Sunday, 12 January 2014

मराठ्यांच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले

डॉ. सदानंद मोरे यांनी उघडकीस आणली राजवाड्यांची पापवचने


मराठ्यांचा खोटा इतिहास लिहिणा-या बोगस विद्वानांवर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी औरंगाबाद येथे जोरदार प्रहार केला. इतिहासकार विश्वनाथ काशिनाथ राजवाडे उपाख्य वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर केलेल्या जातीयवादी लिखाणाचे डॉ. मोरे यांनी वाभाडे काढले. डॉ. मोरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले. 

डॉ. सदानंद मोरे यांचे ‘गर्जा महाराष्ट्र' हे नवे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याचे औचित्य साधून औरंगाबादेत त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एम. जी. एम. र्जनालिझम महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक दत्ता बाळसराफ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, साहित्य, संत वाङ्मय अशा सर्व क्षेत्रात विराट लेखनकार्य करणा-या डॉ. मोरे यांच्या प्रकट मुलाखतीसाठी एमजीएमच्या रुखमिनी सभागृहात जनसागर लोटला होता. सभागृह हाऊसफुल्ल झाल्याने बाहेर मैदानात बसून लोकांनी ही मुलाखत ऐकली. वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर लिहिलेली पापवचने उघड करताना डॉ. मोरे यांनी असंख्य उदाहरणे श्रोत्यांसमोर ठेवली. 

जे इंग्रजांनी कले, तेच ब्रह्मणांनी केले 
डॉ. मोरे म्हणाले की, मोरे म्हणाले, इंग्रजांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, तर आधुनिक इतिहासकारांनी त्याला जातीत विभागले, त्यामुळे मराठय़ांचा समग्र इतिहास क्वचितच लिहिण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहास लेखनातील मुख्य इंग्रज इतिहासकारांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. मराठय़ांचे शौर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागा झाला, तर आपला टिकाव लागणार नाही अशी भीती इंग्रजांना होती. आधुनिक काळात भारतीय इतिहासकारांनी मराठय़ांच्या इतिहासाला जातीत विभागण्याचे काम केले. जे इंग्रजांनी कलेले तेच ब्रह्मणांनी केले . त्यामुळे तो समग्र न होता तुकड्या तुकड्यात आणि जातीनिहाय लिहिला गेला. महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयतेकडे नेण्याचे पातक इतिहासकार राजवाड्यांनी केले. न्यायमूर्ती रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी काही प्रमाणात मराठय़ांचा समग्र इतिहास लिहिला; पण तो र्मयादितच राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मराठे आपला इतिहास लिहित आहेत. ओबीसी त्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत आहेत. या साऱ्या गदारोळात खरा इतिहास समोर येणारच नाही. 


फक्त कलाकार नाचवले 

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सरकार मराठय़ांच्या इतिहासाची सांस्कृतिक, तात्त्विक मांडणी करील असे वाटले होते, तथापि सांस्कृतिक कार्यक्रमात भगवे झेंडे घेऊन कलाकारांना नाचवण्याव्यक्तीरिक्त राज्य सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय आयडेन्टिटी मांडण्यासाठी गर्जा महाराष्ट्र हा ग्रंथ लिहिल्याचे मोरे यांनी सांगितले.

इतिहासाप्रमाणेच मराठी भाषेचीही पीछेहाट झाली. सातवाहनांनी प्राकृत भाषेचा स्वीकार केल्याने त्यांच्या काळात मराठीची स्थिती चांगली होती. त्यानंतर मात्र राष्ट्रकूटांनी पुन्हा संस्कृत भाषेचा वापर सुरू केला. यादवांच्या काळात मराठीने झेप घेतली. महानुभाव आणि वारकर्‍यांनी मराठीत साहित्य निर्मिती केली. 
यादवांनी दरबारात आणि व्यवहारात मराठी आणली. मुस्लिम शासनकर्त्यांच्या काळात पुन्हा मराठीला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांनी राज्यभाषाकोष तयार करून मराठीला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले, असे सदानंद मोरे म्हणाले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले. एमजीएमचे अंकुशराव कदम, प्राचार्य प्रताप बोराडे, मधुकरराव मुळे, सुहास तेंडुलकर, अंकुशराव भालेकर, रेखा शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.