Thursday, 24 July 2014

धनगरांच्या कुंडलीतला "ड"!

धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही आधीपासून धनगर समाजाच्या प्रवर्गाचा विषय दोन्ही काँग्रेसने अधांतरी लटकावून ठेवला आहे. केंद्र सरकारच्या यादीत धनगर ही जात अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र धनगरांना भटक्या जमाती या स्वतंत्र प्रवर्गात टाकले आहे. भारत सरकारचा कारभार इंग्रजीत चालतो. कोणताही जीआर इंग्रजीत निघतो. नंतर त्याचे भाषांतर हिंदी  आणि इतर भाषांत होते. भारतीय भाषांतील"र" हा वर्ण इंग्रजीत जाताना "ड" होते. धनगर या शब्दाचेही तसेच झाले. "र" चा "ड" होऊन धनगरच्या जागी धनगड आला. या "र" ने मोठा घोटाळा केला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या कुंडलाीत बसलेला हा ड समाजाला गेली कित्येक दशके छळत आहे. धनगड आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत, असे गृहीत धरून राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे हक्क नकारले. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर या मुद्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकारने यावर एक बैठकही घेतली. पण, मधुकर पिचड आणि वळवी यांसारख्या वजनदार नेत्यांनी हा निर्णय रोखला. आपल्या जातींच्या आरक्षणात त्यांना वाटेकरी नको आहेत.

धनगर-धनगड एकच! 
या विषयावर संजय सोनवणी हे गेली अनेक वर्षे लिहित आहेत. त्यांनी या विषयी खरोखरच सखोल अभ्यास केलेला आहे, असे त्यांच्या लिखाणावरून दिसून येते. एका लेखात सोनवणी यांनी या विषयाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की,
"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत "Oraon and Dhangad" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात "ओरान, धनगर" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही "धनगर/धनगड" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी "महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत" असे विधान केले होते.

आरक्षणाबाबत अपाविमंची भूमिका स्पष्ट आहे. हक्कदार जाती-जमातींना न्याय्य वाटा मिळायलाच हवा. धनगर समाज अनुसूचित जमातीत येत असेल, तर त्याला तो हक्क मिळायलाच हवा. कोणी मंत्री समाजाचा हक्क नाकारू शकत नाही.

3 comments:

  1. हा लेख माझ्या ब्लोग वर टाकू का ?

    प्रकाश पोळ.

    ReplyDelete
    Replies
    1. अवश्य टाका. अपाविमं वरील लेख कॉपीराइट मुक्त आहेत.

      Delete
  2. तुमचा काहीतरी घोळ होतोय. तुमच्या मते धनगर आदिवासी आहेत काय?

    ReplyDelete