Monday, 30 June 2014

आरक्षणाची नामुष्की

दै. दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला अग्रलेख

दिव्य मराठी|Jun 27, 2014, 00:54AM IST

ज्या मराठा जातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे वर्षानुवर्षे आहेत, त्या जातीचाही विकास वर्षानुवर्षे होऊ शकलेला नाही. याचा अर्थ केवळ राजकारणाने सर्वांचा तर सोडाच, पण त्या जातीतील सर्वसामान्य माणसाचाही विकास होत नाही, हे अखेरीस सिद्ध झाले. मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करावा लागला आहे. हा निर्णय केवळ राजकीय असून त्याचा आणि मराठा समाजाच्या विकासाचा काही संबंध प्रस्थापित होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शिक्षण व शासकीय नोकर्‍यांतील सरळ सेवा भरतीमध्ये मराठा आणि मुस्लिम उमेदवारांना आरक्षण असेल, मात्र क्रीमिलेअर म्हणजे आर्थिकदृष्ट्या उन्नत गटाला आणि राजकीय क्षेत्रालाही ते लागू नसेल, असा हा निर्णय आहे. मूळ प्रश्न आहे तो भेदभावरहित सर्वांना संधी मिळण्याचा. मग ती शिक्षणातील असो की नोकरीतील. कारण त्या मूलभूत गरजा आहेत. अशा संधीच्या शोधात लाखो तरुण आज उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, तसेच त्यांना नोकर्‍याही मिळेनाशा झाल्या आहेत. म्हणूनच जेथे फार मोठे शिक्षण आणि कौशल्यही लागत नाहीत अशा पोलिस खात्यात भरती होण्यासाठी ऊर फुटेपर्यंत पळण्याची आणि चेंगराचेंगरीत मरण पत्करण्याची त्यांची तयारी आहे. ते कोणत्या जातीत जन्माला आले, हे तेथे महत्त्वाचे ठरत नाही. अशा लाखो तरुणांना संधी हवी आहे आणि ती मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली असून त्याचा परिणाम म्हणून सर्वच जातींमध्ये अस्वस्थ तरुणांची संख्या वाढत चालली आहे. मराठा समाजाचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण तर 32 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच मराठा समाजात बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे अनेक पाहण्यांतून स्पष्ट झाले आहे. या तरुणांना कसे सामोरे जायचे, असा पेच सत्ताधारी मराठा नेत्यांसमोर निर्माण झाला तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी पुढे आली. या मागणीवर विचार सुरू झाला यालाही आता 10 वर्षे उलटून गेली आहेत. याचा अर्थ असा होतो की, नोकर्‍या पुरेशा प्रमाणात निर्माणच होत नाहीत, याला किमान दोन दशके उलटली असून रोजगाराच्या संधीच्या शोधात दोन पिढ्या गारद झाल्या आहेत. म्हणजे समाजात जी अस्वस्थता आहे ती कळण्यास 10 वर्षे आणि त्यासंदर्भात काही करण्यास 10 वर्षे असा हा क्रूर राजकीय प्रतिसाद आहे.  

 घटनेतील तरतुदीनुसार 50  टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मराठा-मुस्लिम आरक्षणाने हे प्रमाण 73 टक्के झाल्याने न्यायालयात हे आरक्षण टिकणार काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच हा निर्णय सरकारने घेतला असून कोणी आव्हान दिले तरी त्याचा प्रतिवाद करण्याची तयारी सरकारने केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. कायद्याच्या लढाईत हे आरक्षण मराठा आणि मुस्लिम तरुणांच्या पदरात केव्हा पडेल माहीत नाही. मात्र, जात-धर्म  हाच जगण्याचा आधार मानणार्‍या तरुणांना आपल्या समाजालाही आरक्षण मिळाले, याचे तोकडे भावनिक समाधान निश्चितच मिळाले आहे. सामाजिक-आर्थिक मागासलेपणा व अपुरे प्रतिनिधित्व या प्रमुख निकषांवर आरक्षण दिले जाते. आंध्रातील वायएसआर रेड्डी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते, ते नंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने याच निकषाने रद्द केले होते. त्यामुळे आरक्षण देतानाच सर्वच जातींतील तरुणांना उच्च शिक्षण कसे घेता येईल आणि त्यांना रोजगार संधी कशा उपलब्ध होतील, असे सरकार म्हणून आम्ही पाहू, असे मुख्यमंत्री म्हणाले असते तर केवळ राजकारणासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असे म्हणता आले असते; पण मूळ प्रश्नांचा सरकारला एक तर विसर पडला आहे किंवा त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात राहिलेले नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा, तर काँग्रेसने मुस्लिम समाजाला सोबत ठेवून नेहमीच राजकारण केले आहे आणि आता इतक्या वर्षांनी या समाजांना आरक्षण देण्याची नामुष्की येते आहे. याचा अर्थ आपले काही चुकते आहे, याचेही भान या पक्षांच्या धुरीणांना राहिलेले नाही. त्यामुळेच अनेक अडथळे पार करून हा निर्णय आपले सरकार घेऊ शकले आणि आपली राजकीय पोळी भाजण्याची ताकद या विषयात नक्कीच आहे, यावर ते खुश आहेत. मात्र आता वातावरण बदलले असून अशा राजकीय निर्णयांचा कावा जनतेला आणि विशेषत: तरुणांना कळू लागला आहे. आतापर्यंत भावनिक लाटा निर्माण करून निवडणुका जिंकता येत होत्या, मात्र फसवणुकीचा हा खेळ असाच चालू राहण्याची शक्यता कमी होत चालली आहे. या नव्या बदलाची दखल सरकारने घेतलेली दिसत नाही.

