Showing posts with label मराठा आरक्षण आणि वृत्तपत्रे-अग्रलेख. Show all posts
Showing posts with label मराठा आरक्षण आणि वृत्तपत्रे-अग्रलेख. Show all posts

Monday, 30 June 2014

आरक्षणाची नामुष्की

दै. दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला अग्रलेख

दिव्य मराठी|Jun 27, 2014, 00:54AM IST

ज्या मराठा जातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे वर्षानुवर्षे आहेत, त्या जातीचाही विकास वर्षानुवर्षे होऊ शकलेला नाही. याचा अर्थ केवळ राजकारणाने सर्वांचा तर सोडाच, पण त्या जातीतील सर्वसामान्य माणसाचाही विकास होत नाही, हे अखेरीस सिद्ध झाले. मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करावा लागला आहे. हा निर्णय केवळ राजकीय असून त्याचा आणि मराठा समाजाच्या विकासाचा काही संबंध प्रस्थापित होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शिक्षण व शासकीय नोकर्‍यांतील सरळ सेवा भरतीमध्ये मराठा आणि मुस्लिम उमेदवारांना आरक्षण असेल, मात्र क्रीमिलेअर म्हणजे आर्थिकदृष्ट्या उन्नत गटाला आणि राजकीय क्षेत्रालाही ते लागू नसेल, असा हा निर्णय आहे. मूळ प्रश्न आहे तो भेदभावरहित सर्वांना संधी मिळण्याचा. मग ती शिक्षणातील असो की नोकरीतील. कारण त्या मूलभूत गरजा आहेत. अशा संधीच्या शोधात लाखो तरुण आज उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, तसेच त्यांना नोकर्‍याही मिळेनाशा झाल्या आहेत. म्हणूनच जेथे फार मोठे शिक्षण आणि कौशल्यही लागत नाहीत अशा पोलिस खात्यात भरती होण्यासाठी ऊर फुटेपर्यंत पळण्याची आणि चेंगराचेंगरीत मरण पत्करण्याची त्यांची तयारी आहे. ते कोणत्या जातीत जन्माला आले, हे तेथे महत्त्वाचे ठरत नाही. अशा लाखो तरुणांना संधी हवी आहे आणि ती मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली असून त्याचा परिणाम म्हणून सर्वच जातींमध्ये अस्वस्थ तरुणांची संख्या वाढत चालली आहे. मराठा समाजाचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण तर 32 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच मराठा समाजात बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे अनेक पाहण्यांतून स्पष्ट झाले आहे. या तरुणांना कसे सामोरे जायचे, असा पेच सत्ताधारी मराठा नेत्यांसमोर निर्माण झाला तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी पुढे आली. या मागणीवर विचार सुरू झाला यालाही आता 10 वर्षे उलटून गेली आहेत. याचा अर्थ असा होतो की, नोकर्‍या पुरेशा प्रमाणात निर्माणच होत नाहीत, याला किमान दोन दशके उलटली असून रोजगाराच्या संधीच्या शोधात दोन पिढ्या गारद झाल्या आहेत. म्हणजे समाजात जी अस्वस्थता आहे ती कळण्यास 10 वर्षे आणि त्यासंदर्भात काही करण्यास 10 वर्षे असा हा क्रूर राजकीय प्रतिसाद आहे.  

 घटनेतील तरतुदीनुसार 50  टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मराठा-मुस्लिम आरक्षणाने हे प्रमाण 73 टक्के झाल्याने न्यायालयात हे आरक्षण टिकणार काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच हा निर्णय सरकारने घेतला असून कोणी आव्हान दिले तरी त्याचा प्रतिवाद करण्याची तयारी सरकारने केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. कायद्याच्या लढाईत हे आरक्षण मराठा आणि मुस्लिम तरुणांच्या पदरात केव्हा पडेल माहीत नाही. मात्र, जात-धर्म  हाच जगण्याचा आधार मानणार्‍या तरुणांना आपल्या समाजालाही आरक्षण मिळाले, याचे तोकडे भावनिक समाधान निश्चितच मिळाले आहे. सामाजिक-आर्थिक मागासलेपणा व अपुरे प्रतिनिधित्व या प्रमुख निकषांवर आरक्षण दिले जाते. आंध्रातील वायएसआर रेड्डी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते, ते नंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने याच निकषाने रद्द केले होते. त्यामुळे आरक्षण देतानाच सर्वच जातींतील तरुणांना उच्च शिक्षण कसे घेता येईल आणि त्यांना रोजगार संधी कशा उपलब्ध होतील, असे सरकार म्हणून आम्ही पाहू, असे मुख्यमंत्री म्हणाले असते तर केवळ राजकारणासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असे म्हणता आले असते; पण मूळ प्रश्नांचा सरकारला एक तर विसर पडला आहे किंवा त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात राहिलेले नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा, तर काँग्रेसने मुस्लिम समाजाला सोबत ठेवून नेहमीच राजकारण केले आहे आणि आता इतक्या वर्षांनी या समाजांना आरक्षण देण्याची नामुष्की येते आहे. याचा अर्थ आपले काही चुकते आहे, याचेही भान या पक्षांच्या धुरीणांना राहिलेले नाही. त्यामुळेच अनेक अडथळे पार करून हा निर्णय आपले सरकार घेऊ शकले आणि आपली राजकीय पोळी भाजण्याची ताकद या विषयात नक्कीच आहे, यावर ते खुश आहेत. मात्र आता वातावरण बदलले असून अशा राजकीय निर्णयांचा कावा जनतेला आणि विशेषत: तरुणांना कळू लागला आहे. आतापर्यंत भावनिक लाटा निर्माण करून निवडणुका जिंकता येत होत्या, मात्र फसवणुकीचा हा खेळ असाच चालू राहण्याची शक्यता कमी होत चालली आहे. या नव्या बदलाची दखल सरकारने घेतलेली दिसत नाही.

