आदरणीय अनिता तार्इंनी २०११ मध्ये हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण लेखांनी जातीयवाद्यांच्या तंबूत घबराट पसरली. ब्लॉगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण होऊ लागले. काही ब्लॉग तर केवळ अनिता ताई यांना विरोध एवढ्या एकाच उद्देशाने काढले गेले. लोकशाहीत विरोध नोंदविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ‘अनिता पाटील विचार मंच'चे (अपाविम) संपादक मंडळ विरोधकांचा तिरस्कार करीत नाही. उलट विरोधकांची दखल घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आमच्या ब्लॉगच्या विरोधातील लिखाण या पुढे टप्प्याने वाचकांना उपलब्ध करून दिले जाईल. ‘आमचे विरोधक' या सदरात हे लेख प्रसिद्ध होतील. ‘मिसळ पाव' या संकेत स्थळावरील लेखाने या सदराची सुरुवात करीत आहोत. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘मिसळ पाव'वर प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया वाचकांनी अवश्य वाचाव्यात.
-संपादक मंडळ, अपाविम.
Published on मिसळपाव (http://www.misalpav.com)
पु.ल :महाराष्ट्राचे लंगडे व्यक्तिमत्व !
प्रेषक, तर्री, Mon, 17/09/2012 - 12:46
नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. ह्या ब्लॉग मध्ये अतिशय वैचारिक , पुरोगामी व बहुजनहिताय लेखन केलेले आहे. अनेक तथाकथित मान्यवरांची धोतरे , तुमानी टराटरा फाडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज - ज्यांना साहित्य चोरी करता ज्ञानपीठ देण्यात आले त्यांचा समावेश आहे. आता कुसुमाग्रजांवर / त्यांच्या नाटकावर शेक्पिअरचा प्रभाव होता हे स्वतः तात्यासाहेब म्हणायचे ! पण हया ब्लॉग च्या विदुषींनी वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या “नटसम्राट” हया नाटकात कशी शेक्पिअरची वाक्ये उचलली आहेत ? त्याचा अती सखोल अभ्यास केला आहे. सर्व सामान्य वाचकास हे संशोधन झेपणारे नाही. म्हणून वाचण्या पासून मी परावृत्त त्यांना करत आहे व ब्लॉग चा संदर्भ जाहीर पणे देत नाही आहे. कुसुमाग्रज ह्यांचे असे वस्त्र हरण व्हायलाच हवे होते आणि ते झाले ह्याचा अतीव आनंद समग्र नाशिक नगरी प्रमाणे मलाही होतो आहे.
अती आनंदाची गोष्ट म्हणजे ह्याच विदुषींनी केलेले पु.ल. देशपांडे ह्यांच्या लेखनाची समिक्षा ! जवळ जवळ त्यांची हजामत !! “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” असे ज्यांना त्यांचे पगारी भाट म्हणतात तेंव्हा आम्हाला अती दु:ख होते. हया विदूषकाला महाराष्ट्राने उगाचच चढवून ठेवला होता. अहो ह्यानी कधी आपले हात माती मध्ये काळे केले नाहीत , एकाही साखर कारखान्याचे जे मतदारही नाहीत व ज्यांनी कधीही शाहू महाराजांना मानले नाही (उलट एक धिप्पाड माणूस अशी त्यांची अवहेलनाच केली ) त्याला का म्हणून “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” म्हणायचे ? हा सगळा सुनिता बाईंच्या (ह्याच त्या ज्यांनी मुक्तांगणला देणगी देवून विशिष्ठ लोकांना व्यसनांच्या गर्तेत फेकले ) “गोबेल्स नीतीचा” भाग होता.
आज हा ब्लॉग वाचल्यावर माझे डोळे ज्यांनी उघडले त्या ब्लॉग कर्तीचे कसे आभार मानावेत हेच सुचत नाही आहे !
