Wednesday 17 April 2013

म्हणे, ब्राह्मणांसाठीच ईश्वर अवतार घेतो

पांडुरंगबुवा आठवले यांचा आणखी एक बोगस सिद्धांत

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगबुवा आठवले हे आपल्या नावापुढे शास्त्री ही पदवी लावतात. शास्त्र शिकवतो तो शास्त्री! पांडुरंगबुवा आठवले कोणते शास्त्र शिकवितात? पांडुरंगबुवा हे ब्राह्मणी वर्चस्वाचे शास्त्र शिकवितात. पण,  जातीभेद करणे हे शास्त्र कसे काय असू शकते? पांडुरंगबुवांची शिकवण हे शास्त्र नसून बहुजन समाजाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी वापरले गेलेले शस्त्र आहे.

एकादशीला उपवास करून संतांची भजने म्हणणा-या वारकरी व अन्य वैष्णवांसाठी ईश्वर अवतार घेत नाही, असा दावा पांडुरंग बुवा आठवले यांनी केल्यानंतर लोकांच्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की, मग ईश्वर पृथ्वीवर अवतार कोणासाठी घेतो. यावर आठवलेबुवा अत्यंत खुबी उत्तर देतात : ईश्वर हा केवळ ब्राह्मणांसाठीच अवतार घेतो!

'दशावतार' या पुस्तकात आलेले या विषयावरील विवेचन भयंकर विषारी आहे. भारतीय समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले पाहिजे. इतर सर्व जातींनी ब्राह्मणांच्या आज्ञेत राहिले पाहिजे अशाच आशयाची शिकवण पांडुरंगबुवांनी या विवेचनात दिली आहे. या पुस्तकात छापलेले परशुरामाच्या अवतारावरील पांडुरंगबुवांचे प्रवचन इतके जातीयवादी आहे की, त्याची तुलना कोणाशीच करता येऊ शकत नाही. या प्रवचनात ‘विदुषक ब्राह्मण' या विषयी काही विवेचन आले आहे. ते पाहिले की याची प्रचीती येते.

आठवले म्हणतात : ‘..तुम्ही जुनी नाटके वाचा. त्यात एक ब्राह्मण असतो. त्याला विदुषक म्हणून दाखविले जाते. आजही अधिकांश ब्राह्मण विदुषकाप्रमाणेच बनत चालले आहेत. कित्येक वेळा ब्राह्मणांची अशी अवस्था झाली आहे. आणि वारंवार भगवंताला अवतार घ्यावा लागला आहे...ज्यांच्यावर वैदिक संस्कृती, भारतीय गौरव, भारतीय सभ्यता व मानव सभ्यता ह्यांची फार मोठी जबाबदारी आहे अशा ब्राह्मणांना ज्यावेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते. त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही...'१

आठवलेबुवांचे प्रवचन खरे मानले तर ज्या काळी वर उल्लेखिलेली नाटके आली, तेव्हाच देवाने अवतार घ्यायला हवा होता. पण अजून तरी तो अवतरलेला नाही. ब्राह्मणांना विदुषक बनवूनही देव आलेला नाही, याचाच अर्थ आठवल्यांचा कथित वैदिक सिद्धांत खोटा ठरला आहे. 

बहुजन समाजाचा विदुषक झाल्यावर देव काय करतो?
भारतीय समाज-संस्कृतीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवी सभ्यतेची जबाबदारी केवळ आणि केवळ ब्राह्मणांवर आहे, असा भ्रम येथे आठवलेबुवा निर्माण करतात. पण, संस्कृतीचा हा मक्ता ब्राह्मणांना कोणी दिला? ब्राह्मणांचा विदुषक झाल्यावर देव अवतार घेत असेल तर बहुजन समाजाची अवस्था विदुषकासारखी झाल्यावर देव काय करतो. सर्कशीतील विदुषकाची लोक जशी गंमत पाहतात, तशी देव बहुजनांची गंमत पाहतो का? बहुजन समाज देवाच्या पोटाखाली आलेला आहे, असे आठवल्यांना वाटत होते की काय कोण जाणे? ब्राह्मणांना देवाने निर्माण केले आणि बहुजनांना  सैतानाने निर्माण केले, असे काही आहे का? 

