Wednesday, 15 January 2014

बडव्यांपासून विठ्ठलाला अखेर मुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

बडवे आणि उत्पात यांच्या कचाट्यातून अखेर पंढरीचा विठ्ठल आणि रखूमाई 'मुक्त' झाले आहेत. पंढरपूर मंदिरात बडवे आणि उत्पातांना असेलेले सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे संपले आहेत. त्यांना या मंदिरात आता पुजेचाही मान मिळणार नाही. या ऐतिहासिक निकालाने मैलोन् मैल पायपीट करून विठ्ठलाच्या दारात मात्र तिष्ठत रहावे लागणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंदिराचे सर्व अधिकार आम्हालाच मिळावेत, अशी मागणी करणारी बडव्यांची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. ही याचिका आज फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने बडव्यांना जोरदार धक्का तर विठ्ठलाच्या लाखो भक्तांना दिलासा दिला.

राज्य सरकारने पंढरपूर मंदिर व्यवथापनासाठी स्थापन केलेला ट्रस्ट बरखास्त करावा व मंदिराचे सर्व अधिकार आपल्याकडे द्यावेत, अशी मागणी करणारी बडव्यांची मूळ याचिका बडव्यांनी १९७६ मधली होती. मात्र यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. पण सर्व ठिकाणी हार मिळाल्यानंतर बडवे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत त्यांना सणसणीत चपराक लगावली.

दरम्यान, १९८५ साली सर्वप्रथम मंदिर समिती अस्तित्त्वात आली होती. त्यावर्षीच मंदिर समितीने बडव्यांकडून मंदिराचा संपूर्ण ताबा घेतला होता. त्यानंतर केवळ पुजा करण्याचे अधिकार बडव्यांकडे होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर बडव्याना पुजेचा अधिकारही मिळू शकणार नाही.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.