मी ही एके काळी पापी होतो. पु.ल. चे ( ह्याची गुंडगिरी व दडपशाही इतकी होती की लोक त्याला खाजगीत भाई म्हणत असत ) लेखन मी अधाश्या सारखे वाचत असे. त्याच्या लेखनाने माझी अभिरुची इतकी बिघडवली की विचारून सोय नाही. हया बिघडलेल्या अभिरुची ची ३ उदाहरणे देवून मी माझ्या संशोधनाचा पहिला सर्ग संपवणार आहे.
१. हया पी.एल. च्या अतीसामान्य लेखना मुळे मला इतर विनोदी लेखकांचे विनोद आवडेनासे झाले होते. माझ्या आयुष्यतील आनंदच ह्याने काढून घेतला होता. शक्ती कपूर , कदर खान सारखे विनोदी नट जेंव्हा हसवून हसवून प्रेक्षकांच्या पोटात दुखावत असत तेंव्हा मी कसनुसा होत असे . शक्ती कपूर , कादरखान , ह्यांचे उच्च , दर्जेदार विनोद न समजण्याची माझी सुमार बुद्धी ! आज आठवून हसू येते . हा दोष हया साल्या पिल्याचाच !
२. पिल्या स्वतःला मोठा संगीतकार समजायचा. नुसते पेटी वाजवून काय कोणी संगीतकार होते. पण हा ही त्या पुणेकरांचा कंपूबाजपणा ! ज्या पुणेकरांनी कधी रेड्याचे रेकणे ऐकलेले नाही , त्यांचा हा संगीतकार ! माझी संगीताची जाण ह्याच्या लेखना मुळे बिघडली. बांगो , बांगो , बांगो सारख्या गाण्यावर कुले वाकडे करायचे सोडून कानावर हात ठेवण्याचा माझ्या करंटेपणाला “हाच” xxx जबाबदार. ( पु.ल. इतक्या घाण शिव्या देत असे वर xxx छापत असे – ते परत केंव्हातरी ) संगीत भूषण भप्पी लाहिरी , संगीतमार्तंड अन्नू मलिक ह्यांचे संगीत मला कधी झेपलेच नाही. आता मी संस्कृती वस्त्र सोडले आहे म्हणून मी खूप नागडा आहे. सुखी आहे. “दिल गार्डन गार्डन हो गया” सारख्या गाण्याचा परम आनंद घेता येतो.
३. हयाच्या हलक्या व प्रतिभाशून्य लेखनाने माझी वाचनाची आवड बिघडवून टाकली. नव साहित्य व नव कविता हयाला कधीही जमली नाही. हया प्रतीगाम्याला कायम पुण्याचे जोशीच दिसले. रामोशी नाही दिसले ! इतके टोकदार नव साहित्य मराठी मध्ये येत होते आणि मी मात्र नस्ती उठाठेव करत होतो. ह्याचाच लेखनाने माझ्या मनात नवसाहित्याची घृणा निर्माण झाली . त्याची भरपाई म्हणून ताबडतोप त्या पुणेकराची मक्का असलेल्या नारायणपेठेचे नामकरण तातडीने “नानू सरंजामे “ पेठ असे करण्यात यावे ही मागणी मी हया संशोधनखंडाच्या अखेरीस करीत आहे. पु.ल. च्या लेखनाने बहकलेले त्याला भरघोस पाठिंबा देतीलच.
मला माहित आहे की माझ्या सारखेच अनेक पु.ल.ग्रस्त आज समाजात लाजिरवाणे जीणे जगत आहेत. पण मित्रानो घाबरू नका. संघटीत व्हा.
वेळ परिवर्तनाची आहे , प्रबोधनाची आहे , प्रवार्तानाची आहे , प्रतिक्रियेची आहे ,प्रसावायची आहे आणि प्रातर्विधीची आहे . आपला हुंकार जोरात भरा. बाहेर येवू द्या सगळी घाण तरच समाज ठेवेल तुमची जाण !
जय रेडे-स्वर !
लेखनविषय::
विडंबन [1]
लेखनप्रकार:
प्रतिसाद [2]
Source URL: http://www.misalpav.com/node/22760
No comments:
Post a Comment