Sunday, 29 June 2014

रक्षणासाठी आरक्षण!

नागपूर तरूण भारतमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

तारीख: 27 Jun 2014 00:06:08

महाराष्ट्रातील कॉंग्रेस आघाडी सरकार, निवडणूक जवळ आल्याने बावचळल्यासारखे करू लागले आहे. या सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंेडावर मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षणाच्या मूळ तत्त्वालाच या निर्णयाने हरताळ फासला गेला आहे. हा निर्णय निव्वळ स्वार्थी आणि येणार्‍या निवडणुकीत आपले रक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे. सत्तेसाठी समाजाचे विभाजन करून, मतांचा गठ्ठा आपल्या झोळीत टाकण्याच्या दिशेने निर्णय करण्याचा जो खेळ या देशात कॉंग्रेसने आतापर्यंत केला, तो अत्यंत घातक आणि विपरीत परिणाम करणारा सिद्ध झाला आहे. प्रगतीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा समाजातील सर्व घटक आपल्याला मागास ठरविण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. देशाच्या सर्वंकष प्रगतीचे कुणाला काही देणेघेणे नाही. समाजाच्या खर्‍या प्रगतीसाठी या कुणाकडेही काही कार्यक्रम नाही. फक्त आरक्षण मिळाले की जादूच्या कांडीप्रमाणे आपल्या समाजाचा विकास होईल, असे भ्रामक चित्र ही मंडळी उभे करत आहेत. या विपरीत दिशेने समाजाच्या चाललेल्या वाटचालीमुळे जे मागास आहेत त्यांना आरक्षण देण्याची, त्यांनी आरक्षण मागण्याची, ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना त्याचा लाभ होऊन त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करण्याची गरज कुणालाच वाटत नाही. उलट, जे वर्षानुवर्षे या राज्यात सत्तेवर होते, त्यावेळी त्यांनी आपल्या समाजासाठी काहीच केले नाही. आता मात्र पराभव दिसून लागल्याने अशी मंडळी अगदी आपला हक्क असल्यासारखी सत्तांध भाषेत, ‘आम्हालाही आरक्षण द्या,’ असे दटावतात आणि सत्तेला चटावलेले सत्ताधारी, येणारी निवडणूक हरणार, या भीतीने थरथर कापत हे आरक्षण त्यांच्यासाठी जाहीर करतात. हा सगळा अव्यापारेषु व्यापार चालला आहे.
यापेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आरक्षण हे खरोखर या समाजाला मिळणार आहे काय? की, हा केवळ निवडणुकीपुरता कळवळा दाखविण्याचा दिखाऊ कार्यक्रम आहे? घटनेने आरक्षणाला मर्यादा घातलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे निकालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे सरळ सरळ उल्लंघन केले आहे. आता महाराष्ट्रात आरक्षण ७३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. जी खरी गुणवत्ता आहे, ज्यांनी आपल्या अंगभूत गुणांचा अथक प्रयत्नाने विकास करून सर्वोच्च गुण प्राप्त केले आहेत, त्यांना केवळ आरक्षणामुळे संधी नाकारली जाणार काय? ते एका उच्च जातीत जन्माला आले, हाच त्यांचा दोष ठरणार की काय? असे न होता त्यांनाही संधी दिली जावी, यासाठीच न्यायालयाने पन्नास टक्क्यांची मर्यादा आरक्षणाला घातली होती. मात्र, मतांच्या मतलबी धावपळीत आता ती मर्यादा तोडून सरकार पुढे निघून गेले आहे. मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात आरक्षण, यासारखी तर विपरीत गोष्ट कोणती नाही! आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. मुस्लिम समाजातील मागास जातींचा सरकारच्या अनु. जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समावेश आधीच केला गेला आहे. मात्र, अन्य मुस्लिमांना आरक्षण केवळ गठ्ठा मते डोळ्यांसमोर ठेवून ना? हा प्रयोग अनेकदा करून फसला आहे. आंध्रप्रदेशात मुस्लिमांना असेच आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन कॉंग्रेस सरकारने तेथे घेतला होता. मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद देशाच्या राज्यघटनेत नसल्याने न्यायालयात हा निर्णय टिकला नाही. हे सर्व ज्ञात असूनही महाराष्ट्रात तोच प्रयोग कशाकरिता? उत्तरप्रदेशात, निवडणुका असतानाही सलमान खुर्शीद आणि बेनीप्रसाद वर्मा यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा, निवडणूक आयोगाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करत केली होती. महाराष्ट्राच्या मराठवाड्यासारख्या