ्यतेची चिकित्सा का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तरासाठीही आपणास पुन्हा याच व्यवस्थेकडे जावे लागेल. वैदिक धर्म नष्ट झाला. वैष्णव, शैवादि नवे धर्म अस्तित्वात आले, तरी समाज व्यवस्थेची मूळ चौकट तीच राहिली.  कारण ग्रंथरचनेचे पेटंट अजूनही ब्राह्मणांकडेच होते. त्यामुळे उत्तर कालीन १८ पुराणे, सूत्रे शास्त्रे वगैरे सर्व ग्रंथात ब्राह्मण हेच समाजव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी कायम होते. उलट या काळात ब्राह्मणांचे स्थान अधिक बळकट झालेले दिसते. स्मृती ग्रंथांची रचना याच काळात झाली.  ज्यांना आज आपण बहुजन समाज म्हणतो. त्या जातींवर अधिकाधिक बंधने लादली गेली. परवापर्यंत म्हणजेच पेशवाईपर्यंत ही दाबादाबी सुरू होती. दलितांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधण्यापर्यंत नीच पातळी पेशवाईत या सभ्यतेने गाठली. या संपूर्ण काळात बहुजन समाज अशिक्षिततेच्या गर्तेत होता. तो वेदवाङ्मयाची खरी चिकित्सा करण्यास असमर्थ होता. वेद आणि वेदांना प्रामाण्य मानणारया धर्मातील तरतुदी बहुजन समाजाच्या विरोधात होत्या. या समाजाकडून वेदवाङ्मयाची चिकित्सा होण्याचा सर्वाधिक धोका होता. म्हणून बहुजनांना वेदाधिकारच नाकारण्यात आला. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी, ही आजची म्हण येथे चपखलपणे लागू होते. बहुजन समाजाला वैदिक वाङ्मयापासून दूर ठेवण्याच्या तरतुदी वैदिक वाङ्मयात करून ठेवण्यात आल्या त्यामागे असे व्यापक षडयंत्र आहे. वेदिक सभ्यतेची आणि वाङ्मयाची चिकित्सा करण्याची क्षमता या संपूर्ण कालावधीत केवळ ब्राह्मणांतच होती. तथापि, ब्राह्मणांनी वैदिक धर्माची खरी चिकित्सा केली नाही. या धर्मात ब्राह्मणांसाठी +लाभाचे पद+ होते. वेदांची खरी चिकित्सा करून ब्राह्मण स्वत:ला नुकसानीत कशाला टाकतील?
बौद्ध काळात ब्राह्मण वाङ्मय भूमिगत
वैदिक काळ आणि पुराण काळ यांच्या मध्ये बौद्ध आणि जैन काळ भारतात येऊन गेला. बौद्ध-जैन काळानंतर पुन्हा ब्राह्मणी चौकट जशीच्या तशी लागू झाली. यावरून ब्राह्मणवादी पंडित दिशाभूल करणारा युक्तिवाद करतात की, बौद्ध धर्म या देशाचा धर्म कधीच होऊ शकला नाही. हा युक्तिवाद करणारया या विद्वानांना लावण्यासाठी पाखंडी, ढोंगी, कारस्थानी या प्रकारातील सर्व उपमा आणि अलंकार थिटे पडतील. बौद्ध काळात वैदिकांची पूर्ण वाताहत झाली होती. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले धर्मग्रंथ भूमिगत केले. वेदार्थ गुप्त केला२. अनेक ब्राह्मणी ग्रंथ तर हजारो वर्षे भूमिगत होते. दयानंद सरस्वती यांना वेदांच्या शुद्ध संहिता युरोपातून मॅक्समूल्लरसारख्या पंडिताकडून आणाव्या लागल्या त्या याचमुळे. बौद्ध काळात वेदविद्या गुप्त होती, असा उल्लेख गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी  यांनीही केला आहे. लोकहितवादी म्हणतात : वेदविद्या गुप्त ठेवण्याची रीति, म्हणजे ज्या काळी बौद्ध मार्गातील व इतर साधू हे धडधडीत वेदांतील प्रतिपादनाची निंदा  करू लागले व तेणेकरून वेदांविषयी सर्वत्र असन्मान उत्पन्न होऊ लागला. तेव्हा वेदार्थ न जाणता केवळ तो पाठ करून कायम ठेवण्याविषयीची रीति, वैदिकधर्मानुयायींनी ठरविली असावी३.
वैदिकांनी बौद्ध आणि जैन धर्माचा एवढा धसका घेतला होता की, बौद्ध आणि जैन मंदिरात जाऊ नये असे शास्त्रादेश ब्राह्मणी ग्रंथांत लिहिण्यात आले. त्यापैकी एक शास्त्रादेश असा :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम ।।
या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत४. लोकहितवादींच्या या म्हणण्यात खूप तथ्य आहे. बौद्ध धर्म भारतभूमीतून नामशेष झाल्यानंतर भारतातील बहुतेक बौद्ध आणि जैन लेण्या, चैत्य विहार ओस पडले. सांचीचा स्तूप तर मातीने झाकूनच टाकण्यात आला होता. इंग्रज आल्यानंतर या वास्तूंना प्रकाशात आणले गेले. अजिंठ्याची बौद्ध लेणी रॉबर्ट नावाच्या इंग्रज अधिकारयाने जगासमोर आणली. ती स्थानिक लोकांना माहीत होती. परंतु तिच्यात जाणे लोक पाप समजत.
बहुजनांवर इंग्रजांचे उपकार
