Sunday, 12 January 2014

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणार

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. अधिसभेने यासंबंधीच्या प्रस्तावास आधीच मान्यता दिल्याने आता नामविस्तारासाठी केवळ राज्य सरकारच्या मान्यतेची गरज उरली आहे. त्यानंतर विद्यापीठाचा उल्लेख "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा करण्यात येणार आहे. 

महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी ऐतिहासिक कार्य केले होते. भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात होती. 26 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अधिसभेत या ठरावाला मान्यता मिळाली. आज झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी नामविस्ताराचा ठराव मांडला. अधिसभेत "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय झाला होता; परंतु नाव मोठे होत असल्याने यातील ज्ञानज्योती शब्द वगळून नामविस्तार करण्यास परिषदेने मान्यता दिली. 

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ""परिषदेच्या बैठकीत नामविस्तार आणि नाशिकमधील एका शिक्षण संस्थेच्या तक्रारीसंदर्भात दीर्घकाळ चर्चा झाली. त्यामुळे दोन विषयांवर निर्णय घेऊन बैठक तहकूब करण्यात आली. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास परिषदेने एकमुखी मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारला नामविस्तारासाठी शिफारस केली जाईल. सरकारने यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर नामविस्ताराबाबत अंतिम निर्णय होईल.'' 

डॉ. बाळसराफ म्हणाले, ""हा ऐतिहासिक निर्णय आहे. फुले दांपत्याने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत महिला समर्थपणे काम करीत आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याचा हा गौरव आहे.'' नाशिकमधील व्ही. एन. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकांना 1999 पासून वेतन बंद करण्यात आले होते. ही चूक महाविद्यालयाने मान्य करीत नऊ शिक्षकांना उच्च आदेशानुसार पुन्हा सेवेत घेण्याचे मान्य केले. अन्य प्रश्‍न सोडविण्याचे संस्थाचालकांनी मान्य केले. 

सिनेट सदस्य डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ""विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा परिषदेचा ठराव स्वागतार्ह आहे. हा नामविस्तार म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी त्या वेळच्या समाजाचा विरोध स्वीकारून धीरोदात्तपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीच्या प्रती समाजाने दाखविलेली कृतज्ञता आहे. या नामविस्तारात पुणे विद्यापीठ हे दोन शब्द कायम ठेवले याचेही स्वागत आहे. कारण हेच नाव विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. या नावामागे सावित्रीबाईंचे नाव जोडल्याने विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण होईल.''

संबधित लेख 
आमची सावित्री ज्ञानाई !

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.