भागात फार पूर्वी नाही, तर फक्त ६० वर्षांपूर्वी रझाकाराची बारी लोकांनी अनुभवली आहे. या रझाकारांनी अत्यंत उर्मटपणाने घराघरांत घुसून लूटमार, खून, अत्याचार केले आहेत. सत्तेत असलेल्या निजामाच्या इशार्‍यावर कासिम रझवी नावाच्या दहशतवादी प्रमुखाच्या निर्देशाने या रझाकार नावाच्या दहशतवादी फौजेने मराठवाड्याच्या गावागावांत अक्षरश: दहशतीचा नंगानाच करत, आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ समाजावर आणली होती! अशा अत्याचार करणार्‍या, सत्ता गाजविणार्‍या आणि इतरांना आपल्या सुल्तानी टाचेखाली रगडून ठेवणार्‍यांना आता पाच टक्के आरक्षण द्यायचे? निजामाच्या काळात संस्थानात बहुसंख्य हिंदूंना समान संधी नाकारली गेली होती. बहुसंख्य समाजाचे पाच टक्केही लोक नोकरीत नव्हते. मग ज्यांना संधी नाकारली गेली त्यांना आरक्षण न देता, ज्यांनी मगरुरी, दहशत माजवून संधी हिरावून घेतली त्यांना आरक्षण देणार? आजही या रझाकारांचे वंशज समाजात बिनधास्तपणे सांगतात की, ‘हमने यहॉंपर राज किया है|’ त्यांनाही आरक्षणाचा आता लाभ मिळणार? हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, हे माहीत असूनही आरक्षणाची घोषणा करणे म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे! तेही चुकीच्या धारणांवर, चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे. याला कसून विरोध केला गेला पाहिजे.
मराठा आरक्षण हासुद्धा वादग्रस्त विषय आहे. मराठा समाजात मागास स्थितीत, गरिबीत दिवस कंठणारे जसे मोठ्या संख्येने आहेत, तसेे स्वत:ला राजे म्हणविणारे आणि राजेशाहीच्या थाटात जीवन व्यतीत करणारेही अनेक आहेत. दलित-सवर्ण असे जे संघर्ष अगदी अलीकडच्या काळात झाले आणि अजूनही होतात, ते कुणाकुणात होतात? मग केवळ संख्येच्या बळावर आरक्षणाची मागणी करून, राजकीयदृष्ट्या दबावगट स्थापन करून आरक्षण मागितले जाणार आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ते देण्याची घोषणा होणार, हे कितपत योग्य आहे? मराठा समाजात प्रस्थापित झालेली मंडळी, मराठा समाजातील गरीब, वंचित, पिचणार्‍या वर्गाची उदाहरणे देऊन गोंधळ घालून आरक्षण मागणार, पदरात पाडून घेणार. त्याचा लाभ खरोखर मराठा समाजातील वंचितांना मिळणार काय? हा सगळा विषय आणि मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर होत असलेली चर्चा पाहिली की, सर्व मंडळी आर्थिक निकषावर आरक्षणाच्या तत्त्वाकडे जात असल्यासारखी विधाने करत आहेत. आरक्षणाच्या विषयाला आजही योग्य दिशा आहे. सामाजिक मागासलेपणाच्या आधारे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांना आरक्षण तसेच ठेवून अन्य समाजातील अर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिले गेले पाहिजे. त्या दिशेने समाजाची मतनिश्‍चिती झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या वेळी प्रमोद महाजन म्हणाले होते की, ज्या भाकरीसाठी हे भांडण चालले आहे ती भाकरी आहे कुठे? झिरो बजेट महाराष्ट्र सरकारने त्या वेळी स्वीकारून नव्या रोजगाराच्या वाटा बंद केल्या होत्या. नसलेल्या नोकर्‍यांसाठी आरक्षणाचे भांडण कशासाठी? आजही परिस्थिती फार वेगळी नाही. रोजगार निर्मितीचा विचार कॉंग्रेसवाल्यांच्या डोक्यात, बोलण्यात कुठेच नाही. महाराष्ट्र सरकारची आरक्षणाची घोषणा तर निव्वळ बनवाबनवी आहे! लोकसभा निवडणुकीत यांची जी वाताहत झाली, त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपली खुर्ची महाराष्ट्राची जनता खेचून काढणार, अशी भीती यांना बसली आहे. भीतीने कापरे भरले आहे. त्यामुळे काहीही करून, कसेही करून सत्ता वाचविण्याची त्यांना घाई लागली आहे. त्यामुळे आपला निर्णय न्यायालयात टिकणार नाही, हे माहीत असूनही, निर्णय चुकीचा आहे हे पटत असूनही, केवळ मतांचे गठ्ठे डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईने हा निर्णय केला आहे. ज्यांच्यासाठी हा निर्णय आहे त्यांनाही या निर्णयातील फोलपणा चांगला माहीत आहे. त्यामुळे या निर्णयाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल आणि ज्या सत्ताहरणापासून रक्षणासाठी आरक्षण जाहीर केले आहे तो हेतू काही साध्य होईल, असे वाटत नाही!