Sunday, 29 June 2014

‘आरक्षण रक्षणाय...!’

दै. देशदूत नाशिकमध्ये प्रसिद्ध झालेला लेख

Nashik,Editorial,CoverStory,

महाराष्ट्रात पावसाच्रा मोसमी वार्‍रांचा अद्याप पत्ता नसला तरी विधानसभा निवडणुकीचे वारे मात्र वाहू लागले आहेत. सध्रा रा वार्‍रांचा वेग सौम्र असला तरी काही दिवसातच त्राचे रूपांतर तुफानात होणार अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एका बाजूला आणि शिवसेना, भाजप दुसर्‍रा बाजूला अशा आघाड्यांवर एकमेकांविरुद्ध आणि आपापसात कधी चिखलफेक तर कधी दगडफेक होऊ लागली आहे. मात्र सर्वांचे एकमत होईल, निदान त्रास आपला विरोध नाही, असा निर्णर मुख्रमंत्री पृथ्वीराज चव्हाण रांनी नुकताच घेतला आणि खेळाला सुरुवात होण्रापूर्वीच आघाडी घेतली, असे चित्र निर्माण करण्राचा प्ररत्न तरी रशस्वी केला. त्रांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजास शिक्षण आणि नोकर्‍रांमध्रे 16 टक्के, तर मुसलमानांना 5 टक्के आरक्षण जाहीर केले आणि एकाच दगडात बर्‍राच पक्षांवर नेम धरले. रा गोफणफेकीत नक्की किती पक्षी मरतात की गोफणीतला दगड सुटून त्रांच्रा स्वतःच्राच कपाळाचा ठाव घेतो ते निवडणुकीच्रा निकालानंतरच कळेल. असो. मराठा समाज हा खरे तर राज्रातला अतिशक्तिमान असा राज्रकर्ता समाज. महाराष्ट्राच्रा आतापर्रंतच्रा मुख्रमंत्र्रांपैकी एका हाताच्रा बोटांवर मोजता रेण्राइतकेच मुख्रमंत्री वगळता बाकी सर्व मराठा समाजातूनच आले. शिवार महाराष्ट्राच्रा अर्थकारणात चाळीस वर्षे हुकूमी सत्ता गाजवणारी सहकार चळवळ राच समाजाच्रा हातात राहिली. साखर सम्राटांचे पुढे शिक्षणसम्राट बनले, तेही बहुसंख्र मराठाच. अशा रा बलवान समाजाला ‘मागास’ म्हणावे तरी कसे, हा प्रश्न अनेक वर्षे उपस्थित केला जात होता. त्रामुळेच त्रांना नोकर्‍रा आणि शिक्षणात आरक्षण देण्राची रोजनाही मागे पडत राहिली. मुसलमान समाज खरेच मागास राहिलेला असला तरी रा समाजाला असे आरक्षण मिळावे, अशी मागणी केव्हाही जोरदारपणे पुढे आली नाही. कारण तसे जनआंदोलन करण्रासारखी लोकप्रिर संघटना वा नेतृत्व रा समाजाकडे महाराष्ट्रात तरी उरलेले नाही. त्रामुळेच आझाद मैदानाजवळील 1857 च्रा हुतात्म्रांचे स्मारक उद्ध्वस्त करण्रासाठी रझा अकादमीसारख्रा संघटना पुढे रेतात. ‘अर्धा तास सत्ता द्या, भारतभरच्रा हिंदूंना उडवून दाखवतो’, अशी हिंसक व चिथावणीखोर दर्पोक्ती करणारे ओवेसीसारखे आरएमआरचे नेते उगवतात. पण मुसलमानांच्रा सर्वदूर हिताचा विचार करणारा कुणीच पुढे रेत नाही, हे दुर्दैव. रेत्रा साडेतीन महिन्रांनंतर होऊ घातलेल्रा राज्र विधानसभा निवडणुकांच्रा पार्श्वभूमीवर चव्हाण रांनी मराठा व मुसलमान रांना आरक्षण जाहीर केले आणि निवडणुकीतला पहिला हुकूमाचा पत्ता टाकला. पत्ते खोळणार्‍रांकडे जेव्हा हुकूमाचे पत्ते कमी व निवडकच असतात तेव्हा तरबेज खेळाडू त्रांचा जपून वापर करतो व मोजक्रा हुकूमाच्रा पत्त्रांच्रा सहाय्यानेसुद्धा प्रतिस्पर्ध्राला नामोहरम करतो. पण त्रासाठी हातातले पत्ते कसे व केव्हा वापरारचे राचे भान व ज्ञान हवे. सत्ताधारी आघाडीमध्रे रा शहाणपणाचीच वानवा आहे, हे लोकसभा निवडणुकांच्रा काळात ध्रानात आलेच. पण त्रा पराभवाकडून काहीही न शिकता पुन्हा पुन्हा त्राच त्रा चुका करत आपले नाक वारंवार कापून घेण्राचा जणू वसाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घेतलेला आहे. निवडणुकांच्रा तोंडावर अशी आरक्षणाची घोषणा हा आपल्रा हाताने आपलेच नाक कापून घेण्राचा प्रकार. मराठा आणि मुसलमानांना आरक्षण दिल्राने महाराष्ट्रातील आरक्षणाची एकूण टक्केवारी आता 73 वर गेली. आतापर्रंत शिक्षण आणि सरकारी नोकर्‍रांत 52 टक्के आरक्षण होतेच. त्रात आता आणखी 21 टक्क्रांची भर पडली. असे आरक्षण न्रारालरात टिकेल का, हा प्रश्न आहेच. कारण रापूर्वी सर्वोच्च न्रारालराते 50 टक्क्रांपेक्षा अधिक आरक्षण असू नरे, असे मत नोंदवलेले आहे. जर न्रारालराने हा निर्णर रद्दबातल ठरवला तर ‘आमच्रा तोंडाला पाने पुसली’, ‘आमचा विश्वासघात केला’, अशी भावना मराठा व मुसलमानांमध्रे निर्माण होईल व त्राचा विपरित परिणाम मतदानावर होईल. न्रारालराचा निर्णर सरकारच्रा बाजूने लागला तरी आगोदर आरक्षण असलेले 52 टक्के दलित, अनुसूचित