कुणबिक करतो तो कुणबी
मराठी भाषेचे दोन प्रकारांत विभाजन करता येते. मूळ मराठी हिलाच देशीभाषा असे म्हटले जाते. दुसरी संस्कृतप्रचूर मराठी. देशीभाषा हीच खरी मराठी आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीचे वर्णन करताना ‘देशीकार लेणेङ्क असा शब्दप्रयोग केलेला आहे. दुर्दैवाने आज लिखाणातून मराठीचे हे देशीकार लेणे बाद झाले असून संस्कृतप्रचूर निर्जीव मराठी वापरली जात आहे. असो. देशी बोलीत शेतीला कुणबिक असे म्हटले जाते. जो कुणबिक करतो तो कुणबी. महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जाऊन कोणत्याही शेतकèयाला विचारा कुणबिक म्हणजे काय? तो शेती असाच अर्थ सांगेल. माझे वडील म्हणत - ''कुणबिकीला कमीत कमी दोन बैल लागतात.'' सर्वच शेतकरयांच्या तोंडी हे वाक्य असते.
कुळवाडी ते कुणबी
हा कुणबी समाज आहे तरी कोण? त्याचाच धांडोळा आपण आता घेणार आहोत. मागील सुमारे हजार-दीडहजार भर वर्षांच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी वर्ग स्थिरावला असे दिसून येते. पूर्वी संपूर्ण शेतकरी वर्ग एकाच जातीत मोडत होता. त्याला त्यालाच कुळवाडी म्हणत. मूळ शब्द कुळ आहे. हे दोन्ही शब्द 'कृषिवल' या शब्दाच्या अपभ्रंशातून आले आहेत. कृषिवल-कृषिवळ-कुवळ-कुळ अशी त्याची उपपत्ती आहे. कुळ म्हणजे शेती कसणारा. हा फार प्रचलित शब्द आहे. शेती कसणारया कुळांना शेतीचे मालक बनविणारा कुळकायदा सर्वपरिचित आहे. 'वाडी' हा प्राकृत भाषेतील प्रत्यय आहे. मारवाडी, काठेवाडी, भिलवाडी, असे शब्द भारतीय भाषांत दिसतात. तसाच कुळवाडी हा शब्द आहे. कृषिवल आणि कुळवाडी यात किती साम्य आहे, हे वेगळे सांगायला नको. सोप्या भाषेत कुळवाडी म्हणजे शेतीवाला. शेतीची शासकीय पातळीवर नोंद ठेवणारया ग्राम अधिकारयास कुळकर्णी म्हणत. 'कुळ'वरूनच कुळकर्णी हा शब्द निर्माण झाला. ही व्यवस्था किमान हजार-बाराशे वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात कुळकर्णपद होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांच्या पंजोबांचे पंजोबा हरीपंत कुळकर्णी होत. शके १०६० च्या सुमारास हरीपंत आपेगावचे कुळकर्णी होते. कुळवाडी हा प्राकृत शब्द असून त्याचा अपभ्रंश होऊन-होऊन कुणबी हा शब्द तयार झाला आहे. कुणबी, माळी, धनगरांचे मूळ एकच
महात्मा फुले यांनी या विषयावर केलेल्या संशोधनाला तोड नाही. त्यांचा ‘शेतकरयाचा असूड' हा अजोड ग्रंथ त्यासाठी उपयुक्त ठरतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच फुले यांनी एक छोटेसे उपशीर्षक टाकले आहे. त्यात ते म्हणतात - हे लहानसे पुस्तक जोतीराव गोविंददराव फुले यांनी शूद्र शेतकरयांचे बचावाकरिता केले आहे.
‘शेतकरयाच्या असूड'च्या उपोद्घातात फुले यांनी कुणबी, माळी आणि धनगर या जातींविषयी लिहिले आहे.
फुले म्हणतात - ‘‘वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी म्हणजे कुणबी, माळी व धनगर. आता तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मुळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी. जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले , ते माळी व जे ही दोन्ही कामे करून मेंढरे , बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले ते धनगर, असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या प्रथक जातीच मानतात. त्यांचा सांप्रत आपसांत फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच जातीचे असावेत.''
खंडोबा-भानू : पहिले आंतरजातीय प्रेमीयुगुल
विद्यमान मराठे-कुणबी, धनगर आणि इतर बहुजन जातींचे कुलदैवत खंडोबा, श्रीक्षेत्र जेजुरी. .......................................................................................................... |
वखराच्या पाशींच्या तलवारी
कुणबी समाज हा मुळातच लढवय्या आणि काटक आहे. प्रसंगी वखराच्या पाशींच्या तलवारी करण्याचीही त्याची तयारी होती. सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध सम्राट गौतमीपूत्र सातकर्णी याने मातीच्या पुतळ्यांत प्राण फुंकून लढाई जिंकल्याची आख्यायिका सांगितली जाते. ही कथा प्रतिमात्मक आहे. हे मातीचे पुतळे म्हणजे खरोखरचे पुतळे नव्हेत. हे शेतीत राबणारे शेतकरी होते. त्यांची स्थिती मातीमोल होती. म्हणून त्यांना 'मातीचे पुतळे' म्हटले गेले. या शेतकऱ्यांना लष्करी प्रशिक्षण देऊन गौतमीपूत्र सातकर्णीने लढाई मारली. महाराष्ट्रातील शेती पूर्णत: पावसावरच अवलंबून होती. त्यामुळे कुळवाडी उर्फ कुणबी अर्धवेळच शेती करायचा. शेतीभातीची कामे आटोपायची, दसरयाला शिलंगणाचे सोने लुटायचे आणि युद्ध मोहिमेवर रवाना व्हायचे, हा कुणबी वीरांचा वर्षक्रम होता. कुळवाडी भूषण शिवाजी राजांच्या काळातही मराठा सैन्य असेच अर्धवेळ लढाया मारीत असे. हाती सत्ता आल्यानंतर हेच कुळवाडी उर्फ कुणबी पुढे मराठे म्हणून नावारूपास आले. हा बदल शिवरायांच्या आधी शंभरेक वर्षे सुरू झाला असावा. पण आपले मूळ कुणबी हे नाव या समाजाने शेवटपर्यंत टाकले नाही.
- अनिता पाटील, औरंगाबाद.
.................................................................................................................
नमस्कार, सध्या कुणबी समाज व साहित्य ह्या विषयीच अभ्यास करत होतो, कुणबी समाजातील साहित्यकारांची नावे व त्यांनी निर्माण केलेले साहित्य, साहित्य प्रकार इत्यादींची माहिती मिळेल काय?
ReplyDelete