पवार झाले ‘मेटे’करी

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

28-June-2014 : 11:55:00
  
जी गोष्ट जगजाहीर आहे ती वारंवार सांगण्यात अर्थ नसतो. तसे केल्याने ती आदरणीय न राहता पांचट आणि हास्यास्पद होते. शरद पवार हे संत नाहीत आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही संतांची टोळी (मांदियाळी नव्हे) नाही किंवा महाराष्ट्रात मराठय़ांना दिलेले आरक्षण विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी दिले आहे, हेही त्याचमुळे त्यांनी सांगण्याचे कारण नाही. त्या संघवाल्यांचे पहा, आपण ढोंगी आहोत असे ते बिचारे कधी सांगतात काय? कारण आपले तसे असणे सार्‍यांना ठाऊक आहे आणि ज्यांना ते अजून कळले नाही त्यांनाही ते हळूहळू कळणारच आहे, हे समजण्याएवढे ते गंभीर आणि शहाणे आहेत. शरद पवारांचे तसे नाही. १९६0 च्या दशकापासून म्हणजे गेली पंचावन्न वर्षे ते महाराष्ट्राच्या (व अधूनमधून देशाच्या) राजकारणात राहिले आहेत आणि मराठी माणसांना त्यांचे अजूनही शिल्लक असलेले उतावळेपण नको तेवढे समजले आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दाचाच नव्हे तर हालचालीचाही अर्थ त्यांच्या ध्यानात येणारा आहे. विनायक मेट्यांनी जेव्हा मराठा आरक्षणाची आरोळी ठोकली, तेव्हाही तो आवाज कोणाचा आहे हे सार्‍यांना कळून चुकले होते. तरीही ‘सोयरिकीला जाताना शहाण्णव कुळांची थोरवी सांगायची आणि आरक्षण मागताना मागासलेपण पुढे करायचे यात विसंगती आहे’ हे तेव्हाचे त्यांचे मेट्यांवर केलेल्या टीकेचे बोल लोकांनी ऐकून घेतले होते. मात्र, ते ऐकतानाही मेटे आणि पवार एक आहेत आणि त्यांची तोंडे वेगळी असली तरी वाणी एक आहे हे त्यांना समजलेच होते. पुढे पवारांनी मेट्यांना आमदारकीचा मुकुट (त्यांच्या अनुयायांनी एका संपादकाच्या घरावर हल्ला चढविल्यानंतर आनंदाने) दिला, तेव्हाही लोकांना त्यांचा समज खरा असल्याची खात्री पटलीच होती. जे मेट्यांनी तेव्हा मागितले ते पवारांनी आता त्यांना दिले आहे व ते देताना शहाण्णव कुळी मराठय़ांना मागासवर्गीयांच्या रांगेत आणून बसविण्याचे राजकारणही केले आहे. आता मेट्यांनी युतीचा नाद सोडायला आणि पुन्हा पवारांच्या आश्रयाला यायला हरकत नाही. पण मेटेही चलाख आहेत. उद्या युतीचेच राज्य महाराष्ट्रात आले तर त्यात ते कदाचित मंत्री होतील आणि पवारांकडे येऊन साधे आमदार राहण्यापेक्षा तिकडे राहून मंत्री होणे त्यांनाही हिताचे वाटेल. मात्र, ते युतीत असले काय आणि आघाडीत, रामदास आठवल्यांसारखेच, ते पवारांचे आहेत आणि तसेच राहणारही आहेत. पवारांच्या मनातला मराठावाद कधी मावळलाच नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसी राजकारणात त्यांनी केलेली वजाबाकी ज्यांना नीट तपासता येते त्यांना त्यांच्या या मराठा भक्तीचीही चांगली कल्पना येऊ शकेल. मुसलमान काँग्रेससोबत नव्हते आणि दलितांचे वर्ग आंबेडकरी निष्ठेमुळे त्या पक्षापासून दूर होते, मग राहिलेले वर्ग कोणते? पवारांनी प्रथम ब्राह्मणांना दूर केले (आता तर त्यांचे अनुयायी ब्राह्मणांचे पुस्तकातील नामोल्लेख आणि पुतळेही काढण्याच्या मागे लागले आहेत) मग ओबीसींना दूर केले. मग उरले ते मराठे, कुणबी आणि तत्सम इतर त्यांच्याजवळचे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेव्हा ती चक्क मराठय़ांची रिपब्लिकन पार्टी होती. तिला काँग्रेसहून अधिक जागा कधी मिळाल्या नाहीत आणि मूळच्या काँग्रेसमध्येही मराठय़ांचे प्राबल्य आहेच. मग पवारच मेट्यांचे अनुयायी झाले आणि परवापर्यंतचा मराठा आरक्षणाला असलेला त्यांचा तोंडी विरोध मावळला. पण एकदम विरोधी रिंगणात उडी घ्यायची तर तिलाही एक धारिष्ट्य लागते. म्हणून मग पवारांची आताची रस्त्यावरची भाषा, ‘आम्ही म्हणजे कोणी संत नाहीत’  ही.. पवारसाहेब, तुम्ही संत नाहीत, संत कधी नव्हताही आणि यापुढेही तुम्हाला संत होता येणार नाही हे सारे जाणतात. तुम्हाला राजकीय संतांच्या मालिकेतही कोणी घेणार नाही. एक गोष्ट मात्र खरी, तुम्ही चांगले राजकारणी आहात आणि चांगले राजकारणी असण्यासाठी जे काही बरेवाईट सोडावे लागते ते सारे सोडण्याची तुमची तयारी आहे. कुणा जाणकाराचे म्हणणे असे की ज्वारीच्या शेतातून फिरतानाही अंगाला पांढरे लागू न देण्याचे कसब पवारसाहेबांमध्ये आहे. ते खरेच आहे. गेली ५0 वर्षे तुम्ही महाराष्ट्र, त्याला कळूही न देता आपल्या मुठीत ठेवला. सगळ्या वजाबाक्या मनापासून केल्या आणि तरीही त्यात जे गळले त्यांनी तुमच्या आरत्या गाण्याचे काम कधी थांबविले नाही. राजकारणी माणसांना प्रत्येकाचीच किंमत (मूल्य नव्हे) ठाऊक असते असे म्हणतात. ती मोजली की तो खूष राहतो आणि खिशातही राहतो.. तर काय, पवारसाहेब, तुमचे अभिनंदन!