जाती-जमातीचे व अन्र मागासवार्गीर नाराज राहणारच. कारण त्रांच्रा आरक्षणात आता नवे वाटेकरी निर्माण होणार. शिवार ज्रांना अद्याप आरक्षणाचा कोणताही लाभ मिळालेला नाही असे उच्च जातींचे व सवर्ण हिंदू, ख्रिश्चन, पारशी रांच्रासारखे अल्पसंख्राकही सरकारच्रा विरुद्ध उभे ठाकतील. रा सार्‍रांचा परिणाम आघाडीला होणारा विरोध वाढण्रातच होईल. हा झाला निवडणुकीच्रा डावपेचांचा पंचनामा. मुख्र प्रश्न हा आहे की मराठा व मुसलमानांना खरेच आरक्षण हवे का? आणि तसे दिल्रास त्रामुळे त्रांची संपूर्ण समाज म्हणून प्रगती होईल का? रापैकी पहिल्रा प्रश्नाचे उत्तर होर असे तर दुसर्‍राचे नकारार्थी आहे. भारतीर राज्रघटनेत धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही. त्रामुळे मुस्लिम समाजाच्रा आरक्षणाचे समर्थन न्रारालरात टिकणार नाही, असा रुक्तिवाद केला जातो. पण असे आरक्षण कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी राज्रात आहे. त्रामुळे तसा प्ररोग महाराष्ट्रात करणे शक्र आहे. मराठा समाज राज्रकर्ता आणि त्रामुळे श्रीमंत आहे, असा समज असला तरी तो चुकीचा आहे. रा समाजातील काही कुटुंबे राजकारण आणि सहकार रांच्रा जोरावर निश्चितच सुधारली व पुढारली. पण बाकीचे मराठे तितकेच अशिक्षित, अडाणी व गरीब राहिले हेही वास्तव आहे. मुख्रमंत्री, मंत्री, साखर कारखानदार मराठा, ते बंगल्रात राहतात, एअर कण्डिशण्ड गाडीने फिरतात, त्रांची मुले विदेशात शिकतात, हे खरेच; पण त्रांच्रा मराठा ड्रारव्हर, शिपाई रांचा आर्थिक स्तर कोणता? बहुतांश मााथडी कामगार मराठाच आहेत. त्रांच्रा आर्थिक व सामाजिक स्थितीचा कोण विचार करणार? त्रामुळे कल्राणकारी राज्र संकल्पनेत समाजातील रा दुर्बल घटकांचा विचार व्हारलाच हवा. असे असले तरी दुसर्‍रा प्रश्नाचे उत्तर नाही असे देण्राचे कारण आतापर्रंतचा भारतातील अनुभव असा की, शिक्षण, नोकर्‍रा वा राजकारण रापैकी कोणत्राही आरक्षणाचा उपरोग मागास समाजाच्रा समुच्चित उद्धारासाठी झालेला नाही. अनुभव हा आहे की, मागास समाजातील मूठभरच कुटुंबे आरक्षणाच्रा सवलतीचा फारदा घेऊन शिक्षण संस्थांत प्रवेश मिळवतात. पुढे आरक्षणाच्रा जोरावरच उत्तम सरकारी अधिकाराची पदे मिळवतात. राजकारणात रेऊन आरक्षित जागांवर निवडणुका लढवतात व आमदार-खासदार बनतात. त्रांच्रा रा उत्कर्षाचा त्रांच्रा समाजाला कार फारदा होतो? आरक्षणातून वर आलेल्रांची मुलेच पुन्हा त्राच आरक्षणाचा आधार घेत शिकतात. अधिकाराची पदे मिळवतात व पुढे हे लाभ आपल्रा पुढल्रा पिढीकडे सुपूर्द करतात. आमुळे समुच्च समाजाचे कार भले होते? मुस्लिमांच्रा बाबतीत बोलारचे तर शिक्षणातील आरक्षण उच्च माध्रमिक स्तरावरून सुरू होते. तिथे आरक्षणाचा लाभ मिळवारचा तर किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण व्हारला हवे. मुसलमान समाजात इथेच गडबड होते. किती टक्के मुले शालांत परीक्षा उत्तीर्ण होतात? तसे व्हारचे तर त्रासाठी सरकारी निरमाप्रमाणे चालणार्‍रा व नेमून दिलेला अभ्रासक्रम शिकवणार्‍रा शाळांमध्रे जारला हवे. जर हे कोवळे विद्यार्थी धमांचे शिक्षण देणार्‍रा मदरशांमध्रेच शिकणार असतील तर ते धर्मग्रंथाचे पठण करू शकतील; पण विद्यापीठाच्रा पदव्रा कसे मिळवणार? अशी अर्हता नसेल तर आरक्षण असूनही नोकर्‍रा कशा मिळणार? त्रासाठी रा समाजातल्रा लहान मुलांना मदरशात नव्हे तर क्रमिक शिक्षण देणार्‍रा शाळांमध्रे पाठवा, असे निक्षून व आग्रहाने सांगणारे नेतृत्व हवे. तसे पुरोगामी नेते रा समाजात किती सापडतात? सगळी गोची ही अशी आहे. पुराच्रा पाण्रात निर्माण होणार्‍रा भोवर्‍रांत पट्टीचा पोहणारा सापडला तर त्राचीही अनेकदा गाळण उडते व जिवाच्रा भीतीने तो वाटेल तसे हात-पार झाडू लागतो व त्रामुळे बुडू लागतो. अखेर नाका-तोंडात पाणी जाऊन पाण्राच्रा खाली जातो व संपतो. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाऊन 48 पैकी केवळ 6 जागा जिंकण्राची नामुष्की ओढवलेल्रा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेमके असे झाले आहे. त्रामुळे आता रा निर्णराने आरक्षणाचे रक्षण झाले तरी सरकारचे रक्षण होईल की नाही ते जनताच जाणे! 
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य आहेत.)

