Saturday, 16 June 2012

भारतातील मुलींची पहिली शाळा


गेस्ट रायटर : महावीर सांगलीकर (नव्या पिढीतील विचारवंत, अभ्यासक)

भारतातील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? असा प्रश्न आपणास कोणी विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. त्यांनी ती कोणत्या साली काढली असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना ते साल सांगता येत नाही.

महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. यासाठी त्यांना आपल्या बायकोला, सावित्री बाई फुले यांना शिकवून मग शिक्षिका बनवायला लागले. या त्यांच्या महान कामास ब्राम्हणांनी आणि बहुजनांनीही मोठा विरोध केला. (त्या काळात महात्मा फुले यांना बहुजनांनी किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुलेंबरोबर मातंग, मुस्लीम आणि इंग्रज हेच होते असे दिसते) . पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या, तसेच त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती.

असे असले तरी भारतातील मुलींच्या शिक्षणाची सुरवात करण्याचे काम ब्रिटीश आणि अमेरिकन मिशन -यांनी केले ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही. इ.स. १८१० साली या मिशन -यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीनींची संख्या उल्लेखनीय होती.

महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. हा ब्राम्हण बहुल भाग होता व त्यांनी मुलींच्या शाळेला प्रचंड विरोध केला. प्यारी चरण सरकार यांना खुनाच्या धमक्या यायला लागल्या. अशा वेळी जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथी मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावीत झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

प्यारी चरण सरकार यांनी १८४७ साली स्थापन केलेली मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते.

इंग्रज व अमेरिकन मिशन-यांनी सुरू केलेल्या व कृष्ण बंधू, प्यारी चरण सरकार, महात्मा फुले-सावित्री बाई फुले यांनी पुढे नेलेल्या या कामास आलेले आणखी एक फळम्हणजे बेगम रोकेया शकावत हुसेन यांनी मुस्लीम मुलींसाठी काढलेली शाळा. बेगम हुसेन यांनी १९०९ साली बिहारमधील भागलपूर येथे मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरू केली. बेगम हुसेन हिच्या नव-याचे नुकतेच निधन झाले होते आणि त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे मुस्लीम समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला शाळा बंद करायला आणि घर सोडून जायला भाग पाडले. तेंव्हा ही बाई आपली शाळा बंद करून कलकत्त्याला आली व तिथे तिने १९११ साली आपल्या नव-याच्या नावाने शकावत हुसेन मेमोरिअल गर्ल्स स्कूल ही शाळा काढली. बेगम रोकेयाला तिच्या भावाने लिहायला-वाचायला चोरून शिकवले होते व पुढे तिच्या नव-याने तिला इंग्रजी भाषा शिकवली होती. बेगम रोकेयाने महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अनेक लेख व कथा लिहिल्या.

(सांगलीकर यांच्या शोध आणि बोध या ब्लॉगवरून साभार.)

No comments:

Post a Comment