Tuesday 22 January 2013

संभाजी ब्रिगेड आणि मी

-महावीर सांगलीकर
(हा लेख महावीर सांगलीकर यांच्या महाविचार या ब्लॉगवरून घेतला आहे.)

संभाजी ब्रिगेडशी माझा संबंध २००४ या वर्षाच्या आसपास आला. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराजांबद्दल आपल्या पुस्तकात जो बदनामीकारक मजकूर लिहिला, तो उघडकीला आल्यावर पुण्यात ज्या निषेध सभा व्हायला लागल्या त्या काळात संभाजी ब्रिगेडच्या अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची शाखा, त्यामुळे सेवा संघाच्या नेत्यांचीही ओळख झाली. 

याच काळात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष खेडेकर साहेबांच्या एका भाषणात अस उल्लेख आला की चक्रवर्ती सुभौमाने परशुरामाला युद्धात मारून टाकले होते आणि त्याचा उल्लेख जैन साहित्यात आहे. पण तो उल्लेख नेमका कोठे आहे याची कोणालाच माहिती नव्हती. खूप प्रयत्न करून मी ती माहिती शोधून काढली. त्यावर एक लेख लिहिला आणि खेडेकर साहेबांना दाखवला. त्यांनी तो लेख मराठा मार्ग या मासिकाकडे पाठवण्यास सांगितला. पुढे तो लेख त्या मासिकात छापुनही आला. कांही दिवसांनी या विषयावर मी 'परशुरामाचा वध' हे संशोधनात्मक छोटे पुस्तकही लिहिले. (हे पुस्तक माझे मित्र नरेश जाधव यांनी प्रकाशित केले). या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. हे पुस्तक मी डॉ. आ.ह. साळुंखे यांना अर्पण केले होते. पुढे डॉ. आ.ह. साळुंखे यांनी 'परशुराम: जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे' या आपल्या पुस्तकात परशुरामाच्या जैन साहित्यातील कथेवर विस्ताराने लिहिले. 

पुढे बराच काळ मी संभाजी ब्रिगेडमध्ये गुंतत गेलो. दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा काढून टाकण्याच्या चळवळीत भाग घेतला. मी ब्राम्हण विरोधी कधीच नव्हतो, पण ब्राम्हणांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात नेहमीच राहिलो आहे. त्या काळात माझा हा विरोध उफाळून आला. अनेक नवीन तरुणांना संभाजी ब्रिगेडशी जोडले. एका कट्टर शिवसैनिक स्थानिक नेत्याला ब्रिगेडशी जोडण्यात मला यश आले. त्यानेही दादोजी कोंडदेव पुतळा हटवण्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली. अखेर एके रात्री पुतळा हटवण्यात आला, पण त्याची चाहूल मला आधीच लागली होती. ती रात्र चक्क जागून काढली. अपेक्षेप्रमाणे पुतळा हटवला गेला आणि कांही मिनिटातच मला तसा फोन एका कार्यकर्त्याकडून आला. 

चिंचवड येथे एका व्याख्यान मालेचे ब्राम्हणी नाव बदलण्यासाठी मी यशस्वी प्रबोधन केले. पुढे त्या व्याख्यान मालेत शिवश्री प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान ठेवण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. दुस-या दिवशीच्या एका व्याख्यानात एका ब्राम्हणवाद्याने स्टेजवर येवून कालच्या व्याख्यानावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला. कालच्या भाषणात सोळुंके यांनी 'शिवधर्मात भटांना प्रवेश नाही' असे उदगार काढले होते. त्यावर या ब्राम्हणवाद्याने 'म्हणजे तुम्ही डोक्याला प्रवेश देणार नाही' असे उदगार काढले. व्याख्यान मालेच्या आयोजकाचे या विषयावर आधीच प्रबोधन झालेले असल्याने त्याने त्या ब्राम्हणवाद्याच्या हातातील माइक काढून घेतला, स्टेजवरून खाली जाण्याचा हुकूम दिला आणि तब्बल अर्धा तास ब्राम्हणवाद्यांच्या स्वत:ला समाजाचे डोके समजण्याच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले. खाली आलेला त्या ब्राम्हनवाद्याचे मीही थोडे बौद्धिक घेतले. 