आरक्षणाचे रक्षण!

महाराष्ट्र टाईम्समध्ये २००९मध्ये प्रसिद्ध झालेला भारतकुमार राऊत यांचा लेख

Jun 21, 2009, 12.00AM IST

भारतकुमार राऊत 

'आरक्षण' हा भारतीय मनाचा एक दुखरा कोपरा आहे. भळभळणाऱ्या जखमेवर मलमपट्टी केली की, खपली धरू लागते. पण जखम भरण्यापूवीर्च खपली काढण्याचा अनावर मोह होत राहतो आणि एका नाजूक क्षणी खपलीला नख लागलेच, तर पुन्हा रक्त भळभळा वाहू लागते. आरक्षणाच्या प्रश्नाचे तसेच आहे. स्वातंत्र्य मिळून राज्य घटना अमलात आल्यापासूनच देशाला 'आरक्षणा'च्या शापाने पछाडले आहे आणि ते भूत आजही भारतीय समाजाच्या मानगुटीवरून उतरलेले नाही. 

घटनेने ज्या वर्गांना आथिर्क व सामाजिक पायावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आरक्षण मान्य केले, त्याची गरज तर आहेच, पण त्याचवेळी आरक्षणाची मूळ कल्पना 'हक्क' नसून 'सवलत' आहे, हे ही ध्यानात घेणे गरजेचे आहे. देशातील धामिर्क व सामाजिक रूढींमुळे समाजातील ज्या वर्गांच्या सुधारणांच्या हक्कांची प्रगत व सत्ताधारी वर्गाकडून कायम पायमल्ली झाली व त्यामुळे ज्या वर्गांच्या सुधारणांच्या शक्यतेला पायबंद बसला, अशा वर्गांना स्वतंत्र समाजव्यवस्थेत प्रगतीची संधी मिळावी व सामाजिक जाचामुळे मागे पडलेला समाज एका पातळीवर यावा, यासाठी आरक्षणाची कल्पना आली. ती गेली साठ वषेर् अव्याहत चालू आहे. 

ज्या वर्गांसाठी आरक्षण राबवण्यात आले, त्या वर्गांची अद्याप पुरेशी प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे आणखी काही काळ आरक्षणाचे सूत्र पुढे चालूच ठेवावे लागणार, हे ठीकच आहे. पण तसे करताना सत्ताधारी राज्यर्कत्यांना एक प्रश्न जनतेने (आरक्षण असलेल्यासुद्धा) विचारायला हवा, तो हा की, सर्व समाज एका पातळीवर यावा, म्हणून काय प्रयत्न झाले? केवळ शिक्षण व नंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवल्याने सर्व समाजाचे उत्थान होते की, ज्यांना यापूवीर् आरक्षणाची सवलत अनेकदा मिळाली, अशांचाच तो पिढीजात अधिकार बनतो? 

आरक्षणाच्या अधिकाराच्या साह्याने जे लोक आज वेगवेगळ्या राजकीय व सरकारी पदांवर बसले आहेत, त्यांच्याकडे पाहा. त्यांना खरेच जातीचे आरक्षण मिळायला हवे? त्यांनी स्वत:ला आरक्षण मिळवून आपल्याच समाजातील गरजू व लायक उमेदवारांवर अन्याय केला का? याचा विचार कोण करणार? पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या काँग्रेसच्या मीराकुमार यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही हा प्रश्न विचारावासा वाटतोच. लोकसभा सदस्य, मंत्री व त्यापूवीर् परराष्ट्र सेवेतील अधिकाराची नोकरी या बाबींवर मीराकुमार यांची लोकसभा अध्यक्षपदावरील निवड उचित ठरायला हवी. पण आरक्षणाच्या मुद्द्याचा वारंवार उच्चार करून समाजातील पीडित समाजाला आपल्याकडे खेचण्याचा राज्यर्कत्यांचा डाव असा की, मीराकुमार यांचे वर्णन करताना वारंवार त्या 'दलितकन्या' असल्याचा उल्लेख सर्वच जण जाणीवपूर्वक करत राहिले आहेत. याची खरेच गरज आहे? मीराकुमार या काँग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीवनराम यांच्या कन्या. त्यामुळे त्या जन्माने मागासवगीर्य हे ही खरे. पण ज्यांना 'दलित' असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल, असे त्यांचे बालपण वा नंतरचे जीवनमान आहे काय? त्यांचा जन्म झाला, तेव्हा जगजीवनराम केंदात मंत्री होते. त्या मंत्र्याच्या विशाल निवासस्थानातच मोठ्या झाल्या. सर्व सुखसोयी त्यांना मिळाल्या. उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले व नंतर परराष्ट्र सेवेत अधिकाराची नोकरीही मिळाली. वडिलांच्या निधनानंतर त्यांची बिहारमधील सासाराम ही लोकसभेची जागाही मिळाली. त्यांना जन्माने आलेल्या 'मागास'पणाचे असे कोणते चटके सहन करावे लागले? त्यांना दलित म्हणताना आपण खऱ्याखुऱ्या दलितांचा अपमान करत नाही का? अशावेळी त्यांची जबाबदारी ही होती की, देश व समाजाला स्पष्ट सांगायचे की, बाबांनो, मी दलित म्हणून जन्माला आले असले, तरी मी तुमच्यासारखी पीडित दलित नाही. अन्य पुढारलेल्या समाजाचे सर्व हक्क व सुविधा मला जन्मापासूनच मिळाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही मला लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडलेत, ते माझ्या गुणवत्तेमुळे. दलित म्हणून नव्हे. पण असे सांगायची इच्छा वा हिंमत त्यांच्यात नाही. कारण तसे केले, तर एक महत्त्वाचे कवचकुंडल स्वत:च कापून टाकल्यासारखे होईल. ते धाडस का व कोणासाठी करायचे? 