आरक्षण नव्हे प्रोत्साहन

दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख
प्रसिद्धी दि. २७/०६/२०१४

वरील अग्रलेख फोटोकॉपी असून तो नीट वाचण्यासाठी माऊसला राईट क्लिक करा.  समोर आलेल्या पर्यायांपैकी open link in new tab वर क्लिक करा. फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल. open link in new window या पर्यायावर क्लिक केल्यानंतरही फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल.

मूळ लिंक येथे पाहा 

आरक्षणाचे राजकारण

दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

शुक्रवार, 27 जून 2014 - 04:00 AM IST

राज्यात निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याची जाणीव राज्य सरकारला झाली आहे, याविषयी आता कोणाला शंका वाटू नये. मराठा आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय त्याची खात्री पटवणारा आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी नवी नव्हती. ते दिले पाहिजे, यावर सत्ताधारी आणि विरोधकांतली सहमतीही नवी नव्हती. मुद्दा सरकारला निर्णय घ्यावा असे वाटण्याचा होता आणि तसे सरकारला वाटले. सत्तेत बसून एकमेकांवर कुरघोड्या करण्यापलीकडे आपण लोकांसाठी सत्तेत आहोत हे दाखवायला तरी सुरवात होईल, अशी आशा आहे. आरक्षणाच्या निर्णयाचे राज्यात व्यापक प्रमाणात स्वागत झाले. ते अपेक्षितच आहे. राज्याच्या सत्ताकारणात मराठा समाजाचे महत्त्व सारेच जाणतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीने पुरत्या खचलेल्या आघाडी सरकारला आरक्षण तारेल असे वाटत असल्यास नवल नाही. मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देऊन राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने आपल्या भात्यातील महत्त्वाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आघाडीची लोकसभा निवडणुकीत धूळधाण झाली नसती, तर त्यांनी या विषयात हात घातला असता काय, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. याआधी 2004 च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करून आघाडी सरकारने सत्ता वाचविली होती. हीच किमया आता आरक्षणाच्या निर्णयाने साधेल, असा दांडगा विश्‍वास सत्तेत बसलेल्यांना आहे. परंतु, या निर्णयासाठी अनेक राजकीय कसरतींबरोबरच मोठ्या न्यायालयीन लढाईचाही सामना करावा लागणार आहे, याची जाणीव राजकीय पक्षांना आहे. त्यामुळेच हे आरक्षण "गाजराची पुंगी‘ ठरेल काय, अशी शंका राजकीय नेत्यांना व आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनांना सुरवातीपासूनच आहे. 

आरक्षणासारखा दुसरा संवेदनशील विषय नाही. पिढ्यान्‌पिढ्या पिचलेल्या, दबलेल्या वर्गाला ताकद द्यायला आरक्षणाचेच हत्यार वापरले पाहिजे, यावर राजकीय वर्गात सहमती आहे. वाद आहेत ते प्रमाणाचे. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गांना आरक्षणामुळे प्रगतीची दारे खुली झाली. या वर्गाला आरक्षणाचे फायदे मिळू लागले, तसे आपला हक्क डावलला जात असल्याचा सूर आरक्षण नसलेल्या जातींतून उमटू लागला. आरक्षण रद्द होणे तर शक्‍य नाही; मग आपणच आरक्षणाच्या कक्षेत यावे, असे काही जातींना वाटू लागले. त्यातूनच मग उत्तर भारतातील जाट, महाराष्ट्रात मराठा अशा प्रबळ जातींनी इतर मागासवर्गीयांत आपल्या समावेशाची मागणी सुरू केली. हा मागासलेपणा सिद्ध होणे ही आरक्षण देण्यातील पहिली कसोटी असते. 1991 पूर्वी राज्य सरकारच्या मनात आल्यानंतर कोणतीही जात मागास ठरू शकत होती. मात्र, मंडल अहवालावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यनिहाय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा आदेश दिला. कोणत्याही वर्गाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी या आयोगाचे मत विचारात घेण्याचेही न्यायालयाने सुचविले. महाराष्ट्रात बापट आयोगाने मराठा समाज मागास नसल्याचा निष्कर्ष काढला व आरक्षण न देण्याची शिफारस केली. मराठा संघटनांचे म्हणणे याउलट होते. "मंडल‘ने आरक्षणाबाहेर ठेवले व आर्थिक उदारीकरणाच्या लाटेने आर्थिक सुरक्षा हिरावून घेतली. ग्रामीण भागातील जमिनीचे दरडोई क्षेत्र घटले व शहरांत मराठा तरुणांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या. त्यामुळेच या संघटना आरक्षणासाठी आग्रही राहिल्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मराठा आरक्षणासाठी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने प्रगत आणि बलदंड मानल्या गेलेल्या मराठा समाजातील तळागाळातले वास्तव समोर आणले. मुस्लिमांच्या समस्येसाठीही सरकारने रेहमान आयोग नेमून मत विचारात घेतले होते. 