पुढे संभाजी ब्रिगेडमुळेच बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांशी संबंध आला. त्यांचे अतिरेकी विचार मला कधीच पटले नाहीत. संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांच्या नादी लागून वहावत चालली आहे हे स्पष्ट दिसून आले. कदाचित संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांचा वापर करून घेत असावी अशी शंका आली. कांही बाबतीत ही संघटना बोटचेपी भूमिका घेते हे स्पष्ट पणे दिसून आले. उदाहरण म्हणजे डॉ. विनोद अनाव्रत या लेखकाने लिहिलेले 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' हे पुस्तक. हे पुस्तक जेम्स लेनलाही लाजवेल असे आहे. पण संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर मौन बाळगले. (या पुस्तकाचे परीक्षण पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव येथे वाचा) तसेच कांही नवबौद्ध वक्ते आणि लेखक 'जिजाऊ महार होती' अशी थेअरी मांडतात, त्यालाही ब्रिगेडचे वक्ते-नेते आक्षेप घेत नाहीत, उलट माना डोलावतात, ही गोष्ट मला अनाकलनीय वाटली. 

संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी तरुणांमध्ये हिंदू धर्माबद्दल द्वेष आणि बौद्ध धर्माबद्दल अतिप्रेम तयार केले आहे. मला या दोन्ही गोष्टी चुकीच्या वाटतात. हिंदू धर्मातील वैदिक पंथ काढून टाकला की जो उरतो तो शैव धर्म आहे. तो मराठ्यांचा खरा धर्म आहे. तसेच मध्ययुगीन काळापर्यंत मराठ्यांमध्ये जैन धर्म मोठ्या प्रमाणावर होता याचे अनेक पुरावे देता येतील. पण पूर्वी मराठे बौद्ध होते अशा बामसेफी प्रचाराला ब्रिगेडचे लेखक, वक्ते आणि अनुयायी बळी पडत आहेत. खरे म्हणजे मराठे पूर्वी बौद्ध होते याला कसलाही पुरावा नाही. (कृपया वाचा:वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे? ). बामसेफला खूष करण्यासाठी शिवाला नाकारणे, गांधीजींवर टीका करणे ही फारच विचित्र गोष्ट आहे. 

ओ.बी.सींच्या तथाकथित बौद्ध धर्मांतराला मराठा सेवा संघाने पाठींबा दिला आहे. त्यांच्या या धोरणाचीही मला गम्मत वाटते. बौद्ध धर्माचे गुणगान गायचे, पण स्वत: बौद्ध धर्म स्वीकारण्याऐवजी वेगळा शिवधर्म काढायचा, ओ.बी.सी. जाती बौद्ध धर्म स्वीकारत असतील तर त्याचे स्वागत करायचे पण त्यांना शिवधर्माची दारे बंद ठेवायची ही गोष्ट खटकते. आमचे अंतिम ध्येय बौद्ध धर्म हेच आहे, शिवधर्म हा एक थांबा आहे असे स्पष्टीकरण दिले जाते, पण मग ओ.बी.सी. जाती थांबा न घेता बौद्ध होणार आहेत म्हणे, तीच गोष्ट मराठा सेवा संघ का करू शकत नाही? असा प्रश्न तयार होतो. असो. 

वाघ्या कुत्र्याच्या बाबतीतील संभाजी ब्रिगेडची भूमिकाही मला चुकीची वाटते. अशा प्रकारांमुळे आपण बहुजनांतीलच घटकांना आपले शत्रू बनवतो याचे भान यायला पाहिजे.  

एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे. त्यांच्या विरोधकांना हे पटणार नाही, पण जे त्यांना जवळून ओळखतात, त्यांचे विचार जाणतात त्यांना ही गोष्ट पटते. खेडेकर साहेबांनी मराठा समाजातील अनेक अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती बंद होण्यासाठी अनेक यशस्वी प्रयत्न केले आहेत. तसेच मराठा आणि मुस्लिम समाजातील दरी कमी करण्यासाठी योग्य पाउले उचलली आहेत, त्यामुळे मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहात आले आहेत. खेडेकर साहेबांनी जे बीज रोवले आहे, त्याची चांगली फळे पुढील कांही दशकातच दिसू लागतील. पण खेडेकर साहेबांच्याकडे जी दूर दृष्टी आहे, ती दुस-या फळीतील नेत्यांकडे नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. 

बाकी कांहीही असले तरी संभाजी ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्राची एक गरज आहे. माझ्या या मतावर मी ठाम आहे. कारण ब्राम्हणवादी संघटनांना, ब्राम्हणी वर्चस्ववादाला फक्त हीच संघटना आळा घालू शकते. या संघटनेने ते अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. येथे हे लक्षात घ्यावे की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवाद्यांच्या संदर्भात बोलत आहे. असो. 

संभाजी ब्रिगेडने अधिक व्यापक भूमिका घेवून या संघटनेचा 'मराठा युवकांची संघटना' हा चेहरा बदलला पाहिजे, आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन तरुणांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे.

No comments:

Post a Comment