Sunday, 26 October 2014

"कविता सागर" दिवाळी अंकात "अपाविमं"चे लेख

जयसिंगपूर येथून ‘कविता सागर' हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. अनिल दुधाट पाटील हे या दिवाळी अंकाचे संपादक असून, डॉ. सुनिल पाटील हे प्रकाशक आहेत. मोठा वाचक वर्ग असलेल्या या दिवाळी अंकात अपाविमंवरील दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. अपाविमंच्या संस्थापिका आदरणीय अनिता पाटील यांचा ‘कुणबी मराठा एकच : तुकाराम गाथ्यातील पुरावे' हा लेख या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अपाविमंचे कार्यकारी संपादक राजा मइंद यांची ‘ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले' ही संपूर्ण लेखमाला कविता सागर दिवाळी अंकांत घेण्यात आली आहे. कविता सागर हा दिवाळी अंक अत्यंत दर्जेदार असून, वाचकांकडून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. कविता सागरच्या टिमला अपाविमंच्या मनापासून शुभेच्छा. 

'कविता सागर' हा दिवाळी अंक
कविता सागर हे केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणारे व जगभरात वाचक असलेले एकमेव नियतकालिक आहे; कवितासागरच्या या वेगळेपणाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी कवितासागरच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्काराने सन्मानित केले असून कविता सागर राबवीत असलेल्या उपक्रमांची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. 

कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवामार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला आहे.  मराठीत दरवर्षी एक हजारच्या आसपास दिवाळी अंकांच्या रूपाने दर्जेदार साहित्य तयार होत असतं. महाराष्ट्रातील मराठी साहित्य प्रेमींना याचा आस्वाद घेणे शक्य असते. पण महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशात राहणा-या मराठी बांधवांना ऑनलाइनच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य फारच कमी प्रमाणात पोहचते. कवितासागरमधील साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कवितासागर दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.
  
कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर गेल्या अनेक वर्षापासून ‘कवितासागर’ दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता, त्याचंबरोबर या पूर्वीही सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.