ब्राह्मणांनी गुप्त केलेले, कटकारस्थानांनी भरलेले वेदवाङ्मय इंग्रजी राजवटीत जगासमोर आले. या दृष्टीने पाहता इंग्रजी राजवट ही या देशातील बहुजनांसाठी उपकारकच ठरली.  इंग्रज अधिकारयांनी सर्व प्रकारच्या भारतीय वाङ्मयाचा धांडोळा घेतला. ब्राह्मणांना खास तैनात करून अर्थ नीट लावून घेतले. तेव्हा त्यातील रानटी तरतुदी समोर आल्या. तसेच ब्राह्मणांच्या धूर्तपणाचा, कारस्थानांचा आणि कपटांचाही पर्दाफाश झाला. तरीही ब्राह्मणी कपट-कारस्थाने बहुजन समाज समजून घेऊ शकला नाही. कारण बहुजन समाज अजूनही अशिक्षितच होता. स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज शिकून बराचसा जाणता झाला आहे. ब्राह्मणी संस्कृत ग्रंथ तसेच इंग्रजांनी केलेली या ग्रंथांची समीक्षाही तो आता वाचू, समजू लागला आहे. आता ब्राह्मणी धर्माचे पितळ उघडे पडत आहे. तथापि, ब्राह्मणी कारस्थाने अजूनही पूर्णपणे जगासमोर येऊ शकलेली नाहीत. याचे कारण आहे मीडिया. भारतातील मीडिया अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाखाली असल्यामुळे ब्राह्मणी वाङ्मयाची समीक्षेला प्रसिद्धी दिली जात नाही. असो मीडियाचा विषय आपण केव्हा तरी हाताळू.
वेदांकडे चला नको, वेदांपासून दूर व्हा!
इंग्रजांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घाबरलेल्या काही ब्राह्मणांनी वैदिक धर्म परंपरा कशी श्रेष्ठ तसेच वेदांकडे परत जाण्यात समाजाचे कसे भले आहे, असे सांगून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दयानंद सरस्वती, विवेकानंद हे लोक असा भ्रम पसरविण्यात आघाडीवर होते. दयानंद सरस्वतींनी आर्यसमाजाची स्थापना केली, तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन केला. +वेदांकडे चला+ अशी हाक दयानंदांनी दिली होती. या उपद्व्यापातून फार काही साध्य झाले नाही. आर्यसमाजाचे महत्त्व प्रेमविवाह लावून देण्यापुरते राहिले. गेल्याच महिन्यात खुद्द न्यायालयानेच आर्यसमाजाच्या या विकृत चाळ्यांना चाप लावला आहे. रामकृष्ण मठ वैदिक पुस्तकांचे दुकान होऊन बसला आहे. त्यापलीकडे हा मठ कोणतेही विधायक कार्य करू शकला नाही. आपल्या पंथाला हिंदू धर्मात गृहीत धरले जाऊ नये, यासाठी रामकृष्ण मठाने काही वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावरून वेदाभिमान्यांची निराशा लक्षात येते. वेदांकडे चला ही हाक बंद करून आता वेदांपासून दूर चला अशी नवी हाक देण्याची वेळ आली आहे.
आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजांचे पाप
इंग्रजांनी कायदे करून सतीची चाल बंद करण्यासारख्या काही सुधारणा केल्या. त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माला राजकीय पाठबळ मिळाले. बहुजन समाज ख्रिस्ती होण्याचा धोका या काळात होता. ब्राह्मणी धर्म व्यवस्थापकांनी हे बरोबर हेरले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज असे अनेकविध समाज स्थापन करून बहुजनांना वैदिक व्यवस्थेतच गुरफटून ठेवण्याचे नवे कारस्थान खेळले गेले. इंग्रजांना राज्य आणि व्यापारातून पैसे कमावण्यात जास्त रस होता. तो मिळवून देण्यासाठी स्थानिक हस्तक म्हणून ब्राह्मणांची त्यांना मदत झाली. न्या. महादेवशास्त्री रानडे, राजा राममाहन रॉय वगैरेंसारखे या समाजांचे प्रमुख इंग्रजांच्या प्रशासकीय व्यवस्थेचे भाग होते. त्यामुळे इंग्रजांनी अशा कथित सुधारक समाजांना काही प्रमाणात प्रतिष्ठा मिळू दिली. या काळात जे काही बहुजन शिकून विद्वान झाले. ते वैदिक चौकटीची समीक्षा करण्याऐवजी या बोगस समाजांच्या नादी लागले. बहुजन समाजातील मोठे समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. अशा प्रकारे इंग्रजी राजवटीत वैदिक सभ्यतेची बहुजनांकडून चिकित्सा होण्याची निर्माण झालेली शक्यता धुळीस मिळाली. बहुजनांचा उद्धार होण्याचा दरवाजा किलकिला होत असताना तो अशा प्रकारे पुन्हा घट्ट बंद झाला. ब्राह्मणांनी त्या काळी निर्माण केलेल्या विविध समाजांचे हे पाप आहे. इंग्रज गेल्यानंतर हे कथित समाज रहस्यमयरित्या गायब झाले. त्यांचे अस्तित्व कायमचे संपले. कारण त्यांचा कार्यभाग साधला गेला होता.
समीक्षेच हा छोटा प्रयत्न  
असो. कथित श्रेष्ठ आणि महान वैदिक धर्माची न झालेली चिकित्सा करण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे. तो किती यशस्वी होतो, हे वाचकांनीच ठरवायचे आहे. माझा शब्द अंतिम आहे, असा माझा दावा नाही. याच्या विरुद्ध मत कोणाला मांडायचे असल्यास जरूर मांडावे. मी त्याचे स्वागतच करीन. एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. एका अर्थान हाच लोकशाहीचा खरा दागिना आहे. फक्त असे करताना खोट्या पुराव्यांचा आधार घेतला जाऊ नये, एवढी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करून ही लांबलेली प्रस्तावना संपविते.

