बुधवार दि. ७ सप्टेंबर 2011 रोजी राजधानी दिल्लीत उच्च न्यायालयासमोर बॉम्बस्फोट झाला तेव्हा, माझ्या मनातील घालमेल व्यक्त करण्यासाठी मी लेखणीचा आधार घेतला. त्यातून हा छोटा लेख तयार झाला. फेसबुकवर तो मी या आधी टाकलेला होता. माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी तो उपलब्ध करून देत आहे.
..........................................................................................................................................................
..........................................................................................................................................................
by Anita Patil on Thursday, September 8, 2011 at 3:43pm
दिल्लीतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या भावांनो,
हे लिहिताना माझे हात अजिबात थरथरत नाहीत. मी शांत आहे. नेहमीप्रमाणे ऑफिसला आले आहे. घरून निघताना माझ्या मुलीने चॉकलेटचा हट्ट धरला. होऊ दे ऑफिसला ५ मिनिटे उशीर, असे म्हणून मी तिला दुकानात घेऊन गेले. चॉकलेट देऊन, गोड पापी घेऊन मगच ऑफिसला आले. ऑफिसात टिव्ही चालू आहे. बॉम्बस्फोट झालेल्या दिल्ली कोर्टाबाहेर चॅनलचा प्रतिनिधी वकिलांच्या प्र्रतिक्रिया घेतो आहे. ‘‘हम बिलकूल नही डरेंगे. आतंकियों के मनसुबों को सक्सेस नही होने देंगे. हम निडर है. हमारा काम चलता रहेगा...'' एक वकिल सांगत असतो. ‘‘ ये है दिल्ली स्पिरिट. दिल्ली का जज्बा...ङ्क चॅनलचा प्रतिनिधी कॅमेèयासमोर समारोप करताना कौतुकाच्या आरत्या ओवाळत असतो. मला पुढचे काहीही ऐकू येत नाही... नुकताच मुंबईत अतिरेकी हल्ला झाला तेव्हाही चॅनलवरून अशाच आरत्या ओवाळण्यात येत होत्या. ‘‘‘मुंबई टस से मस नही हुवी. जींदगी की रफ्तार जारी है, ये है मुंबई का स्पिरिट. मुंबई का जजबा..''
आम्ही स्वार्थी आहोत
खरेच याला जींदगीचा जज्बा वा स्पिरिट म्हणायचे? भावांनो, बहिणींनो मला काहीच सूचत नाही. पण माझे मन म्हणतेय...
‘‘....छे. कसला जज्बा आणि कसले स्पिरिट. आम्ही स्वार्थी आहोत. जे मेले त्यांचे दु:ख आम्हाला नाही. आपण सुरक्षित आहोत. आपली मुले-बाळे सुरक्षित आहेत. यात आम्ही खुष आहोत. दु:ख असलेच तर ते मेल्याल्यांच्या बायकास-पोरांना आहे. काही जणींना विधवेचे आयुष्य जगावे लागेल. बिन नवरयाच्या म्हणून त्यांना नजरांचा सामना करीत रोज नवे मरण मरावे लागेल. काही मुले बापांविना पोरकीच राहतील. कमावता बाप गमावल्यामुळे त्यांना ‘शहाणंङ्क व्हावं लागेल. बापाच्या मांडीवर बसण्याचा हट्ट आता त्यांना करता येणार नाही. नव्या खेळण्यांचा हट्ट करता येणार नाही. वाढदिवसाला नव्या ड्रेसचा हट्ट जरा बेतानेच करावा लागेल. वाढदिवसाचा केक आता कोण भरवील?
कॉलेजात बक्षीस मिळाले तर घरी जाण्याची घाई करताना काळीज चर्र होईल. कारण कौतुक करायला आता घरी बाप नसेल. हातून काही चूक झाली तर रागवायला बाप नसेल. बाप रागवायचा तेव्हा राग यायचा. पण रागवून घेण्यातही आनंद होता. ही जाणीव किती जीव घेणी आहे? ही जाणीव घेऊनच या मुलांना आयुष्य काढावे लागेल.....''
स्वार्थ, अगतिकतेला आम्ही जज्बा म्हणतो
स्वर्गस्थ भावांनो, या वास्तवाची जाणीव आम्हाला आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे. आम्हाला क्षमा करा. तुमच्या कुटुंबियांना आता जे भोगावे लागणार आहे, त्याचे तसूभरही दु:ख आम्हाला झालेले नाही. आम्ही अपराधी आहोत. आम्ही किरकोळ माणसे आहोत. माणसे आहोत, म्हणून स्वार्थी आहोत. अगतिक आहोत. आम्हाला आमचे आयुष्य जगायचे आहे. या स्वार्थाला आणि अगतिकतेला आम्ही जज्बा आणि स्पिरिट अशी नावे देऊन स्वत:चे समाधान करून घेतो.
आम्हाला खरंच क्षमा करा.
तुमची अभागी बहीण
-अनिता पाटील, औरंगाबाद.
No comments:
Post a Comment