हे केवळ एक उदाहरण. आरक्षण जर आवश्यक असेलच, तर ते कोणासाठी व किती काळ ठेवायचे, याचा निर्णय समाजातील धुरिणांनी एकदा घ्यायला हवा. याचे कारण अनिर्बंध आरक्षणामुळे ज्यांच्यासाठी आरक्षणाची सोय झाली, त्या पीडितांपर्यंत त्याचे फायदे पोहोचत नाहीतच, पण त्याच्या मूळ तत्त्वाचा दुरुपयोग होताना समाजात दरी मात्र वाढत जाते. एका बाजूला ज्यांना आरक्षण मिळाले, त्यांच्याबद्दल अन्य वर्गांना दुस्वास वाटत राहतो आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आरक्षण मिळण्याची सोय आहे, त्यांच्यात न्यूनगंड वाढत जातो. त्यांना आरक्षण हा हक्क वाटतो, कारण त्याच्याशिवाय आपण उभे राहूच शकत नाही, ही भावना मूळ धरते. या दोन्ही गोष्टी वाईटच.

याचा विचार पक्ष करणार नाहीत. कारण आरक्षण आणि त्याची सतत टिकणारी गरज हा तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्राणवायूच. त्याचा पुरवठा बंद होऊन कसे चालेल? तथाकथित समाजसुधारकही या विषयाला हात घालणार नाहीत, कारण तसे केले, तर समाजातील मोठ्या गटाचा रोष ओढवून घ्यावा लागेल, शिवाय त्यांच्या बेगडी 'समाजसुधारक'पणाचे ढोंग उघडे पडेल, ते वेगळेच. म्हणून अशावेळी ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळाले व त्याच्या मदतीने ज्यांनी जीवनात उत्कर्ष साधला, त्यांनी पुढे येऊन यापुढे आरक्षण कोणाला द्यावे व मुख्य म्हणजे त्यातून कोणाला वगळावे, याचा निर्णय घ्यावा व जनजागरण करून हा विचार सर्व समाजात पसरवायला हवा. प्रगत समाजात समता हवी. ही समता आणायची, तर सर्व घटक एका पातळीवर यायला हवेत, हे खरे. पण सध्याचे आरक्षणाचे धोरण या उद्देशाला तारक की मारक, यावर चर्चा हवी. ज्या समाजात कोणतेही आरक्षण ठेवण्याची गरज नाही, तो समाज विकसित, असे मानायला हवे. एका बाजूला भारतीय संस्कृतीच्या प्रगतपणाचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे आरक्षणांचा संकोच न करता, उलट त्यांचा व्याप वाढवायचा, याला काय म्हणावे? नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे समाज आणखी एकदा दुभंगला. त्यानंतर सच्चर आयोगाची गडबड सुरू झाली आणि भारतीय समाज धर्माच्या आधारावर दुभंगला. त्यातून सावरायच्या आतच महिला आरक्षणाचे शंखनाद निनादू लागले. आता समाज लिंग पातळीवर दुभंगू लागला. आरक्षणाच्या नावावर देशाचे असे किती तुकडे आपल्याला करायचे आहेत? 

जगात सर्वत्र जनतेला आपण 'पुढारलेले' आहोत, असे सांगायला अभिमान वाटतो. याचा अर्थ ते खरेच पुढारलेले असतात, असे नव्हे. पण भारतात मात्र पुढारलेले व राज्यकतेर् म्हणून मिरवणारे समाजसुद्धा आपण 'मागासलेले' असे जाहीर करण्याची स्पर्धा करतात. याचे कारण मागास असल्याचे सरकारी फायदे! महाराष्ट्रातील एक दलित मंत्री गेली साडेतीन दशके कुठल्या ना कुठल्या सत्तेच्या खुचीर्त आहेत. तरीही आपण 'दलित' आहोत, याचे जाहीर स्मरण करत त्या दु:खावेगाचे कढत उसासे सोडायला ते विसरत नाहीत. एका ज्येष्ठ नेत्याची कन्या जन्मली, तेव्हापासून मुंबई, दिल्ली व परदेशात राहिली, पण ती स्वत:चे वर्णन 'शेतकऱ्याची कन्या' असे करते. ना तिच्या वडिलांनी कधी नांगराचा फाळ हाती घेतला, ना तिने कधी शेतावर जाऊन कांद्याची भाजी आणि भाकरी खाल्ली. 

आरक्षणाच्या मूळ सूत्राची व तत्त्वाची ही थट्टा तातडीने थांबायला हवी, तूर्तास इतकेच. 