आठवलेबुवांच्या या विवेचनात एक मोठी मेख आहे. ‘ब्राह्मणांना ज्या वेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते', असे जेव्हा आठवलेबुवा म्हणता, तेव्हा त्यांना बहुजनांना धाक घालायचा असतो. खबरदार, ब्राह्मणांच्या विरोधात काही बोलाल तर देव तुमचा बंदोबस्त करील, अशी ताकीद आठवले देऊ इच्छितात. धर्माची भीती घालून ब्राह्मणांनी हजारो वर्षे पोटे भरली. तोच उद्योग येथे आठवलेही करून जातात.

ब्राह्मणांना देवाने जन्मत:च जानवे घालून का पाठवले नाही?
आम्ही सांगतो, ब्राह्मणांचीच काय कोणाचीच अवस्था विदुषकासारखी होता कामा नये. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. तरच हा समाज टिकेल. ब्राह्मण हे देवाचे आवडते आहेत आणि बहुजन नावडते आहेत, असे जर आठवले आणि त्यांच्या स्वाध्याय परिवाराला वाटत असेल, ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत असे म्हणावे लागते. फक्त ब्राह्मणच देवाचे लाडके असते, तर देवाने ब्राह्मणांना मातेच्या पोटात असतानाच जानवे घातले असते आणि ब्राह्मणाचे मूल हे जानवे गुंडाळूनच जन्माला आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. बहुजनांची मुले जशी नाळ गुंडाळून जन्माला येतात तशीच ब्राह्मणांची मुलेही नाळ गुंडाळूनच जन्माला येतात. हाच खरा सिद्धांत आहे. या सिद्धांताला तुम्ही वैदिक म्हणा नाही तर अवैदिक, पण तोच सत्य आहे.

संदर्भ
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ८४,८५ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई. 


वरील विवेचनाचा पुरावा म्हणून पांडुरंग आठवले यांच्या दशावतार या पुस्तकातील एका पानाची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासू वाचकांनी ती अवश्य पाहावी. 


4 comments:

  1. Vidarak chitra ahe he. Samajat pandurangbuvansarkhi lok punha bhedabhed anu icchit ahet. Apla lekh abhyaspurna ahe. Dhanyavad post kelybddal. Tumhi aplya samajala jagrut karnyacha khup motha kam karat ahat. Tumchya ya karyala shubhechha.
    NAMO BUDDHAY

    ReplyDelete
  2. Iscon या संस्थेतही सांगितलं जातं की तुम्ही या जन्मात मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला ब्राह्मणां सारखे आचरण करावे लागेल अशा बऱ्याच संस्था आहेत मला असा प्रश्न पडतो की भगवतगीता युद्धभूमीवर एका क्षत्रियाने दुसऱ्या क्षत्रियाला सांगितलेली त्याला प्रेरित करणे साठी युद्ध करण्यासाठी त्याला तयार करण्यासाठी सांगितलेली उपदेशपर पुस्तिका आहे असा पुन्हा शकतो ब्राह्मणत्व आले कुठे असा प्रश्न ी बर्‍याच लोकांना विचारला पण या तथाकथित ब्राह्मणांनी याचे उत्तर देण्याची सोयीस्कर रित्या टाळले एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये राम आणि कृष्ण हे सर्वश्रेष्ठ मानले जातात पण यांनी अवतार घेण्यासाठी क्षत्रियांची घराणी का निवडली आणि त्यांनी जर क्षत्रियांची घराणी निवडली तर ब्राह्मण श्रेष्ठ कसे नचिकेता या ब्राह्मण पुत्रास साक्षात यम एका कसायाकडे ब्रह्मज्ञान मिळविण्यासाठी पाठवतात मग मला नक्कीच प्रश्न पडतो की कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ

    ReplyDelete
  3. Yatil Purna paragraph post kela pahije.
    Karan sentence kadhi Suru zale kenvha taycha artha ardhavat lagat aahe....
    Please pahile page pathav anita...

    ReplyDelete
  4. तुम्ही संपुर्ण पुस्तक वाचले आहे काय

    ReplyDelete