गळ्यातले जानवे हेच भेदाचे मूळ..!
श्रीपाद अमृत डांगे. ............................................................................. |
१ वर्षाचे असताना आईचे निधन.
डांग्यांचा जन्म १० ऑक्टोबर १८९९ चा. मुंबईतला. पण डांगे वर्षभराचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. एक वर्षाच्या बाळाचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न त्यांचे वडील अमृतराव डांगे यांच्यासमोर निर्माण झाला. अमृतरावांचा एक भाऊ नाशिकला राहत असे. अमृतरावांनी १ वर्षाच्या बाळाला भावाच्या पत्नीच्या स्वाधीन केले. हीच डांग्यांची धर्माची आई. या महान स्त्रीचे नाव होते दगूबाई. दगूबाई जातीने मराठा होत्या. त्यांची वर्तणूक इतकी स्वच्छ होती की, ब्राह्मणी पगडा असलेल्या डांगे परीवाराच्या त्या सर्वांत लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण प्रेमाने दगूताई म्हणत. अमृतराव डांगे यांनी आपले १ वर्षाचे बाळ अत्यंत विश्वासाने दगूताइंच्या ओटीत घातले.मुंजीने उभी केली समस्या
दगूताइंनी बाळाला यशोदेच्या मायेने सांभाळले. दोघांतील उत्कट ममतेची कहाणी पत्थर दील माणसालाही हेलावून सोडणारी आहे. दगूताई स्वयंपाक उत्तम करीत. मराठा असल्यामुळे साहजिकच त्यांना मांसाहार वर्ज्य नव्हता. दगूताइंनी लहानग्या श्रीपादलाही अंडी, मटण भरपूर खाऊ घातले. डांग्यांच्या भरदार बांध्याचे रहस्य असे त्यांच्या बाळपणात दडलेले आहे. आठव्या वर्षी डांग्यांची मुंज झाली. ब्राह्मणी कर्मकांडानुसार मुंज होईपर्यंत ब्राह्मणही शुद्रच असतो. मुंज झाल्यानंतर तो ब्राह्मण होतो. मुंज झाल्यानंतर डांगे अशा प्रकारे ब्राह्मण झाले. त्यांच्या गळ्यात जानवे आले. हेच जानवे या माय-लेकरांतील निर्मळ प्रेमात अडसर ठरले. दगूताई मराठा म्हणजेच ब्राह्मणांच्या दृष्टीने शूद्र. शूद्र स्त्रीच्या हातचे खाणे ब्राह्मणाला कसे चालणार? त्यात त्याकाळचे नाशिक शहर म्हणजे ब्राह्मणी कर्मकांडांचे माहेरघरच. ब्राह्मणांची संख्याही मोठी. श्रीपादला दगूताईच्या हातचे खाऊ घातले जाऊ नये, यासाठी डांगे कुटुंबाला सनातनी ब्राह्मणांनी वेठीस धरले. त्याकाळी समाजावर ब्राह्मणी अंधश्रद्धांचा प्रचंड प्रभाव होता. दगूताईसारखी सामान्य स्त्री या प्रभावापासून दूर राहणे शक्यच नव्हते. श्रीपादला आपल्या हातचे खाऊ घालणे म्हणजे त्याला बाटवणे आहे, असे त्यांनाही वाटू लागले. गावातील ब्राह्मण पंडीत घरी येऊन दगूताईला दोष देऊ देत. त्यामुळे दगूताई खचल्या. या माऊलीने शेवटी श्रीपादला दूर केले. श्रीपादच्या जेवणाची सोय दगूताइंनी एका ब्राह्मण कुटुंबाकडे केली.
नाशिक शहरातील पंचवटी हे धार्मिक दृष्ट्या महत्त्व असलेले स्थळ. ....................................................................................................................................... |
दगूताईने जी माया लावली होती, ती माया नवे ब्राह्मण कुटुंब श्रीपादला देऊ शकले नाही. माणूस नुसता भाकरीवर जगत नाही, असे येशूने एकेठिकाणी म्हटले आहे. ते अगदी खरे आहे. दगूताईच्या भाकरीत माया होती, ममता होती. ती ब्राह्मणाघरच्या भाकरीत श्रीपादला सापडेना. तो अस्वस्थ झाला. आठ वर्षे दगूताईच्या सान्निध्यात वाढल्यामुळे मराठ्यांमध्ये असणारया कणखरपणाचे आणि बंडखोरीचे बाळकडूच डांग्यांना मिळाले होते. त्यांचे बंडखोर मन त्यांना स्वस्थ बसू देईना. गळ्यात घातलेले चार सुताचे वेटोळे आपल्या आणि काकूंच्या आड येत आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गळ्यातले जानवे त्यांना गळफासासारखे वाटू लागले. एके दिवशी त्यांनी गळ्यातले जानवे काढले. त्याची गुंडाळी केली आणि काकूंच्या हातावर ठेवले. ते काकीला म्हणाले- ‘‘या सुतामुळे जर आपल्यातलं नातं संपणार असेल, तर हे सुताचं वेटोळं मला नको.''
धन्य त्या दगूताई. परक्या लेकराला त्यांनी असा जीव लावला की, या लेकराने दगूताइंसाठी आपले ब्राह्मणत्व सोडले. डांग्यांचे श्रेष्ठत्वही येथे भावोत्कटतेच्या सर्व सीमांना पार करून समोर येते. माणूसकी नाकारणारी जात डांग्यांनी नाकारली. जातीची बंधने नसलेल्या माणूसकीचा स्वीकार केला. १९०० ते १९१७ अशी १७ वर्षे डांगे दगूतार्इंकडे राहिले. वयाच्या १८ व्या वर्षी ते उच्चशिक्षणासाठी मुंबईला वडिलांकडे आले. पण आपल्या मराठा आईला ते त्या हयात असेपर्यंत कधीही विसरले नाही.
ब्राह्मणांनो जानवी तोडून फेका
या देशातील भेदभावाचे मूळ कारण ब्राह्मणांच्या गळ्यातील हे सुताचे वेटोळे आहे. कॉम्रेड डांगे यांनी समस्त ब्राह्मणवर्गासमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. या देशातील भेदभाव मिटविण्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेऊन जानवी तोडून फेकावीत, असे माझे त्यांना विनम्र आवाहन आहे.
शेवटी दगूताई नावाच्या या यशोदेला लक्ष लक्ष प्रणाम!
- अनिता पाटील, औरंगाबाद.
कॉम्रेड डांगे : लेखक - बाबुराव रणदिवे.
(अभिनव प्रकाशन मुंबई, प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर १९८९.
प्रकरण- पहिले. पान क्र - २०-२१)
Khup changale likhan aahe aple madum.
ReplyDeletethanx yogesh.
ReplyDelete