(लेखक टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.) 

रक्षणासाठी आरक्षण!

नागपूर तरूण भारतमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

तारीख: 27 Jun 2014 00:06:08

महाराष्ट्रातील कॉंग्रेस आघाडी सरकार, निवडणूक जवळ आल्याने बावचळल्यासारखे करू लागले आहे. या सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंेडावर मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षणाच्या मूळ तत्त्वालाच या निर्णयाने हरताळ फासला गेला आहे. हा निर्णय निव्वळ स्वार्थी आणि येणार्‍या निवडणुकीत आपले रक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे. सत्तेसाठी समाजाचे विभाजन करून, मतांचा गठ्ठा आपल्या झोळीत टाकण्याच्या दिशेने निर्णय करण्याचा जो खेळ या देशात कॉंग्रेसने आतापर्यंत केला, तो अत्यंत घातक आणि विपरीत परिणाम करणारा सिद्ध झाला आहे. प्रगतीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा समाजातील सर्व घटक आपल्याला मागास ठरविण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. देशाच्या सर्वंकष प्रगतीचे कुणाला काही देणेघेणे नाही. समाजाच्या खर्‍या प्रगतीसाठी या कुणाकडेही काही कार्यक्रम नाही. फक्त आरक्षण मिळाले की जादूच्या कांडीप्रमाणे आपल्या समाजाचा विकास होईल, असे भ्रामक चित्र ही मंडळी उभे करत आहेत. या विपरीत दिशेने समाजाच्या चाललेल्या वाटचालीमुळे जे मागास आहेत त्यांना आरक्षण देण्याची, त्यांनी आरक्षण मागण्याची, ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना त्याचा लाभ होऊन त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करण्याची गरज कुणालाच वाटत नाही. उलट, जे वर्षानुवर्षे या राज्यात सत्तेवर होते, त्यावेळी त्यांनी आपल्या समाजासाठी काहीच केले नाही. आता मात्र पराभव दिसून लागल्याने अशी मंडळी अगदी आपला हक्क असल्यासारखी सत्तांध भाषेत, ‘आम्हालाही आरक्षण द्या,’ असे दटावतात आणि सत्तेला चटावलेले सत्ताधारी, येणारी निवडणूक हरणार, या भीतीने थरथर कापत हे आरक्षण त्यांच्यासाठी जाहीर करतात. हा सगळा अव्यापारेषु व्यापार चालला आहे.
यापेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आरक्षण हे खरोखर या समाजाला मिळणार आहे काय? की, हा केवळ निवडणुकीपुरता कळवळा दाखविण्याचा दिखाऊ कार्यक्रम आहे? घटनेने आरक्षणाला मर्यादा घातलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे निकालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे सरळ सरळ उल्लंघन केले आहे. आता महाराष्ट्रात आरक्षण ७३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. जी खरी गुणवत्ता आहे, ज्यांनी आपल्या अंगभूत गुणांचा अथक प्रयत्नाने विकास करून सर्वोच्च गुण प्राप्त केले आहेत, त्यांना केवळ आरक्षणामुळे संधी नाकारली जाणार काय? ते एका उच्च जातीत जन्माला आले, हाच त्यांचा दोष ठरणार की काय? असे न होता त्यांनाही संधी दिली जावी, यासाठीच न्यायालयाने पन्नास टक्क्यांची मर्यादा आरक्षणाला घातली होती. मात्र, मतांच्या मतलबी धावपळीत आता ती मर्यादा तोडून सरकार पुढे निघून गेले आहे. मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात आरक्षण, यासारखी तर विपरीत गोष्ट कोणती नाही! आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. मुस्लिम समाजातील मागास जातींचा सरकारच्या अनु. जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समावेश आधीच केला गेला आहे. मात्र, अन्य मुस्लिमांना आरक्षण केवळ गठ्ठा मते डोळ्यांसमोर ठेवून ना? हा प्रयोग अनेकदा करून फसला आहे. आंध्रप्रदेशात मुस्लिमांना असेच आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन कॉंग्रेस सरकारने तेथे घेतला होता. मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद देशाच्या राज्यघटनेत नसल्याने न्यायालयात हा निर्णय टिकला नाही. हे सर्व ज्ञात असूनही महाराष्ट्रात तोच प्रयोग कशाकरिता? उत्तरप्रदेशात, निवडणुका असतानाही सलमान खुर्शीद आणि बेनीप्रसाद वर्मा यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा, निवडणूक आयोगाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करत केली होती. महाराष्ट्राच्या