Thursday, 29 March 2012

रामदासांच्या वधूचे पुढे काय झाले?



मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती  नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.

लग्नाच्या आदल्या रात्रीच नारायण पळाला

हा विवाह गाव - गोंदी (ता. अंबड ,जि.जालना ) इथे सकाळच्या अभिजित मुहुर्तावर होणार होता. सर्व मंडळी लग्नाच्या तयारीत असतानाच लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री अंधाराचा फायदा घेवून नारायण पळाला. नवरदेवच  पळाल्यानंतर अर्धी हळद लागलेल्या काशीबाईचे लग्न कुणाबरोबर  लावावे, हा प्रश्न निर्माण झाला. कुणीही ब्राम्हण तरुण तिच्याशी विवाह करण्यास तयार होईना. अंगावरची हळद तर साडेतीन दिवसात फिटली पाहिजे. नागुजी बदनापूरकर हतबल झाले. त्यांनी पंचक्रोशीतील सर्व गावांतील ब्राह्मण कुटुंबांशी संपर्क साधला. तथापि, काशीबाईशी लग्न करण्यास कोणीही तयार होईना.

मराठा गड्याने केले काशीबाईशी लग्न 

अशावेळी गाव सोमवाडी, ता. अंबड ,  जि. जालना येथील साखाजी मिन्धर हा एक मराठा गडी नागुजी बदनापूरकर यांच्या मदतीला धावून आला. साखाजीचे घराण्यात देशमुखी होती.  निधड्या छातीचा हा तरूण म्हणाला- "मी देतो काशीला आधार. तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मी तयार आहे." नारायण सूर्याजी ठोसर यांचा मोठा भाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनीच मग पुढाकार घेतला. नारायणाची नियोजित वधू काशीबाई हिचे वडील नागुजी बदनापूरकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. नागुजींची अनुमती घेऊन काशीबाईचा विवाह साखाजी मिन्धर याच्याशी लावून देण्यात आला. कन्यादान स्वत: नारायणाचा भाऊ गंगाधरपंतांनी केले. काशीबाई साखाजीची धर्मपत्नी झाली. अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे, हा मराठ्यांचा धर्मच आहे. साखाजीने या धर्माचे पालन केले.

मृतदेह सापडला अंबड येथील बारवेत

अरेरे आता सगळे कसे मंगल कुशल झाले, असे वाटत असतानाच धर्ममार्तंडांनी पुन्हा एकदा बिब्बा घातला. साखाजी-काशीबाईचा विवाह होऊ नये, यासाठी पंचक्रोशीतील धर्ममार्तंड आधीपासूनच प्रयत्न करीत  होते. ब्राह्मण सोडून इतर जातीतील पुरुषाशी विवाह करणे हे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात भरविणयाचे महापाप धर्ममार्तंड मंडळी करीत होती. पापभिरू काशीबाई गांगरून गेली. साखाजी याच्यासोबत सुखाचा संसार सुरू असतानाच एके दिवशी काशीबाईने आत्महत्या केली. तिचा मृतदेह अंबड येथील एका बारवेत सापडला. अंबड येथे ही बारव आजही आहे. +सती काशीची बारव+ म्हणून ही बारव ओळखली जाते.

अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशीतले पुरावे

अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी'त  काशीबाईची कथा आली आहे. काशीबाईला साखाजीसोबतचा विवाह मान्य नव्हता, त्यामुळे तिने बारवेत आत्महत्या केली, असे वाकेनिशीत म्हटले आहे. साखाजी-काशीबाईच्या विवाहाची कथाही वाकेनिशीत विस्ताराने आली आहे.

-अनिता पाटील 


5 comments:

  1. वास्तवाला हात घातला , सत्य जगासमोर आलेच पाहिजे

    ReplyDelete
  2. सत्य वास्तव मांडणी आपण केली

    ReplyDelete
  3. हेच सत्य आहे,मि कुंभार पिम्पलगाव येथे 8 वर्ष नौकरी केली।जे जांब समर्थ पासून अवघे 5 कि मि आहे।जांब ला नेहमी जयचो।त्या परिसरात ह्याच कथा लोक सांगत।

    ReplyDelete
  4. जो बहुतेक सर्वांना पडलेले या मागील कोडे उलगडण्याचे आपण कार्य केले

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.