या लेख मालेतील इतर लेख पुढील लिंक वर वाचा 




अनिता पाटील, औरंगाबाद. 

...................................................................................................................
संदर्भ :
१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.
३. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५५.
४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५०.  
...................................................................................................................

वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव !


प्रकरण १.

भारतातील प्राचीन वैदिक संस्कृती यज्ञ आणि पशुपालन या दोन पायांवर उभी होती. वैदिक स्वत:ला आर्य म्हणवून घेत. अग्नी हा मानवी सभ्यतेतील पहिला वैज्ञानिक शोध समजला जातो. अग्नीच्या शोधामुळे माणूस कच्चे मांस खाण्याऐवजी भाजून, शिजवून खाऊ लागला. मानवाच्या प्रगतीतील ही दुसरी अवस्था आहे. वैदिक संस्कृती याच टप्प्यात विकसित झाली. वैदिक आर्य अग्नीशिवाय जगूच शकत नव्हते. वैदिकांची संस्कृती अंत्यंत प्रगत आणि उन्नत होती, असे मानण्याची अंधश्रद्धा भारतात कित्येक शतकांपासून जोपासली हेतूत: गेली आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे, असा अपसमज शतकानुशतके प्रसृत केला गेला. काही हितसंबंधी पोटपूजक पुरोहित आणि इतिहासकारांनी हे पाप केले. वैदिक आर्य प्रगत नव्हे, तर मानवी प्रगतीच्या दुसरया टप्प्यावर जगत होते. ते भटके आणि पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. मांस खाण्यायोग्य करण्यासाठी वैदिक आर्यांना अग्नीची गरज होती. सासरी जाणारया मुलीसोबत अग्नीही दिला जात असे. वैदिक संस्कृतीने अग्नी सतत प्रज्वलित ठेवणे हे एक आद्य कर्तव्य ठरविले, त्यामागील कारण असे व्यवहारिक आहे. या व्यवहारिकतेतून अग्निहोत्राचा म्हणजेच यज्ञाचा जन्म झाला. यज्ञ संस्कृतीचा जन्म अशा प्रकारे वैदिकांच्या दैनंदिन गरजेतून झाला आहे. घरातील अग्नी विझला तर वैदिकशास्त्रात विविध प्रायश्चित्ते सांगितली आहेत. 
अग्नीसंबंधीचे काही शास्त्रादेश पुढील प्रमाणे:
विवाहाग्निमग्रतोऽजस्त्रं नयन्ति ।।
अर्थ : वधुवरांचे पुढे विवाहकाली सिद्ध झालेला अग्नी अजस्त्र न्यावा१. (अजस्त्र म्हणजे मोठ्या भांड्यातून. मोठ्या भांड्यातून यासाठी की मुलीला सासरी आणेपर्यंत तो विझता कामा नये.)
पाणिग्रहणादि गृह्यं परिचरत्स्वयं 
पल्यपि वा पुत्र: कुमार्यन्तेसी वा ।।
अर्थ : लग्न झाल्यापासून घरात अग्नीची सेवा स्वत: करावी. स्वत:ला शक्य नसल्यास पत्नीकडून, पुत्राकडून qकवा अविवाहित कन्येकडून करावी२.
यदि तूपशाम्येत्पत्न्यूपवसेदित्येके ।।
अर्थ : घरातील अग्नी जर विझला तर पत्नीने उपोषण करावे, असे ऋषींचे सांगणे आहे३.
वरील शास्त्रादेश पाहिले असता वैदिक लोक पूर्णत: अग्नीवरच कसे अवलंबून होते, हे लक्षात येते. वैदिकांच्या हातातील अग्नी काढून घेतल्यास ते कच्चे मांस दातांनी तोडून खाणारया आदिमानवाच्या अवस्थेत जाऊन पडतील. ही वस्तुस्थिती एकदा समजून घेतली की, आर्यांच्या अफाट प्रगतीचा तसेच महान संस्कृतीचा भोपळा आपोआप फुटतो. अग्निशिवाय दुसरे कोणतेच वैज्ञानिक रहस्य वेदांना माहीत नाही. या पाश्र्वभूमीवर +वेदांकडे चला+  ही दयानंद सरस्वतींसारख्या वेदाभिमान्यांची हाक प्रगतीकडे नेण्याऐवजी उलट्या दिशेने मानवाच्या आदिम अवस्थेकडे नेणारी ठरते. 