मराठवाड्यासारख्या भागात फार पूर्वी नाही, तर फक्त ६० वर्षांपूर्वी रझाकाराची बारी लोकांनी अनुभवली आहे. या रझाकारांनी अत्यंत उर्मटपणाने घराघरांत घुसून लूटमार, खून, अत्याचार केले आहेत. सत्तेत असलेल्या निजामाच्या इशार्‍यावर कासिम रझवी नावाच्या दहशतवादी प्रमुखाच्या निर्देशाने या रझाकार नावाच्या दहशतवादी फौजेने मराठवाड्याच्या गावागावांत अक्षरश: दहशतीचा नंगानाच करत, आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ समाजावर आणली होती! अशा अत्याचार करणार्‍या, सत्ता गाजविणार्‍या आणि इतरांना आपल्या सुल्तानी टाचेखाली रगडून ठेवणार्‍यांना आता पाच टक्के आरक्षण द्यायचे? निजामाच्या काळात संस्थानात बहुसंख्य हिंदूंना समान संधी नाकारली गेली होती. बहुसंख्य समाजाचे पाच टक्केही लोक नोकरीत नव्हते. मग ज्यांना संधी नाकारली गेली त्यांना आरक्षण न देता, ज्यांनी मगरुरी, दहशत माजवून संधी हिरावून घेतली त्यांना आरक्षण देणार? आजही या रझाकारांचे वंशज समाजात बिनधास्तपणे सांगतात की, ‘हमने यहॉंपर राज किया है|’ त्यांनाही आरक्षणाचा आता लाभ मिळणार? हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, हे माहीत असूनही आरक्षणाची घोषणा करणे म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे! तेही चुकीच्या धारणांवर, चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे. याला कसून विरोध केला गेला पाहिजे.
मराठा आरक्षण हासुद्धा वादग्रस्त विषय आहे. मराठा समाजात मागास स्थितीत, गरिबीत दिवस कंठणारे जसे मोठ्या संख्येने आहेत, तसेे स्वत:ला राजे म्हणविणारे आणि राजेशाहीच्या थाटात जीवन व्यतीत करणारेही अनेक आहेत. दलित-सवर्ण असे जे संघर्ष अगदी अलीकडच्या काळात झाले आणि अजूनही होतात, ते कुणाकुणात होतात? मग केवळ संख्येच्या बळावर आरक्षणाची मागणी करून, राजकीयदृष्ट्या दबावगट स्थापन करून आरक्षण मागितले जाणार आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ते देण्याची घोषणा होणार, हे कितपत योग्य आहे? मराठा समाजात प्रस्थापित झालेली मंडळी, मराठा समाजातील गरीब, वंचित, पिचणार्‍या वर्गाची उदाहरणे देऊन गोंधळ घालून आरक्षण मागणार, पदरात पाडून घेणार. त्याचा लाभ खरोखर मराठा समाजातील वंचितांना मिळणार काय? हा सगळा विषय आणि मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर होत असलेली चर्चा पाहिली की, सर्व मंडळी आर्थिक निकषावर आरक्षणाच्या तत्त्वाकडे जात असल्यासारखी विधाने करत आहेत. आरक्षणाच्या विषयाला आजही योग्य दिशा आहे. सामाजिक मागासलेपणाच्या आधारे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांना आरक्षण तसेच ठेवून अन्य समाजातील अर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिले गेले पाहिजे. त्या दिशेने समाजाची मतनिश्‍चिती झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या वेळी प्रमोद महाजन म्हणाले होते की, ज्या भाकरीसाठी हे भांडण चालले आहे ती भाकरी आहे कुठे? झिरो बजेट महाराष्ट्र सरकारने त्या वेळी स्वीकारून नव्या रोजगाराच्या वाटा बंद केल्या होत्या. नसलेल्या नोकर्‍यांसाठी आरक्षणाचे भांडण कशासाठी? आजही परिस्थिती फार वेगळी नाही. रोजगार निर्मितीचा विचार कॉंग्रेसवाल्यांच्या डोक्यात, बोलण्यात कुठेच नाही. महाराष्ट्र सरकारची आरक्षणाची घोषणा तर निव्वळ बनवाबनवी आहे! लोकसभा निवडणुकीत यांची जी वाताहत झाली, त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपली खुर्ची महाराष्ट्राची जनता खेचून काढणार, अशी भीती यांना बसली आहे. भीतीने कापरे भरले आहे. त्यामुळे काहीही करून, कसेही करून सत्ता वाचविण्याची त्यांना घाई लागली आहे. त्यामुळे आपला निर्णय न्यायालयात टिकणार नाही, हे माहीत असूनही, निर्णय चुकीचा आहे हे पटत असूनही, केवळ मतांचे गठ्ठे डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईने हा निर्णय केला आहे. ज्यांच्यासाठी हा निर्णय आहे त्यांनाही या निर्णयातील फोलपणा चांगला माहीत आहे. त्यामुळे या निर्णयाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल आणि ज्या सत्ताहरणापासून रक्षणासाठी आरक्षण जाहीर केले आहे तो हेतू काही साध्य होईल, असे वाटत नाही!

