Wednesday 2 October 2024

जणू ही गोळी फक्त गांधींसाठी होती!

इ.स. १९३७ ते इ.स. १९४७ सावरकरांनी जे लढे दिले त्यांचे स्वरूप भागानगर निःशस्त्र प्रतिकाराचे तरी होते किंवा निवडणुका लढवण्याचे तरी होते. केळकरांच्यासारख्या टिळकानुयायांनी तर कोणताच लढा दिला नाही! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना फक्त संघटनाच बांधत बसली! हे सगळेच हिंदुत्ववादी इ.स. १९२० नंतर फक्त प्रतिसहकारवादी झाले. इंग्रजांच्या विरुद्ध एकही हिंदुत्ववादी लढ्यात कधी उतरलाच नाही. हा स्वातंत्र्याच्या चळवळीशी असणारा सर्व हिंदुत्ववाद्यांचा बेजबाबदार घटस्फोट आज तरी गोळवलकर मोकळेपणाने स्वीकारण्यास तयार आहेत काय? लढले गांधीजी. तो लढा करणारे किती बावळट आहेत याची मिटक्या मारत वर्णने केली हिंदुत्ववाद्यांनी! न लढणाऱ्यांचा हा वाचाळपणा सतत २५ वर्षे टिकलेला एक स्वातंत्र्यद्रोह होता, हे मान्य करण्याची ज्यांची तयारी नसते त्यांनी गांधींना स्वातंत्र्यलढ्याचे नेते म्हणण्यात अर्थ नसतो! कारण ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याशी फक्त वैरच केले ते तुमचे जिव्हाळ्याचे जिवलग असतात. निदान हैद्राबादचा लढा हा तर मुस्लिमविरोधी होता. भारताची एकात्मता निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढ्यात तरी काय भाग घेतला? शक्ती लहान असणे हा गुन्हा नसतो. स्वातंत्र्यलढा चालू असताना शक्ती न वापरणे हा मात्र गुन्हा असतो! निझामावर बॉम्ब फेकणारा पुन्हा गांधींचा जयघोष करणाराच असतो. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रझवी दिसला नाही. निझाम व जिना दिसले नाहीत. या पिस्तुलातील गोळी इ.स. १९२० नंतर इंग्रजांच्याही विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी फक्त गांधींसाठी होती!

गांधींना हिंदुत्ववाद्यांनी नेहमीच द्वेष्य मानले. मुसलमान फाळणी करून वेगळा तुकडा मागत होते, त्यांचा फारसा द्वेष हिंदुत्ववाद्यांना वाटला नाही. त्यांचा सगळा तिरस्कार अखंड भारत टिकवण्यासाठी सतत मुसलमानांना सांभाळून घेणाऱ्या गांधींच्या विरुद्ध उफाळून आला! अखंड भारतात बंगाल, पंजाब, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत हे चार प्रांत मुस्लिम बहुसंख्येचे होते. काश्मीर हे संस्थानही मुस्लिम बहुसंख्येचे होते. या भागात अखंड भारतवादी शक्तींनी निवडणूक जिंकल्याशिवाय अखंड भारत निर्माण होणे शक्यच नव्हते. शनिवारवाड्यासमोर 'हिंदुस्थान हिंदुओंका' अशी घोषणा करणे सोपे होते; पण या घोषणेवर सिंध, पंजाबच्या निवडणुका कशा जिंकता आल्या असत्या, याचा असणारा विचार करण्यास हिंदुत्ववादी शुद्धीवर होते कुठे? हिंदू हे एक स्वयंभू राष्ट्र असून मुसलमान हे आपल्यापेक्षा पृथक् राष्ट्र आहे, हेच तर हिंदुत्ववाद्यांचे तुणतुणे होते! जर मुसलमान हे वेगळे राष्ट्र असतील तर त्यांचा बहुसंख्य प्रदेश हिंदुस्थानच्या बाहेर जाणारच, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती.

भारताची फाळणी टाळण्यात गांधींना अपयश आले, हे कुणीच नाकबूल करणार नाही. पण हे अपयश का आले? मुसलमानांशी करारामागून करार करत टिळक-गोखल्यांच्या वाटेने गांधी निघाले असते तर भारत अखंड राहिला असता, पण मग ४० कोटी हिंदूंचे जीवित सांस्कृतिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले असते; आणि भारताचे भवितव्य राजकीयदृष्ट्या अंधारले असते! हिंदूंचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ देण्यास गांधीजी तयार नव्हते, म्हणून फाळणी टळू शकली नाही. मुस्लिम समाजाला वेगळे राष्ट्र मिळत असताना त्यांना अल्पसंख्य म्हणून राहण्यात प्रेम कसे वाटावे? शिवाय त्यांच्या मदतीला इंग्रजांची फुटीर नीती होतीच. म्हणून गांधी अखंड भारत टिकवण्यात अयशस्वी झाले. गांधींचे अपयश मान्य केले तरी अखंड भारत टिकवण्याची लढाई ते सर्व सामर्थ्यानिशी खेळले होते. जे लढत राहिले आणि शक्ती अपुरी पडल्यामुळे पराभूत झाले त्यांचे नेते गांधी होते; पण ज्यांनी लढाच दिला नाही, अखंड भारत टिकवण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त मान्यच करून टाकला त्यांचे वर्णन कसे करावे ? हिंदुत्ववाद्यांनी नेमके हेच कार्य केले. अखंड भारताचा तोंडाने जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद मान्य केला आणि अखंड भारत टिकवण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला! पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाट्या पिटणाऱ्यांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता. ही मीमांसा गोळवलकरांना मान्य आहे काय? ही मान्य असेल तर गांधी प्रातःस्मरणीय ठरवण्यात अर्थ असतो. एरव्ही जे लढताना मेले आणि जे अंथरुणावर झोपून मेले त्या दोघांनाही सारखेच वंदनीय ठरवण्यात अर्थ नसतो!

- नरहर कुरुंदकर
(शिवरात्र लेख - श्री. गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी, पृष्ठ ३३-३४)