सरकारचा निर्णय झाला, पण खरी लढाई आता सुरू होणार आहे. 1991 नंतरचे याबाबतचे निवाडे पाहिले, तर अनेक निवाड्यांमध्ये न्यायालयांनी आरक्षणाची तरतूद 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ठेवण्यास निक्षून विरोध केला आहे. अपवाद केवळ तमिळनाडूचा. तेथे मागासवर्गाचे प्रमाण 72 टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे तेथील सरकारने सर्वोच्च न्यायालयात सिद्ध केले. तेव्हा महाराष्ट्राची भिस्त "तमिळनाडू पॅटर्न‘वर आहे. मुस्लिमांसाठीच्या आरक्षणाचा निर्णयही न्यायालयीन वादात अडकू शकतो. एकूणच सरकारच्या निर्णयावर मतमतांतरे होत राहतील, राजकीय लाभहानीची गणितेही मांडली जातील. मुद्दा आरक्षणासोबतच सर्वांना फुलण्याची संधी देण्याचा आहे. आरक्षण हाच केवळ विकासाचा मार्ग नाही, ते एक साधन आहे, हे समजून घ्यायची आणि समजावून सांगण्याचीही गरज आहे. सरकारी नोकऱ्यांची संख्याच आकुंचित होत आहे. त्यामुळे आरक्षण दिले म्हणजे समाजाचा उद्धार झाला इतक्‍या सरधोपटपणातूनही मुक्त व्हायला हवे. संधी तोकड्या पडतात तेव्हा सवलतींच्या मागण्या वाढतात. संधी निर्माण करणारी धोरणे ठरवणे, राबवणे आणि त्याचा लाभ घेता येईल अशी कौशल्ये बाणवणारी व्यवस्था सर्वांसाठी उभारणे हे सरकारचे दीर्घकालीन लक्ष्य असायला हवे. आऱक्षण दिल्याचे आणि मिळाल्याचे समाधान मानताना हे भानही सुटू नये.

