ऐतिहासिक सांगोला तह
महाराष्ट्रात एक म्हण आहे भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. संपूर्ण भारतवर्षात बऱ्याच राजशाह्यांना या भटांचा हिसका दिसला. सम्राट अशोकचा नातू बृहदत्त, सिंधचे मौर्य घराणे, मदुराईचे नाईक, म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान, कित्तुर संस्थान, अशा बर्याच घराण्यातील ब्राह्मण कारभाऱ्यांनी गदारोळ माजवून त्या सत्तांचा नाश केला. पण भारतीय इतिहासात व्हाईट कॉलरचा गद्दारीचा इतिहास मुद्दाम लपवून ठेवला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी मोठ्या कष्टाने व जिद्दीने दख्खनच्या पठारावर "मराठा राज्य" उभा केलं. त्यांच्या सरदारांनी निष्ठेने सेवा केल्यामुळे दिल्लीच तख्त पण त्या सावलीत उभे राहीले होते. पण पुढे याच साम्राज्याच्या कारभाऱ्यांनी मराठ्यांची सत्ता गिळायला सुरूवात केली आणि त्यातून आपल्याला पण काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मिळते म्हणून सरदार लोक ही तमाशा बघत राहिले. शेवटी "सांगोला तह" होऊन "मराठा राज्य" पेशव्यांनी आपल्या नरड्यात घातलं.
महाराणी ताराबाई साहेबांनी व त्यांच्या चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, दमाजी गायकवाड, आनंदराव पवार, उदाजी पवार, हिंम्मतबहाद्दुर उदाजी चव्हाण या सरदारांनी ढेरी फुगवणाऱ्या पेशवाईला विरोध केला. तथापि, त्यांचा पराभव झाला. पुढे पेशवा विश्वासराव याच्या लग्नात पेशवा नानासाहेब, कारभारी सखाराम बापू, नाना फडणवीस, महादेव पुरंदरे, रामचंद्र बाबा पटवर्धन यांनी गुप्त कट करून छत्रपती शाहू महाराज यांचे दत्तक पुत्र, सत्तेवर असलेले छत्रपती रामराजा यांना आपल्या पक्षात ओढून घेतले व महाराणी ताराबाई यांच्या पक्षातील दादोबा पंतप्रतिनिधी, यमाजी शिवदेव मुतालिक यांचा सरंजाम जप्त केला तसेच यमाजी शिवदेव यांना "सांगोला" येथे वेढा दिला.
यमाजी शिवदेव हा छत्रपतींच्या गादीशी व महाराणी ताराबाई साहेबांशी निष्ठेने वागणारा होता. त्याने महाराणी ताराबाईंच्या आज्ञेवरून पंतप्रतिनिधी दादोबा, बापूजी नाईक, फत्तेसिंह भोसले यांची मदत घेऊन पेशवाई उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी सदाशिवराव भाऊ पेशवा याने यमाजी शिवदेव याला "सांगोला" किल्ल्यात कोंडले. यमाजी शिवदेव याने बरेच दिवस किल्ला जोमाने लढवला. किल्ला हातात येत नाही व परिस्थिती चिघळून आपल्या आंगलटी येऊ शकते हे हेरून सदाशिवराव भाऊने नाना पेशव्याच्या आज्ञेवरून छत्रपती रामराजा यांना सांगोला किल्यासमोर आणून उभे केले व त्यांची आज्ञा असलेली पत्रे किल्ल्यावर पाठवली. आपला धनी पुढे उभा आहे व तो आपल्याला पायउतार होण्यास सांगतोय, हे बघून यमाजी शिवदेव मुतालिक यांनी लढाई थांबवली; पण आपण किल्ला छत्रपतींच्या हवाली करू व छत्रपतींच्याच सोबत राहू, या अटीवर सांगोला किल्ला सोडला. कितीही स्वामीनिष्ठा!
दि. २५ डिसेंबर १७५० रोजी सांगोला येथील अंबाबाई मंदिरात छत्रपती रामराजा महाराज यांच्याकडून पेशवा नानासाहेब व सदाशिवराव भाऊ यांनी "सांगोला तह" लिहून घेतला. या तहानुसार छत्रपती हे फक्त नावापुरते राहून सगळी सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या "मराठा राज्याचा" जीव कायमचा जावून "पेशवाई" ने जन्म घेतला.
सांगोला तहाचा तपशील असा-
१) छत्रपतींचा सर्व कारभार व राज्याची सर्व कामे पेशव्यांच्या आज्ञेवरून चालतील अशी जाचक अट घालण्यात आली.
२) छत्रपतींच्या खर्चासाठी काही भाग तोडून देण्यात आला व छत्रपतींवर नजर ठेवण्यासाठी बापू चिटणीस याच्या हाताखाली राजवाड्यावर चौकी बसण्यात आली.
३) अष्टप्रधान बरखास्त करून तोफखाना, हत्ती, जडजवाहीर, दप्तर व सैन्य साताऱ्यातून पुण्यात नेण्यात आले.
४) फत्तेसिंह भोसले यांचा प्रदेश कापून त्यांना केवळ अक्कलकोट देण्यात आले. तसेच त्यांना शांत बसावे अशी तंबी देण्यात आली. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्र्यंबक हरी पटवर्धन याची नेमणूक झाली.
५) बापूजी नाईक बारामतीकरांकडून कर्नाटक प्रांत काढून सर्व प्रांत सदाशिवराव भाऊच्या नावावर करण्यात आला.
६) यमाजी शिवदेव मुतालिक याची मुतालिकी त्याचा पुतण्या वासुदेव याला देण्यात आली तर दादोबा पंतप्रतिनिधी याच्या ठिकाणी भवानराव पंतप्रतिनिधी याची नेमणूक करण्यात आली
७) आंग्रे, गायकवाड, शिंदे, होळकर यांनी छत्रपतींच्या ऐंवजी पेशव्यांना जमाखर्च सांगून दरवर्षी खंडणी द्यावी.
संदर्भ_ मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६
लेखक_ वि. का. राजवाडे
No comments:
Post a Comment