गेस्ट रायटर : महावीर सांगलीकर (अभ्यासक, विचारवंत)
मागे ब-याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध लेखकाने महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता लवकरच जाणार या अर्थाचे भाकीत करणारा एक लेख लिहिला होता. महाराष्ट्रातील कांही, नव्हे अनेक लोकांना महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावी असे मनापासून वाटत असते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे अतिशय अवघड आहे, किंबहुना मराठ्यांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण या गोष्टी केवळ अशक्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मराठा समाज सत्ताधारी आणि शक्तिशाली आहे. त्याची कांही शक्तिस्थळे आहेत. अशी शक्तिस्थळे महाराष्ट्रातील इतर कोणत्याच समाजाकडे नाहीत. काय आहेत ही शक्तिस्थळे?
मराठ्यांची संख्या
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मराठ्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मतभेद आहेत. खुद्द मराठा समाज आपल्या समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे असे मानतो, तर मराठाविरोधी मानसिकता असणारे लोक ही संख्या फारतर २२ टक्के असावी असे म्हणतात. ते कांहीही असले तरी मराठा समाज इतर कुठल्याही समाजापेक्षा संख्येने जास्त आहे ही गोष्ट नक्की आहे. तो किमान ४० टक्के तरी असावा. भारताच्या कोणत्याही राज्यात लोकसंख्येचा एवढा मोठा भाग असणारा दूसरा समाज नसावा. मराठ्यांची ही मोठी संख्या हे त्यांचे सगळ्यात मोठे शक्तिस्थळ आहे. वर उल्लेख केलेल्या लेखकाने असे म्हंटले होते की महाराष्ट्रातील माळी, धनगर आणि वंजारी हे समाज एकत्र आले तर त्यांची लोकसंख्या मराठ्यांच्यापेक्षा जास्त होते, त्यामुळे ते एकत्र आले तर महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावू शकते. पण ही तर जर-तरची भाषा झाली. पहिली गोष्ट म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या मराठ्यांच्या पेक्षा जास्त असेल तर आणि आपण ती किमान ४५ टक्के आहे असे गृहीत धरले तर या चार समाजांची एकत्रित संख्या ८५ टक्के आहे असे मानावे लागेल. त्यात १२ टक्के मुस्लीम लोकसंख्या मिळवली की एकूण बेरीज ९७ टक्के होते. उरलेल्या तीन टक्के लोकसंख्येत ख्रिश्चन, जैन, बौद्ध, बौद्धेतर दलित, ब्राम्हण, लिंगायत, कुणबी, बलुतेदार जाती, आदिवासी आणि इतर शेकडो समूहांना बसवावे लागेल. याचाच अर्थ असा आहे की माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या फार मोठी आहे ही गोष्ट खोटी आहे.
आता राहिली गोष्ट माळी, धनगर आणि वंजारी यांनी एकत्रित येण्याची. भारतीय जातीव्यवस्थेचे स्वरूप बघितले तर अशा वेगवेगळ्या जाती एकत्र येवून राजकारण करतील ही गोष्ट अशक्य कोटीतील आहे. जिथे एकाच जातीच्या उपजाती एकत्र येण्याची मारामार, तिथे अशा वेगवेगळ्या जाती एकत्र कशा येणार? शिवाय एकगठ्ठा मराठा समाजाशी वेगेवगळ्या जातींनी एकत्र येवून स्पर्धा करणे आणि ती जिंकणे हेही अशक्यच आहे.
मराठ्यांचे नेटवर्क
मराठ्यांचे दुसरे मोठे शक्तीस्थळ म्हणजे त्यांचे जबरदस्त नेटवर्क. मराठा समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, खेड्या-पाड्यांमध्ये मोठ्या संख्येने आहे. हा समाज एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडला गेलेला आहे. या नेटवर्कचे प्रचंड फायदे या समाजाला राजकारणात आणि इतरही क्षेत्रात मिळत असतात. इतर समाज महाराष्ट्रभर पसरलेले नसल्याने त्यांचे ऑल महाराष्ट्र नेटवर्क तयार होवू शकत नाही. ज्यांचे होवू शकते त्यांची संख्या राजकारणाच्या दृष्टीने नगण्य आहे.
मराठ्यांची सत्तेची परंपरा
मराठा समाजाचे तिसरे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांना असलेली सत्तेची परंपरा. ही परंपरा अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरपासून चालत आली आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाला गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सत्ता सांभाळण्याचा शेकडो वर्षांचा अनुभव मिळाला आहे. अर्थातच या अनुभवाचा फायदा त्यांना मिळत आला आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाकडे सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती आली आहे, नेत्यांकडे संयम, मोजके आणि नेमके बोलणे, धडाडी, लोकसंग्रह करण्याचे वृत्ती यासारखे अनेक गुण आले आहेत.
सहकार चळवळ
मराठा समाजाचे चौथे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांची सहकार चळवळ. या समाजाने सहकार चळवळ गावोगावी नेली. त्यांनी अनेक सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअ-या काढल्या. इतर समाज सहकारी क्षेत्रात मराठ्यानएवढे काम करू शकले नाहीत. याचा राजकीय फायदा मराठा समाजाला नेहमीच होत राहिला.
आज मराठा समाजावर उघडपणे किंवा कुजबूज मोहिमेतून टीका करणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पण त्याचा फारसा कांही उपयोग होणार नाही. कारण मराठ्यांची ही शक्तीस्थळे त्यांना पुढील काळातही राजकीय फायदा देत रहाणार आहेत. शिवाय इतर कोणत्याही समाजाकडे अशी शक्तीस्थळे नाहीत आणि ती मिळवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
महाराष्ट्रातील कोणताही पक्ष मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. ज्या पक्षात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही, त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहातोच (आठवले का, कोणते ते पक्ष?). दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला मराठाविरोधी लोक मराठ्यांचा पक्ष म्हणून संबोधतात, पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष सर्व समावेशक आहेत. मराठ्यांना त्यात जास्त प्रतिनिधित्व आहे असे दिसते, पण ते त्यांच्या लोकसंख्येतील टक्केवारीला अनुसरूनच आहे. या पक्षांचे नेते मराठा या जातीचे नेते नसून सगळ्यांचे नेते आहेत, याउलट इतर पक्षांचे नेते त्यांच्या जातीचे नेते असल्याप्रमाणे वागत असतात.
...............................................................................
महाविचार या ब्लॉगवरून साभार
aaple lekh vachun jiv kalwalyoy
ReplyDeleteNice I like it
ReplyDelete