Friday, 27 June 2014

मराठा, मुसलमान मेळवावा

"लोकसत्ता"चा अग्रलेख 

Published: Friday, June 27, 2014

राखीव जागा आणि/किंवा कर्जमाफी केल्याखेरीज मतांची बेगमी होत नाही हे काही काँग्रेसच्या डोक्यातून अजूनही जाता जात नाही. वास्तविक निवडणुकीत इतके फटके खाल्ल्यानंतरही आपले जुने समज काढून टाकण्याची गरज अद्यापही काँग्रेसला वाटत नसेल तर ते त्या पक्षाच्या आंधळ्या नेतृत्वाचे निदर्शक म्हणावे लागेल. राजकीय यशाचा सोपा मार्ग राखीव जागांच्या अंगणातून जातो, असे तो पक्ष अजूनही मानतो. राष्ट्रवादी ही त्याच पक्षाची राज्यस्तरीय पोटशाखा. त्यामुळे काँग्रेसच्या रक्तातील गुणदोष त्या पक्षातही उतरणे साहजिकच. अशा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा आणि मुसलमानांसाठी राखीव जागा जाहीर करून आपले मागासपण सिद्ध केले आहे. राजकीयदृष्टय़ा समर्थ अशा मराठा समाजास राखीव जागांच्या पंखांखाली घेताना काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील मुसलमानांनाही राखीव जागांचे मधाचे बोट चाटवायचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेस पक्ष केंद्रात आणि राजस्थान आदी राज्यांत सत्तेवर होता. त्या निवडणुकांत तेथील गुजर आणि अन्य समाजघटकांना राखीव जागांचा मोह दाखवत चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसने केला. परंतु त्यामुळे मतदार जराही हुरळून गेले नाहीत. त्यांनी काँग्रेसला अनेक राज्यांत अक्षरश: कचऱ्याच्या डब्यात टाकले. महाराष्ट्र सरकारने यातून काहीही धडा घेतलेला नाही, असे दिसते. तसा तो घेतला असता तर या सरकारने मराठा आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला नसता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घेतल्या गेलेल्या या निर्णयाचा फोलपणा दाखवून देणे त्यामुळे आवश्यक ठरते.
ज्या मराठा समाजास राखीव जागा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जिवाचा आटापिटा चालवला होता त्याच मराठा समाजाच्या मराठा महासंघ या आद्य संघटनेने बरोबर ३२ वर्षांपूर्वी, म्हणजे १९८२ साली, जातींवर आधारित राखीव जागांच्या संकल्पनेस ठाम विरोध दर्शवला होता, याची आठवण या प्रसंगी करून द्यावयास हवी. मराठा महासंघाचे अण्णासाहेब पाटील यांचा जातिआधारित राखीव जागांना विरोध होता. त्याचे कारण अर्थातच राजकीय होते. मराठा महासंघाचा दलितांना विरोध असल्यामुळे व्यापक दलितविरोधी भूमिकेचा भाग म्हणून जातिआधारित राखीव जागा नकोत असे त्यांचे मत होते. राखीव जागांमुळे दलितांना सत्तेत वाटेकरी करावे लागते आणि एकंदरच सत्तासंतुलन बिघडते हा विचार त्यामागे असावा. त्यामुळे राखीव जागा या आर्थिक निकषांवर दिल्या जाव्यात असे ते म्हणत. परंतु नंतर या राखीव जागांच्या व्यवस्थेचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण मराठा समाजालाच मागास जाहीर करावे अशीही मागणी पुढे येऊ लागली. राज्याच्या लोकसंख्येत तब्बल ३२ टक्क्यांच्या आसपास असणाऱ्या, अनेक आर्थिक, सामाजिक संस्था चालवणाऱ्या मराठा समाजास मागास ठरवणे हे अन्य मागासांवर अन्याय करणारे ठरले असते. तसे न करण्याएवढे शहाणपण सुदैवाने राज्यकर्त्यांकडे शाबूत होते. वास्तविक ज्या समाजाचा राज्यातील सत्तेत सिंहाचा वाटा आहे, त्या समाजाला स्वत:ला मागास म्हणवून घ्यायची तहान लागत असेल तर ते काही निरोगी व्यवस्थेचे लक्षण मानता येणार नाही. ग्रामीण महाराष्ट्र असो वा नागरी, मराठा समाजाचे स्थान कायमच लक्षणीय राहिलेले आहे. गेल्या चार दशकांत राज्य विधानसभेत २४३० सदस्य होऊन गेले. त्यापैकी तब्बल १३३६ इतके मराठाच होते. हे प्रमाण ५५ टक्के इतके भरते. याचा अर्थ राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक आमदार एकाच समाजाचे असतात. तो समाज म्हणजे मराठा. राज्यातील सर्वच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय आदी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी प्राबल्य आहे ते मराठा समाजाचेच. तरीही तो समाज स्वत:स मागास समजत असेल तर हे असे समजणे हे त्या समाजाच्या मानसिक मागासपणाचे लक्षण मानावयास हवे. या निष्कर्षांप्रत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपणास राखीव जागा मिळाव्यात यासाठी या पक्षाने गेले कित्येक दिवस जंग जंग पछाडले आहे. कुणबी ही मराठय़ांतील एक उपशाखा. तिचा समावेश मराठय़ांतील मागासांत होतो. हे पाहून कुणबी मराठा ही एक नवीन एक जात महाराष्ट्रात जन्माला घातली गेली. असे केल्याने आपोआप आपणास राखीव जागांचा लाभ मिळेल अशी ही अटकळ होती. पण ती फोल ठरली. कारण तसे करावयाचे तर अन्य मागासांच्या राखीव घासांतील वाटा घ्यावा लागला असता. तसे करणे म्हणजे नवीनच मोहोळ उठवून देण्यासारखे. १९९३ साली स्थापन केल्या गेलेल्या न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने असा प्रयत्न हाणून पाडला होता. खेरीज, तसे झाले असते तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाण्याचा धोका होता. तेव्हा असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या दोन्ही अडथळ्यांना वळसा घालत मराठय़ांना राखीव जागांची सवलत कशी देता येईल याची पाहणी करण्यासाठी नारायण राणे यांची समिती नेमली होती. बुधवारी राखीव जागांची घोषणा झाली ती याच राणे समितीच्या अहवालावर आधारित. तीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधांना हात न लावता स्वतंत्रपणे शैक्षणिक व सामाजिक मागास हा नवाप्रवर्ग निर्माण करण्यात आला असून या नव्या वर्गवारीनुसार मराठा आणि मुसलमानांना राखीव जागांची सवलत दिली जाणार आहे. याचा अर्थ हा की सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधानुसार वेगवेगळ्या वर्गासाठी ५० टक्के राखीव जागा राहणारच आहेत. त्याखेरीज हा नवा घटक तयार करण्यात आला असून त्यामुळे सर्व राखीव जागांचे प्रमाण ७३ टक्के इतके होणार आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला हे शोभणारे नाही. स्वातंत्र्यापासून ज्या वर्गाच्या हाती सत्तेच्या राजकीय आणि आर्थिक चाव्या आहेत त्या वर्गाला स्वत:चा समावेश राखीव वर्गात व्हावा असे वाटत असेल तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते कोणते? ही अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा ते त्या समाजाच्या राजकीय अपयशाचे निदर्शक असते. यामागील एक कारण आर्थिक आहे. राज्यातील मराठा समाजातील एक मोठा घटक हा अजूनही कृषी क्षेत्राशी निगडित आहे. तो कुणबी या नावाने ओळखला जातो. परंतु सर्वसामान्य मराठय़ास कुणबी म्हटलेले आवडत नाही. शेतीच्या घसरत्या टक्क्यामुळे हा वर्ग गेली काही वर्षे संकटात येत आहे. महाराष्ट्रात मुळात शेतीसाठी ओलिताखालच्या जमिनीचे प्रमाणच कमी. त्यात शेतीची सरासरी मालकीही घटत चाललेली. म्हणजे शेती नुकसानीत चाललेली, सहकार चळवळ बाराच्या भावात निघालेली आणि अन्य उद्योगधंद्यांच्या कौशल्याचा अभाव. यामुळे हा वर्ग मोठय़ा विवंचनेत होता. त्या सोडवण्याचा सोपा मार्ग म्हणून या राखीव जागांकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत सरकारी नोकऱ्या वा शिक्षणात आपणास विशेष संधी मिळावी असा त्या वर्गाचा आग्रह होता. ती या राखीव जागांमुळे मिळेल असे या वर्गास आणि त्यापेक्षा त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांस वाटते.
पण तेथेही फसवणूकच होण्याची शक्यता अधिक. याचे कारण असे की मुळात राज्य सरकारची तिजोरीच खपाटीला गेलेली असल्याने सरकार आता रोजगारसंधी उपलब्ध करू न देऊ शकत नाही. तेव्हा ही राखीव जागांची घोषणा म्हणजे आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी नेतृत्वाने केलेली निव्वळ धूळफेक आहे. ती निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. परंतु या मराठा, मुसलमान मेळवावा धोरणाने काहीही साध्य होणार नाही. ना राजकीय फायदा ना त्या समाजांची प्रगती.