पवार झाले ‘मेटे’करी

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

28-June-2014 : 11:55:00
  
जी गोष्ट जगजाहीर आहे ती वारंवार सांगण्यात अर्थ नसतो. तसे केल्याने ती आदरणीय न राहता पांचट आणि हास्यास्पद होते. शरद पवार हे संत नाहीत आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही संतांची टोळी (मांदियाळी नव्हे) नाही किंवा महाराष्ट्रात मराठय़ांना दिलेले आरक्षण विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी दिले आहे, हेही त्याचमुळे त्यांनी सांगण्याचे कारण नाही. त्या संघवाल्यांचे पहा, आपण ढोंगी आहोत असे ते बिचारे कधी सांगतात काय? कारण आपले तसे असणे सार्‍यांना ठाऊक आहे आणि ज्यांना ते अजून कळले नाही त्यांनाही ते हळूहळू कळणारच आहे, हे समजण्याएवढे ते गंभीर आणि शहाणे आहेत. शरद पवारांचे तसे नाही. १९६0 च्या दशकापासून म्हणजे गेली पंचावन्न वर्षे ते महाराष्ट्राच्या (व अधूनमधून देशाच्या) राजकारणात राहिले आहेत आणि मराठी माणसांना त्यांचे अजूनही शिल्लक असलेले उतावळेपण नको तेवढे समजले आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दाचाच नव्हे तर हालचालीचाही अर्थ त्यांच्या ध्यानात येणारा आहे. विनायक मेट्यांनी जेव्हा मराठा आरक्षणाची आरोळी ठोकली, तेव्हाही तो आवाज कोणाचा आहे हे सार्‍यांना कळून चुकले होते. तरीही ‘सोयरिकीला जाताना शहाण्णव कुळांची थोरवी सांगायची आणि आरक्षण मागताना मागासलेपण पुढे करायचे यात विसंगती आहे’ हे तेव्हाचे त्यांचे मेट्यांवर केलेल्या टीकेचे बोल लोकांनी ऐकून घेतले होते. मात्र, ते ऐकतानाही मेटे आणि पवार एक आहेत आणि त्यांची तोंडे वेगळी असली तरी वाणी एक आहे हे त्यांना समजलेच होते. पुढे पवारांनी मेट्यांना आमदारकीचा मुकुट (त्यांच्या अनुयायांनी एका संपादकाच्या घरावर हल्ला चढविल्यानंतर आनंदाने) दिला, तेव्हाही लोकांना त्यांचा समज खरा असल्याची खात्री पटलीच होती. जे मेट्यांनी तेव्हा मागितले ते पवारांनी आता त्यांना दिले आहे व ते देताना शहाण्णव कुळी मराठय़ांना मागासवर्गीयांच्या रांगेत आणून बसविण्याचे राजकारणही केले आहे. आता मेट्यांनी युतीचा नाद सोडायला आणि पुन्हा पवारांच्या आश्रयाला यायला हरकत नाही. पण मेटेही चलाख आहेत. उद्या युतीचेच राज्य महाराष्ट्रात आले तर त्यात ते कदाचित मंत्री होतील आणि पवारांकडे येऊन साधे आमदार राहण्यापेक्षा तिकडे राहून मंत्री होणे त्यांनाही हिताचे वाटेल. मात्र, ते युतीत असले काय आणि आघाडीत, रामदास आठवल्यांसारखेच, ते पवारांचे आहेत आणि तसेच राहणारही आहेत. पवारांच्या मनातला मराठावाद कधी मावळलाच नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसी राजकारणात त्यांनी केलेली वजाबाकी ज्यांना नीट तपासता येते त्यांना त्यांच्या या मराठा भक्तीचीही चांगली कल्पना येऊ शकेल. मुसलमान काँग्रेससोबत नव्हते आणि दलितांचे वर्ग आंबेडकरी निष्ठेमुळे त्या पक्षापासून दूर होते, मग राहिलेले वर्ग कोणते? पवारांनी प्रथम ब्राह्मणांना दूर केले (आता तर त्यांचे अनुयायी ब्राह्मणांचे पुस्तकातील नामोल्लेख आणि पुतळेही काढण्याच्या मागे लागले आहेत) मग ओबीसींना दूर केले. मग उरले ते मराठे, कुणबी आणि तत्सम इतर त्यांच्याजवळचे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेव्हा ती चक्क मराठय़ांची रिपब्लिकन पार्टी होती. तिला काँग्रेसहून अधिक जागा कधी मिळाल्या नाहीत आणि मूळच्या काँग्रेसमध्येही मराठय़ांचे प्राबल्य आहेच. मग पवारच मेट्यांचे अनुयायी झाले आणि परवापर्यंतचा मराठा आरक्षणाला असलेला त्यांचा तोंडी विरोध मावळला. पण एकदम विरोधी रिंगणात उडी घ्यायची तर तिलाही एक धारिष्ट्य लागते. म्हणून मग पवारांची आताची रस्त्यावरची भाषा, ‘आम्ही म्हणजे कोणी संत नाहीत’  ही.. पवारसाहेब, तुम्ही संत नाहीत, संत कधी नव्हताही आणि यापुढेही तुम्हाला संत होता येणार नाही हे सारे जाणतात. तुम्हाला राजकीय संतांच्या मालिकेतही कोणी घेणार नाही. एक गोष्ट मात्र खरी, तुम्ही चांगले राजकारणी आहात आणि चांगले राजकारणी असण्यासाठी जे काही बरेवाईट सोडावे लागते ते सारे सोडण्याची तुमची तयारी आहे. कुणा जाणकाराचे म्हणणे असे की ज्वारीच्या शेतातून फिरतानाही अंगाला पांढरे लागू न देण्याचे कसब पवारसाहेबांमध्ये आहे. ते खरेच आहे. गेली ५0 वर्षे तुम्ही महाराष्ट्र, त्याला कळूही न देता आपल्या मुठीत ठेवला. सगळ्या वजाबाक्या मनापासून केल्या आणि तरीही त्यात जे गळले त्यांनी तुमच्या आरत्या गाण्याचे काम कधी थांबविले नाही. राजकारणी माणसांना प्रत्येकाचीच किंमत (मूल्य नव्हे) ठाऊक असते असे म्हणतात. ती मोजली की तो खूष राहतो आणि खिशातही राहतो.. तर काय, पवारसाहेब, तुमचे अभिनंदन!

मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख नेते

वरील लेख फोटोकॉपी असून तो नीट वाचण्यासाठी माऊसला राईट क्लिक करा.  समोर आलेल्या पर्यायांपैकी open link in new tab वर क्लिक करा. फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल. open link in new window या पर्यायावर क्लिक केल्यानंतरही फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल.

लेखाची मूळ लिन्क येथे पाहा

आरक्षण नव्हे प्रोत्साहन

दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख
प्रसिद्धी दि. २७/०६/२०१४

वरील अग्रलेख फोटोकॉपी असून तो नीट वाचण्यासाठी माऊसला राईट क्लिक करा.  समोर आलेल्या पर्यायांपैकी open link in new tab वर क्लिक करा. फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल. open link in new window या पर्यायावर क्लिक केल्यानंतरही फोटो वाचण्याजोग्या आकारात उघडेल.

मूळ लिंक येथे पाहा