या लेखमालेतील इतर लेख पुढील लिंकवर वाचा 

  



अनिता  पाटील, औरंगाबाद. 

...................................................................



संदर्भ :
१. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ८. सूत्र : ५
२. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ९. सूत्र : १
१. आश्वलायन सूत्र. भाग-गृह्य. अध्याय : १. खंड : ९. सूत्र : ३
...................................................................

गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!


प्रकरण २.
...............

वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
१ श्रौत यज्ञ
२. स्मार्त यज्ञ

स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
यज्ञात बळी दिले जाणारे पशु
यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१.  बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२.  ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
आपस्तंभ सूत्र काय म्हणते? 
आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा  उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०) 
अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
मनुस्मृतीतील पुरावे
ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने  + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।। 

(मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।

अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
या वेदविहिता 
हिंसा   न सा हिंसा  प्रकीत्र्तिता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची 
हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.


या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  






अनिता पाटील, औरंगाबाद.


...........................................................................................................................
Foot Notes 

लेखातील पुस्तकांचे  संदर्भ :
 १. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.

२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४८.

३. आश्वलायनसूत्र हे शालिवाहन शकाच्या सुमारे ६०० वर्षे आधी लिहिले गेले असे मानले जाते. हे सूत्र ऋगवेदाचा भाग आहे. या सूत्राचे दोन भाग आहेत : १) श्रौतसूत्र. २) गृह्यसूत्र qकवा स्मार्त सूत्र. आश्वलायनाचार्य याने हे सूत्र लिहिले म्हणून त्याला आश्वलायन सूत्र म्हणतात. आश्वलायनाचार्य हा शौनक ऋqषचा शिष्य होता. आश्वलायन सूत्राचे त्याचे एकूण सोळा अध्याय असून सर्वांना मिळून कल्पसूत्रही म्हणतात. आश्वलायन गृह्य सूत्रात ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाच्या दैनंदिन क्रियाकर्माचे प्रयोग ठरवून दिलेले आहेत. या सूत्रावर नारायणवृत्ती नावाचा टीकाग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय जयंत व देवत्रात नावाच्या कोणा अज्ञात जाणकारांनी लिहिलेली दोन भाष्ये उपलब्ध आहेत. आश्वलायन सूत्रावर कुमारिल भट्टांनी कारिका लिहिल्या आहेत. कारिका म्हणजे फुटकळ वाक्ये एकत्र करून तयार केलेले श्लोक.


४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.

५. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.

...........................................................................................................................


इतर संदर्भ : 
ऐतरेय ब्राह्मण.
तैत्तरेय आरण्यक.
ऋग्वेद संहिता.
सामवेद संहिता.
मंत्रब्राह्मण.
...........................................................................................................................