लेखाची मूळ लिन्क येथे वाचा

संधी की, मलमपट्टी?

"महाराष्ट्र टाइम्स"चा अग्रलेख  

Jun 27, 2014, 02.22AM IST

गेली अनेक वर्षे मराठा समाजाच्या संघटना करीत असलेली शिक्षण व नोकरीतील आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केल्याने लोकसभेच्या निकालाचे पडसाद राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर पडू लागल्याचे स्पष्ट झाले. मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिल्यामुळे येत्या विधानसभेत त्याचा राजकीय परिणाम काय होईल हे निवडणुकीनंतर दिसेलच. मात्र या आरक्षणामुळे या समाजातील 'नाही रे' घटकांपुढे उभे असलेले शिक्षणाचे व नोकऱ्यांचे प्रश्न खाजगीकरणाच्या या युगात कितपत सुटतील याचाही विचार व्हायला हवा.

मराठा समाजाच्या हातात सत्ता असल्याने काही घटकांमधून याला विरोध केला जात आहे. महाराष्ट्राची सत्ता ही कायम १३७ मराठा घराण्यांच्या भोवतीच फिरत राहिली. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३२ ते ३५ टक्के असलेल्या उर्वरित मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत सत्ताधारी मराठ्यांनी फारसा विचार केला नाही. मराठा समाजात शेतकरी व शेती सोडून शहरात वसलेला, असे दोन प्रमुख वर्ग आहेत. जागतिकीकरणानंतर शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतीतला खर्च शेतमालाला भाव नसल्याने वसूल होणे मुश्किल झाले आहे. सहकारी साखर कारखाने जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मोडीत निघत आहेत. विसाव्या शतकाच्या मध्यावर माथाडी कामगार वा गिरणी कामगार म्हणून शहरांमध्ये येऊन वसलेल्या मराठ्यांच्या सध्याच्या पिढीपुढेही जागतिकीकरणामुळे मोठी बिकट परिस्थिती तयार झाली आहे.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या बरोबरीनेच महाराष्ट्रात एकीकडे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ व दुसरीकडे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था व पंजाबराव देशमुखांची शिवाजी शिक्षण संस्था यांच्यामुळे या कृषक समाजाने शिक्षण घेतले. भारतात औद्योगिकरणाचा पाया मजबूत होत असताना नवे तंत्रज्ञान शिकून घेतले. त्यातूनच पुढे हा समाज सत्तेची सुत्रे हाती घेऊ शकला. मात्र सत्ता हातात आल्यावर मराठा समाजातील नेत्यांनी व्यक्तिगत उत्कर्ष साधण्यावरच भर दिला. निम्म्यापेक्षा अधिक समाज अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर म्हणून राबत राहिला. जागतिकीकरणामुळे शिक्षण व उद्योगांच्या झालेल्या खासगीकरणाने या समाजातील गरिबांचे प्रश्न तीव्र झाले. मराठा समाजातील 'नाही रे' वर्गात त्यामुळेच मोठा आक्रोश धुमसत होता.

फाळणीनंतर भारतात गरीब कारागीर मुस्लिम राहिला. नेहरू-गांधींच्या सेक्युलर विचारधारेमुळे आर्थिक, राजकीय उन्नतीचा मार्ग सापडेल यावर या समाजाचा दृढ विश्वास आहे. मात्र गरीब, अशिक्षित मुस्लिम हे धर्ममार्तंडांच्या विळख्यात गुरफटल्याने त्यांची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती विदारक झाल्याचे केंद्रातील सच्चर आयोगाने व महाराष्ट्रात मेहमूद उर् रेहमान समितीने समोर आणले आहे. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजालाही जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांचा तिढा सोडवणे शक्य झाले नाही. स्पर्धेच्या जगात जो सक्षम तोच जगण्यास लायक हा 'जंगल कायदा' लागतो, तर सुसंस्कृत समाज मात्र कमकुवत मनुष्याला सांभाळून घ्यायला शिकवतो. पाश्चिमात्य भांडवली देशांमध्येही तेथील मागास समाजांच्या उन्नतीसाठी आरक्षणाची तरतूद आहे. भारतात मात्र त्याबाबत उलट-सुलट चर्चा होत असतात. कुठलाही विशिष्ट समाज क्षमतेमुळे कमी पडत नसून संधी न मिळाल्यानेच त्याचा आर्थिक-सामाजिक ऱ्हास होत जातो, हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याही तत्त्वज्ञानाचे सार आहे. आरक्षणामुळे ही संधी मराठा व मुस्लिम समाजाला मिळणार की, ती केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरणार, हे येणारा काळ ठरवेलच!