Wednesday 18 April 2012

सेना-मनसेचे मराठी प्रेम


डोळ्यात केर - कानात फुंकर !  ( भाग १ )

आज महाराष्ट्रात  सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला प्रभावी विरोध करु
शकेल असा विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार
सलग तीनवेळा सत्तेत आले. याचा अर्थ ते खूप लोकप्रिय आहे किंवा जनहिताची
कामे करत आहे असे समजण्याचे आजीबात कारण नाही. उलट सलग तीनवेळा
सत्ता हाती आल्याने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या मध्ये
सत्तेची गुर्मी, उध्दटपणा आणि बेमुरवतपणा स्पष्ट दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या
गोमेलाही असंख्य पाय फुटले आहेत. पण तरीही महाराष्ट्रातील जनता
(विशेषतः  ग्रामीण भागातील ) पुन्हा पुन्हा आघाडी वरच विश्वास टाकताना
दिसते. याचा अर्थ ती मूर्ख बेअक्कल बावळट आणि मुकी बहिरी आंधळी
आहे असे आजीबात नाही. परंतु मग आपले आणि महाराष्ट्राचे भवितव्य
कुणाच्या हातात सोपवायचे ? शिवसेना...भा,ज.पा. किंवा म न से च्या ?
म्हणजे एखाद्या जनावरा समोर दावणीला मरायचे की खाटकाच्या खोडावर ?
असा पर्याय ठेवला  तर तो जो निर्णय घेयील तोच निर्णय या बाबतीत
महाराष्ट्रातील जनता घेत आहे. दगडा पेक्षा वीट मऊ या न्यायाने  शहाण्याचे चाकर
होणे परवडले परंतु मूर्खाचे धनी होणे महागात पडेल हें सत्य महाराष्ट्रातील
जनता चांगल्या प्रकारे जाणते

संधी दिली होती

महाराष्ट्रातील जनतेला जेव्हा काँग्रेस सरकार गृहीत धरून
राज्य करु लागली तेंव्हा (१९९५ ) महाराष्ट्रातील जनतेने
सेना-भाजप च्या हाती सत्ता सोपवली होती. बाळासाहेब ठाकरे यांची
प्रभावी भाषणे,वाजपेयी यांची प्रतिमा (?) आणि जनतेच्या मनातील
बदलाची इच्छा या मुळे सेना भाजपा युती ची सत्ता आली. परंतु
लवकरच जनतेचा भ्रमनिरास झाला. सेना भाजप चे मंत्री -मुख्यमंत्री 
जनतेचे प्रश्न सोडवण्या पेक्षा  बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन
या दोन रिमोट कंट्रोल च्या तालावर नाचण्या पलीकडे काहीही करु
शकले नाही. मुळात या मंडळीना मुंबई बाहेर देखील महाराष्ट्र आहे .
त्या जनतेच्या आधारावरच सत्ता मिळते आणि टिकते याची जाण
आणि जाणीवच नव्हती. शिवाय आजवर जे मुंबई महापालिकेत
प्रत्येक कामाच्या टेंडरचे विशिष्ट कमिशन मातोश्रीवर पोहचवण्याची
जी सिष्टीम होती ती जशीच्या तशी मंत्रालयात आली. परिणामी
भ्रष्टाचाराला अतिशय बाजारू स्वरूप आले.
जो एनरोन  प्रकल्प शिवसेनेच्या "ढाण्या वाघाने अरबी समुद्रात बुडवला 
तोच प्रकल्प पुन्हा मातोश्रीच्या मागच्या दाराने आत आला आणि
ढाण्या वाघाने त्याची मलई मांजरी सारखी चाटली हें ही मराठी जनतेने
उघड्या डोळ्याने पहिले. खोपकर सारखा सच्चा कार्यकर्ता गैंगष्टर सारखा
भररस्त्यात मारला जातो..वरतून पुन्हा गद्दारांचा खोपकर करु अशी
भाषा केली जाते. रमेश किणी सारखा सामान्य चाकरमानी एका फ्ल्याट
च्या व्यवहारा साठी जीवानिशी मारला जातो हें सुद्धा महाराष्ट्रातील
जनतेने पहिले. जी शिवसेना ८० % समाज कारण आणि २० % राजकारणाची
भाषा करीत होती त्याच शिवसेनेच्या हातात सत्ता सोपवल्या नंतर
सुरेश जैन- धूत सारखे व्यापारी गोळा झाले हें ही जनतेने पहिले.
काँग्रेस निदान लोण्याचा गोळा काढून घेवून ताक तरी जनतेच्या हाती
देतात, हें बोके मात्र लोणी मटकाऊन ताकाने आंघोळ करतात.
म्हणून  जनता या प्रकाराला वैतागली आणि जनतेने सेना-भाजप
युतीला झिडकारले.  आता विरोधी पक्ष म्हणूनही सत्ताधारी सरकारवर
अंकुश ठेवण्यात युतीचे पक्ष आणि नेते अयशस्वी ठरत आहेत,
आणि या अवनितीला केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पोकळ
मराठी प्रेमाचे नाटकी राजकारण जबाबदार आहे.

-रवींद्र तहकीक

No comments:

Post a Comment